आपल्या समाजात व्यक्तीपूजेचे मोठे स्तोम आहे. चांगल्या विभूतींची पूजा करणे गैर नाही. पण त्यांचे आदर्श ठेवून आचरण केले नाही तर अशी पूजा फक्त एक कर्मकांड बनून रहाते. एके काळचे मोठे मोठे लोक आपण नमस्कार करण्यासाठीच वापरतो.
हेच राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय दिनांचे पण आहे. रोज कोणता ना कोणता दिवस असतोच असतो. बालिका दिवस, व्हॅलंटाइन डे, भाषा दिवस, ज्येष्ठ नागरिक दिवस असे अनेक. मग आपण तो दिवस साजरा करतो म्हणजे काय करतो? कविता, लेख, एखादी सभा, भाषणे वगैरे वगैरे. यात औपचारिकतेचा भागच जास्त असतो. एक साधे उदाहरण महिला दिनाचे घेऊ या. हा दिवस कित्येक वर्षापासून साजरा केला जात आहे. पण महिलांची ( शहरी सोडून ) परिस्थिती जैसे थेच आहे. आपण अशा दिवसामागचा हेतू लक्षात घेऊन कांहीच करत नाही. हेच स्त्रीभ्रुणाच्या आणि नवजात मुलींच्या बाबतीतही घडते. मुलगा व्हावा म्हणून या काळातही एखादी मुलगी कर्नाटकातील येल्लम्मादेवीला अर्पण केल्याचे बघून समाजाच्या बधीर मनाला कांहीच वाटत नाही ही खरी शोकांतिका आहे.
हेच नेमके जयंत्या आणि स्मृतीदिनांच्या बाबतीतही घडते. आपण सर्व नेत्यांचे या दिवशी गुणगाण गातो. त्यांचे तत्वज्ञान त्रिकालाबाधित असल्याचे सभांमधून सांगतो. त्यांचे तत्वज्ञान दहा टक्केही पाळले असते तर समजात अमुलाग्र बदल दिसला असता एव्हाना. एकेकाळी ज्यांना वंदन करावे अशा व्यक्ती समाजात भरपूर होत्या. त्यांनी समाजाला आकार देण्याचे बहुमुल्य काम केले. आजच्या काळात भोवती नजर टाकून बघा. दिसतात का कुणी विभूती. शायर इलाही जमादार यांनी ही खंत व्यक्त करताना लिहिलेल्या एका गझलेतील दोन शेर खाली देतोय.
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?
रोज अत्याचार होतो आरशावरती अता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?
हेच माझ्या डोक्यात काहूर उठवत होते कांही वर्षांपूर्वी. गांधी जयंती साजरी झाली धुमधडाक्यात. आणि नंतर इलाहीजींची वरील गझल वाचून विचाराचे चक्रीवादळ उठले. मग मन या जयंती साजरी करण्याच्या पध्दतीचा आणि वास्तवाचा विचार करू लागले आणि त्यातून एक कविता जन्मास आली. कविता उपरोधिक झालीय या उद्वेगातून. पहिल्या चार ओळी लिहिताना मनात आले की एक खेड्यातील अनपढ शेतकरी आपल्या नातवाला विचारतो की आज तारीख काय आहे. त्यांने दोन ऑक्टोबर असे सांगण्यापासून या रचनेची सुरुवात झाली आहे. बघा कशी वाटते ती.
काय म्हणलास पोरा, आज
दोन ऑक्टोबरय व्हय?
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
सगळ्या हापिसात फोटो तुझे,
कैक गावी गांधी रोड
एवढं करून तुझ्या तत्वाशी
बसत नाही जोड
सगळं बघून उपोषणाला
बसशील वाटतय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
खादी भंडरातुन घेतोत
झेंडे, पायजम्याच्या नाड्या
तू रहिलास आश्रमात
आम्ही बांधल्या माड्या
माया जमा करील त्यालाच
म्हनत्यात दिग्विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
नेते लोक भाषण करतील
तुझे गुण गाऊन
झकास बोलता येतय त्यांना
येळ प्रसंग पाहून
सभा संपली, भूक लागली
कोंबडीची नाही गय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
सत्याग्रह शस्त्र शोधलस
स्वातंत्र्य त्याचं फलीत
आम्ही घेतलं हातात जसं
माकडा हाती कोलीत
वेळी अवेळी सत्त्याग्रह
आम्हाला जडलीय सवय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
आजच्या गांधीचं काय सांगू
दिल्लीत बसत्यात
क्वत्रोची कोन इचाराव तर
गालामंदी हसत्यात
तरण्या गांधीला मिळणारय म्हने
सिंहासनाचं वलय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
दुष्ट वृत्ती हिंसा करताना
सगळीकडे दिसत्यात
शांतीप्रिय लोकांना
भ्याड म्हनून हसत्यात
तुझ्या अहिंसेला हिंसेच
वाटू लागलय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
आभाळातला तारा तुटून
अंधारात हरपतोय
अंधाराच्या तिव्रतेनं
प्रकाश झोत करपतोय
होतोय बघा अंधाराचा
प्रकाशावर विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment