Saturday, October 9, 2021

मॅनिया--( वीक एंड लिखाण. )

  मॅनिया--( वीक एंड लिखाण. )


 बहुतांश लोक कोणत्या ना कोणत्या मॅनियाने ग्रस्त असतात. कळत किंवा नकळत! एखाद्या गोष्टीचे आतोनात वेड असणे याच सदरात मोडते. अशी गोष्ट जर मिळाली नाही तर माणूस अस्वस्थ होतो.  कांही लोकांना संपत्तीचा मॅनिया असतो तर कांहींना लोकप्रियतेचा. अर्थात यात हजारो प्रकार असतात. छंद पोसणे हा जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे; पण छंदाचा अतिरेक होणे म्हणजे मॅनिया.

मी माझे या बाबतीत विश्लेषण केले  आणि एक गोष्ट ध्यानात आली. मी या आधी सांगितले की माझे गझल क्षेत्रातले पदार्पण माझे गुरू औरंगाबादचे डॉ. इकबाल मिन्ने यांचे बोट धरून झाले. जसा मी पुण्याला स्थलांतरित झालो, मी इलाही जमादार यांच्याकडे गझलेसाठी मार्गदर्शन घेऊ लागलो. त्यांनी मला अगदी लहान लहान गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांच्या गझल लिखाणाबद्दल लिहायची अर्थातच माझी कुवत नाही. मला या काळात इलाहींचा मॅनियाच झाला होता म्हणा ना!

मी मंत्रमुग्ध झालो त्यांच्या गझला वाचून. मी त्यांच्याकडून आठ दहा गझल संग्रह विकत घेतले आणि पारायणे सुरू केली त्यांच्या गझलांची. 

परवा बर्‍याच दिवसांनी मला त्यांची आठवण आली. अस्वस्थ झालो. मी त्यांचे माझ्याकडे असलेले सगळे गझल संग्रह काढले आणि जवळ जवळ आठ दिवस वाचत गेलो. अवीट गोडी आणि नजाकत! मोगरा या गझल संग्रहातील दोन शेरांनी मला खिळवूनच ठेवले. काय ती कल्पना शक्ती आणि खयालांची झेप! ते शेर असे आहेत.


आनंद वेचताना आक्रंदने मिळाली

रत्ने गळून गेली मज कोंदणे मिळाली


कळपात काजव्यांच्या आजन्म हिंडलो मी

नुसत्या तुझ्या स्मृतीची तारांगणे मिळाली


हे झाले हळूवार इलाही. शायर काय किंवा कवि काय त्यांची समाजाशी नाळ जुळलेली असेल तर कवितेला एक प्रकारची झळाळी येते. स्त्रियांची परिस्थिती वर्णन कर्तानाचे त्यांचे बोचरे शेर पण वाचण्यात आले. दोन खाली देतोय.


संस्कृतीचा आरसा खरोखर नारी आहे

जिवंत असुनी एक कलेवर नारी आहे


नारी म्हणजे धन दौलत वा जणू खिरापत

मनाप्रमाणे करण्या वापर नारी आहे


शायराचा खरा कस लागतो तो लहान बहरात गझल लिहिताना. त्यांची अशीच एक गझल वाचली. ओळीत फक्त चौदा मात्रा आहेत. त्यातील सहा मात्रांचा रदीफ आहे. तरीही अप्रतिम आहे ही गझल. त्यातील दोन शेर खली देतोय.


वाळूचे तर वाळूचे

चल बांधू घर वाळूचे


गाव झर्‍यांचे खरेच हे

वरवरचे थर वाळूचे


मला या हिमालयाची ऊंची असलेल्या गुरूंचे मार्ग दर्शन मिळाले. ते सांगायचे की शायराने जे सांगायचे ते स्पष्ट आणि वेगळ्या रितीने सांगायचे असते. हे ध्यानात धरून मी असे लिहिलेले दोन शेर खाली देतोय. पहिला आहे एका स्त्रीच्या गोरेपणावर तर दुसरा एकदा कोथिंबीर जुडी ५० रुपायाला एक इतक्या महागाईवर. ते शेर असे.


रेखून चित्र झाले, भरण्यास रंग आता

केशर गुलाब दोन्ही घेतो खलून आहे


केशर डबीत आता कोथिंबिरीस जागा

गगनास भाव भिडले जगणे कठीण झाले


असे हटके गझल लिहिण्याची मला परवा पुन्हा उर्मी आली. विषय होता स्त्रीच्या रुपाचे वर्णन. माझ्या आजोबा पासून सौंदर्य वर्णन म्हणजे डाळींबी ओठ, गालावर खळी, गोरा रंग, हनुवटीवर तीळ वगैरे वगैरे. हे सारे आता तेच ते वाटते. मला हे सर्व टाळून लिहायचे होते. नायिका तर चांगलीच आहे आणि तिला चांगलीच म्हणायचय पण जरा वेगळ्या पध्दतीने. आठवडाभर विचार करून लिहिली एकदाची गझल! खाली देतोय. बघा जमलाय का प्रयोग.


आली असावी उर्वशी


बाग ना फुलली तरी गंधित हवा येते कशी?

बांधला अंदाज की आली असावी उर्वशी


सभ्यही बघती तिला चोरून, राखित सभ्यता

पण बिचारे पाहुनी हसणे तिचे, पडती फशी


मुक्त छंदातून लिहिणार्‍या कवींनाही अता

पाहता तिजला गझल वाटे लिहावी छानशी


पैंजणांचे वाजणेही सांगते कानात की

सोड तू वेड्या तपाला, जिंदगी जग अल्पशी


व्यस्त  असते समिकरण का रूप अन् वय यातले?

कैक वर्षांपासुनी दिसते जणू ती षोडशी


वाढली वर्दळ जशी ती लागली उमलायला

का अडोशाला जगावे, माय सांगे तिज जशी ?


आड आहे, पण भुतांचा, सांगते ती अंगणी

ग्रासता नैराश्य केली रोमिओंनी खुदकशी


भाग्यशाली तोच ज्याची जाहली ती शेवटी

प्राक्तनी इतरास बघणे फक्त स्वप्ने धुंदशी


लेखणी "निशिकांत"ची थकली तिला रेखटता

शेवटी इतकेच लिहिले "रूप ते बावनकशी"



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

वृत्त--देवप्रिया

लगावली--गालगागा X ३ +गालगा


  


No comments:

Post a Comment