Saturday, August 7, 2021

कवितेचा आशय---( वीक एंड लिखाण )


मला बर्‍याच वेळा अनुभव आला आहे की कविता काय लिहायची, कशी लिहायची, कधी लिहायची हे कधी कधी कवीच्या हातात नसते. माझ्या बर्‍याच कविता मला जशा हव्या होत्या तशा आकारल्या नाहीत.
सध्या सर्व समूहावर उपक्रम आणि स्पर्धांचे, विशेषतः व्हाट्स अ‍ॅपवर, पीक माजले आहे. प्रत्येक समूह असे उपक्रम राबवत असतातच. चारोळ्या, शेल चारोळी, ओळ देवून कविता, वृत्त देवून गझल, चित्र चारोळ्या किंवा कविता, एक ना दोन, कैक उपक्रम राबवले जातात. या खाली लिहिलेले लिखाण ठराविक वेळातच पोस्ट करावे लागते.
एकच प्लस मुद्दा असा आहे की लोकांना लिहिते करता येते. मी असे समूह पाहिलेत जेथे विषय दिला जातो. एक  कडवे चार ओळीचे असावे , दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असावे असे अनेक नियम सांगून कविलोकांच्या मुसक्या बांधल्या जातात. मला आश्चर्य वाटते की अशा परिस्थितीत नैसर्गिक कविता होईल कशी? मग ओढून ताणून शब्द जुळवले जातात. अशा स्पर्धांमुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. एका समूहाच्या अ‍ॅड्मिनने मला फोन करून उपक्रमात कविता पाठवण्याची गळ घातली. मी जेंव्हा त्यांना नियमाविषयी बोललो तेंव्हा त्यांच्याकडे कांहीही स्पष्टीकरण नव्हते. जे लोक अशा कविता लिहितात त्यांचे मला कौतुक वाटते. कविता म्हणजे हॉटेलचे मेनू कार्ड नसते. जी ऑर्डर दिली ते पुरवले जाते. 
हे सर्व लिहायला कारणही तसेच आहे. आम्ही तीन वर्षापूर्वी एका अ‍ॅग्रो टूरिस्ट रिसॉर्ट्ला पिकनिकसाठी गेलो होतो. खूप छान ठिकाण होते. सर्व सोयी उत्तम होत्या. लोकांची गर्दी पण बर्‍यापैकी होती. दिवस खूप एंजॉय केला सर्वांनी.
दुपारचे जेवण झाल्यानंतर दाट झाडीखाली बाजा ( कॉट्स) टाकल्या होत्या. मी थोडा आडवा झालो. दाट झाड असून आणि मी सावलीत असूनही उन्हाची तिरीप तोंडावर येत होती. मनात विचार आला की सूर्य का असा मला डोकावून बघत आहे? कविमनच ते. लागलीच दोन ओळी आठवल्या ज्या मोबाईलमधे टाईप करून सेव्ह केल्या. मनात विचार आला की नंतर आरामशीर या पिकनिकवर एक छान कविता लिहावी. पुण्याला सारेजण परतलो. त्या ओळींबद्दल पार विसरून गेलो. जवळ जवळ दीड वर्षानंतर त्या ओळी बघण्यात आल्या आणि कविता लिहायची उर्मी आली. बसलो थाटात कविता लिहायला. मूळ कल्पना पिकनिकवर लिहायची होती. पण दुसरेच सुचत गेले. पूर्ण झालेली कविता एकदम भिन्न अंगकाठीची झाली. या आधी पण असे झालेले आहे. म्हणून म्हणतो की कवितेचा आशय आधीच ठरवता येत नाही. ऐनवेळी जे सुचेल तीच कविता/गझल असते. ती कविता खाली देतोय रसिकांच्या सेवेत.

सूर्य का मला शोधतो आहे?

अता कुठे सावली मिळाली, चैन भोगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?


रखरख वणवण सदैव असते पाचवीस पुजलेली
आयुष्याची घडी त्यामुळे सदैव विसकटलेली
लगाम घालत आकांक्षांना, मजेत जगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जिथे संपतो रस्ता तिथुनी चालू प्रवास होतो
कसे जायचे ध्येय दिशेने, बांधत कयास असतो
अनवट वाटांवरती पाउल खुणा सोडतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

पहिल्या, शेवटच्या श्वासातिल अंतर असते जीवन
त्यात भेटतो कधी उन्हाळा कधी ओलसर श्रावण
दु:ख-वेदनांशी मैत्रीचा सराव करतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जन्मच झाला मुळी मानवा! जगात रडता रडता
जरी कळाले दु:ख सोबती असेल बसता उठता
हात धुवोनी तरी सुखाच्या मागे पळतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

परावलंबी सुखास हिणकस, भाव केवढा आला!
दु:ख नांदते जगी म्हणोनी जन्म सुखाचा झाला
पर्णफुटीला पानगळीचे फलीत म्हणतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?



निशिकांत देश्पांडे, पुणे. 
मो.क्र. ९८९०७ ९९०२३




No comments:

Post a Comment