Wednesday, December 29, 2021

तीन अलक--( वीक एंड लिखाण )

१) कॅमेरा.--

महिला लैंगिक आत्याचार निर्मूलन समितीच्या अधिवेशनात एक मंत्री भाषण करत होते. प्रेक्षकात अर्थातच स्त्रिया होत्या. ते तावातावाने स्त्रियांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे सांगत होते. मी फोटोग्राफर म्हणून जबाबदारी पार पाडत होतो. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांनी मला खुणाऊन बोलावले आणि कानात प्रश्न विचारला. या अधुनिक काळात तुझा एवढा मोठा कॅमेरा कसा काय? मी त्यांना सांगितले की हा भारी आणि अद्यावत कॅमेरा असून फोटो सोबत हा मनातील भाव पण टिपतो. हे ऐकताच त्या स्त्रीलंपट मंत्र्याची पाचावर धारण बसली आणि त्याला धाप लागली.

२) अडगळ--
एका पंचतारांकित हॉटेलमधे मी तीन चार मित्रांबरोबर  रात्री जेवायला गेलो. उशीरापर्यंत मद्यपान आणि जेवणे झाली. दुसरे दिवशी सकाळी अकरा वाजता त्या हॉटेलजवळून कांही कामानिमित्त जात असता बरेच उरलेले अन्न तेथे ठेवले होते रस्त्याच्या बाजूला. म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे लोक अजून आले नव्हते कचरा गोळा करायला. सगळीकडे त्या अन्नाची  दुर्गंधी सुटली होती. लोक नाकाला हातरुमाल लाऊन जात होते.
उगाच मनात विचार आला की काल आपण हेच अन्नपदार्थ खूप महागड्या भावाने घेतले होते आणि त्यांचा आस्वाद पण घेतला होता. असेही वाटून गेले की जगात कितीही चांगली वस्तू असो कधी ना कधी ओंगळवाणी अन अडगळ होणारच. जशी समाजासाठी वृध्द माणसे!
३) तीन अंध--
माझ्या शेजारी एक कुटुंब रहात होते. घरात नवरा, बायको आणि तीन मुली होत्या त्यांच्या. मुलगा व्हावा म्हणून खूप प्रयत्न करत होते ते जोडपे. त्या बाईने चौथ्या वेळेस पुन्हा मुलीलाच जन्म दिला आणि तोही एका अंध मुलीला. जन्मांध होती ती. माझी पत्नी भेटायला त्या घरी गेली असता प्रसूत झालेली बाई वैतागून म्हणाली की हत्या करण्याची सजा जेल आहे म्हणून मी मजबूर आहे नसता मी या पोरीच्या नरड्याला जन्मताच नख दिले असते.
हे सारे पत्नीने मला सांगितले  मनात विचार आला की ती नवजात मुलगी तर अंध आहेच पण तिचे आई आणि बाबा पण मुलगा व्हावा या ध्यासाने अंधच आहेत. म्हणजे एका घरात तीन अंध.


निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
टीप..मला अलकचे नियम माहीत नाहीत. मी गुगलवर शोध घेतला पण कांही मिळाले नाही. पण कथा लघुकथेपेक्षा लहान लिहायचा प्रयत्न केला आहे. कुणाला माहीत असतील तर मला सांगावेत कृपया. कांही आशय खुणावत होते म्हणून लिहिले.

Monday, December 20, 2021

भाव कागदावरी उतरले

 

व्यक्त कराया गूज मनीचे

शब्दफुलांना वेचवेचले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


चित्रित करण्या तुला जीवना

शब्द कुंचला जरी घेतला

मला हवा तो रंग आयुष्या

तुझ्यामुळे तर मला लाभला

विश्व असोनी काळोखाचे

कैक काजवे तू पाठवले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


कविता लिहिल्या, गझला लिहिल्या

बिंब तुझे दावण्या जीवना

कधी गिलावा नाही केला

जे दिसले ते दाखवताना

स्पष्ट शब्द अन् स्पष्ट अर्थ हे

काव्यासाठी ध्येय ठरवले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


शब्दप्रभू असतात कैकजण

शब्दांचा मी दास बनावे

स्वप्न आजचे कधी ना कधी

स्वप्न पहाटेचेच ठरावे

हेच दान मा सरस्वतीला

मागण्यास मी हात पसरले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


सुरईमधले शब्दरुपी मय

प्याल्यामध्ये रोज ओततो

दु:ख विसरुनी प्राक्तनातले

सुरेल गाण्यांमधे रंगतो

जगणे झाले उत्सव आणिक

नवे जीवनी रंग बहरले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


रसिक माय अन् रसिक बापही

हीच भावना मनी नांदते

आशिर्वचने त्यांची मिळता

धन्य धन्य जाहलो वाटते

जे मी लिहिले, माझ्याकडुनी

रसिकजनांनी लिहुन घेतले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, December 4, 2021

जसा बहरला कल्पतरू--( वीक एंड लिखाण )

 एखाद्या दिवसाचे पूर्ण जीवनात अतिशय महत्व असते. तसे सर्वच दिवशी कांही ना कांही घडत असते जे माणसाच्या आयुष्यात   नगण्य असते. म्हणून बहुतेक दिवस "नेमेची येतो मग पावसाळा" या सदरात मोडणारे असतात. पण घरात नवीन अपत्याचे अगमन, मेहनतीने बांधलेल्या घराची वास्तुशांती, एखादी विशेष घडलेली घटना या मनात नेहमीसाठी जपाव्या अशा असतात आणि त्या जपल्याही जातात. सारे जीवनच एका अर्थाने  आकारत असते. हे जीवनाच्या घाईगर्दीत ध्यानातही येत नाही. पण जेंव्हा शांतपणे मागे वळून बघतो किंवा सिंहावलोकन करतो तेंव्हा सारा जीवनपटच डोळ्यासमोरून तरळतो. अनेक सुखदु:खाचे पैलू दिसावयास लागतात आणि आपण कुठेतरी हरवून जातो. यालाच जीवन ऐसे नाव म्हणत असावेत.

मी आणि माझी पत्नी सौ. जयश्री दोघांनाही आवर्जून दरसाली आठवणारा आणि आमच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला दिवस म्हणजे चार डिसेंबर ज्या दिवशी आम्ही विवाहबध्द झालो. ५२ वर्षापूर्वी आमच्या सहजीवनाची सुरुवात झाली. खूप चढउतार पाहिले जीवनात. या बद्दल जास्त बोलणे म्हणजे स्वतःची टिमकी वाजवल्यासारखे होईल म्हणून हा मोह टाळतो. पण जीवनात जे कांही चांगले घडले ते उत्कृष्ट आप्त, मित्र मंडळी, कर्यालयीन सोबती यांच्या सहकारामुळेच घडले हे मात्र नक्कीच. आजच्या या लिखाणाचे प्रयोजन या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करणे हेच आहे. परमेश्वराचे ऋण तर वादातीत आहे. हे ऋण व्यक्त करण्यासाठी एकदा मी लिहिले होते ते असे:


हातामध्ये हात धरोनी वसंत आम्ही सवे पाहिला

जगून झाले यथार्थ जीवन, मोह न कुठला मनी राहिला


दयाघना तव छत्र कृपेचे असेच राहो उरल्यायुष्यी

म्हणून तुझिया चरणावरती कृतज्ञतेचा भाव वाहिला


एकदा आम्ही दोघे गत आयुष्याचा आढावा घेत होतो. गप्पा बर्‍याच रंगल्या ज्यात मुलेही सामील झाली होती. जवळ जवळ दोन तास हा कार्यक्रम चालू होता. अशा गप्पा झाल्यानंतर माझ्या मनात आले की आपण किती छान जीवन जगलो.! या एकमेव सकारात्मक विचारातून एक कविता आवतरली. या कवितेतून आम्हा दोघांचेही मनोगत व्यक्त होते. ही कविता आपणासमोर नम्रतेने पेश करतोय.


जसा बहरला कल्पतरू----


हिशोब करता आयुष्याचा

कांही आठवू, कांही विसरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


जीवनातले कडे कोपरे

साठे माणिक मोत्यांचे

जेथे रमलो हळूच विणले

जाळे नात्यागोत्यांचे

कठीण समयी कधी न पडला

प्रश्न पुढे मी काय करू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


कष्टाविन का खडबड झाले

हात आपुले आज असे?

स्वतःच लिहिल्या नशीब रेषा

भाग्य आम्हाला हवे तसे

हिंमत आहे आकाशाला

कवेत अपुल्या सहज धरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


खूप राहिलो सूर्य प्रकाशी

संध्या छाया दिसू लागल्या

आठवणींच्या लक्ष तारका

वेचू त्यातिल सर्व चांगल्या

सूर मारुनी खोल सागरी

मोत्यांच्या ओंजळी भरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


धवल यशाची जणू पताका

जीवन करण्या शुभ्र साजरे

धाग्यांनी सुखदु:खाच्या विणले

आयुष्याचे वस्त्र गोजिरे

या वस्त्रावर आपण दोघे

इंद्रधनूचे रंग भरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


कांगारूचे जीवन जगलो

पोटी धरुनी दोन मुले

काबिज केले लिलया त्यांनी

क्षितिजापुढचे क्षेत्र नवे

पैलतीर तो दिसू लागला

डोळे मिटुनी ईश स्मरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू




निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, December 3, 2021

वात्सल्य---( वीक एंड लिखाण )

आई हा किती प्रेमळ, सर्वांचा आवडता, जिव्हाळ्याचा विषय! आईने एका अर्थाने संपूर्ण विश्व व्यापून टाकलेलं आहे. हिंदू धर्मात तर पूजनीय व्यक्तीमधे मातृदेवोभव, पितृदेवोभव म्हणत आईला आद्य स्थान दिलेले आहे.

माझा स्वतःचा कांही कविंना बोलल्यानंतरचा अनुभव आहे की बहुतांश कवी आपल्या आयुष्यात पहिली रचना आपल्या आईवरच लिहितात. 

प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई ही माधव ज्युलियन यांची कविता आणि आई म्हणून कोणी आईस हाक मारी ही कवी यशवंत यांची कविता या दोन्ही आई या विषयावर असल्यामुळेच अजरामर झाल्या. आई या विषयावर असंख्य कविता आहेत आणि या नवयुगात अजूनही त्या आवडीने वाचल्या/लिहिल्या जातात. सर्वांच्या जडणघडणीत आईचा मोठा वाटा असतो हे निश्चित.

माझ्या मनाला जे विषय जवळ आहेत काव्यलिखाणासाठी, त्यात आईला उच्च स्थान आहे. मी बर्‍याच कविता, गझला आईवर लिहिलेल्या आहेत. ही आईचीच कृपा असावी की जेंव्हा जेंव्हा मी आईवरील कविता/गझला काव्य संमेलनात वाचतो, श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.  मी एकदा बाबावर कविता लिहायची ठरवले. पण सर्वव्यापी आई या कवितेतही डोकावली, आणि तीही चक्क कवितेच्या ध्रुवपदात! कसे ते खाली पहा.


अनेक वेळा धाकधपटशा

क्वचित प्रसंगी लाडीगोडी

माय दुधाची मऊ साय अन्

बाबांचे बोलणे पहाडी

 

आई या व्यक्तिमत्वाचे रसायनच वेगळे आहे. आई ही कुणाचीही असो, ती सोशीक आणि मायाळूच असते. वाघ आणि सिंह हे माणसांना भले क्रूर वाटत असोत, आपल्या पिल्लांसाठी वाघीण किंवा सिंहीण ही मायेचा झराच असते. कनवाळू, मायाळू अशीच तुमच्या आमच्या आईसारखीच.

मला मी औरंगाबादला असतानाचे दोन प्रसंग आठवतात. माझ्या घराच्या गॅलरीत बसल्यावर एक रस्ता दिसत होता. तिथे एक दहा फूट खोल नाला होता सांडपाणी वाहून नेण्यासाठी. मी एकदा गॅलरीत बसलो असता पाहिले की एक कुत्रे नाल्यात डोकावून बघत होते. नंतर ते पळत पळत नाल्याच्या कडेकडेने जाई आणि पुन्हा परत येवून नाल्यात एकटक बघत असे. हे जवळ जव्ळ अर्धा तास चालू होते. माझ्यातली उत्सुकता जागी झाली. मी खाली जाऊन पाहिले तेंव्हा ध्यानात आले की,एक पिल्लू नाल्यात पडले होते. तिच्या आईची तगमग चालू होती. दहा फूट खोल आईला उतरता येत नव्हते. तेथे एक कचर्‍यातील पिशव्या गोळा करणारा मुलगा आला. त्याला कांही पैसे देऊ केले आणि त्याच्याकडून ते पिल्लू वर काढून घेतले. त्या आईच्या चेहर्‍यावरील केविलवाणे भाव मला कित्येक दिवस डोळ्यासमोर दिसत होते. या घालमेलीतून एका आर्त कवितेचा जन्म झाला.

दुसरा प्रसंग माझ्या घरातीलच. एका खोलीच्या खिडकीत चिमणीने घरटे बांधले आहे हे माझ्या ध्यानात आले. दोन चिमण्या येऊन घरट्यात नवीन वाळलेले गवत आणायच्या. त्यांचे घरटे बांधणीचे काम बहुधा चालू होते. एखाद्या महिण्याने त्या घरट्यात एक अंडे पण दिसले. यथावकाश उबवले गेल्यानंतर पिलाचा जन्म झाला. आम्हा दोघांना येता जाता घरट्याचे निरिक्षण करायचा छंदच लागला होता! मग चिमणी बाहेर जाऊन पिलासाठी चारा आणायची. चिमणी येताच पिल्लू चोंच उघडायचे आणि आई दाणा भरवायची. हे बरेच दिवस चालले. नंतर पिल्लू खिडकीतल्या खिडकीत हळूहळू चालायला लागले. आई दुरून पिलाकडे लक्ष ठेवायची. नंतर पिलाला घरट्यात बसवून बाहेर जायची आणि छकुल्यासाठी चारा घेऊन यायची. सुदैवाने म्हणा  किंवा दुर्दैवाने आम्ही साक्षीदार होतो , एके दिवशी चिमणी चारा घेऊन आली आणि तिला घरट्यात पिल्लू दिसलेच नाही. ती भिरभिरत्या नजरेने उडत जाऊन शोध घ्यायची आणि परत घरट्याकडे यायची. हे असे चार पाच दिवस चालले. नंतर चिमणी गेली आणि इकडे फिरकलीच नाही. बहुधा तिला कळले असावे की आता शोध घेणे व्यर्थ आहे. कित्येक दिवस ते घरटे तसेच होते खिडकीत. मोकळे, विरान. ती स्मशान शांतता आम्हाला सुध्दा भयाण वाटत होती. या हृदय पिळवटणार्‍या प्रसंगातून उतरलेली कविता जिच्यात मातेची वात्सल्य भावना चित्रित केरण्याचा प्रयत्न केला आहे,  ती खाली पेश करतोय.


झाली संध्याकाळ


चोंच उघडुनी वाट पहाते

पक्षिणिचे ते बाळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


बाळा चारा खाऊ घाली

खूप खूप मायेने

पाठीवरुनी हात मखमली

फिरवी ती प्रेमाने

कुशीत निजता बाळ वाटते

येवू नये सकाळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


बाळाच्या खोड्या दंग्यांनी

घरटे गजबजलेले

तिला आवडे बाळ नेहमी

कानी कुजबुजलेले

कौतुक जेंव्हा बाळ खेळते

सोडुन सारा ताळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


पंख पसरुनी कसे उडावे

तिने शिकविले त्याला

आकाशाचे स्वप्न लागले

अता पडू बाळाला

उरात धडधड प्रश्न भयानक

तुटेल का ही नाळ?

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


एके दिवशी चारा घेउन

अशीच ती परतता

घरट्यामध्ये तिने पाहिली

खूप निरव शंतता

भिरभिरत्या नजरने शोधी,

मनी रक्तबंबाळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


स्वतंत्र होउन बाळ उडाले

हीच जुनी ती कथा

आईच्या प्राक्तनात असते

कुरतडणारी व्यथा

एकलपणचे शल्य उरी अन्

मावळतीचा काळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ




निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, November 26, 2021

मूक आक्रंद--( वीक एंड लिखाण )

 कांही वर्षापूर्वी करम या संस्थेतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामधे वक्त्यांना विषय होता एकत्र कुटुंब पध्दती की विभक्त कुटुंब पध्दती योग्य. विषय तसा जुनाच आहे. यात चार पाच वक्त्यांनी भाग घेतला होता. ही भाषणे पूर्वार्धात झाल्यानंतर उत्तरार्धत याच विषयावरील कविता पण सादर झाल्या. मी या कार्यक्रमात आमंत्रित वक्ता आणि कवी म्हणून माझा सहभाग नोंदवला होता.

बर्‍याचजणांनी विभक्त कुटुंबपध्दतीची तरफदारी करताना प्रामुख्याने दोन मुद्दे मांडले. पहिला मुद्दा असा होता की वैयक्तिक गुणांना संयुक्त कुटुंबात पोषक वातावरण नसते. जीवन म्हणजे एक गुदमर असते. पावलोपावली इतर लोक काय म्हणतील, मुलांच्या वैयक्तिक विकासाकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मनाला मुरड घालत जगावे लागते. या सर्वात जीवनाचा आनंदच हरवून जातो.

या व्यासपिठावर मी एकटाच एकत्र कुटुंबपध्दतीचा पुरस्कार करत होतो. याला कारणही तसेच होते. मी एका जंबो एकत्र गरीब कुटुंबात जन्मलो आणि वाढलेला होतो. मी या बद्दल आधिकाराने बोलू शकतो. मला आठवते आमच्या घरी जेवायला बसले  तर जेवणार्‍यांची संख्या पस्तीस ते चाळीसच्या घरात असायची. खरे वाटणार नाही कदाचित कुणाला. आणि हा मुद्दा मी पुण्यात, जिथे विभक्त पधदती पोसलेली आहे,  तिथे मांडत होतो. मी स्वतः अनुभवलेलं आहे की माझे वडील नोकरी वगैरे करत नसतानाही आम्हा भावंडाचे पालनपोषण झाले. एकत्र कुटुंबात कुणी उपाशी रहात नसत. एक महत्वाचे म्हणजे बाँडिंग खूप घट्ट असते हे निश्चित! अजून एक महत्वाचा मी मांडलेला मुद्दा असा की विभक्त कुटुंबातील मुले होत असलेल्या लाडामुळे खूप आत्मकेंद्रीत असतात. त्यांना आपले कांही  इतरांशी शेअर करणे हा प्रकार माहीतच नसतो. बहुतांश मुले चिडखोर असतात.त्यांना घरच्या आई बाबांचे लक्ष शंभर टक्के हवे असते.  इगोईस्टही असतात. एकत्र कुटुंबातील मुले जास्त सहनशील असतात. आयुष्यातील धक्के सहन करायची शक्ती त्यांच्यात जास्त असते. शेवटी मी म्हणालो की प्राणी पण कळपाने रहातात; तर माणसाला का अवघड वाटावे? 

हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला. पण हा विषय कांही माझी पाठ सोडेना!

आजच्या बदलत्या जीवनशैलीचा जीवनावर होणार्‍या परिणामांचा परामर्ष घेणे  गरजेचे आहे असे  वाटते. आपली आर्थिक परिस्थिती, वाढत्या गरजा,  वैयक्तीक महत्वाकांक्षा, विभक्त कुटुंबपध्दतीत नवरा बायको या दोघांनाही नोकरी करण्याची गरज या गोष्टी मध्यम वर्गीयांच्या जीवनावर खूप परिणाम करत आहेत. आपल्या मुलाचे चांगले पालनपोषण व्हावे म्हणून एक मूल कुटुंबशैली आता बर्‍यापैकी स्थीर झाली आहे. हे सर्व होणे अपरिहार्य आहे. पण या बदलाचे अनेक पैलू आहेत.


वर्किंग कपल्सच्या मुलांवर याचा परिणाम नक्कीच होतो आहे. आईला इच्छ असूनही मुलांना वेळ देणे जमत नाही. पण मुलांच्या वाट्याला उपेक्षा येते हे कुणाच्या ध्यानात येत नाही. बाळाला पाळणा घरात ठेवणे, त्याला सांभाळण्यासाठी आया ठेवणे या सर्व बाबीत मुलांची हेळसांड तर होतेच होते. मी कल्पना केली की अशा एखाद्या मुलाला अशी व्यथा सांगावयाची असेल तर तो काय सांगेल? त्याच्या मनात खदखदणार्‍या भावना असतीलच. अशा मुलांचा आक्रंद या रचनेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझा कोणाचीही टिका करण्याचा हेतू नाही. बघा प्रयत्न यशस्वी झाला आहे का ते!


थोपवावे मी कसे?


पेटलेल्या काहुराला

शांतवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


पाळणाघर विश्व माझे

माय करते नोकरी

ऊब मायेची न तेथे

दु:ख सलते अंतरी

गात अंगाई स्वतःला

झोपवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


खेळणी भरपूर आहे

खेळतो मी एकटा

ना मला ताई न दादा

मीच मोठा, धाकटा

काचणार्‍या वेदनांना

जोजवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


अक्षरे गिरवून घेण्या

माय ना बाबा घरी

शिक्षणाचे तीन तेरा

मी रित्या कलशापरी

चित्र भावी जीवनाचे

रंगवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


कोक देते, चिप्स देते

ती घरी आल्यावरी

वेळ फिरवायास नसतो

हातही पाठीवरी

तृप्ततेचे स्वप्न नेत्री

जागवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?


जन्म पुढचा द्यायचा तर

दे मला गरिबा घरी

हक्क आईचा मिळावा

ऐक माझे श्रीहरी

दु:ख तुज सोडून इतरा

दाखवावे मी कसे?

भावनांच्या वादळांना 

थोपवावे मी कसे?




निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, November 24, 2021

गीत तुझ्यावर सुचते

 

चाहुल येता तुझी अचानक

मन माझे मोहरते

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते


तुझ्या वावराने तर माझा

आसमंत भरलेला

आत माझिया बघता कळले

मी तेथे नसलेला

नशा वेगळी हरवण्यातली

झिंग केवढी असते!

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते


आठवणींचा श्रावण असतो

माझा महिने बारा

सभोवताली सदैव वाहे

गंधित गंधित वारा

स्वप्नांच्या दुनियेतही तुझे

स्वप्न नेहमी पडते

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते


एकदुज्यासाठीच निर्मिली

दोघांनीही हिरवळ

सहजीवन एवढे उमलेले!

घमघमणारा दरवळ

जीवन अपुले एक सोहळा

पदोपदी जाणवते

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते


चल ठरवू! मी गीत तुझ्यावर

लिहितो लयीत एका

चाल बसवुनी शीक गायला

मस्त धरूनी ठेका

सहभागाने दोघांच्याही

मैफिल रंगत असते

मनात जेंव्हा वादळ उठते

गीत तुझ्यावर सुचते



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Monday, November 15, 2021

वैचारिक धुमारे--( वीक एंड लिखाण )


आपल्या भोवतालचे विश्व कोणी निर्माण केले या बद्दल भिन्न भिन्न मत प्रवाह आहेत. हिंदू धर्मानुसार विश्वाची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे. ब्रह्म हा निर्माता, विष्णू काळजी घेणारे ( preserver) तर महेश हे विनाश करणारे ( destroyer) आहेत. बरे झाले महादेवाने अजून तिसरा डोळा उघडलेला नाही. या विश्व निर्मितीसाठी किती विचार करावा लागला असेल ना ब्रह्मदेवाला? माणूस, विविध प्राणी, जीव जंतू वनस्पती असे अनेक प्रकार. पंचमहाभुतांचे असणे सुध्दा एका मोठ्या नियोजनाचाच भाग आहे.
पण मला जास्त आश्चर्य वाटते ते मानव निर्मितीचे. कारण मानवाला लाभलेली विचार करण्याची शक्ती अफाट आहे. इतर प्राण्यांना नाहीच असे नाही. पण माणसाला हे सारे भरभरून मिळालेले आहे. हे चांगले की नाही हा प्रश्न वेगळा. प्राण्यांमधे ते एखाद्या प्रसंगी कसे वागतील याचा अंदाज बांधता येतो आणि तो बहुतांश बरोबर असतो. पण माणसाचे तसे नाही. त्याचे वर्तन वेगवेगळे असू शकते; नव्हे असतेच. आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे कोणी अर्धा ग्लास रिकामा किंवा भरलेला म्हणेल. साधे लग्नाचे उदाहरण घ्या. कुणाला सुखासाठी लग्न हवे असते, कुणाला घरात कामाला बाई हवी असते तर कुणाला येणारी सून वंशवृध्दीसाठी हवी असते तर घरात येणार्‍या मुलीला स्वप्नपूर्ती हवी असते. हे मी पारंपारीक विचार शैलीबद्दल बोलतोय. विचारशैली अधुनिक झाली तरी ही मतभिन्नता कायमच असणारय जरी संदर्भ बदलले तरीही.
आज खुद्द ब्रह्मदेवालाही कोडे पडले असेल की मी बनवलेला माणूस तो हाच का? तो म्हणत पण असेल की " हेच फल काय मम तपाला." अशा अगम्य माणसाचे (ज्यात मीही आलो) मला नेहमीच कुतुहल वाटत आलेले आहे, कुठे थोडे जरी विचित्र वागणे दिसले तर लगेच विचारांना चालना मिळते.
हे वैचारिक वादळ निर्माण व्हायला एक छोटेसे कारण मला पुरेसे झाले.मी पुण्यात एका जॉगिंग ट्रॅकवर रोज सकाळी फिरायला जात असे.  ट्रॅकच्या शेजारी कांही फ्लॅट्स होते. मला एकेदिवशी दिसले की एका फ्लॅटमधून एक स्त्री गॅलरीत येवून आपले धुतलेले कपडे झटकून दोरीवर वाळू घालत होती. ती आत गेली की थोड्याच वेळाने एक गृहस्थ आपले कपडे झटकून वाळू घालत असत. हे दृष्य मी रोजच छंद म्हणून बघायला लागलो. दोघेही नवरा बायको असावेत बहुधा. माझ्या मनात विचार घोळायला सुरू झाले. त्यांचे आपापसात जमत नसेल कदाचित. पण मजबूरीने एकत्र रहात असावेत. अर्थात ही माझीच कल्पना. हे खरे असेल तर त्यांचे जीवन कसे असू शकते? यावर विचार सुरू झाले आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता म्हण्जे कवि मनाला फुटलेले वैचारिक धुमारे.

एक एकटी नांदत होती

दारावरच्या पाटीवरती
दोन्ही नावे झळकत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

जवळ असोनी जवळिक नाही
असे कसे हे जीवन जगणे?
सुगंधास का फुलापासुनी
शक्य वाटते स्वतंत्र असणे?
अहंकार हा शत्रू असुनी
दोघेही गोंजारत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

आनंदाची नवीन व्याख्या
"दुसर्‍यावर कुरघोडी करणे"
"गं"ची बाधा दोघांनाही
अवघड होते प्रश्न मिटवणे
रेशिमगाठी सोडवण्याची
ना इच्छा ना फुरसत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

सणासुदीला घरचे जेवण
अशात केंव्हा शिजले नव्हते
ऑर्डर देउन मागवलेले
टेबलवरती सजले होते
करून आग्रह वाढायाची
विसरुन गेली पध्दत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

व्हाल्वोमधले शिष्ट प्रवासी
असेच त्यांचे जणू वागणे
अजून होता एक मुसाफिर
मूल पोटचे गोजिरवाणे
गुन्हा नसोनी मुलाभोवती
हेळसांड घोंघावत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

गरीब होते जरी बालपण
माझे मजला होते प्यारे
प्रेमळ आई बाबाकडुनी
मला मिळाले लाख सितारे
त्यांच्या पंखातला उबारा
एकच माझी दौलत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती



निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

मजेत राहू खुशीखुशीने

 

चार पाउले ये तू पुढती

मीही येतो तुझ्या दिशेने

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने


गैरसमज का चुकाच होत्या?

कीस कशाला पाडायाचा?

उगाळून का तेच ते पुन्हा

प्रश्न किती तो ताणायाचा?

विलंब झाला तरी निघावे

समझोत्याच्या फक्त दिशेने

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने


आपण बोलू, उत्तर शोधू

का शिष्टाई तिर्‍हाइतांची?

हीत आपुले जपावयाला

हवी पायरी का कोर्टाची?

इच्छा तेथ मार्ग सापडे

निराश तू आहेस कशाने?

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने


जरी सुशिक्षित आपण दोघे

अशिक्षिताहुनही का वेडे?

काय चांगले अपुल्यासाठी

कसे सुटेना साधे कोडे?

भान हरवले दोघांचेही

आत्मघातकी अहं नशेने

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने


सहजीवन ही खरेच अवघड

तारेवरची कसरत आहे

एकदुज्याला समजुन घ्यावे

कुरघोडीला जागा नसते

साधा सल्ला साध्या कविचा

ना सांगितला कुण्या ऋषीने

झाले गेले विसरुन सारे

मजेत राहू खुशीखुशीने



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३




Monday, November 8, 2021

आठवण डोकावते

 भूतकाळाच्या धुक्यातुन

आठवण डोकावते

बालपण माझे तुझे, मज

दूर मागे खेचते


बाहुला अन् बाहुलीचा

खेळ आपण खेळला

आजही ध्यानात आहे

रंगलेला सोहळा


वाढदिवसाला दहाव्या

फूल देताना तुला

तू मला गोळ्या दिल्या अन्

हात हलके दाबला


प्रेम नक्की काय असते

माहिती नव्हते तरी

भेटल्या नजरेस नजरा

टाळुनी नानापरी


मार्ग झाले वेगळे अन्

रंगले मी सासरी

वाटते आठवून सारे

संपल्या श्रावणसरी


फेसबुकवर मी अचानक

आज तुजला पाहिले

तू कवी झालास हेही

मी लगेचच जाणले


वाचली कविता तुझी अन्

श्वासही रेंगाळला

शब्दरूपी मोगर्‍याने

देहही गंधाळला



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Thursday, October 21, 2021

पदर खोचला होता


असून स्त्रीभ्रुण, घरी नकोशी

जन्म जाहला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


माय सासरी नवीन होती

चालत नव्हते कांही

मुकाट गेली सामोरी ती

लिंग निदानालाही

जन्मायाच्या अधी मुलीचा

गळा दाबला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


इतिहासाची पुनरावृत्ती

अधी दोनदा झाली

अशी कशी ही काजळलेली

पूर्व दिशेची लाली?

श्वास घ्यायच्या अधीच पहिला

श्वास थांबला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


घरातल्यांनी नवस बोलला

जर का मुलगा झाला!

एक पोरगी करूत अर्पण

देवी यल्लम्माला

बरे जाहले मुलगी झाली 

अनर्थ टळला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


आई झाली कणखर आता,

आम्ही सार्‍या बहिणी

तिला बघूनी उत्तर मिळते

 कशी असावी गृहिणी

तिच्या कडूनी लढावयाचा

अर्थ जाणला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


काय पोरगी काय पोरगा?

काय दिवा वंशाचा?

थोतांडाला कुणी बनवला

भाग अंधश्रध्देचा?

अज्ञानाने ज्ञानासंगे 

लढा जिंकला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

 

Friday, October 15, 2021

प्रतिकात्मक परीघ--( वीक एंड लिखाण. )

 आपण जर सभोवताली डोळसपणे पाहिले तर बर्‍याच गोष्टी मजेशीर घडताना दिसतात. याला कारणीभूत असते आपण जोपासलेल्या श्रध्दा आणि त्यांच्याशी चिकटून रहाण्यातील वाटणारा मोठेपणा! परत लोक काय म्हणतील याची तलवार कायमच लटकत असते. 

१) परत फिरा काम होणार नाही;  कारण मांजर आडवे गेले आहे,

२) सवाष्ण बाई भरली घागर घेऊन वाटेत भेटली तर काम यशस्वी होते,  

३) मुहूर्त बघून पूजा पाठ किंवा कामाची सुरुवात करणे,

४) आमक्या आमक्या वारी दाढी किंवा कटिंग करू नये

एक नाही अशा हजारो बाबी आपणास दिसतील आणि आपणही त्या पाळतोच.  मी जास्त उदाहरणे देत नाही कारण ते कदाचित कांही लोकांना आवडणार नाही. अर्थात यात कांही गोष्टी प्रतिकात्मक असतात. श्रावणाच्या आसपास मृत्तिका पूजन हे धरतीमातेचे उपकार बिंबवण्यासाठी असते कारण धरती सुजलाम सुफलाम नसती तर काय झाले असते? तसेच मंगळागौरीची पाने पत्रीने पुजा करणे याचे पण आहे. वनस्पती जोपासणे आणि त्यांचे अनन्यसाधारण महत्व हे यातून अधोरेखित करण्यासाठी असते. आपण हे सर्व श्रध्देचा भाग म्हणून करतो. म्हणावी तशी जागृती न आल्याने जंगलतोड चालूच आहे.  आपण कर्मकांडात अडकतो आणि मूळ उद्देश बाजुलाच रहातो.

गेल्या आठवड्यात आपण विजयादश्मी नेहमीप्रमाणे उत्साहाने साजरी केली. ठिकठिकाणी ( विशेषतः उत्तर भारतात) रावणाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. असे दहन कित्त्येक वर्षापासून करतच आहोत. याचा हेतू दुष्टप्रवृत्तींचा नायनाट करावा असा आहे. रावण हा दुष्टवृत्तीचे प्रतीक आहे. पण प्रत्यक्ष हे काम करतो का? दुष्टप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. खून, दंगे, लिंचींग, लाचखोरी हे सारे कशाचे प्रतीक आहे? पण आपण दरसाली रावणाचे दहन करतो एक  कर्मकांड म्हणून. आपण नेहमी प्रतिकात्मक परीघात अडकलेलो असतो.  यावर विचार करून करून माझ्या एका कवितेचा जन्म झाला. मी ही कविता दसर्‍यादिवशी मुद्दाम पोस्ट केली नाही कारण मला जनतेच्या सणासुदीच्या उत्साही मूडमधे अडथळा आणायचा नव्हता. सदर कविता खाली पेश करतोय. 


रावणास का पोसत असतो? ( विजयादश्मीच्या निमित्ताने. )


विजयादश्मी मुहुर्तावरी

दशाननाला जाळत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


रामप्रभूंना तोंड द्यावया

समोर होता एकच रावण

हजार आता सभोवताली

लुटावयाला अमुचा श्रावण

राम व्हायचे सोडून त्याच्या

पादुकांस प्रक्षाळत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


आज जरी का कुणी लक्ष्मण

भूक लागुनी मुर्छित झाला

हनुमंताने कुठे उडावे?

संजिवनीचा शोध घ्यायला

पर्वतावरी घरे, लव्हासा

झाडे आम्ही तोडत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


सत्तांधांच्या हस्ते जेंव्हा

पुतळ्याला फुंकून टाकले

दुष्टाचे निर्दालन झाले

मनोमनी जनतेस वाटले

आजकालचा रावण येथे

जुन्या रावणा जाळत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


अनेक रावण जिवंत असुनी

मानमरातब त्यांना मिळतो

पुरुषोत्तम मर्यादित, त्याचा

म्हणे मंदिरी वावर दिसतो

रामकथेतिल आदर्शांचे

डोस जमाना सोसत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


समाज सारा राम बनावा

प्रत्त्यंचा ओढून धराया

मुठभर रावण वेचवेचुनी

बाण मारुनी नष्ट कराया

कृती न करता, समाज निर्बल

प्राक्तनास का कोसत असतो?

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?




निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

 


 

Saturday, October 9, 2021

मॅनिया--( वीक एंड लिखाण. )

  मॅनिया--( वीक एंड लिखाण. )


 बहुतांश लोक कोणत्या ना कोणत्या मॅनियाने ग्रस्त असतात. कळत किंवा नकळत! एखाद्या गोष्टीचे आतोनात वेड असणे याच सदरात मोडते. अशी गोष्ट जर मिळाली नाही तर माणूस अस्वस्थ होतो.  कांही लोकांना संपत्तीचा मॅनिया असतो तर कांहींना लोकप्रियतेचा. अर्थात यात हजारो प्रकार असतात. छंद पोसणे हा जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे; पण छंदाचा अतिरेक होणे म्हणजे मॅनिया.

मी माझे या बाबतीत विश्लेषण केले  आणि एक गोष्ट ध्यानात आली. मी या आधी सांगितले की माझे गझल क्षेत्रातले पदार्पण माझे गुरू औरंगाबादचे डॉ. इकबाल मिन्ने यांचे बोट धरून झाले. जसा मी पुण्याला स्थलांतरित झालो, मी इलाही जमादार यांच्याकडे गझलेसाठी मार्गदर्शन घेऊ लागलो. त्यांनी मला अगदी लहान लहान गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांच्या गझल लिखाणाबद्दल लिहायची अर्थातच माझी कुवत नाही. मला या काळात इलाहींचा मॅनियाच झाला होता म्हणा ना!

मी मंत्रमुग्ध झालो त्यांच्या गझला वाचून. मी त्यांच्याकडून आठ दहा गझल संग्रह विकत घेतले आणि पारायणे सुरू केली त्यांच्या गझलांची. 

परवा बर्‍याच दिवसांनी मला त्यांची आठवण आली. अस्वस्थ झालो. मी त्यांचे माझ्याकडे असलेले सगळे गझल संग्रह काढले आणि जवळ जवळ आठ दिवस वाचत गेलो. अवीट गोडी आणि नजाकत! मोगरा या गझल संग्रहातील दोन शेरांनी मला खिळवूनच ठेवले. काय ती कल्पना शक्ती आणि खयालांची झेप! ते शेर असे आहेत.


आनंद वेचताना आक्रंदने मिळाली

रत्ने गळून गेली मज कोंदणे मिळाली


कळपात काजव्यांच्या आजन्म हिंडलो मी

नुसत्या तुझ्या स्मृतीची तारांगणे मिळाली


हे झाले हळूवार इलाही. शायर काय किंवा कवि काय त्यांची समाजाशी नाळ जुळलेली असेल तर कवितेला एक प्रकारची झळाळी येते. स्त्रियांची परिस्थिती वर्णन कर्तानाचे त्यांचे बोचरे शेर पण वाचण्यात आले. दोन खाली देतोय.


संस्कृतीचा आरसा खरोखर नारी आहे

जिवंत असुनी एक कलेवर नारी आहे


नारी म्हणजे धन दौलत वा जणू खिरापत

मनाप्रमाणे करण्या वापर नारी आहे


शायराचा खरा कस लागतो तो लहान बहरात गझल लिहिताना. त्यांची अशीच एक गझल वाचली. ओळीत फक्त चौदा मात्रा आहेत. त्यातील सहा मात्रांचा रदीफ आहे. तरीही अप्रतिम आहे ही गझल. त्यातील दोन शेर खली देतोय.


वाळूचे तर वाळूचे

चल बांधू घर वाळूचे


गाव झर्‍यांचे खरेच हे

वरवरचे थर वाळूचे


मला या हिमालयाची ऊंची असलेल्या गुरूंचे मार्ग दर्शन मिळाले. ते सांगायचे की शायराने जे सांगायचे ते स्पष्ट आणि वेगळ्या रितीने सांगायचे असते. हे ध्यानात धरून मी असे लिहिलेले दोन शेर खाली देतोय. पहिला आहे एका स्त्रीच्या गोरेपणावर तर दुसरा एकदा कोथिंबीर जुडी ५० रुपायाला एक इतक्या महागाईवर. ते शेर असे.


रेखून चित्र झाले, भरण्यास रंग आता

केशर गुलाब दोन्ही घेतो खलून आहे


केशर डबीत आता कोथिंबिरीस जागा

गगनास भाव भिडले जगणे कठीण झाले


असे हटके गझल लिहिण्याची मला परवा पुन्हा उर्मी आली. विषय होता स्त्रीच्या रुपाचे वर्णन. माझ्या आजोबा पासून सौंदर्य वर्णन म्हणजे डाळींबी ओठ, गालावर खळी, गोरा रंग, हनुवटीवर तीळ वगैरे वगैरे. हे सारे आता तेच ते वाटते. मला हे सर्व टाळून लिहायचे होते. नायिका तर चांगलीच आहे आणि तिला चांगलीच म्हणायचय पण जरा वेगळ्या पध्दतीने. आठवडाभर विचार करून लिहिली एकदाची गझल! खाली देतोय. बघा जमलाय का प्रयोग.


आली असावी उर्वशी


बाग ना फुलली तरी गंधित हवा येते कशी?

बांधला अंदाज की आली असावी उर्वशी


सभ्यही बघती तिला चोरून, राखित सभ्यता

पण बिचारे पाहुनी हसणे तिचे, पडती फशी


मुक्त छंदातून लिहिणार्‍या कवींनाही अता

पाहता तिजला गझल वाटे लिहावी छानशी


पैंजणांचे वाजणेही सांगते कानात की

सोड तू वेड्या तपाला, जिंदगी जग अल्पशी


व्यस्त  असते समिकरण का रूप अन् वय यातले?

कैक वर्षांपासुनी दिसते जणू ती षोडशी


वाढली वर्दळ जशी ती लागली उमलायला

का अडोशाला जगावे, माय सांगे तिज जशी ?


आड आहे, पण भुतांचा, सांगते ती अंगणी

ग्रासता नैराश्य केली रोमिओंनी खुदकशी


भाग्यशाली तोच ज्याची जाहली ती शेवटी

प्राक्तनी इतरास बघणे फक्त स्वप्ने धुंदशी


लेखणी "निशिकांत"ची थकली तिला रेखटता

शेवटी इतकेच लिहिले "रूप ते बावनकशी"



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

वृत्त--देवप्रिया

लगावली--गालगागा X ३ +गालगा


  


Monday, October 4, 2021

योग म्हणूनी जुळून आला

 ( या कवितेस विनोदी म्हणा किंवा जीवनाचे जहाल वास्तव म्हणा. )


ऑक्सिजनचा वातावरणी

कमी पुरवठा असेल झाला

दाखल आयसीयूत व्हायचा

योग म्हणोनी जुळून आला


जीवन शैली तीच असूनी

वेळ पुढे का सरकत नाही?

रात्र आजही काल सारखी

तरी संपता संपत नाही


पत्नीसंगे गप्पा टप्पा

मित्र मैत्रिणी सोडुन झाल्या

भोळीला त्या कळले नाही

आज कशा या तारा जुळल्या?


मुबलक होता वेळ म्हणोनी

एक घेतले पुस्तक हाती

कसले वाचन! कानी माझ्या

माझी मैत्रिण बोलत होती


वहावलेल्या मनास माझ्या

नकोच होती निरव शांतता

चुळबुळ इतकी मनात माझ्या !

शांततेतही दिसे आर्तता


काल जाहले बंद फेसबुक

व्हट्सअ‍ॅपही तया सोबती

असे पुन्हा ना कधीच होवो

अशी विठ्ठला तुला विनंती


काल रात्री फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप दोन्हीही जगभरात बंद पडले औटेजमुळे. त्यावरून सुचलेली कविता.



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Saturday, October 2, 2021

गांधीजी की जय--( वीक एंड लिखाण )

 आपल्या समाजात व्यक्तीपूजेचे मोठे स्तोम आहे. चांगल्या विभूतींची पूजा करणे गैर नाही. पण त्यांचे आदर्श ठेवून आचरण केले नाही तर अशी पूजा फक्त एक कर्मकांड बनून रहाते. एके काळचे मोठे मोठे लोक आपण नमस्कार करण्यासाठीच वापरतो.

हेच राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय दिनांचे पण आहे. रोज कोणता ना कोणता दिवस असतोच असतो. बालिका दिवस, व्हॅलंटाइन डे, भाषा दिवस, ज्येष्ठ नागरिक दिवस असे अनेक. मग आपण तो दिवस साजरा करतो म्हणजे काय करतो? कविता, लेख, एखादी सभा, भाषणे वगैरे वगैरे. यात औपचारिकतेचा भागच जास्त असतो. एक साधे उदाहरण महिला दिनाचे घेऊ या. हा दिवस कित्येक वर्षापासून साजरा केला जात आहे. पण महिलांची ( शहरी सोडून ) परिस्थिती जैसे थेच आहे. आपण अशा दिवसामागचा हेतू लक्षात घेऊन कांहीच करत नाही. हेच स्त्रीभ्रुणाच्या आणि नवजात मुलींच्या बाबतीतही घडते. मुलगा व्हावा म्हणून या काळातही एखादी मुलगी कर्नाटकातील येल्लम्मादेवीला अर्पण केल्याचे बघून समाजाच्या बधीर मनाला कांहीच वाटत नाही ही खरी शोकांतिका आहे.
हेच नेमके जयंत्या आणि स्मृतीदिनांच्या बाबतीतही घडते. आपण सर्व नेत्यांचे या दिवशी गुणगाण गातो. त्यांचे तत्वज्ञान त्रिकालाबाधित असल्याचे सभांमधून सांगतो. त्यांचे तत्वज्ञान दहा टक्केही पाळले असते तर समजात अमुलाग्र बदल दिसला असता एव्हाना. एकेकाळी ज्यांना वंदन करावे अशा व्यक्ती समाजात भरपूर होत्या. त्यांनी समाजाला आकार देण्याचे बहुमुल्य काम केले. आजच्या काळात भोवती नजर टाकून बघा. दिसतात का कुणी विभूती. शायर इलाही जमादार यांनी ही खंत व्यक्त करताना लिहिलेल्या एका गझलेतील दोन शेर खाली देतोय.

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?

रोज अत्याचार होतो आरशावरती अता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?

हेच माझ्या डोक्यात काहूर उठवत होते कांही वर्षांपूर्वी. गांधी जयंती साजरी झाली धुमधडाक्यात. आणि नंतर इलाहीजींची वरील गझल वाचून विचाराचे चक्रीवादळ उठले. मग मन या जयंती साजरी करण्याच्या पध्दतीचा आणि वास्तवाचा विचार करू लागले आणि त्यातून एक कविता जन्मास आली. कविता उपरोधिक झालीय या उद्वेगातून.  पहिल्या चार ओळी लिहिताना मनात आले की एक खेड्यातील अनपढ शेतकरी आपल्या नातवाला विचारतो की आज तारीख काय आहे. त्यांने दोन ऑक्टोबर असे सांगण्यापासून या रचनेची सुरुवात झाली आहे. बघा कशी वाटते ती.

काय म्हणलास पोरा, आज
दोन ऑक्टोबरय व्हय?
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

सगळ्या हापिसात फोटो तुझे,
कैक गावी गांधी रोड
एवढं करून तुझ्या तत्वाशी
बसत नाही जोड
सगळं बघून उपोषणाला
बसशील वाटतय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

खादी भंडरातुन घेतोत
झेंडे, पायजम्याच्या नाड्या
तू रहिलास आश्रमात
आम्ही बांधल्या माड्या
माया जमा करील त्यालाच
म्हनत्यात दिग्विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

नेते लोक भाषण करतील
तुझे गुण गाऊन
झकास बोलता येतय त्यांना
येळ प्रसंग पाहून
सभा संपली, भूक लागली
कोंबडीची नाही गय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

सत्याग्रह शस्त्र शोधलस
स्वातंत्र्य त्याचं फलीत
आम्ही घेतलं हातात जसं
माकडा हाती कोलीत
वेळी अवेळी सत्त्याग्रह
आम्हाला जडलीय सवय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

आजच्या गांधीचं काय सांगू
दिल्लीत बसत्यात
क्वत्रोची कोन इचाराव तर
गालामंदी हसत्यात
तरण्या गांधीला मिळणारय म्हने
सिंहासनाचं वलय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

दुष्ट वृत्ती हिंसा करताना
सगळीकडे दिसत्यात
शांतीप्रिय लोकांना
भ्याड म्हनून हसत्यात
तुझ्या अहिंसेला हिंसेच
वाटू लागलय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

आभाळातला तारा तुटून
अंधारात हरपतोय
अंधाराच्या तिव्रतेनं
प्रकाश झोत करपतोय
होतोय बघा अंधाराचा
प्रकाशावर विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय



निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, September 23, 2021

मोठ्यांच्या छोट्या आशय गहन गोष्टी--- ( वीक एंड लिखाण. )

 

आज एक खूप जुनी आठवण आली. अशा आठवणी का आणि कशा येतात हे एक गूढच आहे. खरे तर अगम्यच! आणि मी त्या काळात रमून गेलो. ही गोष्ट सर्वांशी शेअर करायची तिव्र ईच्छा झाली; म्हणून हा प्रपंच.जवळ जवळ २५ व्॑र्षापूर्वी मी बीबीसी न्यूज चॅनलवर एक इंटरव्यू ऐकत होतो. हा इंटरव्यू ईंग्रजीतून जवळ जवळ ४५ मिनिटे चालू होता. प्रश्न विचारणारा पत्रकार भारतीयच होता आणि प्रश्नांची शांतपणे समर्पक उत्तरे देत होते बाबा आमटे! बाबांच्या आश्रमातल्या एका खोलीत प्रश्नोत्तरे चालू होती. बाबांची अगदी छोटेखानी खोली. खोलीत कमीतकमी सामान. त्या खोलीतील साधेपणा नजरेत भरण्याजोगा होता. बाबा एका बाजेवर पहुडले होते आणि शांतपणे विविध प्रश्नांना उत्तरे देत होते. अर्थातच सर्व प्रश्न हे बाबांचा आश्रम आणि त्यांच्या कार्याबद्दलच होते. बाबांची सरळ उत्तर द्यायची शैली पाहून पत्रकार भारावून गेल्याचे त्याच्या चेहर्यावरून दिसत होते. पत्रकारांनी आरडा ओरडा करत प्रश्न विचारण्याची त्यावेळी प्रथा नव्हती. बाबा बाजेवर निजून उत्तरे देत होते कारण बाबावर .थोड्या दिवसापूर्वीच कांही गुंडांनी हल्ला केला होता आणि झालेल्या दुखपतीमुळे बाबांना बसता येत नव्हते.या साक्षात्काराचा समारोप करताना पत्रकाराने शेवटचा प्रश्न विचारला की "बाबा आपणास अत्त्यूच्च समाधान देणारा आणि नेहमी स्मरणात रहाणारा एक प्रसंग सांगायचा असेल तर आपण काय सांगाल?" बाबांनी या प्रश्नाला दिलेले उत्तर ऐकून मी भाराऊनच गेलो. त्या उत्तरातून त्यांची आपल्या कर्याबद्दल वादातीत निष्ठा स्पष्ट दिसत होती. अशी माणसेच खरी राष्ट्राची संपत्ती असतात. त्यांनी दिलेले उत्तर असे होते:-"एका खेड्यात एका पाटलाच्या १४ वर्षाच्या मुलीला कुष्ट रोग झाला. पाटलाचा अर्थातच गावातच नव्हे तर पंचक्रोशीत दबदबा होता. त्या कुटुंबाचा मानमरातब पण खूप होता. घरात कुणाला कुष्टरोग होणे ही अपमानास्पद बाब समजली जाई. म्हणून ही बातमी दडवण्यात आली. मुलीला पदोपदी घरातील लोक घालून पाडून बोलत. असेच २/३ वर्षे गेली आणि कुष्टरोग जास्तच वाढला. मुलीत नैराश्य आले. एकेदिवशी ती शेतात गेली आणि जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारली. तिला वाचवण्यात आले. ही बातमी मला कळताच मी त्या गावाला गेलो आणि त्या पाटलांना भेटलो. त्यांना समजाऊन सांगितले की कुष्टरोग इलाज केल्यास बरा होऊ शकतो. पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी त्यांना म्हणालो की तुमच्या मुलीला मी माझ्या आश्रमात घेऊन जातो आणि तेथे तिच्यावर उपचार करतो. घरची ब्याद जातेय या विचाराने त्यांनी लगेच होकार दिला; आणि मी मुलीला आश्रमात घेऊन आलो.मुलगी खूप भ्यालेली आणि बुजलेली होती सुरुवातीला. कुणात मिसळत पण नव्हती. मी मुद्दाम तिला अधीच दोन मुली असलेल्या खोलीत ठेवले जेणेकरून तिचे मन रमेल. तिच्यावर हलकी फुलकी कामेही सोपवली. कांही शेतातली, कांही स्वयंपाकघरातली. हळू हळू मुलगी आश्रमातल्या वातावरणात रमायला लागली. तिची वागणूक पण सामान्य मुलीसारखी झाली.एकदा आश्रमात मी फेरफटका मारत असता त्या मुलीच्या खोलीपासून जात होतो. सहज मी खिडकीतून तिच्या खोलीत डोकावलो आणि अक्षरशः आचंबितच झालो. ती मुलगी आरशासमोर उभी राहून लिपस्टिक लावत होती आपल्या ओठाला. दोन वर्षापूर्वी नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्त्येचा प्रयत्न करणारी मुलगी आज सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक लावत होती. जीवनाबद्दलचा दृष्टीकोन एकदम सकारात्मक झाला होता. जगण्याची दुर्दम्य आशा तिच्यात जागली होती. हा प्रसंग मला अत्त्युच्च आनंद देणारा आणि चिरकाल ध्यानात राहणारा आहे असे मला वाटते."बाबांना अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यापैकी एखादी घटना सांगितली असती तरीही चालले असते. पण त्यांचा खरा आनंद त्यांच्या कामात होता ना की पुरस्कारात. हे उत्तर ऐकून मी शहारलो होतो हे मला आजही आठवतय. असे लोक चालते बोलते देवच असतात. हा वरील प्रसंग लिहिताना मला खालील चार ओळी सुचल्या..भेटवार्ता ऐकताना काय किमया जाहली!कूळदैवत बदलले मी, तूच बाबा माउलीपाठ देवाने फिरवली त्या अभाग्यांना तुझीहे धरेच्या ईश्वरा! लाभो तुझी रे सावली
ता.क. कुष्ठरोगाबद्दलचे एक प्रसिध्द वाक्य--ज्यांचे अवयव बधीर होतात ते कुष्ठरोगी असतात आणि ज्यांची मने बधीर असतात ते महारोगी असतात.


निशिकांत देशपांडे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३


अशाश्वताच्या झोक्यावरती

 

अशाश्वताच्या झोक्यावरती

हिंदोळावे, हरकत नाही

आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही


बालपणीचा अखंड निर्झर

मनी आजही झुळझुळतो मी

आई, बाबा, नाव कागदी

पर्व संपले हळहळतो मी

जरी जाहलो मोठा! पण का

बाल्यावस्था विसरत नाही?

आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही


तरुणाईच्या काळी असते

सदैव मस्तीचीच त्सुनामी

सभोवताली हिरवळ, श्रावण

लवून देतो प्रभो सलामी

जीवन जगणे, म्हणून येथे 

कधी वाटली कसरत नाही

आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही


जन्मायाच्या वेळी देतो

तिकिट सोबती परतायाचे

पण त्या वरती तिथीच नसते

कधी नेमके निघावयाचे

उद्या काय? ठाऊक नसोनी

मनी जराही दहशत नाही

आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही


सायंकाळी आयुष्याच्या

प्लॅटफॉर्मवर बसलो आहे

केंव्हा येते गाडी बघण्या

अनेकदा मी उठलो आहे 

किती वेदना शेवटच्या या?

काळ सरकता सरकत नाही

 आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३



Monday, September 6, 2021

  प्रेमगीत---( वीक एंड लिखाण )


मी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ठरवले की व्यस्ततेमुळे जे नोकरी करताना जमले नाही आयुष्यात,  ते सर्व आता करायचे. यामुळे मी आता भरपूर गाणे, संगीत ऐकून हा छंद जोपासायचे ठरवले. सौ.ला संगीताचा छंद आणि संगिताचे शिक्षण तिचे झाल्यामुळे,  तिचा माझ्या या नविन छंदाला विरोध तर नव्हताच पण तिचे प्रोत्साहन होते. दुसरा छंद म्हणजे कविता/गझल लेखनाचा. या दोन्ही छंदामुळे अजून तरी निवृत्त होवूनही जीवन मजेत आहेत.

कांही दिवसापूर्वी असाच सकाळी रेडियो ऐकत असता,  एका मराठी गाण्याने माझे लक्ष वेधून घेतले. सुंदर चाल, तेवढीच सुरेल गायकी, आणि काव्य यांनी माझे चांगलेच लक्ष वेधून घेतले. हे सिनेगीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले आहे. हे गीत लिहिले आहे १९८१ मधे बनलेल्या चित्रपट कैवारी साठी जगदीश खेबुडकर यांनी तर संगितकार श्री प्रभाकर जोग आहेत.  शब्द सुलभता आणि आशय गहनता ध्यानात यावी म्हणून या गाण्याच्या चार ओळी खाली देतोय.


मी कशी ओळखू प्रीती, हे हृदय म्हणू की लेणे?

प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे


का नकळत डोळे मिटती? स्पर्शात शहारे उठती

मी कशी भावना बोलू? हे शब्द म्हणू की गाणे?


या जबरदस्त रचनेने मला मोहवून टाकले . प्रेम ही भावना परमेश्वराने मानवास दिलेली मौल्यवान भेट  आहे .  विचार करा हे प्रेम जर नसते तर माणसाचे आयुष्य काय बनले असते? म्हणून तर एका गीतात कवि म्हणून गेलायः

प्रेमा काय  देवू तुला?

भाग्य दिले तू मला.


प्रत्येक भाषेमधे प्रेम या विषयावर भरपूर लिखाण झालेले आहे. मग ते कवितेच्या रुपाने असो वा कादंबरीच्या रुपाने. मी बरेच कवि असे पाहिले आहेत की ज्यांनी बालपणी पहिली कविता आईवर आणि तरुणपणी पहिली कविता प्रेमावर केलेली आहे. आई हे प्रेमाचे मूर्तीमंत रूप असते. प्रेम हे सांगावे लागत नाही. त्याची अनुभूती यावी लागते.

पण हल्ली बर्‍याच वेळा प्रेमाचे भ्रष्ट रूप बघायला मिळते जी अतिशय खेदाची बाब आहे. असाच एक प्रसंग एका बातमीत वाचून मी खूप वैतागून लिहिले होते ते असे:


 फ्यूजन होता परक्या स्त्रीशी

भावतात का ओंगळ गाणी?

स्त्रीलंपट चौकट राजाला

आवडते का बदाम राणी?


असा भावनांचा स्फोट होतो कधी कधी विमनस्कतेतून! पण वरील गाण्याने मला प्रेमाची हळूवार बाजू दाखवली आणि मला एक कविता याच विषयावर लिहायची तिव्र ईच्छा झाली. बरेच दिवस विचार मंथन करून लिहिलेली कविता खाली प्रस्तूत करतोय. बघा कशी वाटतेय ती.


मी गुणगुणतो


तुझिया वरती गीत लिहाया शब्द जुळवतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


तुझे हासणे, तुझे बोलणे, तुझे लाजणे

मला आवडे कधी तुझे ते रुसून बसणे

तुझ्या भोवती सदा सर्वदा मी रुणझुणतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


वसंत फुलला जेंव्हा भेटी झाल्या अपुल्या

आठवणीच्या शुभ्र तारका मनी कोंदल्या

बेमौसम का श्रावण तू येता रिमझिमतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


मिसळुन गेलो केंव्हा आपण पत्ता नाही

दोस्तीमध्ये गाजवलेली सत्ता नाही

आठव येता झर्‍याप्रमणे मी झुळझुळतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


सुखदु:खाची एकच व्याख्या अपुली आहे

सूर, ताल, लय आयुष्याची जपली आहे

केसामध्ये फुले तुझ्या, अन् मी दरवळतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


तू नसताना क्षितीज असते काजळलेले

चैन हरवुनी भाव मनाचे वादळलेले

तुला शोधण्या अंधःकारी मी मिणमिणतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


आम्रतरूवर मोहर नसता, कोकिळ ताना

सदा ऐकल्या मिठीत आपण मोहरताना

आम्राईतुन झुळूक होवुन मी सळसळतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


योगायोग म्हणजे एक हुरहुन्नरी तरुण संगीतकार श्री निखिल महामुनी यांच्या ही रचना वाचनात आली आणि त्यांना फार आवडली. त्यांनी या रचनेला संगीतबध्द  केले. अर्थात चाल आणि गायकी तरूण पिढीची आहे. खूपच सुरेख गायली आहे. आपण पण मजा घ्याल ऐकतांना. ही रचना ऐकण्यासाठी क्लिक करा---https://www.youtube.com/watch?v=ab-0ExszE2k



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Saturday, August 28, 2021

शरसंधान---( वीक एंड लिखाण )

 


आठ वर्षांपूर्वी एके दिवशी माझा मोबाईल खणाणला. हॅलो म्हणता दुसर्‍या बाजूने माझा एक खूप जुना वर्गमित्र बोलत होता. आम्ही दोघे दहावीत ( तेंहा मॅट्रिक म्हणत असत ) एका वर्गात होतो. एकदा त्याने खाणाखुणा सांगत ओळख पटवली आणि गप्पा सुरू झाल्या. अगदी दिलखुलास! त्याने पुढाकार घेऊन त्या वर्षी दहावीत होते त्या मुलांचे एक गेट टुगेदर करायचे ठरवले होते. त्यासाठी फोन नंबर्स आणि पत्ते काढून तो संपर्क साधत होता. आम्ही सारे अंबाजोगाईच्या शाळेत होतो. मी त्याला प्रोत्साहन देऊन पुढे जाण्यास सांगितले. लागेल ती मदत द्यायचीही तयारी दाखवली. 

या नंतर जवळ जवळ एक महिन्याने त्याचा परत फोन आला. त्याने सांगितले की बत्तीस मित्रांनी यायची तयारी दर्शवली आहे. पण सर्वांना अंबाजोगाई गैरसोयीचे वाटत असल्याने आणि एवढ्या लोकांची बडदास्त ठेवणे शक्य नसल्याने, गेटटुगेदर एका मोठ्या शहरात ठरले. तारीखही ठरली होती. मी त्याला हिरवा कंदील दाखवला.

यथावकाश आम्ही सर्वजण एकत्र जमलो आणि यादोंके गलियारोंका सफर शुरू हुवा. कोण कोठे असते, काय करते, मुलं मुली काय करतात असे अनेक प्रश्न चर्चिले गेले. मधे मोकळ्या वेळात माझे खास असलेले चार मित्र भेटले. वेगळा ग्रुप करून गप्पा सुरू झाल्या. आम्ही पाच जणांनी असे ठरवले की हा कार्यक्रम झाल्यावर कुठे तरी आउटींगला जायचे एका रात्रीसाठी. आणि आम्ही निघालो. मित्रात जसे वातावरण असते तसेच होते. भरपूर गप्पा, थट्टा, मस्करी, वर्गातील मुलींच्या आठवणी वगैरे.

मला प्रथमच कळाले की त्या चौघातील दोघांना फेसबुकमुळे माहीत होते की मी कविता करतोय. आणि सगळ्यांनी माझी  छेड काढायला सुरुवात केली. त्यांनी  खोचक पण हसत विचारलेले प्रश्न असे:

१) निशा, तुला कविता करायची आवदसा कशी सुचली?

२) जगात आणि मराठीत एवढे कवि असताना तू धाडसच कसे केलेस त्यात भर टाकायची?

३) जगात कुठे भूकंप झाला तर लोक दु:खी होतात पण कवी मात्र संधी आहे असे समजून त्यावर कविता करत बसतात.

४) मुक्त्छंदातल्या कविता तर एखादे गद्य ओळी तोडून लिहिल्या सारखे असते. या वर मी सांगितले की माझ्या लयीत आणि वृत्तात असतात. असे सांगितल्यावर एकजण मोठ्याने म्हणाला की आपला निशिकांत अधुनिक मोरोपंत आहे बरे का!

५) आणि त्या चारोळ्या आणि हायकू? तू लिहितोस की नाही?

बरे हे सारे मित्र शाळेत असताना असे वाह्यात नव्हते. आम्ही शाळेच्या वाचनालयातून पुस्तके घेऊन वाचत असू आणि त्यावर चर्चा पण करत असू. मला वाटले ते माझी फिरकी घेत आहेत म्हणून मी दुर्लक्ष केले. आम्ही सर्वजण आपापल्या गावी परतलो. या कार्यक्रमामुळे आमच्यातील संपर्क वाढला. पण मनात सारखे येत होते की कवी आणि कवितांबद्दल इतके गैरसमज आहेत लोकात? माझे मन मित्रांचे मला चिडवणे सहजासहजी पचवायला तयार नव्हते. या विचार मंथनातून कविता तयार झाली जी थोडी खोचक, म्हंटलं तर विनोदी, थोडी आत्मचिंतन करायला लावणारी अशी झाली आहे. खरे तर हा माझ्या कवितेचा बाज नाही म्हणून पार्श्वभूमी सांगायचा हा प्रपंच.  या कवितेतून तसे पाहता मी (कवी) माझ्यावरच शरसंधान केलेले आहे.

मी एका ठिकाणी वाचलय की माणसाला स्वतःकडे तिर्‍हाईत नजरेने बघता आले पाहिजे. मी छोटासा कवि असूनही ही रचना याच भावनेतून लिहिली आहे. कोणीही गैरसमज करून घेऊ नये. कविता पेश करतोय.


वादळ गेले, वळले नाही


हात जोडुनी जा जा म्हणता

पाय रोवले, गेले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


माणसावरी संकट येते

पूर असो ढगफुटी असू द्या

दु:खाचा डोंगर कोसळतो

माय मरो वा बाप मरू द्या

यावरही कविता केलेल्या

कुणी वाचुनी थकले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


व्यासपिठावर बरीच गर्दी

आणि अल्पसे श्रोते असती

असेल तेथे कविसंमेलन

जिथे कवींची अमाप भरती

कविता वाचन ठीक, तरन्नुम

श्रोत्यांना आवडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


कविविश्वाची विचित्र पध्दत

पहिली सर पडते ना पडते

लगेच श्रावण कवितांची झड

सर्वदूर जोमात बरसते

कवितेसाठी विषय संपले

असे कधीही घडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


सांगायाचे काय न ठावे

यमक जोडण्या धडपड नुसती

आर्या, वृत्तामधली कवणे

यांची झाली पडझड नुसती

दिवस चांगले काल कवींना

आज यूग ते उरले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


श्लोक, आरत्या, स्तोत्रे सारी

काव्य प्रकारातून उपजले

म्हणताना ते उगा वाटते

देवांना ते सर्व भावले

कंटाळुन त्या कवणांना तो

पावत नसतो, कळले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

वादळ गेले, वळले नाही

 हात जोडुनी जा जा म्हणता

पाय रोवले, गेले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


माणसावरी संकट येते

पूर असो ढगफुटी असू द्या

दु:खाचा डोंगर कोसळतो

माय मरो वा बाप मरू द्या

यावरही कविता केलेल्या

कुणी वाचुनी थकले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


व्यासपिठावर बरीच गर्दी

आणि अल्पसे श्रोते असती

असेल तेथे कविसंमेलन

जिथे कवींची अमाप भरती

कविता वाचन ठीक, तरन्नुम

श्रोत्यांना आवडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


कविविश्वाची विचित्र पध्दत

पहिली सर पडते ना पडते

लगेच श्रावण कवितांची झड

सर्वदूर जोमात बरसते

कवितेसाठी विषय संपले

असे कधीही घडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


सांगायाचे काय न ठावे

यमक जोडण्या धडपड नुसती

आर्या, वृत्तामधली कवणे

यांची झाली पडझड नुसती

दिवस चांगले काल कवींना

आज यूग ते उरले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


श्लोक, आरत्या, स्तोत्रे सारी

काव्य प्रकारातून उपजले

म्हणताना ते उगा वाटते

देवांना ते सर्व भावले

कंटाळुन त्या कवणांना तो

पावत नसतो, कळले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Saturday, August 7, 2021

कवितेचा आशय---( वीक एंड लिखाण )


मला बर्‍याच वेळा अनुभव आला आहे की कविता काय लिहायची, कशी लिहायची, कधी लिहायची हे कधी कधी कवीच्या हातात नसते. माझ्या बर्‍याच कविता मला जशा हव्या होत्या तशा आकारल्या नाहीत.
सध्या सर्व समूहावर उपक्रम आणि स्पर्धांचे, विशेषतः व्हाट्स अ‍ॅपवर, पीक माजले आहे. प्रत्येक समूह असे उपक्रम राबवत असतातच. चारोळ्या, शेल चारोळी, ओळ देवून कविता, वृत्त देवून गझल, चित्र चारोळ्या किंवा कविता, एक ना दोन, कैक उपक्रम राबवले जातात. या खाली लिहिलेले लिखाण ठराविक वेळातच पोस्ट करावे लागते.
एकच प्लस मुद्दा असा आहे की लोकांना लिहिते करता येते. मी असे समूह पाहिलेत जेथे विषय दिला जातो. एक  कडवे चार ओळीचे असावे , दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असावे असे अनेक नियम सांगून कविलोकांच्या मुसक्या बांधल्या जातात. मला आश्चर्य वाटते की अशा परिस्थितीत नैसर्गिक कविता होईल कशी? मग ओढून ताणून शब्द जुळवले जातात. अशा स्पर्धांमुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. एका समूहाच्या अ‍ॅड्मिनने मला फोन करून उपक्रमात कविता पाठवण्याची गळ घातली. मी जेंव्हा त्यांना नियमाविषयी बोललो तेंव्हा त्यांच्याकडे कांहीही स्पष्टीकरण नव्हते. जे लोक अशा कविता लिहितात त्यांचे मला कौतुक वाटते. कविता म्हणजे हॉटेलचे मेनू कार्ड नसते. जी ऑर्डर दिली ते पुरवले जाते. 
हे सर्व लिहायला कारणही तसेच आहे. आम्ही तीन वर्षापूर्वी एका अ‍ॅग्रो टूरिस्ट रिसॉर्ट्ला पिकनिकसाठी गेलो होतो. खूप छान ठिकाण होते. सर्व सोयी उत्तम होत्या. लोकांची गर्दी पण बर्‍यापैकी होती. दिवस खूप एंजॉय केला सर्वांनी.
दुपारचे जेवण झाल्यानंतर दाट झाडीखाली बाजा ( कॉट्स) टाकल्या होत्या. मी थोडा आडवा झालो. दाट झाड असून आणि मी सावलीत असूनही उन्हाची तिरीप तोंडावर येत होती. मनात विचार आला की सूर्य का असा मला डोकावून बघत आहे? कविमनच ते. लागलीच दोन ओळी आठवल्या ज्या मोबाईलमधे टाईप करून सेव्ह केल्या. मनात विचार आला की नंतर आरामशीर या पिकनिकवर एक छान कविता लिहावी. पुण्याला सारेजण परतलो. त्या ओळींबद्दल पार विसरून गेलो. जवळ जवळ दीड वर्षानंतर त्या ओळी बघण्यात आल्या आणि कविता लिहायची उर्मी आली. बसलो थाटात कविता लिहायला. मूळ कल्पना पिकनिकवर लिहायची होती. पण दुसरेच सुचत गेले. पूर्ण झालेली कविता एकदम भिन्न अंगकाठीची झाली. या आधी पण असे झालेले आहे. म्हणून म्हणतो की कवितेचा आशय आधीच ठरवता येत नाही. ऐनवेळी जे सुचेल तीच कविता/गझल असते. ती कविता खाली देतोय रसिकांच्या सेवेत.

सूर्य का मला शोधतो आहे?

अता कुठे सावली मिळाली, चैन भोगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?


रखरख वणवण सदैव असते पाचवीस पुजलेली
आयुष्याची घडी त्यामुळे सदैव विसकटलेली
लगाम घालत आकांक्षांना, मजेत जगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जिथे संपतो रस्ता तिथुनी चालू प्रवास होतो
कसे जायचे ध्येय दिशेने, बांधत कयास असतो
अनवट वाटांवरती पाउल खुणा सोडतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

पहिल्या, शेवटच्या श्वासातिल अंतर असते जीवन
त्यात भेटतो कधी उन्हाळा कधी ओलसर श्रावण
दु:ख-वेदनांशी मैत्रीचा सराव करतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जन्मच झाला मुळी मानवा! जगात रडता रडता
जरी कळाले दु:ख सोबती असेल बसता उठता
हात धुवोनी तरी सुखाच्या मागे पळतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

परावलंबी सुखास हिणकस, भाव केवढा आला!
दु:ख नांदते जगी म्हणोनी जन्म सुखाचा झाला
पर्णफुटीला पानगळीचे फलीत म्हणतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?



निशिकांत देश्पांडे, पुणे. 
मो.क्र. ९८९०७ ९९०२३




Friday, July 30, 2021

आनंदण्याची कारणे---( वीक एंड लिखाण )

 मी बँकेत कार्यरत असताना ट्रेनिंग सेंटरमधे गेस्ट फॅकल्टी म्हणून जात असे. एकदा मला असेच एका ट्रेनिंग बॅचला पाचारण करण्यात आले. विषय होता निवृत्तीनंतरचे जीवन कसे व्यतीत कराल. येत्या एक वर्षात निवृत्त होणारे अ‍ॅसिस्टंट जनरल मॅनेजर्स ट्रेनिंगसाठी बोलावले होते. अजून एक विशेष म्हणजे घरात नवरा किंवा बायको कसे आनंदी जीवन जगायचे हे ठरवू शकत नाही. दोघांनी मिळून हे महाकठीण काम करावे लागते. हे ध्यानात घेऊन बँकेने नोकरी करणारे ऑफिसर्स आणि त्यांची पत्नी किंवा पती यांना ही बोलावले होते. अशी एकूण २५ जोडपी होती. मला सकाळी नऊ ते दीड पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. या सर्वांशी संवाद साधताना मला खूप मजेशीर अनुभव आले जे मी येथे आपणांशी शेअर करणार आहे. या ट्रेनिंगमधे जास्त लोक आंध्र प्रदेशातील होते. मी जोडप्यांना अनेक प्रश्न विचारले त्यातील कांही असे--

१)तुम्ही दोघे मिळून घरी( दिलखुलास गप्पा मारता का?--प्रतिसाद्; नुसतेच एकमेकाकडे ओशाळून बघणे

२) तुम्ही कधी एकमेकांना विनोद सांगून मनमोकळे हसता का?--प्रतिसाद-- जो वर आहे तोच.

२) तुम्ही कधी नदी/सागर किनार्‍यावर किंवा तळ्याकाठी निवांत एकमेकांच्या हातात हात घालून वेळ घालवलाय का?--प्रतिसाद पुन्हा तोच. एकमेकाकडे बघणे. 

मग लोकांना थोडे बोलते करण्यासाठी मी जरा विषय बदलला. सर्वांना एक प्रश्न केला की तुम्हाला जीवनात खुशी मिळावी यासाठी कुटुंबात तुम्हाला काय हवे आहे. या प्रश्नाला मात्र भरभरून प्रतिसाद मिळाला. जसे जसे प्रतिसाद मिळत गेले, मी ब्लॅकबोर्डावर लिहीत गेलो. आलेली कांही उत्तरे नमुन्यादाखल खाली देत आहे.

१) माझ्या सुनेने आमच्या दोघांशीही चांगले वागावे.

२) माझी नातवंडे चांगल्या मार्कांनी पास व्हावेत.

३) आम्ही मुलांसाठी ज्या खस्ता खाल्ल्या त्यांचे मुलांनी ध्यान ठेवावे.

४) आमची मुलांनी सर्व परीने काळजी घ्यावी जशी आम्ही आमच्या आई बाबांची घेतली.

५) बायकोने नवर्‍याशी किंवा नवर्‍याने बायकोशी हिडिस फिडिस करू नेये. आदराने वागावे.

असे एकूण पन्नास प्रकार बोर्डावर लिहिले गेले.

समारोप करताना मी सर्वांना सहनुभूती दाखवली. या गोष्टी सर्वच कुटुंबात घडतात. आणि माझा मुख्य प्रतिप्रश्न केला. तुम्हाला आनंद मिळण्यासाठी मुलांनी, सुनेने, नातवंडांनी, शेजार्‍यांनी काय काय करायला पाहिजे हे सविस्तर सांगितलेत आपण. मला एक सांगा की तुम्हा लोकांचा आनंद एवढा परावलंबी आहे का? तुम्ही कोणीही सांगितले नाही की तुमच्या आनंदासाठी तुम्ही स्वतः काय करणार ते! तुम्ही गणपती बाप्पा नाहीत की सर्व लोकांनी तुम्हाला आनंदाचा नैवेद्य दाखवून  नमस्कार करावा. आणि वर्गात पिनड्रॉप शांतता पसरली. मग त्यांना कौन्सेलिंग केले आणि वर्ग संपला. लंच घेतांना बरेच लोक मोकळेपणाने बोलले. ते काय काय म्हणाले हा लिखाणाचा स्वतंत्र विषय होईल.

माझ्या मनात नेहमी येते की आनंद लुटणे लोकांना का एवढे अवघड जाते? आनंद चोहिकडे विखुरलेला आहे. आपण कसा लुटायचा हे आपणच ठरवायचे असते.  अर्थात मी सात्विक आनंदाबद्दल हे विधान केले. दुसर्‍यांना त्रास देवून मिळवलेला आनंद हा असुरी असतो. तुमची प्रवृत्ती कशी आहे यावर आनंद अवलंबून असतो. मी एके ठिकाणी वाचलय की ज्यांचा स्वभाव मोकळा आणि प्रवाही असतो ते लोकच आनंद लुटू शकतात. साधी विनोदाचीच बाब घ्या. ज्यांचा ओघवता स्वभाव आहे तेच विनोद प्रभावीपणे सांगू शकतात  आणि दुसर्‍यांनी सांगितलेल्या विनोदावर खळखळून हसूही शकतात.

असा हा पसरलेला आनंद आपणच लुटायचा असतो. कुणी देण्याची वाट बघायची नसते. आनंदाची जगात कोठेही बाजारपेठ नाही. एकदा आनंद लुटायचे तंत्र आले की आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था सहज प्राप्त होते. या आनंदाविषयी लिखाणाचा शेवट मी एका विनोदी गझलेने करतोय. अशा विनोदी गझलेला हझल म्हणतात, बघा थोडा आनंद मिळतो का ते वाचून!


कारणे (हझल)


सांग माहेरी सदा तू राहण्याची कारणे

तीच माझ्या वेदना आनंदण्याची कारणे


तीच शेजारीण आहे बोलतो मी, लाघवी

ऐकता चोरून मिळती भांडण्याची कारणे


मेहुणी माझी तुझीही लागते भगिनी तरी

सांग तू दुस्वास मग आरंभण्याची कारणे


वाढता तव घेर बघुनी हर्ष मम्मीला तुझ्या

माय पुसते आज माझ्या वाळण्याची कारणे


मी तरी होहोच म्हणतो खानदानी रीत ही

तुज तरी मिळती कुठूनी वसकण्याची कारणे


धूर्त शेजा-यास कळले आज ती नाही घरी

जाणती ते शांततेच्या नांदण्याची कारणे


ती तुझ्या प्रेमात आहे कैद तुज केले तरी

दूर कर "निशिकांत" मुसक्या बांधण्याची कारणे



शेवटी मी एक चित्र देत आहे. हे बघून माझी खात्री झाली की कारण नसताना सुध्दा आनंद लुटता येतो. चित्रातील मुलांचे माय बाप बांधकामावर काम करत आहेत आणि मुले बघा कसा आनंद लुटत आहेत ते!  याला जीवन ऐसे नाव! हे चित्र फेसबुकवरील वाचकांना दिसेल. व्हाट्सॅपवर अवघड वाटते हे चित्र पोस्ट करणे. पण प्रयत्न प्रयत्न करेन. असो.



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो.नं. ९८९०७ ९९०२३


  

 

Friday, July 23, 2021

आनंदाने पुढील अंतर--( वीक एंड लिखाण )

१) अहो तुम्हाला एवढं कसं-----२) तरीही मी म्हणत होते---३) ) आमचे हे न---४) गप्प बसा मी बोलते--- ५) अहो ऐकलत का? ही सारे वाक्ये पूर्ण करून बघा परिचयाची आहेत का ते. सर्व पुरुषांच्या नक्कीच परिचयाची आणि दैनंदिन जीवनात ऐकलेली पण असतील. या सर्व वाक्यातच संसाराची मजा आहे. घरोघर मातीच्या चूली आजकाल राहिल्या नाहीत पण ही वाक्ये घरोघर यावत्चंद्रदिवाकरो बोलली अन् ऐकली जातील. माझं आजचं लिखाण पत्नीबद्दल आहे आणि तेही माझ्याच; इतर कुणाच्या नाही.

गेल्या आठवड्यात माझ्या पत्नीचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने हा प्रपंच! आम्हा दोघांचे लग्न हा आयुष्यातील मैलाचा दगड ठरला सर्वार्थाने. एक वेगळी दिशा, एक अनुपम अनुभव हे सारे मी अनुभवले. तिने काय काय केले याचा गोषवारा येथे देत नाही कारण ते सारेच अनुभवतात. ज्यामुळे ती मला ए कट अबोव्ह वाटते त्या मुद्यांचा जरा परामर्श घेणार आहे

 कांही महत्वांच्या बाबी अशा.

मी बँकेत पुढील बढत्या मिळवण्यासाठी, जे माझे ध्येय होते, खूप कामात आणि आभ्यासात व्यस्त असायचा. त्या वेळी ती सर्व घर सांभाळायची. मुलाचे आणि मुलीचे संगोपन तिने एकटीने केले. मी फक्त पगाराचे पैसे आणण्याशिवाय कांहीही केले नाही. मुलांचा आभ्यास घेणे, त्यांना प्रोत्साहीत करणे, चरित्र बनवणे हे सारे तिचेच काम होते. म्हणतात ना स्त्रीही घरातील सर्वव्यापी व्यक्तिमत्व असते. माझ्या घरात आजही असा एकही कोपरा किंवा क्षेत्र नाही जिथे तिचा वावर नसेल. 

तिचे शिक्षण हैद्राबाद आणि औरंगाबाद येथे झाले होते. मी मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील रहिवासी आणि शिक्षण पण तिथेच. या शहरी ग्रामीण पार्श्वभूमीचा पण अडसर आला नाही. ती अ‍ॅडजस्ट करत गेली. माझे कुटुंब तसे मागासलेले. घरात गाणे असे नव्हतेच. असलेच तर देवाची भजने, आरत्या, पंचमीला भुलईची गाणी, मंगलआष्टके येथेपर्यंतच मर्यादित संगीत होते. पण माझ्या पत्नीमुळे आमच्या घरात संगीत आले. तिला संगिताचे अंग आणि छंद भरपूर आहे. ती आताही पुण्यात रागदारी संगीत आणि सुगम संगिताचे वर्ग घेते. आमच्या घरी सतत संगिताचा अभिषेक चालू असतो. फिल्मी, मराठी, हिंदी आणि शास्त्रीय. यामुळे माझ्यासारखा औरंगजेबही तानसेन नाही पण कानसेन नक्कीच झालाय. मला आठवतय की १९७१ मधे मी फिलिप्स कंपनीच रेकॉर्ड प्लेयर घेतला होता. दरमहा एकदोन रेकॉर्ड्स आम्ही घेत असू. आम्ही लता मंगेशकर यांनी रॉयल अल्बर्ट हॉल मधे लंडन येथे लाईव्ह कार्यक्रमात गायलेल्या गाण्याची आणि चोरी चोरी सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स आणल्या. रागदारीच्या पण एक दोन रेकॉर्ड्स होत्या ज्या आम्ही सतत लावत होतो. माझी पत्नी जयश्री इतकी खुश होती की एकदा ती मला म्हणाली की इतकी  छान गाणी ऐकायला मिळाली तर मी न जेवताही राहीन. असे तिला संगिताचे वेड आहे. या मुळेच की काय संसारात आमचे लय, ताल, सूर सारेच झकास जुळून आले आणि लग्नानंतरचा पन्नासपेक्षा जास्त वर्षाचा काळ भुर्रकन उडुन गेला. जीवनात आनंदी आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था आम्ही दोघेही अनुभवत आहोत.

या वाढदिवसाचे औचित्य साधून तिच्यासाठी रचलेली एक कविता पेश करतोय.


  आनंदाने पुढील अंतर


काय गवसले, काय हरवले?

करूत चर्चा निवांत नंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


तिच्या रुपाने घरात आले

राग, ताल अन् कैक तराने

नूर घराचा बदलत गेला

गळ्यातल्या परिपक्व स्वराने

मैफिल आयुष्याची सजली

अमूल्य झाले हे स्थित्यंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


क्षितिजाच्याही पल्याड आम्ही

दोघे सोबत नांदत होतो

जरी हिमालय जमला नाही

पर्वतीवरी सुखात होतो

काबिज केलेल्या स्वप्नांचा

अश्वमेध चालतो निरंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


गरज वाटली कधीच नाही

हास्य लेउनी मिरवायाची

मनी नांदले, तेच गोंदले

आवड नव्हती प्रदर्शनाची

हवे आमुच्या जगास आम्ही

क्षणोक्षणी आले प्रत्त्यंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


उधारीतल्या सुखास आम्ही

नगदीच्या दु:खात तोलले

संतुष्टीच्या सुपीक रानी

आनंदाचे बीज पेरले

प्रश्न न केला देवांनाही

परावलंबी नव्हते उत्तर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


वटपूजा ना करताही पण

दृढप्रेमाचा प्रत्त्यय येतो

झूळझुळणार्‍या प्रेम प्रवाही

रुढी प्रथांचा व्यत्त्यय येतो

जगावयाचे खूप अजूनी

म्हणूत झाले हे मध्यंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर



निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

 

 

Saturday, July 3, 2021

मनाप्रमाणे घडेल का?

 हवे हवेसे मनास, त्याची 

वाट पहाणे सरेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


खाचा खळगे अवघड वाटा

अंधाराचे राज्य इथे

नैराश्यच का भेटत असते?

धावत हातो जिथे, तिथे

जास्त मागणे माझे नाही

एक कवडसा मिळेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


तुझ्या भोवती वसंत असतो

तुला कळावा ग्रिष्म कसा?

होरपळीतच जगावयाचा

जणू घेतला मीच वसा

हयात असता तुला विसरणे

या वेड्याला जमेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


आठवणींनी किती लगडली! 

स्वप्ने सारी तुझ्यामुळे

खंत एवढी एकच आहे

स्वप्नांशी ना सत्त्य जुळे

मृगजळ तू झालीस अशी का?

उत्तर याचे कळेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


लाख तारका असोत गगनी

कौतुक त्यांचे मला नसे

कशास जत्रा बघावयाची

जणू लागले वेड पिसे

मला हवी जी तीच चांदणी

कधी नेमकी दिसेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


क्षितिजाच्याही पुढती जाऊ

बसवायाला विश्व नवे

दोघे आपण फक्त असू या

कशास तिसरे कुणी हवे?

तार मनाची तुझ्या नि माझ्या

नकोच शंका जुडेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Saturday, June 19, 2021

जनरेशन गॅप---( वीक एंड लिखाण )

 आज एक गंभीर विषय हाताळायचा प्रयत्न करतोय. या विषयाचे मूळ चांगल्या भावनेतच आहे. आई वडील यांना आपल्या मुलांची काळजी वाटणे स्वाभाविकच आहे. प्रश्न निर्माण होतात ते अतिरेकांमुळे. पालकांना, विशेषतः आईला खूपच काळजी असते आपल्या मुलांची. त्यापोटी वेगवेगळ्या सुचना देणे आहोरात्र चालू असते. मुलांनी खावे काय, खेळावे काय,  कपडे कोणते घालावेत, काय आणि कसे बोलावे, अशा अनेक गोष्टीत सुचनांचा भडिमार चालू असतो.

मी अनेक घरात यामुळे कलह झालेले पाहिले आहेत. जुन्या पिढीने जाणीवपूर्वक थोडे लक्ष कमी करायला पाहिजे. तरूण पिढीला अशा पावलोपावली सुचना दिलेल्या आवडत नाहीत. खरे म्हणजे प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगू द्यायला हवे. आता एखाद्या मुलाला आपला   

   जॉब बदलायचा असेल तर तर तो विचार करूनच निर्णय घेईल ना! तेथे पण सल्ला द्यायची काय गरज?

या संबंधात घरचेच कांही किस्से सांगतो. माझा मुलगा सातवी आठवीला असेल. तो शाळेत सायकलीवर जायचा. त्याची आई घराच्या फाटकात जाऊन त्याला टाटा करायची आणि बाळा हळूच रस्त्याच्या डाव्या बाजूने  सायकल चालव अशी न चुकता सुचना द्यायची. एकदा मुलगा आईची फिरकी घेत म्हणाला की आई मी मोठा झाल्यावर विमान कंपनीत  पायलट झालो तरी सांगशील की विमान हळू चालव आणि डाव्या बाजूने चालव. असेच माझ्या मुलीनेही आईबरोबर केले. आई सांगत होती की लहानपणी आम्ही किती गरीबीत दिवस काढले ते. मी पीयुसीला असताना एका मिणमिणत्या चिमणीच्या उजेडात आभ्यास केला आहे. मराठवाड्यात चिमणी म्हणजे एक प्रकारचा केरोसिनचा दिवा ज्याची ज्योत प्रकाश देते पण त्याला काच लावायची सोय नसते. हे मुलीने ऐकून तर घेतले. पण एकदा आई अशी बोलल्यावर चक्क हसू लागली, मुलगी तेंव्हा जेमेतेम पाचवीत असेल. तिला दटावून हसायला काय झाले असे विचारता तिने मजेशीर दोन उत्तरे दिली. ती म्हणाली की तुझ्या लहानपणी गरीबी होती, घरात विजेचे कनेक्शन नव्हते म्हणून तुला तसे रहाणे भाग होते. आता आपल्या घरी लाईट आहे, अर्थिक परिस्थिती पण चांगली आहे. आम्ही कशाला तसे रहायचे? आणि दुसरा याहूनही मजेशीर प्रतिसाद म्हणजे ती सरळ म्हणाली तिच्या आईला की आम्ही बहीण भावांनी खूप आभ्यास करावा म्हणून या गोष्टी तू पुन्हा पुन्हा सांगतेस. हा प्रतिसाद ऐकून मी तर आवाकच झालो. मुलांना मग ते लहान असोत की मोठे, आई वडिलांना वाटते त्या पेक्षा जास्त जाण/समज असते.

आई वडिलांनी आम्ही तुम्हाला किती कष्टाने मोठे केले, किंवा नऊ महिने पोटात भार वाहिला असे वारंवार बोलायचे टाळावे. हे सर्व लिहायचे कारण म्हणजे मुले मोठी झाल्यावर विचारले नसताना सल्ला देऊ नये. त्यांना असा सल्ला बिलकुल आवडत नाही. आधी कांही दिवस आदरापोटी ते गप्प बसतील पण केंव्हा तरी स्फोट होतोच.

माझे स्वतःचे मत आहे की मुलांनी विचारले तरच दोन तीन पर्याय सुचवावेत. आणि मुलांना पर्याय निवडण्याची मुभा द्यावी जेणे करून जनरेशन गॅप थोडा कमी होईल .हा मला सुवर्णमध्य वाटतो. एका घरात फक्त या कारणाने मुलगा दुरावला आणि त्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. ही घटना पाहिल्या नंतर माझ्या डोक्यात विचार चक्र सुरू झाले. या मंथनातून तयार झालेली कविता खाली पेश करतोय.


तुम्हीच तर ठरवायचं


जाईच्या मांडवात

का काँक्रिटच्या तांडवात?

शंभर कौरवात का

फक्त पाच पांडवात?

कुणी कुठं रहायचं?

तुम्हीच तर ठरवायचं


पिझ्झा कोकचा आहार

का बर्गर चिप्स बहार

मऊ भात पिठल्यावर

गावरान तुपाची धार

पोट कसं भरायचं?

तुम्हीच तर ठरवायचं


रोज दारू पिण्यात

अन् बेहोष जगण्यात

का विठूच्या भजनात

देह भान विसरण्यात

सूख कशात बघायचं?

तुम्हीच तर ठरवायचं


दीर्घायुष्यी बनणे

अन् पिकता पान गळणे

दवबिंदूसमान थोडंच

पण चमकत चमकत जगणे

ध्येय काय ठेवायचं?

तुम्हीच तर ठरवायचं


स्मरायचाय गुरूमंत्र

की जुनेरं प्रेमपत्र

जगत जगत शेवटचं

आयुष्याचं सत्र

कशात किती रमायचं

तुम्हीच तर ठरवायचं



निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

  

Monday, May 31, 2021

कधी शक्य का होते?

 

जे झाले ते विसरुन जाणे

कधी शक्य का होते?

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


नाव कागदी सोडत होतो

पाउस पडल्यावरती

तिचे हासणे, टाळ्या पिटणे

आनंदाला भरती

बालपणाचा अंक संपला

पुन्हा न जगता येते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


तारुण्याच्या उंबरठ्यावर

उदंड होता दरवळ

जिकडे तिकडे सभोवताली

ओला श्रावण, हिरवळ

धुंद फुंद जे जगलो ते ते

अजून स्वप्नी दिसते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


अता लक्तरे दिसू लागली

भावी आयुष्याची

सांजवेळ जगण्यास पाहिजे

कृपाच परमेशाची

जे जगलो ते मस्त! शेवटी

म्हणत जायचे असते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


आलेल्यांची गेल्यावरती

आठव सोबत करती

हाच दुवा तर सांधायाला

असतो अपुल्या हाती

गोड गोड तर कधी कडूही

जे झाले ते स्मरते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, May 12, 2021

विरानीत जावे

 विरानीत जावे


नको तो अबोला, विरानीत जावे
 स्वतःशीच बोलावयाला शिकावे

न देता तिला साद, प्रतिसाद येई
सदा उत्तराचीच ती वाट पाही
अबोलीसही बोलताना बघावे
स्वतःशीच बोलावयाला शिकावे

अचानक वसंतास घेऊन आली
मनी ग्रिष्म! हिरवळ कशी काय झाली?
मनाच्या कपारीत माझ्या रहावे
स्वतःशीच बोलावयाला शिकावे

दुराव्यातही गोडवा अनुभवावा
जसे ऊन दे सावलीचा विसावा
कुठे वाट चुकलो? स्वतःला पुसावे
स्वतःशीच बोलावयाला शिकावे

नको दु:ख आता कुणी सोडल्याचे
जरा तू मना शीक विसरावयाचे
चरे काळजाचे तुझ्या तू भरावे
स्वतःशीच बोलावयाला शिकावे


निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

अंधार-- ( वीक एंड लिखाण--०२. ०५. २०२१)

 अंधार-- ( वीक एंड लिखाण--०२. ०५. २०२१)

कांही दिवसांपूर्वी करोनाने बाधित झाल्यामुळे यासदराखाली   लिखाण होऊ शकले नाही.  आज मागे वळून विचार करताना माझे मलाच खूप हसू येते.    
सखीला प्रकाशाची कमतरता पडू नये म्हणून मी तिला म्हणतो की मी अंधाराला बांध बांधला आहे किंवा अंधाराशी करेन दोस्ती किंवा सूर्य कटोरी घेउन हाती, अंधाराची भीक मागतो असे अंधाराचे उदात्तिकरण करत स्वत:ला एक अवलिया/कलंदर कवी माणनारा मी, जेंव्हा बाका प्रसंग येऊन उभा राहिला तेंव्हा माझी छबी मला वेगळीच दिसली. मी या नवीन दर्शनाने भांबाऊनच गेलो. जिकडे तिकडे दवाखान्यात दाखल केल्यापासून किर्र अंधारच दिसत होता. नैराश्याने आशावादावर मात केलेली बघत होतो. हा काळ मी कधीही विसरणार नाही. निराशेचे झुंड घोळक्याने येत होते आणि आशेची पणती या वादळात विझेल याची मनात सदैव होती.
तब्बल नऊ दिवस अशा भयानक अवस्थेत दवाखान्यात काढले. मला दवाखान्यात दाखल करतानाच जिवाची घालमेल सुरू झाली. जो काळ तेथे विलाजासाठी रहाणे अवश्यक होते तो एक लांबच लांब अंधाराचा बोगदा वाटू लागला आणि या टनेलच्या शेवटी कुठेही प्रकाश किरण दिसेना.  दवाखान्यात दाखल व्हायच्या आदलेदिवशी मी माझ्या सर्व चाहत्यांना माहितीसठी एक पोस्ट टाकली.
जेंव्हा माझा अज्ञातवास संपला आणि मी घरी आलो त्या दिवशी एकदम हायसे वाटले. आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी सायंकाळी घरी आलो त्यादिवशीच माझ्या प्रकृतीत अमुलाग्र सुधारणा दिसली आणि माझ्या आनंदास पारावार उरला नाही. चार पाच दिवस आराम करून मी ऑनलाईन गेलो तर माझ्या मित्र मैत्रिणींच्या सदिछ्चांचा धो धो पाऊस पडून गेला होता.आता मला एकदम पालटलेले चित्र दिसत होते. एकीकडे अंधाराचा माझ्यावर होत असलेला  हल्ला तर दुसरीकडे  सदिच्छांची माझ्या बाजूने असलेली त्सुनामी आणि डॉक्टर लोकांचे अथक परिश्रम. या तुंबळ लढाईत विजय शेवटी प्रकाशाचाच झाला आणि मी आपल्यासमोर या सदराखाली लिहिण्यास खडखडीत तंदुरुस्त उभा आहे.
पण ज्या दिवशी अ‍ॅड्मिट व्हायचे होते त्या दिवशीची माझी मनोव्यथा दर्शवणारी एक रचना माझ्याकडून लिहिली गेली जी मी पोस्ट नाही करू शकलो. ती रचना खाली माझ्या चाहत्यांसाठी देत आहे. कविता पूर्ण झाल्यावर टाईप करताना पुन्हा मनात आले की नकारात्मकता हा माझा गुणधर्म नाही. म्हणून शेवटचे कडवे वाढवून पॉझिटिव्ह लँडिंग केले या रचनेचे. शेवटी मला पण माझा डीएनए बदलणे जमूच शकत नाही. ही भूमिका सांगणारी ही कविता.---

कविता आता रचेन म्हणतो

प्रकाश मागे सोडुन पुढती निघेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो
 
प्रतिबिंबाला आरशातल्या वेध लागले
ग्रहण लागण्या वेळ! तरीही चित्त गोठले
राहू केतू संगे दोस्ती करेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

डोळे मिटुनी बसेन मजला आत बघाया
आत्म परिक्षण केले नाही गेलो वाया
काळोखातच कोठे आहे? बघेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

जुनी जळमटे आठवणींची मिटवायाला
काळोखाचे रंग लागलो उधळायाला
एक काजवा कुणाचा तरी बनेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

हृदयाच्या ठोक्यांनाही पण कळून चुकले
हिशोब करतो श्वास संपले, किती राहिले
वजावटी अन्  बेरजातुनी सुटेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

पिंड असावा बंडखोर हे तत्व पाळले
किती संकटे आली गेली ना जुमानले
झोपडीतही दरबारी आळवेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

गोंधळलेले मनही हल्ली विचार करते
अस्तित्वाविन अंधाराचे असणे असते
प्रकाश नसण्यालाच जमाना तम का म्हणतो?
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो



निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३  

Tuesday, May 11, 2021

कुठे हरवल्या माझ्या कविता?

 कुठे हरवल्या माझ्या कविता?---एक ऑनलाईन मैत्रिण. नेहमी तिच्याशी बोलताना म्हणायची की तिला भटाराखान्यात कामाला जायचे आहे. कधी मुदपाकखाना हा शब्द पण ती वापरत असे. तिच्या बोलण्यातून, तिच्या काव्यछंदाचे घरात कौतुक होत नसावे असे वाटले.उलट तिची प्रतारणाच होत असावी. तिचा गुदमर आणि होत असलेली कुचंबणा चित्रित करायचा प्रयत्न केलाय या कवितेतून.


भटारखान्यातली मुग्धिका
बोलत होती आपुल्यासवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे

वाचायाची सूर लाउनी
अपुल्या अन् इतरांच्या कविता
रोमांचांना पांघरून ती
खळखळायची बनून सरिता
तल्लिन होवुन रंगुन जाई
कवितेमधल्या भावनांसवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे

कामे उरकुन थकल्यावरती
दरवळणार्‍या शांत अंगणी
डोळे मिटुनी आत शोधते
उत्तररात्री एक चांदणी
खुदकन हसते मनात दिसता
शब्द धनांचे कैक काजवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे

कविता माझी रचून होता
त्याला मी वाचून दावली
संपण्याआधी मला म्हणाला
जेवण दे ना! भूक लागली
राबराबणे असे निरंतर
जगले नाही कौतुकासवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे

बंडखोर मी बनेन आता
सरस्वती मा कृपा असू दे
एकच निश्चय, लिहावयाचा
साथ जगाची असू नसू दे
नभांगणी माझ्या काव्यांचे
जगा दिसू दे लाख  चांदवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे


निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, March 23, 2021

वहात गेलो

 

दोन किनारे सीमा असुनी

त्यात खुशीने रहात गेलो

खळखळणार्‍या निर्झरासवे

बेफिकिरीने वहात गेलो


खाचा खळग्यातुनी काढला

मार्ग नेहमी आयुष्याचा

एकेरी ही वाट चालतो

प्रश्नच नव्हता परतायाचा

संकटातही ना डगमगता

पुढे पुढे मी निवांत गेलो

खळखळणार्‍या निर्झरासवे

बेफिकिरीने वहात गेलो


काय बघाया मागे होते?

गतकाळाची फक्त लक्तरे

बालपणीही तशीच रखरख

समोर दिसती जुनी दप्तरे

दु:खालाही आठवताना

मनी सदा हिंदोळत गेलो

खळखळणार्‍या निर्झरासवे

बेफिकिरीने वहात गेलो


लेखाजोखा आयुष्याचा

गर्वगीत हे माझे आहे

इतिहासाच्या पानावरती

मी लिहिले ते ताजे आहे

नवीन व्याख्या आनंदाची

माझ्यासाठी करीत गेलो

खळखळणार्‍या निर्झरासवे

बेफिकिरीने वहात गेलो


नसेन मी श्रीमंत, यशस्वी

आजही जरी लोकार्थाने

सुख चैनीच्या सुगीत जगलो

कलंदरासम सर्वार्थाने

अश्वमेध गरिबीचा केला

सातत्याने जिंकत गेलो

खळखळणार्‍या निर्झरासवे

बेफिकिरीने वहात गेलो



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Monday, March 22, 2021

पाचोळा


पाचोळ्याचे ध्येय कधीही त्याला ठाउक नसते

वारा वाहे त्याच दिशेने पुढे जायचे असते


फरपट त्याची चालू होते वाळुन गळल्यावरती

ना उरतो इतिहास कालचा, भविष्य नसते हाती

काय कारणे जगावयाचे? उत्तर कधी न मिळते

वारा वाहे त्याच दिशेने पुढे जायचे असते


सुखावणारा हिरवाईचा रंगही मला होता

मंद हवेने सळसळण्याचा छंद पाळला होता

दिली सावली किती, कुणाला उगाच का आठवते?

वारा वाहे त्याच दिशेने पुढे जायचे असते


पिकल्या पानांच्या देठाला हिरवेपण का असते?

कवी कल्पना वाचत ऐकत सुकले मन मोहरते

अजरामर लावणी ऐकता क्षणेक मन शिरशिरते

वारा वाहे त्याच दिशेने पुढे जायचे असते


आज इथे तर उद्या कुठे? हे मलाच ठाउक नाही

असण्या नसण्यामधले अंतर उरले घाउक नाही

आज संपला, वाट उद्याची का बघतो? ना कळते

वारा वाहे त्याच दिशेने पुढे जायचे असते


थोडे अपुले, थोडे परके, फक्त आपुले कोणी

त्यांच्यासाठी लिहिली आहे छोटी आत्म कहाणी

वाचत कोणी खळखळ हसते, तर कोणी ओघळते

वारा वाहे त्याच दिशेने पुढे जायचे असते



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


 

Wednesday, March 10, 2021

झाली मूक सतार

 झाली मूक सतार


जोश आटला, चढाव सरला

उरला फक्त उतार

साथ दिली ती, दिडदिडणारी

 झाली मूक सतार


तिला सतारच म्हणायचो मी

छेडत होती तार

तिच्या काकणांचे किणकिणणे

निनादती झंकार

गुरफटलो मी तिच्यात इतका!

दुसरी नको गिटार

साथ दिली ती, दिडदिडणारी

झाली मूक सतार


क्षितिजावरती जगावयाचा

तिने छंद लावला

ती असताना सोबत, मजला

कातळही भावला

तिच्या संगती अनुभवायचा

सदैव श्रावणधार

साथ दिली ती, दिडदिडणारी

झाली मूक सतार


वयोपरत्वे सांज जाहली

जरी मळभ दाटले

हार मानली कधीच नाही

दूर तया सारले

मनात आहे, गळ्यात नाही

बागेश्री, मल्हार

साथ दिली ती, दिडदिडणारी

झाली मूक सतार


मूक जाहली तरी आमुचे

संभाषण चालते

मनात जे जे येते ती ते 

नजरेने बोलते

अपूर्ण जे राहिले, कराया

घेऊ जन्म दुबार

साथ दिली ती, दिडदिडणारी

झाली मूक सतार



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, March 5, 2021

मोत्यांना माळेत ओवलेले

 

दोघे मिळुनी चार करांनी वेचवेचलेले

आठवणींच्या मोत्यांना माळेत ओवलेले 


गोड अनुभुती अनुभवली मी घरात येताना

उंबरठ्यावर माप सांडले शैशव सरताना

गलबलले मी, आई बाबा दूर रहिलेले

 आठवणींच्या मोत्यांना माळेत ओवलेले 


तारुण्याचा, प्रणयरसाचा काळ सुरू झाला

ऋतू संपला तरी घरातिल वसंत ना सरला

फुले मिळाली, धुंद गंधही, क्षण मोहरलेले

आठवणींच्या मोत्यांना माळेत ओवलेले 


वेलीवरती फुले उमलली, अंगणात दरवळ

किलबिल चिवचिव मनी नांदते मनभावन हिरवळ

दिवा मिळाला, ज्योत तेवली, घर सुखावलेले

 आठवणींच्या मोत्यांना माळेत ओवलेले 


खाचा खळग्यांनी भरलेली वाट चालले मी

कष्ट करोनी थकले पण ना कधी बोलले मी

वादळ आले, जया पाहिले कपात विरलेले

आठवणींच्या मोत्यांना माळेत ओवलेले 


वळून बघता मागे सारे समाधान दिसते

शांत मनाने जीवना तुझ्या कविता मी लिहिते

गणगुणते मी कधी कुणाचे गीत भावलेले

आठवणींच्या मोत्यांना माळेत ओवलेले 



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३




Tuesday, March 2, 2021

तरी पालवी फुटून येते

 

झाड तोडले  तरी पालवी फुटून येते

मानवास देवाची करणी दिसून येते


चिरंजीव "चांगले" निर्मिले जगात सार्‍या

अनिष्ट मारी प्रसंग येता उगाच फेर्‍या

संकट असते इष्टापत्ती कळून येते

मानवास देवाची करणी दिसून येते


पानगळीतच गिरगिरणारे पान गळावे

नवपर्णांना फुटण्यासाठी खोड मिळावे

ईश योजना वसंतातली फुलून येते

मानवास देवाची करणी दिसून येते


उमलायाचे काट्यांमध्ये असून प्राक्तन

गंध देतसे जगास अपुला सारे जीवन

मुग्ध कळीही फुलावयाला हसून येते

मानवास देवाची करणी दिसून येते


वसुंधरेचे रूप गोजिरे वरून बघती

कैक तारका धरतीवरती तुटून पडती

निसर्गात हरवता कसे मोहरून येते

मानवास देवाची करणी दिसून येते


शब्द फुलांची माळ अर्पितो तुजला देवा

सरस्वतीची घडो सर्वदा अशीच सेवा

कविता झरझर झरणीमधुनी झरून येते

 मानवास देवाची करणी दिसून येते



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Monday, February 15, 2021

पदर खोचला होता

 

असून स्त्रीभ्रुण, जगात माझा

जन्म जाहला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


जन्मताच मी रडले, लागुन

नव्या जगाचा वारा

पदराखाली तिने घेउनी

दिधल्या अमृत धारा

याच दुधाने कसे जगावे?

धडा शिकवला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


आल्यावरती पदर, घेतली

साडी मज आईने

पदरावरती मोर छानसा

विणलाही घाईने

पदर घ्यायचा चापुन चोपुन

पाठ गिरवला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


सुटले घर, लग्नात बांधली

गाठ जशी नवर्‍याशी

माझ्यासाठी घर जे होते

उत्तर दक्षिण काशी

अश्रू पुसण्या तुझाच आई

पदर शोधला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


पदरमोड कष्टांची करुनी

गाडा रेटत होती

आज नसोनी, वळणावरती

आई भेटत होती

संकटकाळी लपावयाला

पदर न उरला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


भिन्न मनाचे पदर एवढे!

जीवन सारे गेले

उलगडले पण तरी हजारो

उकलू ना शकलेले

हर पदराचा रंग जीवना

कुणी जाणला होता?

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Tuesday, February 9, 2021

बसून पिऊ या घरात

(चाल--मराठी गीत-- तुझी नि माझी गम्मत वहिनी ऐक सांगते कानात, आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात.)


आज करू या गम्मत जम्मत

ऐक सांगतो कानात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात


किती ओतसी सोडा रे!

आणि केवढा चिवडा रे!

जास्त ओत ना व्हिस्की मित्रा

आधी माझिया ग्लासात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात


रंग लागला जसा चढू

काय गोड अन् काय कडू?

कसे कळावे? भान हरवले

बोलत सुटले जोरात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात


पुढील पार्टी कुणाकडे?

पाठव वहिनी आईकडे

पुन्हा एकदा नवीन मैफिल

मस्त रंगवू जोशात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात


दार वाजले टका टका

उघडा यारों भिऊ नका

गाडी चुकली, घरी परतली

उभी कैकयी दारात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३ 


Saturday, February 6, 2021

व्हायचे ते जाहले

व्हायचे ते जाहले

आज मी माझ्यात नाही
व्हायचे ते जाहले
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले

भोवती अंधार सारा
संपता संपेचना
वाट बघुनी पूर्ण थकले
सूर्य पण उगवेचना
जीवनाशी तह करोनी
श्वास होते घेतले
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले

का व्यथा इतरास सांगू?
मीच माझी सोबती
प्रश्न माझे, दु:ख माझे
वाजवू का नौबती?
व्यक्त होण्याला कधी मी
आरशाशी बोलते
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले

नार आली नार गेली
बाब नित्त्याची असे
एक महिला दिन तिचा जो
येतसे अन् जातसे
फ्रीज, टीव्ही आणि पंख्या
सम तिला का मानले?
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले

संपले मी, नवपिढ्यांनो 
घ्या वसा तुम्ही तरी
खड्ग घ्या हातात आता
का शिकायत वैखरी?
हक्क घ्या झगडून तुम्ही
जे मला ना लाभले
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले


निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३