Friday, July 23, 2021

आनंदाने पुढील अंतर--( वीक एंड लिखाण )

१) अहो तुम्हाला एवढं कसं-----२) तरीही मी म्हणत होते---३) ) आमचे हे न---४) गप्प बसा मी बोलते--- ५) अहो ऐकलत का? ही सारे वाक्ये पूर्ण करून बघा परिचयाची आहेत का ते. सर्व पुरुषांच्या नक्कीच परिचयाची आणि दैनंदिन जीवनात ऐकलेली पण असतील. या सर्व वाक्यातच संसाराची मजा आहे. घरोघर मातीच्या चूली आजकाल राहिल्या नाहीत पण ही वाक्ये घरोघर यावत्चंद्रदिवाकरो बोलली अन् ऐकली जातील. माझं आजचं लिखाण पत्नीबद्दल आहे आणि तेही माझ्याच; इतर कुणाच्या नाही.

गेल्या आठवड्यात माझ्या पत्नीचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने हा प्रपंच! आम्हा दोघांचे लग्न हा आयुष्यातील मैलाचा दगड ठरला सर्वार्थाने. एक वेगळी दिशा, एक अनुपम अनुभव हे सारे मी अनुभवले. तिने काय काय केले याचा गोषवारा येथे देत नाही कारण ते सारेच अनुभवतात. ज्यामुळे ती मला ए कट अबोव्ह वाटते त्या मुद्यांचा जरा परामर्श घेणार आहे

 कांही महत्वांच्या बाबी अशा.

मी बँकेत पुढील बढत्या मिळवण्यासाठी, जे माझे ध्येय होते, खूप कामात आणि आभ्यासात व्यस्त असायचा. त्या वेळी ती सर्व घर सांभाळायची. मुलाचे आणि मुलीचे संगोपन तिने एकटीने केले. मी फक्त पगाराचे पैसे आणण्याशिवाय कांहीही केले नाही. मुलांचा आभ्यास घेणे, त्यांना प्रोत्साहीत करणे, चरित्र बनवणे हे सारे तिचेच काम होते. म्हणतात ना स्त्रीही घरातील सर्वव्यापी व्यक्तिमत्व असते. माझ्या घरात आजही असा एकही कोपरा किंवा क्षेत्र नाही जिथे तिचा वावर नसेल. 

तिचे शिक्षण हैद्राबाद आणि औरंगाबाद येथे झाले होते. मी मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील रहिवासी आणि शिक्षण पण तिथेच. या शहरी ग्रामीण पार्श्वभूमीचा पण अडसर आला नाही. ती अ‍ॅडजस्ट करत गेली. माझे कुटुंब तसे मागासलेले. घरात गाणे असे नव्हतेच. असलेच तर देवाची भजने, आरत्या, पंचमीला भुलईची गाणी, मंगलआष्टके येथेपर्यंतच मर्यादित संगीत होते. पण माझ्या पत्नीमुळे आमच्या घरात संगीत आले. तिला संगिताचे अंग आणि छंद भरपूर आहे. ती आताही पुण्यात रागदारी संगीत आणि सुगम संगिताचे वर्ग घेते. आमच्या घरी सतत संगिताचा अभिषेक चालू असतो. फिल्मी, मराठी, हिंदी आणि शास्त्रीय. यामुळे माझ्यासारखा औरंगजेबही तानसेन नाही पण कानसेन नक्कीच झालाय. मला आठवतय की १९७१ मधे मी फिलिप्स कंपनीच रेकॉर्ड प्लेयर घेतला होता. दरमहा एकदोन रेकॉर्ड्स आम्ही घेत असू. आम्ही लता मंगेशकर यांनी रॉयल अल्बर्ट हॉल मधे लंडन येथे लाईव्ह कार्यक्रमात गायलेल्या गाण्याची आणि चोरी चोरी सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स आणल्या. रागदारीच्या पण एक दोन रेकॉर्ड्स होत्या ज्या आम्ही सतत लावत होतो. माझी पत्नी जयश्री इतकी खुश होती की एकदा ती मला म्हणाली की इतकी  छान गाणी ऐकायला मिळाली तर मी न जेवताही राहीन. असे तिला संगिताचे वेड आहे. या मुळेच की काय संसारात आमचे लय, ताल, सूर सारेच झकास जुळून आले आणि लग्नानंतरचा पन्नासपेक्षा जास्त वर्षाचा काळ भुर्रकन उडुन गेला. जीवनात आनंदी आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था आम्ही दोघेही अनुभवत आहोत.

या वाढदिवसाचे औचित्य साधून तिच्यासाठी रचलेली एक कविता पेश करतोय.


  आनंदाने पुढील अंतर


काय गवसले, काय हरवले?

करूत चर्चा निवांत नंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


तिच्या रुपाने घरात आले

राग, ताल अन् कैक तराने

नूर घराचा बदलत गेला

गळ्यातल्या परिपक्व स्वराने

मैफिल आयुष्याची सजली

अमूल्य झाले हे स्थित्यंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


क्षितिजाच्याही पल्याड आम्ही

दोघे सोबत नांदत होतो

जरी हिमालय जमला नाही

पर्वतीवरी सुखात होतो

काबिज केलेल्या स्वप्नांचा

अश्वमेध चालतो निरंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


गरज वाटली कधीच नाही

हास्य लेउनी मिरवायाची

मनी नांदले, तेच गोंदले

आवड नव्हती प्रदर्शनाची

हवे आमुच्या जगास आम्ही

क्षणोक्षणी आले प्रत्त्यंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


उधारीतल्या सुखास आम्ही

नगदीच्या दु:खात तोलले

संतुष्टीच्या सुपीक रानी

आनंदाचे बीज पेरले

प्रश्न न केला देवांनाही

परावलंबी नव्हते उत्तर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


वटपूजा ना करताही पण

दृढप्रेमाचा प्रत्त्यय येतो

झूळझुळणार्‍या प्रेम प्रवाही

रुढी प्रथांचा व्यत्त्यय येतो

जगावयाचे खूप अजूनी

म्हणूत झाले हे मध्यंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर



निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

 

 

No comments:

Post a Comment