Monday, November 15, 2021

वैचारिक धुमारे--( वीक एंड लिखाण )


आपल्या भोवतालचे विश्व कोणी निर्माण केले या बद्दल भिन्न भिन्न मत प्रवाह आहेत. हिंदू धर्मानुसार विश्वाची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे. ब्रह्म हा निर्माता, विष्णू काळजी घेणारे ( preserver) तर महेश हे विनाश करणारे ( destroyer) आहेत. बरे झाले महादेवाने अजून तिसरा डोळा उघडलेला नाही. या विश्व निर्मितीसाठी किती विचार करावा लागला असेल ना ब्रह्मदेवाला? माणूस, विविध प्राणी, जीव जंतू वनस्पती असे अनेक प्रकार. पंचमहाभुतांचे असणे सुध्दा एका मोठ्या नियोजनाचाच भाग आहे.
पण मला जास्त आश्चर्य वाटते ते मानव निर्मितीचे. कारण मानवाला लाभलेली विचार करण्याची शक्ती अफाट आहे. इतर प्राण्यांना नाहीच असे नाही. पण माणसाला हे सारे भरभरून मिळालेले आहे. हे चांगले की नाही हा प्रश्न वेगळा. प्राण्यांमधे ते एखाद्या प्रसंगी कसे वागतील याचा अंदाज बांधता येतो आणि तो बहुतांश बरोबर असतो. पण माणसाचे तसे नाही. त्याचे वर्तन वेगवेगळे असू शकते; नव्हे असतेच. आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे कोणी अर्धा ग्लास रिकामा किंवा भरलेला म्हणेल. साधे लग्नाचे उदाहरण घ्या. कुणाला सुखासाठी लग्न हवे असते, कुणाला घरात कामाला बाई हवी असते तर कुणाला येणारी सून वंशवृध्दीसाठी हवी असते तर घरात येणार्‍या मुलीला स्वप्नपूर्ती हवी असते. हे मी पारंपारीक विचार शैलीबद्दल बोलतोय. विचारशैली अधुनिक झाली तरी ही मतभिन्नता कायमच असणारय जरी संदर्भ बदलले तरीही.
आज खुद्द ब्रह्मदेवालाही कोडे पडले असेल की मी बनवलेला माणूस तो हाच का? तो म्हणत पण असेल की " हेच फल काय मम तपाला." अशा अगम्य माणसाचे (ज्यात मीही आलो) मला नेहमीच कुतुहल वाटत आलेले आहे, कुठे थोडे जरी विचित्र वागणे दिसले तर लगेच विचारांना चालना मिळते.
हे वैचारिक वादळ निर्माण व्हायला एक छोटेसे कारण मला पुरेसे झाले.मी पुण्यात एका जॉगिंग ट्रॅकवर रोज सकाळी फिरायला जात असे.  ट्रॅकच्या शेजारी कांही फ्लॅट्स होते. मला एकेदिवशी दिसले की एका फ्लॅटमधून एक स्त्री गॅलरीत येवून आपले धुतलेले कपडे झटकून दोरीवर वाळू घालत होती. ती आत गेली की थोड्याच वेळाने एक गृहस्थ आपले कपडे झटकून वाळू घालत असत. हे दृष्य मी रोजच छंद म्हणून बघायला लागलो. दोघेही नवरा बायको असावेत बहुधा. माझ्या मनात विचार घोळायला सुरू झाले. त्यांचे आपापसात जमत नसेल कदाचित. पण मजबूरीने एकत्र रहात असावेत. अर्थात ही माझीच कल्पना. हे खरे असेल तर त्यांचे जीवन कसे असू शकते? यावर विचार सुरू झाले आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता म्हण्जे कवि मनाला फुटलेले वैचारिक धुमारे.

एक एकटी नांदत होती

दारावरच्या पाटीवरती
दोन्ही नावे झळकत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

जवळ असोनी जवळिक नाही
असे कसे हे जीवन जगणे?
सुगंधास का फुलापासुनी
शक्य वाटते स्वतंत्र असणे?
अहंकार हा शत्रू असुनी
दोघेही गोंजारत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

आनंदाची नवीन व्याख्या
"दुसर्‍यावर कुरघोडी करणे"
"गं"ची बाधा दोघांनाही
अवघड होते प्रश्न मिटवणे
रेशिमगाठी सोडवण्याची
ना इच्छा ना फुरसत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

सणासुदीला घरचे जेवण
अशात केंव्हा शिजले नव्हते
ऑर्डर देउन मागवलेले
टेबलवरती सजले होते
करून आग्रह वाढायाची
विसरुन गेली पध्दत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एक एकटी नांदत होती

व्हाल्वोमधले शिष्ट प्रवासी
असेच त्यांचे जणू वागणे
अजून होता एक मुसाफिर
मूल पोटचे गोजिरवाणे
गुन्हा नसोनी मुलाभोवती
हेळसांड घोंघावत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

गरीब होते जरी बालपण
माझे मजला होते प्यारे
प्रेमळ आई बाबाकडुनी
मला मिळाले लाख सितारे
त्यांच्या पंखातला उबारा
एकच माझी दौलत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती



निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment