Monday, December 29, 2014

मोती मी सावडते


तुझा चेहरा बालपणीचा अनूनही आठवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

एकावरती नाव तुझे अन् दुसर्‍यावरती माझे
नावा पाण्यामधे सोडल्या, आठव अजून ताजे
तरल्या, गेल्या भिन्न दिशेने, खंत मना जाणवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

समज यायच्या अधीच वाटा वेगवेगळ्या झाल्या
आज वाटते वळून बघता, तारा होत्या जुळल्या
आठवणींची पाने चाळत, आत खोल ओघळते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

रंगलास तू तुझ्या प्रपंची, मीही नांदत आहे
आज भेटता नजर तुझी का अशक्य सांगत आहे?
शंका येते तुला कदाचित अजून मी आवडते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

बालपणीचे प्रेम मखमली मोर पिसासम असते
गंध वासनांचा नसतो पण मनात ते दरवळते
एक अनामिक ओढ जिवाला हळूवार जोजवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

सांगत असता प्रेम कहाणी गाज पाळते संयम
युगे लोटली पण उत्कटता अजून आहे कायम
चंद्र, सागरामधील अंतर प्रेमाला वाढवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com






Friday, December 19, 2014

मनास भरकटलेल्या


घट्ट असोनी पोत मनाचा
कडा कशा विरलेल्या ?
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

युगे लोटली एकलपणच्या
कुशीत निजतो आहे
व्यक्त व्हावया शब्द नेमके
मनी जुळवतो आहे
प्रतिक्षेतल्या वाटा सार्‍या
काट्यांनी भरलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

स्वप्नांच्या समिधांना जाळत
अंधारास उजळतो
जरी गोठले जीवन सारे
कधी कधी ओघळतो
बंद पापण्यांमधे गवसती
शोक कथा लपलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

हरेक वळणावरी जीवना !
विरक्तीच आढळली
जगावयाची आस मनीची
हळूहळू मरगळली
बाजी हरलो अस्तित्वाची
वाटाही चुकलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

सदा होरपळ एकाकीची,
हिरवळ दिसली नाही
आयुष्याच्या सायंकाळी
सकाळ हसली नाही
कशी पालवी पुन्हा फुटावी ?
वृक्षाला वठलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

आठवणींच्या सुतास धरुनी
स्वर्ग कसा गाठावा ?
जगतो आहे मेल्यागत अन्
त्रास किती सोसावा
नकोच फुंकर ह्रदयावरती
जुन्या बंद पडलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, December 9, 2014

शाई सरली


तरुण्याच्या उन्मादाने
इतिहासाची पाने भरली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

जसा जन्मलो, नाळ कापली
तरी घट्ट ती मजशी जुळली
गोधडीतही मिळे उबारा
नात्याची त्या तर्‍हा वेगळी
ओघळण्या आधीच आसवे
मायेने आईने पुसली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

जीवनातले सुवर्णयुग मी
म्हणेन माझ्या बालपणाला
गतआयुष्यी हरवुन जातो
आठव येता क्षणाक्षणाला
असे न होते आठवणींनी
मनोवेदना नाही हसली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

तारुण्याचा गंध लुटाया
संसाराची बाग फुलवली
कुंचल्याविना रंग उधळले
चहूदिशेने, प्रीत रंगली
स्वर्गसुखाची अनेक स्वप्ने
इथेच पडली अन् अनुभवली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

कमान चढती, टोकावरती
वरच्या सारे नांदत होतो
कैफ केवढा! झोका नसुनी
मस्तीने हिंदोळत होतो
सुरू जाहली उतरण पण ती
वेळेवर ना कुणास दिसली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

पटकन गेल्या पुन्हा न आल्या
तरुणाई अन् बाल्यावस्था
आली, जाता जातच नाही
अशी कशी ही वृध्दावस्था?
मावळतीची तिव्र वेदना
सरणावरही पुरून उरली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Saturday, December 6, 2014

अजून ठरले नाही


तिलांजली आठवांस देणे
जमता जमले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

आम्रतरूच्या तळी एकदा
हात पकडला होता
तो पहिला अन् शेवटचा क्षण
मनी कोरला होता
मोहरलेल्या रोमांचांचे
चीज जाहले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

शमेविना का उत्तररात्री
मैफिल रंगत असते?
एकच विरही सूर छेडता
दु:ख मनी पाझरते
ओलेपण त्या जखमांमधले
अजून सुकले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

तुझ्यामुळे जाहली जीवनी
पखरण अंधाराची
सुप्त आस का तरी तेवते
अशक्य होकाराची
तहानलेला, तरी ओंजळी
मृगजळ भरले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

काजळलेल्या सायंकाळी
सकाळ का आठवते?
रंग केशरी अता न उरले
मनी खूप कालवते
कशी सावली निघून गेली ?
कोडे सुटले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

शब्दांमधुनी व्यक्त व्हावया
कविता गझला लिहितो
अलगद माझे भाव गुंफता
आशय खुलून उठतो
जिला कळावे गूज मनीचे
तिलाच कळले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, November 30, 2014

ना कळता ती थरथरली


गाडीमध्ये बसता बसता पाल मनी का चुकचुकली?
मुलासोबती कुठे निघाली? ना कळता ती थरथरली

बाळाच्या भोवतीच सारी स्वप्ने होती विणलेली
इंद्रधनुष्याच्या रंगांनी मनोगतेही सजलेली
कष्ट करोनी पालन पोषण करावया ना कुरकुरली
मुलासोबती कुठे निघाली? ना कळता ती थरथरली

परदेशी नोकरी मिळाली, स्वर्ग ठेंगणा झालेला
उठता बसता कौतुक त्याचे, जीव केवढा फुललेला!
शिखरावरती आयुष्याच्या, गर्वगीत ती गुणगुणली
मुलासोबती कुठे निघाली? ना कळता ती थरथरली

नको काळजी करूस आई पैशाची तू, बाळ म्हणे
फेडिन सारे पांग तुझे मी, नसेल कांही तुला उणे
कष्टाचे फळ दिसू लागता, रोमांचुन ती मोहरली
मुलासोबती कुठे निघाली? ना कळता ती थरथरली

वापस मी येईन तोवरी, रहावयाची सोय इथे
वृध्दाश्रम हा ए.सी. आहे, नकोस राहू इथे तिथे
निरोप देताना बाळाला, आत केवढी भळभळली!
मुलासोबती कुठे निघाली? ना कळता ती थरथरली

गारव्यात ए.सी.च्या नसतो कधी उबारा प्रेमाचा
शॉवरने का ओला होतो, झरा वाळला स्नेहाचा?
टोचत होती सुखे आश्रमी, बाळ दूर ती हळहळली
मुलासोबती कुठे निघाली? ना कळता ती थरथरली

सुकलेल्या डोळ्यात अधूरे स्वप्न राहिले भेटीचे
श्वास थांबला, बाळ न आला, खेळ कसे हे नियतीचे?
मृत्त्यू कसला? जीवनातुनी परलोकी ती फरपटली
मुलासोबती कुठे निघाली? ना कळता ती थरथरली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, November 25, 2014

चांदणे धाडतो मी---(वृत्त; भुजंग प्रयात)


सुखाने रहा, चांदणे धाडतो मी
तुझे दु:ख माझे सखे मानतो मी

कळ्यांनी फुलावे, सदा दरवळावे
तुझ्या अंगणी मोर सखये झुलावे
सुखांची तुझ्या दृष्ट ये काढतो मी
तुझे दु:ख माझे सखे मानतो मी

तुझ्या हासण्यातून गळतात मोती
खळ्या गालच्या, कैक घायाळ होती
मनाच्या कपारीत गंधाळतो मी
तुझे दु:ख माझे सखे मानतो मी


सदा जीवनी फक्त श्रावण असावा
ऋतू पानगळ हा केंव्हा नसावा
मला ग्रिष्म दे मस्त कुरवाळतो मी
तुझे दु:ख माझे सखे मानतो मी

मला ना तमा सावल्यांची, उन्हाची
सवय जाहली कुट्ट काळ्या तमाची
तुला काजवे देत ठेचाळतो मी
तुझे दु:ख माझे सखे मानतो मी


किती गीत, गझला लिहाव्या तुझ्यावर?
कसे थांबवू मन बिचारे अनावर?
उसास्यांस शब्दातुनी मांडतो मी
तुझे दु:ख माझे सखे मानतो मी

सखीविन उदासीसवे काळ गेला
तुझ्या आठवांनी बरा वेळ गेला
जरा चाहुलीने फुलू लागतो मी
तुझे दु:ख माझे सखे मानतो मी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com







Saturday, November 22, 2014

चालत आलो


खाचा खळगे असून रस्ता चालत आलो
सोबत नव्हती तरी स्वतःशी बोलत आलो

वसंतात सांगाती होती खूप माणसे
वाटत होते जीवनास लाभले बाळसे
ग्रिष्मामध्ये पुन्हा एकटा! पोळत आलो
सोबत नव्हती तरी स्वतःशी बोलत आलो

गस्त घालती जरी संकटे घराभोवती
सदैव लढतो त्यांच्यांशी, पण तेच सोबती
मोह सुखांचा यत्न करोनी टाळत आलो
सोबत नव्हती तरी स्वतःशी बोलत आलो

नको एकही मला कवडसा जगण्यासाठी
काय चांगले जगात उरले बगघण्यासाठी?
ओजस्वाला काळोखाने फासत आलो
सोबत नव्हती तरी स्वतःशी बोलत आलो

काय लिहावे आत्मचरित्री? कागद कोरा
आवडते ना मला पिटायाला दिंडोरा
चुरगळलेल्या चिठोर्‍यातही मावत आलो
सोबत नव्हती तरी स्वतःशी बोलत आलो

शिल्पकार मी माझा आहे, सत्त्य सांगतो
बेफिकिरीने मनास पटते तसे वागतो
मी माझ्या कर्माचे ओझे पेलत आलो
सोबत नव्हती तरी स्वतःशी बोलत आलो

गतजन्माचे सार्थक झाले मृत्त्यू होता
नवीन जन्मी अपुल्या हाती अपुली सत्ता
सुखदु:खाच्या झोक्यावर हिंदोळत आलो
सोबत नव्हती तरी स्वतःशी बोलत आलो


निशिकांत देशपांडे.मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, November 15, 2014

चेहर्‍याला वाचणारे


शांत मुद्रा लेउनी मी
दु:ख जपते काचणारे
मी सुखी, अंदाज करती
चेहर्‍याला वाचणारे

जन्मण्याआधीच उठती
प्रश्न माझ्या जन्मण्याचे
जन्मघटिकेला मिटाया
हात स्फुरती निष्ठुरांचे
उजळ माथ्याने मिरवती
स्त्रीभ्रुणाला मारणारे
मी सुखी, अंदाज करती
चेहर्‍याला वाचणारे

खळखळाया ना मिळाले
जगणेच डबक्यासारखे
वर्तुळातिल आगतिकता
आयुष्य सरल्यासारखे
भोगवाद्यांना कळावे
मन कसे आक्रंदणारे?
मी सुखी, अंदाज करती
चेहर्‍याला वाचणारे

भव्यदिव्यत्वात स्त्रीला
कैद का केले जगाने?
बनवल्या सीता, आहिल्या
ग्रंथ लिहिता वाल्मिकीने
व्यासनिर्मित द्रौपदीला
शेकड्याने त्रासणारे
मी सुखी, अंदाज करती
चेहर्‍याला वाचणारे

पाहिले त्रेतायुगीही
वेगळे नव्हते जराही
रमवण्या देवादिकांना
जाणल्या नाना तर्‍हाही
अप्सरा नाचावयाच्या
देव होते पाहणारे
मी सुखी, अंदाज करती
चेहर्‍याला वाचणारे

लंपटांसाठी इशारा
निक्षुनी मी देत आहे
बदलुनी गोत्रास, झाले
मी विजेची नात आहे
कडकडाटानेच घेइन
मी हिराउन हक्क सारे
मी सुखी, अंदाज करती
चेहर्‍याला वाचणारे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, November 13, 2014

मैत्री होता संगणकाशी


संगणक या विषयावर रचना असल्यामुळे कांही इंग्रजी शब्द अपरिहार्यपणे आले आहेत.

पोरांसोरांकडून शिकलो
नाळ जोडण्या नव्या युगाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

फोन जाहला स्मार्ट अताशा
टॅबलेट अन् किंडल आले
व्हाट्सअ‍ॅपच्या भडिमाराने
दिवस केवढे लहान झाले !
चोविस घंटे वाचन, ज्याचे
नाते नसते बुध्द्यांकाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

विवाहिता जाताना गावी
नसे डोरले तरी चालते
प्रश्न भयानक, चार्जर विसरुन
जाते तेंव्हा विश्व थांबते
कशास यात्रा? स्क्रीन दावतो
उत्तर काशी, दक्षिण काशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

अडचण इतकी, पाप न येते
डाउनलोड कुठे करण्याला
करून कॉपी, पेस्ट, दुज्यांचे
पुण्य न जमते लुटावयाला
जीवन जिथले तिथेच असते
ड्रॅग न होता खंत मनाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

फोल्डर तुझिया आठवणींचे
पासवर्ड लाऊन ठेवले
सहवासाचा असा व्हयरस !
वेळअवेळी मला त्रासले
मनोवेदानांचे फॉर्मॅटिंग
करूनही नाते दु:खाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

तुझ्या नि माझ्या सुखदु:खांची
एकच कॉमन लिंक असावी
एका क्लिकच्या अंतरावरी
अपुली स्वप्ने स्पष्ट दिसावी
सर्च गुगलवर हवी कशाला?
यूट्यूबविना जुळू सुरांशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी


निशिकांत देशपांडे. मो.क्र.  ९८९०७ ९९०२३
E MAIL---nishides1944@yahoo.com


Tuesday, November 11, 2014

योगायोग


माझ्या आयुष्यात एक आनंददायी योगायोग आला आहे. मी माझ्या वाचकांशी हा अनुभव शेअर करत आहे.
मी औरंगाबादला असतांना गझलनवाझ आदरणीय भिमताव पांचाळे यांच्या गझलगायनाचा कार्यक्रम होता. मी त्या कार्यक्रमाला गेलो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मराठी गझल गायन ऐकणार होतो. जसजसा कार्यक्रमात रंग भरू लागला; मी मंत्रमुग्ध होत गेलो. याच मैफिलीमुळे गझल या काव्यप्रकाराकडे आकर्षित झालो. मनात आले की या प्रकारालाही जरा हाताळून बघावे. गझलेची माहिती घेतली; शिक्षण घेतले आणि माझा गझल प्रवास सुरू झाल . पहिले दीड दोन वर्षे फक्त गझला नि गझलाच लिहीत गेलो आणि कवितांकडे दुर्लक्ष झाले. नंतर जाणूनबुजून कविता लिहिण्याचे ठरवले आणि सध्या दोन्ही प्रकार यथाशक्ती लिहीत आहे.
मी गझला लिहीत गेलो आणि त्या फेसबुकवर पोस्ट करत गेलो. माझे सौभाग्य की माझ्या गझला भिमरावजींच्या वाचनात आल्या आणि आशिर्वादपर त्यांचे प्रतिसाद मिळत गेले. एकेदिवशी प्रतिसादात मला कांही गझला त्यांना ईमेलवर पाठवण्यास सांगितले. मी गझला पाठवल्यावर ते काय करणार हा प्रश्न माझ्यासमोर होता. भिमरावजी मुंबईहून प्रसिध्द होणार्‍या पुण्यनगरी या दैनिकाच्या रविवारीय पुरवणी "प्रवाह" यात गझलेवर एक सदर लिहीत असतात. ०२.११.२॑१४ या पुरवणीत त्यांनी माझी एक गझल "आठवड्याची गझल" या शिर्षकाखाली प्रसिध्द केली. इतकेच नव्हे तर ०९.११,२०१४ च्या पुरवणीत त्यांनी माझ्या गझलेवर भाष्य पण केले.
माझ्यासाठी हा अत्त्युच्च आनंदाचा क्षण होता. योगायोग म्हणायचे कारण की ज्यांच्या कडून मी गझलेची प्रेरणा घेतली त्यांनीच आज माझ्या पाठीवर कौतुकाची थाप पण दिली  प्रकाशित झालेली माझी गझल खाली देत आहे

लढतो आहे एक कवडसा
अंधाराशी लढतो आहे एक कवडसा
प्रकाश उत्सव दिसेल आता मनी भरवसा

पडायचे तर पड किंवा तू नकोस येऊ
अश्रूंनीही तहान शमते अरे! पावसा

जनसेवेचा बुरखा असतो पांघरलेला
नांदत असते ना सरणारी आत लालसा

स्फुल्लिंगाला मतदारांच्या कमी लेखता
मुजोर सत्तांधांचे झाले राज्य खालसा

तोल ढळे पर्यावरणाचा तो नसल्याने
म्हणून का तू गिधाड व्हावे असे माणसा?

विभक्त जगते चंगळवादी कटुंबशैली
कसा मिळाला कोणाकडुनी असा वारसा?

गझल संपली, खयाल सरले, पण ती दिसता
उर्मी येते मनी लिहाया शेर छानसा

नको पालख्या, नकोत दिंड्या रस्त्यावरती
भावभक्तिचा मनात उजळो दीप मंदसा

चीड मनी का "निशिकांता"च्या खदखदणारी?
धृतराष्ट्रासम कसा जगू मी शांत शांतस?

भिमरावजींनी केलेले समिक्षण (लेखातून उधृत करत आहे) खालील प्रमाणे.

"अंधाराशी लढतो आहे एक कवडसा
प्रकाश उत्सव दिसेल आता मनी भरवसा..'

एका कवडशानं अंधाराशी झुंज देणं आणि विश्‍वास बाळगणं की, प्रकाश उत्सव साजरा करण्याचे दिवस नक्की येतील, ही अतिशयोक्ती वाटेल; पण क्रांती अशीच आकार घेत असते. मोठमोठी स्थित्यंतरं घडवून आणणारे उठाव असे शून्यातूनच झालेले आहेत.
'अंधकार संपणार आज ना उद्या
फक्त एक ज्योतिचा उठाव पाहिजे..'

असं संगीता जोशी म्हणतात ते याच विश्‍वासाच्या बळावर. इथे पुन्हा अस्ताला जाणार्‍या सूर्याचं अंधार दूर करण्याचं कार्य यथाशक्ती करू पाहणार्‍या रवींद्रनाथांच्या इवल्याशा पणतीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

खूप सुंदर अशी मात्राबद्ध गझल निशिकांतजींनी आपल्याला दिलेली आहे. त्यांच्या गझलचा प्रत्येक शेर छान जमून आलेला आहे. 'आसवांच्याच सरी आणि आसवांचंच पीक' अशी अगतिक अवस्था करणार्‍या बेभरवशी पावसाला त्यांचं ठणकावणंसुद्धा रास्तच आहे. चंगळवादी विभक्त कुटुंब पद्धतीची विषारी फळं आवडीनं चाखून आपलं समाजजीवन कसं रसातळाला चाललं आहे, याचं भान ही गझल देते. आपल्या ३७ व्या संवादातील विश्‍वजीत गुडधेच्या गझलचा एक याच आशयाचा शेर तुम्हालाही नक्की आठवत असेल -

'सुखात न्हावे सदैव तू हीच एक इच्छा
कसा बसा मी जगेन वृद्धाश्रमात बाळा..'

निशिकांतजींची ही गैरमुरद्दफ गझल कवडसा, भरवसा, पावसा, लालसा, खालसा, माणसा, वारसा, शांतसा हे काफिये चालवत मक्त्यापर्यंत जाते. या शेवटच्या शेरात तखल्लुस (शायराचे टोपणनाव) घेण्याचे चलन तसे कमीच आहे. तखल्लुसमुळे एका चांगल्या चपखल शब्दाची जागा वाया जाते, असेही म्हटले जाते. पूर्वीच्या काळी मुद्रणकला विकसित नव्हती, त्या वेळी हे गरजेचे होते. हे काहीही असले तरी हा सर्वस्वी त्या शायराच्या अधिकार व अख्त्यारीतला प्रश्न आहे. असो!"
मला आश्चर्याचा धका बसला तो जेंव्हा भिमरावजीचा अचानक मला एकेदिवशी टेलिफोन आला.  किती साधी असतात ना मोठी माणसे! मुंबईतून प्रसिध्द होणारी पुरवणी मला पुण्यात मिळाली नाही. या संबंधात मला माझी फेसबुक मैत्रीण (पुतणी) अपर्णा जोशी आणि पोलिस खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी श्री. योगेश संखे यांनी मला खूप मदत केली. या सहकार्यासाठी दोघांचेही मना पासून अभार.
या प्रसंगाने मनात विचार आला की झाले ते कौतुक तर झाले; पण मी या लायकीचा अहे का? या विचारातून दोन चारोळ्या सुचल्या ज्या खाली देत आहे.
१)
सरस्वतीच्या दारी बसुनी पायरीवरी
दान मागतो शब्द, पेटली भूक अंतरी
दिग्गज देता पाठीवरती थाप वाटते
भाग्यवंत मी स्वप्न पाहतो संगमरमरी
२)
`मला वाटते गझलांमधुनी सूर गवसले
दिशाहीन जीवना कसे रे! अर्थ बहरले
धूळ झटकुनी हाती धरता, कलमेमधुनी
गझलांची बरसात जाहली, मन मोहरले

मना पासून अभार भिमरावजी!


निशिकांत देशपांडे

Monday, November 10, 2014

मैत्री होता संगणकाशी

थोड्या वेगळ्या धाटणीची कविता. संगणकाविषयी असल्यामुळे बरेच इंग्रजी शब्द आले आहेत रचनेत.

पोरांसोरांकडून शिकलो
नाळ जोडण्या नव्या युगाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

फोन जाहला स्मार्ट अताशा
टॅबलेट अन् किंडल आले
व्हाट्सॅपच्या भडिमाराने
दिवस केवढे लहान झाले!
चोविस घंटे वाचन, ज्याचे
नाते नसते बुध्द्यांकाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

विवाहिता जाताना गावी
नसे डोरले तरी चालते
प्रश्न भयानक, चार्जर विसरुन
जाते तेंव्हा विश्व थांबते
कशास यात्रा ? स्क्रीन दावतो
उत्तर काशी, दक्षिण काशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

अडचण इतकी, पाप न येते
डाउनलोड कुठे करण्याला
करून कॉपी, पेस्ट, दुज्यांचे
पुण्य न येते लुटावयाला
जीवन जिथले तिथेच असते
ड्रॅग न होता खंत मनाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

फोल्डर तुझिया आठवणींचे
पासवर्ड लाऊन ठेवले
सहवासाचा असा व्हायरस!
वेळअवेळी मला त्रासले
मनोवेदनेचे फॉर्मॅटिंग
करूनही नाते दु:खाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

तुझ्या नि माझ्या सुखदु:खांची
एकच कॉमन लिंक असावी
एका क्लिकच्या अंतरावरी
अपुली स्वप्ने स्पष्ट दिसावी
सर्च गुगलवर हवी कशाला?
यूट्यूबविना जुडू सुरांशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Saturday, November 1, 2014

पाऊस तुझ्या स्मरणांचा


मज भास नेहमी होतो
तू आसपास असल्याचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

हरवलो कुठे? ना दिसतो
माझ्यातच मी असलेला
अन् वजावटीने तुझिया
सरल्यागत मी उरलेला
मुल्यांकनात मी खाली
वरती नंबर शुन्याचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

वादळात पाचोळ्याचे
होते ते झाले माझे
बस उडतो सैरावैरा
विरहाचे पेलत ओझे
गोंधळलो, दिसे न रस्ता
जगण्या किंवा मरण्याचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

तो विराम स्वल्प असावा
अपुल्यात,  वाटले होते
पण पूर्णविरामाने का?
आयुष्य व्यापले होते
तळ कसा कोरडा झाला?
आपुलकीच्या धरणाचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

हा प्रश्न मेनके तुजला
का शिकार अर्धी करशी?
तिरप्या नजरेने जखमी
करुनी का वरती हसशी?
ही जातकुळी पुरुषांची
घायाळ कळप हरणांचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा

तू गेल्याने तर झालो
मी कुबेर आठवणींचा
मन विस्तारुनी सोडवला
मी सवाल साठवणीचा
या खजान्यात सापडतो
मज साठा रत्नकणांचा
अनुभवतो बारा महिने
पाऊस तुझ्या स्मरणांचा


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, October 29, 2014

दु:ख हलके होत असते बोलल्याने


वेदना सरते कधी का भोगल्याने?
दु:ख हलके होत असते बोलल्याने

एकटेपण हा खरा वनवास असतो
दूरवर नजरेतही मधुमास नसतो
हायसे! संवाद थोडा साधल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने

ना कळे केंव्हा कशा जुळतात तारा
संपतो गुदमर मनाचा कोंडमारा
मोहरे मन पैंजणांच्या वाजण्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने

तेज अंधार्‍या मनावर गोंदणारी
ज्योत तुझिया आठवांची तेवणारी
भान हरते प्रेमपत्रे चाळल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने

बोलतो स्वप्नांसवे, माझ्यासवेही
अन् अबोला अन् तिच्या रुसव्यासवेही
गाठ सुटते भाव नेत्री दाटल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने

बाळ रडते का? कशाने? माय जाणे
शांत होते माय गाता गोड गाणे
गौण शब्दावाचुनी संवादल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने

देवपूजेतून जुडतो ईश्वराशी
नाळ तुटते जोडलेली नश्वरांशी
मुक्त होतो चार दुर्वा वाहिल्याने
दु:ख हलके होत असते बोलल्याने


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yqhoo.com

Tuesday, October 21, 2014

दु:ख मनाला काचत होते



त्याचा बाबा विचित्र होता असेच त्याला वाटत होते
चार शब्द ना कधी बोलला, दु:ख मनाला काचत होते

सणासुदीला आनंदाने मिळून जेवण कधी न झाले
येई तो रात्री अपरात्री, थंड अन्नही त्याला चाले

सुर्योदय होण्याच्याआधी दिवाळीतही स्नान न केले
स्वर्ग पित्याला कसा मिळावा? मनात काहुर उठून गेले

अव्वल येता वर्गामध्ये घरी धावता सांगायाला
घरात नव्हता बाप, शेवटी डोळे मिटले झोपायाला

कधी नव्हे ते पिक्चर बघण्या आम्हासंगे बाबा आला
भ्रमणध्वनी वाजताच का तो अर्ध्यामधुनी उठून गेला?

चार घराच्या भिंतींनाही विचित्र वाटे जरी वागणे
सहनशीलता घरात इतकी! कुणी न पुसती तया कारणे

तणाव, दंगेधोपे होता, हटकुन बाबा घरात नसतो
उशीर होता परतायाला, जीव आईचा जिवात नसतो

दिवा लाउनी देवापुढती डोळे मिटुनी प्रार्थना करी
माय मागते देवाला "कर औक्षवंत नवर्‍यास श्रीहरी"

मूल विचारी नोकरीतही जीव असा ओलीस कशाला?
पित्यास नाही कधी वाटले झालो मी पोलीस कशाला?


पोलीस म्हणताच लोकांसमोर लाचखोर, उर्मट, लोकांना ठोकून काढणारा, गुन्हेगारांशी साटेलोटे असणारा खाकीतला नोकरवर्ग डोळ्यासमोर उभा राहतो. पोलीसांच्या जीवनाची आणि त्यांच्या कुटुंबियांची व्यथा सांगणारी आणि नाण्याची दुसरी बाजू मांडणारी रचना सादर करत आहे.


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, October 16, 2014

वांझोटी आश्वासनपूर्ती


कालच झालेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने लिहिलेली कविता---

निवडणुकींचा जसा धुराळा
जरा लागला विरावयाला
वांझोटी आश्वासनपूर्ती
मनी लागली रुजावयाला

जुळवाजुळवी पडद्यामागे
भाव किती? हे इथेच ठरते
गाढव जनता, घोड्यांच्या का
बाजारी तिज किंमत असते?
जुने पुढारी, जुन्या पालख्या
जनता भोई, उचलायाला
वांझोटी आश्वासनपूर्ती
मनी लागली रुजावयाला

वेगवेगळे पक्ष आपुले
जणू लांडगे भुकेजलेले
संधी मिळता जरा कुठेही
लाच खावया चटावलेले
निवडणुका जिंकल्या क्षणाला
खिसे लागती भरावयाला
वांझोटी आश्वासनपूर्ती
मनी लागली रुजावयाला

मीच खाउनी, मीच नेमला
लवाद करण्या खोल चौकशी
प्रमाणपत्रे लिहुन घेतली
"डाग न कोठे जणू मी शशी"
सिंचन खाते कोरडे, चला
कालव्यात "शू" करावयाला
वांझोटी आश्वासनपूर्ती
मनी लागली रुजावयाला

प्रचारकाळी सांगत होते
करूत कामे म्हणाल ते ते
बोटावरची शाई सुकण्या
अधीच विरले हवेत नेते
पाच तरी लागतील वर्षे
दर्शन त्यांचे घडावयाला
वांझोटी आश्वासनपूर्ती
मनी लागली रुजावयाला

शब्द असोनी शस्त्र, कवींनो!
चंद्र, चांदणे, गंध, अलिंगन
याच निरर्थक वर्तुळात का
कवितांचे करता संगोपन?
ध्यान घालुनी समाज प्रश्नी
जहाल लागा लिहावयाला
वांझोटी आश्वासनपूर्ती
मनी लागली रुजावयाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Monday, October 6, 2014

रावणास का पोसत असतो?


विजयादश्मी मुहुर्तावरी
दशाननाला जाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

रामप्रभूंना तोंड द्यावया
समोर होता एकच रावण
हजार आता सभोवताली
लुटावयाला अमुचा श्रावण
राम व्हायचे सोडून त्याच्या
पादुकांस प्रक्षाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

आज जरी का कुणी लक्ष्मण
भूक लागुनी मुर्छित झाला
हनुमंताने कुठे उडावे?
संजिवनीचा शोध घ्यायला
पर्वतावरी घरे, लव्हासा
झाडे आम्ही तोडत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

सत्तांधांच्या हस्ते जेंव्हा
पुतळ्याला फुंकून टाकले
दुष्टाचे निर्दालन झाले
मनोमनी जनतेस वाटले
आजकालचा रावण येथे
जुन्या रावणा जाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

अनेक रावण जिवंत असुनी
मानमरातब त्यांना मिळतो
पुरुषोत्तम मर्यादित, त्याचा
म्हणे मंदिरी वावर दिसतो
रामकथेतिल आदर्शांचे
डोस जमाना सोसत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

समाज सारा राम बनावा
प्रत्त्यंचा ओढून धराया
मुठभर रावण वेचवेचुनी
बाण मारुनी नष्ट कराया
कृती न करता, समाज निर्बल
प्राक्तनास का कोसत असतो?
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E mail--- nishides1944@yahoo.com




Wednesday, September 24, 2014

दखल घेतली कुणीच नाही


दखल घेतली कुणीच नाही
कोण कशाला जमले होते?
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

उदघाटनपर भाषणातुनी
उदासवाणा सूर गवसला
चर्चा, प्रश्नोत्तर सत्रांचा
इथेच होता माग लागला
उत्तर नसलेल्या प्रश्नांचे
वांझोटेपण दिसले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

सुरकुतलेले कैक चेहरे
सार्‍यांची बस एक कहानी
उपेक्षिताचे जगणे भाळी
बंद हुंदके हीच बयानी
चंगळवादी त्सुनामीत का
उन्मळून ते पडले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

सुबत्तेतल्या पिलावळीच्या
मातपित्यांची फरपट होती
असून पैसा, संवादाविन
गुदमर, त्रेधा तिरपिट होती
घर मोठे पण छोटेसे मन
सात्त्य शेवटी पटले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

दिशा ठरवुनी पाचोळ्याला
हवे तसे का फिरता येते?
वारा नेतो त्याच दिशेने
मजबूरीने पाउल पडते
घरास अडचण वाटे ज्यांची
आश्रमवासी बनले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

दात आपुले, ओठ आपुले
उहापोह हा व्यर्थ कशाला?
घरची इज्जत वेशीवर का?
असा वेगळा सूर निघाला
लक्तरांस रेशिम धाग्यांनी
समजूतीच्या शिवले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?


ठराव झाला पास शेवटी
दु:ख स्वतःचे स्वतः जपावे
हास्य मुखवटे धारण करुनी
कुरवाळाया दु:ख शिकावे
इच्छमरणाच्या चर्चेने
सत्र वादळी सरले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Saturday, September 20, 2014

नवीन कांही बघण्यासाठी


म्हणू नका माझ्या मित्रांनो
साठी बुध्दी झाली नाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

उत्सुकता तर शिगेस होती
यान उतरता मंगळावरी
नवीन धरती, नवे नजारे
मनास आली खूप तरतरी
कुमारिका ती धरती होती@@
जशी लाजरी गोडशी परी
परलोकीचे बघून राक्षस
धडधडली ती असावी उरी
टोळधाड ही कशास आली?
भंग शांतता करण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

बर्‍याच सेना तिथे पाहिल्या
जनतेच्या सेवा करणार्‍या
जनसेवेचे ढोंग करोनी
धांगडधिंगा माजवणार्‍या
जात, धर्म अन् आदर्शांचे
झेंडे घेउन वावरणार्‍या
अंदोलन हे निमित्त साधुन
नियमांनाही ठोकरणार्‍या
अडचण त्यांची, तिथे टोलबुथ
बसेस नव्हत्या फुटण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

जिकडे तिकडे पाट्या होत्या
सुजीतदादा, नि वरद पवार
किती प्लॉट्स त्यांचे होते ते!
थकलो वाचुन वारंवार
उत्तरेस तर बड्या घराचा
कुणी जावई दावेदार
डोंगर सारे एकाचे अन्
कैक लव्हासा आवतरणार
जमीन जुमला सारा त्यांचा
स्क्वेअरफुटने विकण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

तेथेही दुष्काळच दिसला
नेतृत्वाची चांदी होती
नेत्यांच्या तोंडाला पाणी
मदतनिधीची संधी होती
राजकारणी सोडुन सार्‍या
धंद्यामध्ये मंदी होती
सुजीतदादा खुदकन हसले
कारण तेथे नव्हती बंदी
दर्‍या कपारी खोल कोरड्या
लघुशंकेने भरण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी


अद्भुत यात्रा करावयाची
मनोमनी मी खूप हुरळलो
मंगळ! मंगळ! प्रभात समयी
स्वप्नामध्ये म्हणे बरळलो
मला उठउनी पत्नी करते
सवाल "कोठे कसा हरवलो?"
धरतीवरती पाय टेकले
वास्तवात पटकन गुरफटलो
खडबडून मी उठलो, लोकल
सात तीसची धरण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

@@ virgin land




निशिकांत देशपांडे.मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, September 12, 2014

एकच पणती तेवत होती


धीर धरोनी वादळासवे
जिद्दीने ती झगडत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

झगमग नाही, मंदमंदसा
प्रकाश देणे तिला आवडे
कष्टांचे, खस्ता खाण्याचे
तिला न होते कधी वावडे
तेल संपले, वात जळाली
स्वयंप्रकाशित भासत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

खांद्यावरती ओझे घेणे
तिने पोसला छंद आगळा
गाभार्‍यातिल दिव्याप्रमाणे
मिणमिणता आनंद वेगळा
चंदन होउन झिजावयाची
तिची आपली पध्दत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

ग्रिष्म असोनी सदा द्यायची
थंड सावली, हिरवळ हिरवळ
प्राजक्ताचे झाड जणू ती
सभोवताली दरवळ दरवळ
फुले वाहता ओंजळीत, ती
गंध जरासा ठेवत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

हात फिरवता, स्पर्श मखमली
पडे चांदणे शीतळ शीतळ
रौद्ररूप जर कधी दावले
जणू काय ती होती कातळ
नर्मदेतल्या गोट्याला ती
कठोरतेने घडवत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

गर्भगृहीची ज्योत अचानक
विझून जाता खिन्न वाटले
घरात माझ्या, देवाच्या पण
अंधाराचे राज्य जाहले
ठेच लागली मला कधी तर
स्वर्गी आई विव्हळत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती


निशिकांत देशपांडे. मो.के.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Sunday, September 7, 2014

गीत लिहूया एकदुज्यावर


ठराव आता पास करूया
कधी तुझ्यावर तर माझ्यावर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

आठवणींच्या मळ्यात दोघे
जरा फिरूया हात धरोनी
कळ्या, सुगंधी फुले वेचण्या
पहाटेस ओंजळी भरोनी
जीवन गाणे लिहीन मी अन्
हिंदोळव तू सप्तसुरांवर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

आले गेले प्रसंग बाका
दु:ख हजेरी लावत गेले
हात तुझा हाती असताना
मनास सारे भावत गेले
सुखावायचो घालुन फुंकर
ह्रदयावरच्या खोल चर्‍यांवर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

व्यवहारिक दृष्टीने आपण
प्रपंच केला वजावटीचा
परस्पारातिल समर्पणाला
होता पैलू सजावटीचा
जीवन फुलले कधीच नव्हते
मान, मरातब, हार, तुर्‍यावर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

आप्तेष्टांच्या गर्दीमधला
जो तो होता तुटक वागला
ध्यानी आले सत्त्य शेवटी
मीच तुला अन् तूच तू मला
जीवन केले किती स्वयंभू
विसंबल्याविन ग्रह-तार्‍यांवर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

मैफिलीतले रंग उतरता
एक विरहिणी लिहावयाची
आर्त स्वरांची चाल लाउनी
तन्मयतेने गुणगुणायची
सुरेल शेवट हवा जीवना !
पुढील आहे भिस्त तुझ्यावर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, August 29, 2014

तसेच जपले होते


भळभळणार्‍या आठवणींना
तुझ्या रुजवले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

ना बुजणार्‍या जखमांचे का
दाह अचानक सरले?
एक घाव तू दिल्या क्षणाला
दु:ख जुनेरे विरले
वेदनेतही जगण्यासाठी
हास्य फुलवले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

क्ष किरणाने घे तू फोटो
माझ्या ह्रदय, मनाचा
तुला न दुसरे दिसेल कोणी
तुझाच वावर साचा
बंद मनाचे दार फक्त मी
तुला उघडले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

वसंत गेला दूर जाउदे
मला न कौतुक त्याचे
ग्रिष्म असोनी सदाफुलीने
असते फुलावयाचे
विणून स्वप्ने मनाप्रमाणे
विश्व सजवले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

मावळतीला आज एकटा
तरी उदासी नसते
वस्त्र जुने पण आठवणींची
किनार शोभुन दिसते
उगवतीस, मध्यान्ही अगणित
रंग उधळले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

प्रवास माझ्या कवितांचाही
तुझ्या भोवती फिरला
परीघ तुझिया अस्तित्वाचा
मला पुरोनी उरला
कुंचल्यातुनी इंद्रधनूचे
रंग उतरले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, August 21, 2014

निरव शांतता कुठे मिळेना


यत्न करोनी गावाकडची नाळ तुटेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

भल्या पहाटे उठण्यासाठी गजर लावतो
सेकंदाच्या काट्यावरती उठतो, बसतो
जात्यावरची ओवी कानी कधी पडेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

नकोच शेती, कनिष्ठ असुनी बरी नोकरी
ध्येय दरिद्री, जगावयाला पुरे भाकरी
गावी राहुन शेत कसाया कुणी धजेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

रानपाखरे, ओढे खळखळ, हिरवी धरती
भागवायला भूक बघावे टीव्हीवरती
कर्टुन शोच्या शिवाय दुसरे मुला रुचेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

धृव नि त्याच्या अढळपदाची गोष्ट हरवली
मिकिमाउस अन् विनी मनावर कुणी रुजवली
ग्रहण लागले संस्कृतीस का असे कळेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

असेच लोंढे येत राहिले खेड्यामधुनी
ओस गाव अन् शहरे जातिल तुडुंब भरुनी
मुंग्यांच्या गर्दीत आपुले कुणी दिसेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

बदलाच्या वादळी बदलणे जरी जरूरी
दु:ख वाटते जुन्या पिढीला, ही मजबूरी
सुंभ आमुचा जरी जळाला, पीळ जळेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना


निशिकांत देशपांडे. मो.क्र ९८९०७ ९९०२३
EMail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, August 12, 2014

एवढे प्रेम का सुकले?


भंगल्या माझ्या मनाची
पांगली चौफेर शकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे  प्रेम का सुकले?

सुगंधाची जिथे ये जा
तिथे गेलो कधी आपण?
जरी फुलपाखरासम मी
फुलांचे ना कधी दर्शन
कुंडल्या आपुल्या जुळल्या
तरी सौख्यास का मुकले?
रुजायाच्या अधी माझे
एवढे  प्रेम का सुकले?

तुला जर जायचे होते
तसे सांगून जावे ना!
किती प्रस्ताव केले मी
तुला तडजोड भावेना
प्रश्न हा गौण तर होता
कोण कोणापुढे झुकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे प्रेम का  सुकले?

मनाच्या हिरवळीचा का
असा इतिहास पुसलेला?
नि पाचोळा विरानीचा
मना व्यापून उरलेला
दु:ख नगदीत घेण्याला
सुखांना स्वस्त मी विकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे प्रेम का  सुकले?

वाकता कबरीवरी तो
सोबती ती बया असते
कोण म्हणते कि पुरल्यावर
जाळणेही शक्य नसते
वेदनांचे दाह विरही
भार मी पेलुनी थकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे प्रेम का  सुकले?

कशी ही लक्तरे झाली?
जिवाची, जीवनाचीही
नसे कांही बघायाला
जरा मागे न पुढतीही
अधांतर वर्तमानी मी
जगाया प्रेतवत शिकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे प्रेम का  सुकले?


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Sunday, August 3, 2014

आयुष्याची सरते मरगळ


खाचा खळग्यांच्या वाटेवर
कशी अचानक हिरवळ हिरवळ?
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

वसंत, श्रावण, कळ्या, फुलांचे
दिवस केवढे धुंद फुंद ते !
असून संगत चार दिसाची
उधळलेस तू किती गंध ते
सर्व पाकळ्यांच्या गालावर
अनुभवली हास्याची खळखळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

असा गुंततो भूतकाळच्या
जाळ्यामध्ये, तगमग भारी
वर्तमान रुचतो न मनाला
जरी भोवती झगमग सारी
आठवणीचा एक कवडसा
निशिगंधाचा पसरे दरवळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

तू नसल्याने जीवनात या
किती अजबसे घडू लागले!
रोजच सखये स्वप्नांनाही
स्वप्न तुझे का पडू लागले?
दिलास तू अंधार, शुक्रिया
लपवायाला माझी घळघळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

वळून मागे बघावयाचे
प्राक्तनात लिहिले असताना
भविष्यातली नको काळजी
जिवास, गतकाळी जगताना
विरहाच्या जखमांना आता
वहावयाचे आहे भळभळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

भीक मला दे एकच देवा
कधी तिच्यावर वेळ न येवो
पसरायाची पदर मागण्या
स्वयंभू तिचे जीवन होवो
नवी पालवी तिला मिळावी
म्हणून मजला हवी पानगळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, July 22, 2014

शब्दफुलांना वेचवेचले


शब्दफुलांना वेचवेचले
भाव मनीचे गुंफायाला
या कवितांनो, अन् गझलांनो
वयस्क दु:खे लिहावयाला

झुळझुळणारी माझी कविता
सुरकुत्यात का अडकुन बसते?
आठवणींच्या दलदलीत ती
प्रचंड गुदमर सोसत असते
शैशव, यौवन थडग्यामधले
शब्द लागती खणावयाला
या कवितांनो, अन् गझलांनो
वयस्क दु:खे लिहावयाला

बडबडगीते अता संपली
विरान घरट्यावरती लिहितो
श्रावणातल्या कविता सोडुन
कलमेमधुनी मी ओघळतो
ओठावरचे हास्य कालचे
आज लागले रडावयाला
या कवितांनो, अन् गझलांनो
वयस्क दु:खे लिहावयाला

आयुष्याची दिशा बदलली
पुढे काय? हे मला कळेना
साथ सोडली प्रत्त्येकाने
हात धराया कुणी मिळेना
गूढ प्रदेशी अशी कशी ही
वाट लागली वळावयाला?
या कवितांनो, अन् गझलांनो
वयस्क दु:खे लिहावयाला

सहवासाने या जगातले
भलेबुरे सारे आवडते
म्हणून माझ्या सायंकाळी
दु:ख, सुखांच्या छटा खुलवते
आयुष्याच्या कलेवरावर
प्रेम लागले जडावयाला
या कवितांनो, अन् गझलांनो
वयस्क दु:खे लिहावयाला

प्रवास करताना शेवटचा
कधीच नसते बांधाबांधी
दु:ख कशाला मावळण्याचे?
नवजन्माची असते नांदी
उत्साहाचे, उन्मेषाचे
गीत लागले सुचावयाला
या कवितांनो, अन् गझलांनो
वयस्क दु:खे लिहावयाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, July 18, 2014

वावर तुझिया आठवणींचा



यत्न करोनी थकलो आता
नको सोहळा पाठवणीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर
वावर तुझिया आठवणींचा

जशी जाहली ओळख अपुली
रोज भेटणे अन् कुजबुजणे
रंग कुंचल्याविनाच भावी
स्वप्नांमध्ये छटा खुलवणे
चांदणरात्री जिथे भेटलो
उजाड भासे पार शनीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर
वावर तुझिया आठवणींचा

धरतीवरती पाय टेकले
जशी भंगली स्वप्ने सारी
आषाढी कार्तिकीच नाही
आठवणींची सदैव वारी
विशाल केले ह्रदय, सुटाया
प्रश्न स्मृतिंच्या साठवणीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर
वावर तुझिया आठवणींचा

सोड जगाचे, तुला न माझे
दु:ख कधी जाणवले होते
अंधाराच्या पडद्यामागे
चार थेंब ओघळले होते
"ज्याचे जळते, तयास कळते"
आज उमगला अर्थ म्हणीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर
वावर तुझिया आठवणींचा

आठवणींच्या तनात, माझ्या
आयुष्याचे पीक वाळले
खुरपण निंदन केल्यावरही
तन फोफावुन जास्त माजले
खरे सांगतो आठव येता
मनी दरवळे गंध झणीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर
वावर तुझिया आठवणींचा

अंधाराच्या गावी असुनी
पूर्व दिशेची ओढ जिवाला
ग्रिष्म तरीही ढग आकाशी
बघावयाची खोड मनाला
कधी तरी नाचेल अंगणी
पंख पसरुनी मोर मनीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर
वावर तुझिया आठवणींचा


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com






Saturday, July 5, 2014

अखंड चालू प्रवास आहे


अनामिकाचा सातत्त्यने
शोध घ्यायचा प्रयास आहे
रस्ता माझा मी रस्त्याचा
अखंड चालू प्रवास आहे

ध्येय गाठले एक तत्क्षणी
नवे दूरचे दिसू लागते
जोमाने मग चालायाची
आस नव्याने मनी जागते
ध्येय गाठल्यावरती अंतिम
जीवन जगणे भकास आहे
रस्ता माझा मी रस्त्याचा
अखंड चालू प्रवास आहे

मैफिलीतले माझे गाणे
टाळ्या घेई क्षणाक्षणाला
उत्तररात्री रंग चढे अन्
कैफ केवढा तनामनाला!
मैफिल सरली, वयोपरत्वे
धार न उरली सुरास आहे
रस्ता माझा मी रस्त्याचा
अखंड चालू प्रवास आहे

ओढ सुखाची असून सुध्दा
दु:खासंगे खुशीत होतो
शुध्द झळाळी मिळवायाला
आयुष्याच्या मुशीत होतो
वेदनेतही झरा सुखाचा
झुळझुळतो हा कयास आहे
रस्ता माझा मी रस्त्याचा
अखंड चालू प्रवास आहे

प्रवासातली तर्‍हा निराळी
खाचा, खळगे, वाट वाकडी
वळणावरती वळता कळते
खूप चाललो, पुढे तोकडी
संपत आला प्रवास कळता
कोरड पडते घशास आहे
रस्ता माझा मी रस्त्याचा
अखंड चालू प्रवास आहे

क्षितिजापुढती गूढ प्रदेशी
भगवंताचा वास असावा
पाय वळावे त्याच दिशेने
जिकडे तारणहार  दिसावा
लाख योजने दूर असू दे
ओढ लागली मनास आहे
रस्ता माझा मी रस्त्याचा
अखंड चालू प्रवास आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Monday, June 30, 2014

आभासी जगात रमतो


आजपर्यंतच्या कोरड्या पावसामुळे सुचलेली कविता.

स्वप्नात हर्षलो बघुनी
पाऊस कधीचा पडतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो

कॅन्व्हास ढगांनी भरला
ही किमया रंगछटांची
कुंचल्यातून आवतरली
सर ओली अभासाची
मृगजळातल्या पाण्याला
प्यावयास भरभर पळतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो

कालही कोरडा गेला
ना आस आजची ओली
पाण्यात बुडवले देवा
नवसांची लाउन बोली
अंदाज हवामानाचा
वेडा मी ऐकत असतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो

मी कयास बांधत आहे
वचनांच्या पर्जन्याचा
अन् महापूर मदतीचा
इकडे तिकडे जिरण्याचा
का हाती बळिराजाच्या
फासाचा दोरच उरतो?
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो

कोरडा कधी तर ओला
दुष्काळ मोडतो कंबर
लावावी कितीक ठिगळे?
फाटलेच जर का अंबर
वारीत नाचता विठुच्या
क्षण एक मीत मी नसतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो

अन् सालाबाद प्रमाणे
कविता चारोळ्या लिहितो
पर्जन्य असूदे नसुदे
मी श्रावणात वावरतो
आशय माझ्या कवितांचा
दु:खातच खूप बहरतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, June 22, 2014

कधी अबोला कधी दुरावा


कधी अबोला कधी दुरावा
नित्त्यचे हे वादळ आहे
तरी सांगतो रागही तिच्या
नाकावरचा प्रेमळ आहे

कारण नसतानाही येतो
त्यास कदाचित राग म्हणावे
येतो जातो क्षणाक्षणाला
बघणार्‍याने बघत रहावे
असा शोभतो राग, भासते
ती सुमनांची ओंजळ आहे
तरी सांगतो रागही तिच्या
नाकावरचा प्रेमळ आहे

याच चेहर्‍यावरती केंव्हा
प्रसन्न होते हास्य पाहिले
बोलघेवड्या नजरेमधुनी
अबोल्यातही सर्व ऐकिले
जे आठवते तेच खरे अन्
राग, दिखावा केवळ आहे
तरी सांगतो रागही तिच्या
नाकावरचा प्रेमळ आहे

शब्द बरसले सरीप्रमाणे
वावरता ती कवितेमधुनी
सुकल्या शाईमधे भेटतो
पानोपानी आठवातुनी
काल तिजमुळे मखमल होता
आज तिच्याविन कातळ आहे
तरी सांगतो रागही तिच्या
नाकावरचा प्रेमळ आहे

झुळझुळणारी चंचल प्रतिभा
तुझ्यामुळे तर झरझर झरते
ओळी मागून ओळी लिहितो
आणि मनोगत मस्त बहरते
स्वप्न जरा धूसर झाल्याने
किती पसरली मरगळ आहे?
तरी सांगतो रागही तिच्या
नाकावरचा प्रेमळ आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, June 12, 2014

आत आसवे गाळत गेलो


ध्यानी आले, आयुष्याची
पाने जेंव्हा चाळत गेलो
हास्य लिंपुनी तोंडावरती
आत आसवे गाळत गेलो

सातत्त्याने करीत अभिनय
माझ्यापासून मीच हरवलो
टाळ्या, शिट्ट्या मिळवायाला
पात्र मस्त मी वठवत बसलो
नाटक सरता भयाण वास्तव,
आरशास मी टाळ्त गेलो
हास्य लिंपुनी तोंडावरती
आत आसवे गाळत गेलो

गर्दीमध्ये, तरी एकटे
सूत्र जाहले जगावयाचे
जिथे निघाला जमाव सारा
त्याच दिशेने निघावयाचे
पुरून आशा-आकांक्षांना
प्रवाहात मी मिसळत होतो
हास्य लिंपुनी तोंडावरती
आत आसवे गाळत गेलो

वसंत आला म्हणे कैकदा
पुढे सरकला मला टाळुनी
ग्रिष्माच्या मी झळा भोगतो
बिना सावली, उभा राहुनी
पर्णफुटीची आस संपता
कणाकणाने वाळत गेलो
हास्य लिंपुनी तोंडावरती
आत आसवे गाळत गेलो

मनासारखे जगू न शकणे
माणसास हा शाप लाभला
परीघ रूढीपरंपरांचा
गळ्याभोवती घट्ट काचला
हताश होउन सिगारेटच्या
धुरात स्वप्ने जाळत गेलो
हास्य लिंपुनी तोंडावरती
आत आसवे गाळत गेलो

साथ सखीची जीवनातली
हीच काय ती होती हिरवळ
एक फुलाचा पुरे जाहला
धुंद व्हावया सदैव दरवळ
दु:खाच्या ओझ्याखालीही
सखीसवे हिंदोळत गेलो
हास्य लिंपुनी तोंडावरती
आत आसवे गाळत गेलो


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, June 8, 2014

करार


रुढी प्रथांना तोडत आम्ही
जगावयाचा विचार केला
लग्नाविन एकत्र रहावे
मी अन् त्याने करार केला

काळ गुलाबी धुंदफुंद तो
विषय सुखांचे रोज सोहळे
तुच्छ लेखले जगास आंही
अन् ठोकरले प्रेम सोवळे
नाते नसुनी सागरात मी
यथेश्च नौका विहार केला
लग्नाविन एकत्र रहावे
मी अन् त्याने करार केला

जगावेगळी वाट चालता
धुंदी कांही औरच असते
मी जे करते तेच खरे अन्
माझे कांही गैरच नसते
सौदा नगदी आसक्तीचा,
चांगुलपणचा उधार केला
लग्नाविन एकत्र रहावे
मी अन् त्याने करार केला

एक संपता करार दुसरा,
दुसर्‍यासंगे नवीन जगणे
वेळोवेळी शोधत होते
चरावयाला नवीन कुरणे
करार सरता, बिना गुंतता
गुडनाइटचा प्रकार केला
लग्नाविन एकत्र रहावे
मी अन् त्याने करार केला

गाडीमधले जसे प्रवासी
तसेच आम्ही वागत होतो
भाव मनी फुललेच कधी तर
कुणी न कोणा सांगत होतो
जीवनशैलीमधे, मला मी
पटवत होते, सुधार केला
लग्नाविन एकत्र रहावे
मी अन् त्याने करार केला

तारुण्याचा उभार गेला
करार नवखा अवघड आहे
उभी एकटी उन्हात आता
आयुष्याची परवड आहे
धोंडा उचलुन मीच माझिया
पायावरती प्रहार केला
लग्नाविन एकत्र रहावे
मी अन् त्याने करार केला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, May 27, 2014

क्षितिजावरती मळभ दाटते


तू आल्याने मलाच नाही
वसंतासही बरे वाटते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते

दिशाहीन वाटाही चुकती
जणू जाहला त्यांना चकवा
शोधशोधुनी तुझ्या घराचा
मार्ग, मनाला येतो थकवा
अंधाराच्या खाईमध्ये
फक्त निराशा मनी साठते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते 

प्रेमभावना पाप नसोनी
शाप कसा हा ओघळण्याचा?
रोमांचांचा कमी, नेहमी
मोसम असतो भळभळण्याचा
पर्णझडीच्या अन् ग्रिष्नाच्या
ऋतुचक्राचे शल्य टोचते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते 

पुन्हा पैंजणांची चाहुल का
पडता कानी मनात धडधड?
भास असावा, ध्यानी येता
केविलवाणी उगाच फडफड
धगधगणार्‍या मनी तुझ्याविन
अंतःकरणी दु:ख गोठते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते 

जुनी डायरी आयुष्याची
वाचुन किंचित उदास आहे
तुझाच वावर पानोपानी
अन् मी कोरा समास आहे
प्रेमामधल्या समर्पणाला
विरहाचे का दु:ख भेटते?
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते

जगावयाचे जगून झाले
नकोच चर्चा नको समिक्षा
आयुष्याने सदा घेतली
उगाच माझी सत्वपरिक्षा
एकांतीचा प्रवास माझा
जरी चालता ठेच लागते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Saturday, May 17, 2014

मोदींचे सरकार


मळभ संपले आस लागली
सरेल अंधःकार
पहाट नवखी घेउन येइल
मोदींचे सरकार

नेहरू-गांधी परिवाराचे
जोखड टाकू चला
श्वास मोकळा जरा घ्यायची
अता  शिकू या कला
माय, ल्योक अन् जावयाने
केला हाहा:कार
पहाट नवखी घेउन येइल
मोदींचे सरकार

मनमोहनची इमानदारी
होती त्यांची ढाल
आडून धंदा लुटावयाचा
केली किती धमाल?
आड्डा होता चोरांचा तो
जरी नाव दरबार
पहाट नवखी घेउन येइल
मोदींचे सरकार

पसा अमुचा तरी योजना
नेहरूंच्या नावाने
गांधीही नावात शोभती
अशात नवजोमाने
कुणी लाटला पैसा? जनता
फिरते दारोदार
पहाट नवखी घेउन येइल
मोदींचे सरकार

चव्हाण, राजा, बन्सल सारे
नागवलेले तरी
मान तयांचा तिकीट देउन
शेल्याने भरजरी
प्रामाणिकता फडतुस ठरली
तिचा कुठे सत्कार?
पहाट नवखी घेउन येइल
मोदींचे सरकार

आशा ठेऊ वसंत येइल
बारा महिने इथे
सुशासनाचे सुवर्णयुगही
दिसेल जेथे तिथे
नवीन तारा या बदलांचा
असेल किमयागार
पहाट नवखी घेउन येइल
मोदींचे सरकार


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, April 27, 2014

सावल्या लांबल्या


आठवणींच्या लाटा
येता न थांबल्या
संध्याछाया येता,
सावल्या लांबल्या

वळवाचा पाऊस
आला आणि गेला
थंड गारव्याचा
पांघरला शेला
मनीच्या भावना
पल्ल्वीत झाल्या
संध्याछाया येता,
सावल्या लांबल्या

शब्द गवसले
गवसला सूर
आनंदाचे डोही
होता महापूर
अंग वस्त्री लक्ष
चांदण्या कोंदल्या
संध्याछाया येता,
सावल्या लांबल्या

सोनियाचा धूर
आवती भोवती
आनंदाचे आम्ही
राहिलो सोबती
लक्ष्मी सरस्वती
एकत्र नांदल्या
संध्याछाया येता,
सावल्या लांबल्या

कोणा दारी हत्ती
असतील झुलले
माझ्या दारी मोरांचे
पिसारे फुलले
वर्णाया शब्दांच्या
राशीही संपल्या
संध्याछाया येता,
सावल्या लांबल्या

असे नाही कांही
सुख सदा साथी
दृष्ट लागू नये
मना होती भिती
हसर्‍या चेहर्‍यावर
वेदना गोंदल्या
संध्याछाया येता,
सावल्या लांबल्या

रात्र येता दारी
सावल्यांचा शोध
संपलय सारं
मना झाला बोध
पैल तिरी आता
नजरा लागल्या
संध्याछाया येता,
सावल्या लांबल्या


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



 

स्पष्ट जरा सांगावे म्हणतो


मनातले ते स्पष्ट जरा सांगावे म्हणतो
काळजातल्या धगधगीस मिटवावे म्हणतो

एक जमाना झाला जीवन एकएकटे
आठवणींचा किती पसारा किती जळमटे?
ह्रदयामधल्या कपारीस बुजवावे म्हणतो
काळजातल्या धगधगीस मिटवावे म्हणतो

कसा वेगळा फुलापासुनी गंध जाहला?
चकोर दावुन पाठ शशीला कुठे नांदला?
उत्तर नसल्या प्रश्नांशी झगडावे म्हणतो
काळजातल्या धगधगीस मिटवावे म्हणतो

मनोभावना व्यक्त कराया शब्द फुटेना
कागद शाई शिवाय दुसरा मार्ग दिसेना
जीवनातले वविरहगीत खरडावे म्हणतो
काळजातल्या धगधगीस मिटवावे म्हणतो

भाग्य लागते हवे हवे ते मिळावयाला
मीच शोधला उपाय माझा जगावयाला
प्याल्यामधले दु:ख मस्त रिचवावे म्हणतो
काळजातल्या धगधगीस मिटवावे म्हणतो

सुखदु:खांच्या पुढे सरकले जीवन माझे
भाव-भावनांचे ना उरले आता ओझे
"जे झाले ते ठीक" असे समजावे म्हणतो
काळजातल्या धगधगीस मिटवावे म्हणतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Tuesday, April 22, 2014

उजेड झाला मला नकोसा


अर्ध्यामध्ये साथ सोडली
तू जाता हरवला कवडसा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

अनुभवले मी क्षणभर मृगजळ
रोमांचांची घेत अनुभुती
आठवणींच्या कळा भोगणे
प्रेमाची का हीच फलश्रुती?
आयुष्याची तर्‍हा वेगळी
कधी हुंदका कधी उसासा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

क्षणेक सहवासाचा दरवळ
अजून श्वासामधे नांदतो
सोनेरी क्षण धुंद होउनी
ह्रदयावरती पुन्हा गोंदतो
तगमगतो पण तुझा राबता
स्वप्नी वाटे हवाहवासा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

फुलला होता अवकाळी जो
हिरवा चाफा जळून गेला
बहर चुकोनी आला जेंव्हा
फुलण्याआधी गळून गेला
वसंत इकडे कधी न आला
दुरून जातो जराजरासा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

नको वाट अवसे पुनवेची
ग्रहण योग तर रोजच असतो
"वेध लागणे" जुना रोग हा
माझ्यासोबत जाइल दिसतो
प्राक्तनातल्या दुर्दैवाचे
कारण कुठले? नको मिमांसा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

आठवणींच्या नभांगणातिल
शुक्रतारका तुझी आठवण
शिंपल्यातल्या मोत्यासम मी
मनात केली खोल साठवण
कधी घेतला तुझ्यासवे जो
श्वास जाहला मला पुरेसा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, April 11, 2014

आयुष्याचे रंग बदलले


ऊन कोवळे, प्रखर दुपारी
धूसर झाले का मावळता?
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

खळखळणारी बाल्यावस्था
हुंदडणारी, बागडणारी
अन् आईच्या पदराखाली
सायंकाळी विसावणारी
जाग यायची ऐकुन ओव्या
माय गायची दळता दळता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

आईच्या मायेत डुंबता
बालपणाचे सोने झाले
खडबड असुनी, पाठीवरती
मोरपिसासम हात वाटले
ठेच लागली मला जर, तिची
रात्र जातसे कण्हता कण्हता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

तारुण्याच्या उंबरठ्यावर
प्रेमभावना मनात रुजली
रोमांचांचे फुलून येणे
स्वप्न गुलाबी रोज मखमली
गंध पसरले चहूदिशेला
सखीसंगती जगता जगता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

एक गाठता दुसरे येई
ध्येयमालिका जिंकत गेलो
चढून ध्येयांच्या शिखरांवर
जरी तुतारी फुंकत गेलो
हळूच आली सांज, थकावट
दस्तक देई उठता बसता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

आठवणींचे ओझे घेउन
सुरकुतलेला प्रवास उरला
श्वास घ्यावया जगावयाचे
आयुष्याचा उभार सरला
म्लान किती तो सूर्य जाहला?
पश्चिमेकडे ढळता ढळता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२3
E Mail--- nishides1944@yahoo.com

Monday, April 7, 2014

ओळखा पाहू मी कोण? (भाग--२)


पहिली रचना सादर केल्यानंतर कांही वाचकांनी फर्माईश केल्यामुळे ही दुसरी  आणि या प्रकरातील शेवटची रचना. राज्यकर्त्यांवर लिहिल्यामुळे माझ्या लेखणीला असंगांचा संग झाल्यागत वाटतय; म्हणून हा निर्णय. बहुतेक सर्व पात्रे आपण ओळखू शकाल.

१)
मी आहे इतका साधा
जनावरांचा खातो चारा
बिहारमधे मर्जीनुसार
माझ्याच वाहत असतो वारा
पत्नी, मेव्हणा, मुले, मुली
राजकारणातील एक एक तारा
बिरसामुंडा जेलमधे
आराम केलाय महिने दोन
ओळखा पाहू मी कोण?

२)
जागेवरून उठणे अवघड
व्हील चेयर माझे वाहन
तरीही माझी भागत नाही
मुख्यमंत्री व्हायची तहान
श्रीलंकेच्या तमिळांचा
मीच तारणहार महान
दोन मुले, मुलगी अन् मी
सत्तेचा काटकोन चौकोन
ओळखा पाहू मी कोण?

३)
माझ्याच पक्षात धुसफुस होती
अंतरविरोध केलाय दूर
माझ्याच राज्याचं विकास मॉडेल
प्रचार करतोय मी भरपूर
साठ वर्षे वाया गेली
साठ महिने द्या पुरेपूर
पूर्ण देशात पहाल तुम्ही
विकासाचं पसरलेलं लोन
ओळखा पाहू मी कोण?

४)
काशीरामाची मानस कन्या
एक हात अभिवादन करायला
दुसर्‍या हातात असते पर्स
पैसे त्यात भरपूर भरायला
माझे पुतळे मला आवडतात
चौका चौकात बघायला
मी सत्तेत येताच सुटतात
प्रश्न दलितांचे मिनिटात दोन
ओळखा पाहू मी कोण?

५)
तीन कुमारिका राजकारणातल्या
त्यातलीच मी आहे एक
जायंट किलर म्हणून दिलाय
बंगालात डाव्यांना चेक
टाटा समुहाला हुसकावून लावताना
गुजरातला मिळाला फुकटचा केक
मनमोहना बंगलादेशला जाण्याअधी
विचार माझे मत करून फोन
ओळखा पाहू मी कोण?


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo,com


Wednesday, April 2, 2014

ओळखा पाहू मी कोण?


आज ज्यांचे वय ४०/४५ वर्षांच्या पुढे असेल त्यंना खालील कविता नाक्कीच माहीत असेल.
चाक फिरवतो गरागरा
मडके करतो भराभरा
ओळखा पाहू मी कोण?
याचे उत्तर "कुंभार" आहे. या कवितेत त्यावेळी जीवनाशी निगडीत सर्व कलाकार (आर्टीजन्स) होते; जसे की लोहार, सुतार वगैरे वगैरे. आता या सर्व गोष्टी काळाच्या पडद्याआड लुप्त झाल्या आहेत. हे जुने संदर्भ हल्लीच्या पिढीतील मुलांना माहीत नाहीत. उदाहरणार्थ, जुन्या काळी लहान मुलांना भोवरा गवातील सुतार बनवून देई. आता प्लॅस्टीकचे भोवरे विकत मिळतात. मुलांना कसे माहीत असणार भोवरे सुतार बनवत होते.
याच कवितेपासून प्रेरणा घेऊन अशीच कोडी असलेली एक रचना  तयार आहे. या रचनेत सध्याचे संदर्भ असल्यामुळे कविता थोडी खोचक वाटेल कदाचित. कोणालाही दुखवायचा उद्देश नाही. बघा कशी वाटते ती.

१)
उच्च पदावर असून, साधा
कडक जॅकेट, निळसर पगडी
मूग गिळोनी निमूट बघतो
भ्राष्टाचारी, अनेक लफडी
अर्थतज्ञ मी असून सुध्दा
देश लागलाय देशोधडी
परवानगीविना बोलू कसे?
म्हणून पाळत असतो मौन
ओळखा पाहू मी कोण?

२)
नसताना पद, सत्ता माझी
राजघराण्याचा मी वारस
शहजादा म्हणणार्‍यासाठी
माझ्या मनात आहे आकस
मंत्री, संत्री खिशात माझ्या
चमचे, चमचे अन् चमचे बस!
सारे माझी ओढतात री  SSS
वर्तुळास म्हणता चौकोन
ओळखा पाहू मी कोण?

३)
महाग करतो सालोसाली
कांदे आणि खूप कमवतो
बिल्डर लॉबी, साखार धंदे
शिक्षणक्षेत्री चित्त रमवतो
पंतप्रधानाच्या गादीचे
रात्रंदिन मी स्वप्न पाहतो
माझी कन्या, माझा पुतण्या
बाकी सारे दिसते गौण
ओळखा पाहू मी कोण?

४)
मुलगा माझा पिता म्हणेना
संबोधत असतो "नेताजी"
राज्यामध्ये असून काशी
मजला प्यारे मुल्ला, काझी
दिल्लीश्वरचे अपेंंडिक्स मी
सदैव त्यांची करतो "हां जी!"
मते मिळवण्या करेन अनुनय
दहशतवादी माझा झोन
ओळखा पाहू मी कोण?

5)
रुसतो, फुगतो, त्रागा करतो
वय झाले हे विसरुन जातो
अहंभाव उत्तुंग एवढा!
पक्ष कसपटासमान दिसतो
चुचकाराया नेते येती
कमळालाही तुच्छ लेखतो
सुतासारखा सरळ वागतो
नागपूरहून येता फोन
ओळखा पाहू मी कोण?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, March 30, 2014

दवबिंदूंचे लेउन मोती


व्यर्थ तृणा का थरथरसी तू?
दवबिंदूंचे लेउन मोती
क्षणेक ज्यांची साथ लभते
मिरवावे का त्यांना माथी?

सुखदु:खाचे आपण अपुल्या
शिल्पकार का कधी नसावे?
ध्येय स्वयंभू बनावयाचे
गाठायाला कष्ट करावे
शोध सुखांचा आत आपुल्या
घ्यावा, दुसरी नकोत नाती
क्षणेक ज्यांची साथ लभते
मिरवावे का त्यांना माथी?

असाच मी मोहरलो होतो
हात कुणाचा हाती येता
जगा वाकुल्या दावत होतो
धुंदीमध्ये जगता जगता
वसंत आला निघून गेला
ग्रिष्म जाहला जीवन साथी
क्षणेक ज्यांची साथ लभते
मिरवावे का त्यांना माथी?

शिंपल्यातल्या मोत्यासम मी
मनात जपल्या खास क्षणांना
आठवताना प्रत्त्यय येतो
तुझाच माझ्या रोमांचांना
पुलकित होणे, हरवुन जाणे
मी अनुभवतो विरान राती
क्षणेक ज्यांची साथ लभते
मिरवावे का त्यांना माथी?

हेच खरे, सहवास सखीचा
सदैव देतो धुंदी, दरवळ
असो क्षणाची प्रेम कहाणी
अखंड नांदे हिरवळ हिरवळ
उजेड द्याया मंद तेवती
आठवणींच्या मनात वाती
क्षणेक ज्यांची साथ लभते
मिरवावे का त्यांना माथी?


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, March 26, 2014

कोणत्या जातीतला?


कोण पुसतो? जन्म माझा
कोणत्या मातीतला
एक चर्चा नेहमी मी
कोणत्या जातीतला?

जात माझी श्रेष्ठ असते
दुसरी जरा वेडी खुळी
मी मराठा उच्च्वर्णी
मूळचा शहान्नौ कुळी
वेगळ्या सेना नि झेंडे
अन् ब्रिगेडी मातल्या
एक चर्चा नेहमी मी
कोणत्या जातीतला?

जातीस उपजाती किती !
चक्रव्युह हे केवढे !
अडकला माणूस, पडले
बुध्दिवादी तोकडे
जोश जातींच्या विरोधी
जागवा तरुणातला
एक चर्चा नेहमी मी
कोणत्या जातीतला?

कहर येथे स्मशानेही
वाटली जातीत का?
जात सोडत पाठ  नाही
चितेच्या अग्नीत का?
जातपंचायत कशाला?
अडथळा न्यायातला
एक चर्चा नेहमी मी
कोणत्या जातीतला?

जात सोडुन माणसांनी
जगावे माणूसकीने
प्रश्न जे येतील सारे
सोडवावे समजुतीने
जातपातीच्या भुताला
मूठमाती द्या चला
एक चर्चा नेहमी मी
कोणत्या जातीतला?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, March 18, 2014

कुठे गुंतवू मनास माझ्या?


तू गेल्याने रंग उडाले
किती अवकळा घरास माझ्या !
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?


निशिगंधाचे, प्राजक्ताचे
दरवळ होते जिथे पसरले
त्याच अंगणी निवडुगांचे
रान माजले, गंध हरवले
"पूस आसवे" कसे म्हणावे
भळभळणार्‍या उरास माझ्या ?
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?

ग्रिष्म ऋतूचे स्तोम माजले
वसंत इकडे फिरकत नाही
काळ चालतो हळू एवढा
सूर्य सरकता सरकत नाही
कधीकाळच्या रंगबिरंगी
रात्री झाल्या उदास माझ्या
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?

चालत असता काळोखी मी
कसा अचानक उजेड पडला ?
तुझा मखमली खयाल बहुधा
काळजास हळुवार स्पर्शला
रोमांचांच्या आवरणाने
सर्व वेदना खलास माझ्या
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या

नसे भावना स्वतःची तरी
शब्द बोलती सदैव माझे
खांद्यावरती त्यांच्या असते
माझ्या सुखदु:खाचे ओझे
लिहितो, गातो विरह गीत पण
लाख चरे काळजास माझ्या
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?

हिशोब करता ध्यानी आले
जीवन अवघे गेले वाया
पुनर्जन्म दे नकोच मुक्ती
नको कावळा पिंड शिवाया
नवजोमाने नवीन आशय
देइन मी जीवनास माझ्या
सोडुन गेल्या आठवणीही
कुठे गुंतवू मनास माझ्या ?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Sunday, March 16, 2014

शिंतोडे.


होळीच्या पावनपर्वावर एकेमेकांच्या अंगावर केसरिया रंग टाकून सण साजरा करायचा असतो. पण केशरी रंग टाकून घेण्याची समोरच्या माणसाची लायकी असावी लागते. तसे नसेल तर त्यांच्या अंगावर शिंतोडेच उडवलेले बरे. पण हेही तितकेच खरे की शेणावर दगड टाकला तर आपल्याच अंगावर शिंतोडे उडतात. आज जरा बंडखोरी (माझ्याशीच) करत कांही शिंतोडे उडवायची उर्मी आली आहे. आणि तेही मझ्या लिखाणाचा हळूवार पोत सोडून! बघा कसे वाटते ते. कुणी दुखावले गेल्यास क्षमस्व! पेश करतोय छोट्या छोट्य सहा रचना:--

१)
रस्त्यानं चालले काँग्रेस, बीजेपी
मधूनच दिसतोय आप
या सगळ्याच नाठाळांचा
मतदार आहे बाप

२)
तिकिट मला, तिकिट मला
कशाला करताय भांडाभांड?
पुळचटांनो निमूट ऐका
काय म्हणतेय हायकमांड


३)
 या पक्षातून त्या पक्षात
त्या पक्षातून या पक्षात
निवडणुकीचा काळ आलाय
जनतेच्या आलय लक्षात

४)
तोडले ज्या कोल्ह्या कुत्र्यांनी
लोकतंत्राचे लचके
झोळी घेऊन भीक मागतायत
रहना जरा बचके

५)
सुट्टी जेंव्हा मिळेल
मतदान करायला
बुध्दीवादी कार घेउन
जातील खंडाळ्याला

६)
होता जरी पंतप्रधान
नव्हता कधीच किंग
मुका नंतर काढणारय म्हणे
Institute for public speaking


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Saturday, March 15, 2014

निर्भय होउन मिरवू का?


जगास निष्ठुर, कळी विचारी
"मला जरा मी फुलवू का?"
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

तारुण्याच्या उंबरठ्यावर
थवे हजारो भ्रमरांचे
अंगचटीला लगेच येती
झुंड केवढे नजरांचे !
एकविसाव्या शताब्दीतही
घरी मला मी लपवू का?
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

दरवळ देते जरी जगाला
कैद भोगते काट्यांची
गर्भामधल्या स्त्रीभ्रुणासही
भीती नात्यागोत्यांची
"जन्माआधी दे मज मृत्त्यू"
भगवंताला विनवू का?
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

कधी अहिल्या, कधी द्रौपदी
कधी जानकी झाले मी
पटो ना पटो, जसे शिकवले
मनास मारुन जगले मी
वेष्टनात मी चांगुलपणच्या
पुन्हा स्वतःला सजवू का?
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

रूप दिले, सौंदर्य दिले पण
स्वर्गामध्ये मान कुठे?
दरबारातिल जरी अप्सरा
आम्हाला सन्मान कुठे?
नाचत आले प्रश्न न पुसता
"देवांना मी रिझवू का?"
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"

तोडुन आता परीघ सारे
संचारावे मुक्त जरा
घट्ट होउनी, गुंडांशी का
ना वागावे सक्त जरा?
गिधाड दिसता, भररस्त्यावर
धींड काढुनी फिरवू का?
उत्तर द्या मज सवाल करते
"निर्भय होउन मिरवू का?"


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, March 12, 2014

मनी सजवले होते

रेतीवरती तुझे लिहावे
नाव ठरवले होते
पुसतिल लाटा नाव म्हणोनी
मनी सजवले होते

नसे पौर्णिमा आज तरी पण
लाटावरती लाटा
भाव अनावर, दहा दिशांना
तुझ्या शोधती वाटा
दिशा आकरावी शोधाया
पाय भटकले होते
पुसतिल लाटा नाव म्हणोनी
मनी सजवले होते

कधी वाटते दिल्यास जखमा
अनेक भळभळणार्‍या
सात्य हेच की आठवणी त्या
अखंड झुळझुळणार्‍या
विरहाच्या गर्भात खुशीचे
बी अंकुरले होते
पुसतिल लाटा नाव म्हणोनी
मनी सजवले होते

बाण जिव्हारी जरी लागला
हसावयाचे असते
मौनालाही खूप बोलके
करावयाचे असते
रिवाज प्रेमामधले सारे
खूप गिरवले होते
पुसतिल लाटा नाव म्हणोनी
मनी सजवले होते

चंद्रकुळीची तू कन्या, मी
चकोरकुळचा राजा
वाट बघावी ना थकता हा
स्वभाव आहे माझा
युगांतरीच्या प्रवासात ना
स्वप्न हरवले होते
पुसतिल लाटा नाव म्हणोनी
मनी सजवले होते

भेट न झाल्यामुळे कदाचित
ध्येय मिळाले जगण्या
ध्येय गाठता, प्रश्न केवढा !
उरे न काही करण्या
जन्मोजन्मी तरी मृगजळा !
तुला हुडकले होते
पुसतिल लाटा नाव म्हणोनी
मनी सजवले होते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, March 9, 2014

चित्त झंकारून गेले


सारला पडदा बघाया
कोण डोकाऊन गेले
जाणिवेने चाहुलीच्या
चित्त झंकारून गेले.

भास आभासात जगणे
छंद मी जोपासलेला
भेटण्या वेळी अवेळी
जीव हा सोकावलेला
कल्पना विश्वास माझ्या
कोण गंधाळून गेले
जाणिवेने चाहुलीच्या
चित्त झंकारून गेले.

पापण्यांनी कैद केले
रूप मादक जीवघेणे
अन्य कांही मज दिसेना
नाद जडला, स्वप्न बघणे
पैंजणांचे वाजणेही
का मला रमवून गेले?
जाणिवेने चाहुलीच्या
चित्त झंकारून गेले.

सोयरा मी ग्रिष्मऋतुचा
भोगतो आहे झळांना
आड नकली हासण्याच्या
झाकतो नाना कळांना
ऐन माध्यांन्हीं कुणी, का
सावली देवून गेले?
जाणिवेने चाहुलीच्या
चित्त झंकारून गेले.

भावना दुष्काळलेल्या
जिंदगी भेगाळलेली
या भणंगाने कधीही
ओल नाही पाहिलेली
आस जगण्याची कुणी का
अंतरी फुलवून गेले?
जाणिवेने चाहुलीच्या
चित्त झंकारून गेले.

तूच सरगम, तूच गाणे
तूच मैफिल अन् शमा तू
जीवनी लय साधणारी
खास माझी प्रियतमा तू
मेघमल्हारात ओल्या
कोण मज भिजवून गेले?
जाणिवेने चाहुलीच्या
चित्त झंकारून गेले.


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Friday, February 21, 2014

श्रीकृष्णाची बाधा


कान्हाच्या रंगात रंगली
हरवून गेली राधा
तगमग होते पण आवडते
श्रीकृष्णाची बाधा

एक कटाक्षाने कृष्णाच्या
ओझे हलके होते
नजरेतुन तो जरा हरवता
घळघळ पाणी  गळते
खट्याळ, कपटी सर्वांना पण
राधेशी तो साधा
तगमग होते पण आवडते
श्रीकृष्णाची बाधा

असोत सोळा सहस्त्र नारी
तिला काळजी नाही
ती त्याची अन् तिचाच तोही
मन देते तिज ग्वाही
राधा बघते सदैव ह्रदयी
आनंदाच्या कंदा
तगमग होते पण आवडते
श्रीकृष्णाची बाधा

विषयासक्ती कधीच नव्हते
लक्षण त्या प्रेमाचे
सोज्वळ, निर्मळ नाते होते
राधा श्रीरंगाचे
समर्पणाला कधीच नव्हती
राधेच्या मर्यादा
तगमग होते पण आवडते
श्रीकृष्णाची बाधा

मीपण सारे गळून गेले
अता न ती "ती" उरली
भक्तिरसाने सचैल भिजुनी
सख्यात राधा विरली
तुझी लाडकी, शोध अंतरी
तझ्याच तू गोविंदा
तगमग होते पण आवडते
श्रीकृष्णाची बाधा


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

श्वासांचे गुदमरणे सरले


झुरणे झाले, मरणे झाले
दुसर्‍यांकरिता जगणे झाले
ऊंच भरारी नभी घे मना
श्वासांचे गुदमरणे सरले

रिमझिम रिमझिम सुखे बरसता
श्रावणात मन भिजता भिजता
दु:खाचे ठसठसणे झाले
श्वासांचे गुदमरणे सरले

उदास माझे सदैव गाणे
अन् गीतांचे शब्द विराणे
तुझ्यामुळे भळभळणे सरले
श्वासांचे गुदमरणे सरले

खणखणीत मी चलनी नाणे
पंख पसरले नवजोमाने
उडेन मी, गुरफटणे झाले
श्वासांचे गुदमरणे सरले

चालणार मी ध्येय ठरवुनी
आपण आपली वाट निवडुनी
परावलंबी असणे सरले
श्वासांचे गुदमरणे सरले


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Sunday, February 16, 2014

गीत मखमली लिहावयाला



मनात माझ्या तुझी आठवण
जशी लागली रुजावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला

गझल असो वा असो रुबाई
अथवा कविता वृत्तामधली
तुझ्या वावराविना कधीही
मनाजोगती नाही सजली
चारोळ्या अन् मुक्तछंदही
रंग लागले भरावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला

तू असताना कवितेमध्ये
हवे कशाला चंद्र सितारे?
उर्मी येता लिहावयाची
प्रतिभेला फिटतात धुमारे
लागतेस तू सहजासहजी
लेखणीतुनी झरावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला

व्हॅलेंटाइन आला गेला
कधी? मला हे कळले नाही
डंका का लैला मजनुंचा?
एक दिवस हे पटले नाही
तुझ्यासोबती स्वप्न गुलाबी
रोज लागलो बघावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला

तू हसल्याने मोती गळती
किती, कसे अन् कुठे साठवू?
मधाळ बघणे लोभसवाणे
क्षणोक्षणी मी किती आठवू?
विश्वामित्रा तुझी समस्या
मला लागली छळावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला

बारा महिने ऋतू असावा
तुझियासंगे हसावयाचा
जीवन व्हावे वसंत उत्सव
प्रेम भावना फुलावयाचा
उरले सुरले पुढील जन्मी
भेटू आपण लुटावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, February 11, 2014

ओठी उरली एक विरानी


रियाज केला, सूर लावला
गुणगुणावया तुझीच गाणी
माझ्यापासुन मीच हरवलो
ओठी उरली एक विरानी

बसंत, मल्हाराच्या होत्या
कधी छेडल्या सुरेल ताना
आर्त स्वरांची अता भैरवी
गातो बैठक संपवताना
मैफिल सरली, रंग उडाले
प्रीत अशी का उदासवाणी
माझ्यापासुन मीच हरवलो
ओठी उरली एक विरानी

जीवन माझे पूर्ण व्यापले
कधी? सखे तू मला न कळले
दुय्यम झालो कलाकार मी
दु:ख मनाला तरी न शिवले
धुंद पारवा खुशीत घुमतो
तुझ्या भोवती भान हरवुनी
माझ्यापासुन मीच हरवलो
ओठी उरली एक विरानी

ठीक जाहले, सदैव धरती
आकाशाची मैत्री असते
कुरबुर झाली जरा  कधी तर
क्षितिजाचे अस्तित्व संपते
अपुल्यामधले प्रेम असू दे
जसे झर्‍याचे झुळझुळ पाणी
माझ्यापासुन मीच हरवलो
ओठी उरली एक विरानी

शमा तेवते, विझते तेंव्हा
तिचे केवढे कौतुक नुसते !
पण परवाना जळून मरतो
दुर्लक्षित ती घटना असते
काळाच्या ओघात हरवली
परवान्यांची कैक घराणी
माझ्यापासुन मीच हरवलो
ओठी उरली एक विरानी

आयुष्याच्या सायंकाळी
आठवणींना चाळत असतो
गतकाळाच्या पडद्यामागे
चार  आसवे गाळत असतो
जरी डायरी माझी होती
तुझाच वावर पानोपानी
माझ्यापासुन मीच हरवलो
ओठी उरली एक विरानी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, February 5, 2014

एका प्रशांत समयी


अशाच एका प्रशांत समयी
आठवणींचे झुंड भेटले
गतआयुष्यी हरवुन जाता
आजक्षणीचे मळभ संपले  

सागर लहरी बघता बघता
उंच मनोरे बांधत होतो
असे करू या, तसे करू या
दोघेही हिंदोळत होतो
सूर मारता तळात दिसले
आठवणींचे कैक शिंपले
गतआयुष्यी हरवुन जाता
आजक्षणीचे मळभ संपले

दाट धुक्याच्या आड हरवला
समृद्धीचा काळ आपुला
प्रभात किरणे कुठे न दिसती
सूर्य असा हा कुठे झोपला?
पहाटच्या पूर्वेस कुणी हे
अंधाराचे रंग फासले?
गतआयुष्यी हरवुन जाता
आजक्षणीचे मळभ संपले

वर्तमान हा असा कफल्लक
दिवाळखोरी अस्तित्वाची
श्वास घ्यावया जीवन जगतो
तऱ्हा कशी ही आयुष्याची?
भविष्य कसले? उतरण येता
चढावयाचे स्वप्न भंगले
गतआयुष्यी हरवुन जाता
आजक्षणीचे मळभ संपले

शाप असो वरदान असो हे
जगावयाचा प्रघात आहे
एल्गाराची, विद्रोहाची
उर्मी माझ्या मनात आहे
लढावयाचे भाव जीवना !
भणंगाचिया मनी नांदले
गतआयुष्यी हरवुन जाता
आजक्षणीचे मळभ संपले


निशिकांत देशपांडे.मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com 
 

Friday, January 17, 2014

पेलतो मी जीवनाचा भार आहे


काय होतो? आज का लाचार आहे?
पेलतो मी जीवनाचा भार आहे

गाठुनी ध्येयास जेंव्हा रिक्त झालो
काय पुढती? काळजीने ग्रस्त झालो
मोकळेपण काच अपरंपार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे

संपले चढते प्रहर अन सांज आली
सावली रेंगाळणारी लुप्त झाली
एकटेपण जाहला आजार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे

मी नकोसा का घराच्या कोपऱ्यांना?
जीव ज्यांना लावला त्या आपल्यांना
वेदना भाळी अता श्रंगार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे

हेच देवा का तुझे दातृत्व आहे?
का दिले शापात तू वृद्धत्व आहे?
प्राक्तनाचा भोगतो व्यभिचार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे

हक्क द्या स्वेच्छमरण कवटाळण्याचा
लक्तरांना शेवटी गुंडाळण्याचा
संपण्याचा संयमी निर्धार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com










 

Monday, January 13, 2014

"विरह" या विषयावर एकाच यमकात पाच मुक्तके

"विरह" या विषयावर एकाच यमकात पाच मुक्तके.

१)
नको  पाश ते गळ्याभोवती करकचणारे
जगेन जीवन एकाकी मी गुदमरणारे
तोडलीस तू नवीन मैत्री नऊ दिवसाची
किती पुसावे डोळे आता ओघळणारे?

२)
प्रेम जे कधी आपुल्यातले दरवळणारे
पान जाहले इतिहासाचे फडफडणारे
भूतकाळ ना जगता येतो, गुदमर सारा
आठवणींच्या जळमटात मन भळभळणारे

३)
काव्य कशाला लिहू?  न कोणी गुणगुणणारे
कुठे हरवले सूर मैफिली रंगवणारे?
गजलांचाही पोत अताशा विरही असतो
कसे लपावे मनात वादळ वावरणारे?


४)
एकच होते सप्न पाहिले मोहरणारे
तू गेल्यावर फूल जाहले ते सुकणारे
वैफल्याच्या वळणावरती जसा पोंचलो
जीवन झाले शीड सागरी भरकटणारे

५)
सप्न रेशमी भाव जागले शिरशिरणारे
विरह सोसता  जीवन  झाले फरपटणारे
नजर शोधते व्यर्थ तिला का अजून आहे?
तूच बंद कर देवा डोळे भिरभिरणारे


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail---  nishides1944@yahoo.com





 

Sunday, January 12, 2014

बालपण

बालपण

जर कुणी आठवणींच्या विश्वात राहण्याचा प्रयत्न केला तर त्याला बालपणातच जगावे लागेल. मी बालपणाबद्दल लिहायला बसलो आणि आठवांच्या लाटावर लाटा यायला लागल्या.

अक्षरशः मी कांही क्षण हरवूनच गेलो. कोणत्या आठवणी लिहाव्या याचा मला संभ्रम पडला.

माझ बालपण म्हणजे जवळ जवळ ४०/४५ वर्षापूर्वीचा काळ. बालपण लिहिण्यामागचा अजून एक उद्येश म्हणजे या निमित्ताने नवीन पिढीला त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचा अंदाज यावा. या दृष्टीकोनातून कांही घटना/प्रसंग निवडले

मला अवर्जून आठवतो म्हणजे मी शाळेत दाखल झालेला माझा पहिला दिवस ! वडिलांनी मला एके दिवशी शाळेत जायला सांगितले आणि मी निघालो एकटाच! शाळा घरापासून अर्धा किलोमिटर दूर होती. एक पाटी आणि पेन्सिल घेऊन निघालो. शाळेत शिक्षकांनी फॉर्म भरण्यास सुरुवात केली. ओघात मला माझी जन्मतारीख विचारली जी मला माहीत नव्हती. पळत पळत घरी गेलो आणि बाबांना विचारले. त्यांनाही माहीत नव्हाती. आता आईचा नंबर. तिला वर्ष आठवत होते पण तारीख नाही. तिने फक्त एवढेच सांगितले की माझा जन्म दसऱ्याच्या जवळपासचा आहे. गेल्यावर्षी दसरा १० ऑक्टोबरला होता म्हणून माझी जन्मतारीख १०-१० झाली. खरी जन्मतारीख देवाला ठावे. मोठ्या विभूतींसारखा माझ्याही जन्मतारखेचा घोटाळा आहे. पुन्हा ही तारीख घेऊन शाळेत गेलो. फॉर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा घरी जाऊन बाबांची सही आणि फीसचे दोन आणे (खाजगी शाळा असून ही) घेतले आणि माझी शाळा सुरू झाली

.

हे सर्व सांगायचे प्रयोजन म्हणजे शाळेत मुलांना तयार करून शाळेत पोहंचवणाऱ्या आया जन्मल्याही नव्हत्या. आंम्ही भाऊ बहिणी धरून सात भावंडाचे आमचे कुटुंब होते. आईबाबा कोणाकोणाकडे लक्ष देणार! मला अजून आठवतय की बाबांचे एखादे मित्र जर घरी आले आणि त्यांनी विचारले की तुमचा निशिकांत कोणत्या वर्गात शिकत आहे तर बाबा मला बोलावत असत आणि मी कोणत्या वर्गात आहे हे मलाच सांगायला लावत; कारण त्यांना हे माहीतच नसे.

आमचे एकत्र कुटुंब होते. माझे वडील, त्यंचे एक भाऊ आणि एक चुलत भाऊ अपापल्या जंबॉ कुटुंबासह एकत्र राहत असू. जेवायला पंगत बसली की ती ३०/३५ जणांची असे. पण वाद असे नगण्य होते. माझे वडील देवदेव खूप करायचे. त्यांना कमाई अशी काहींच नव्हती. न कमावणाऱ्या पुरुषाच्या बायकोस एकत्र कुटुंबात काय काय भोगावे लागते हे मी प्रत्यक्ष पहिलेले आहेत. तिचे अविरत कष्ट, पदोपदी होणारी अहेलना माझ्या बालमनावर कायम कोरले गेलेले आहेत. वडीलांनी कधी आमच्याकडे लक्ष दिले नाही. आई वेळोवेळी जिवाच्या

आकांताने सांगत असे निशिकांत लक्ष देवून अभ्यास केलास आणि चार पुस्तके शिकलास तरच मोठेपणी चार घास पोटाला खाशील; नसता बापाप्रमाणे नुसतेच लेकरं हळजत (मुलांना जन्माला घालत) एखाद्या कुत्र्याप्रमाणे जगशील. याचा मला तेव्हा कधीच अर्थ कळाला नाही. खूप अभ्यास करायला हवा एवढेच कळत होते. आज या वाक्यातील वडिलाच्या ना कमवण्याबद्दलची आईला असलेली चीड आणि तिची आगतिकता माझ्या ध्यानात येते.

मी मूळचा मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील रहिवासी. मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी औरंगाबादला गेलो. नोकरी पण लागली. पहिला पगार झाल्यानंतर गावी जाऊन आई-बाबांना पहिल्या पगारातून ४० रुपये दिले (पूर्ण पगार ८० रुपये प्रतिमाह). त्या वेळी आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रूरुपाने घळघळणारा आनंद मी केंव्हा विसरू शकणार नाही

खूप बघूनये ते बघितले आणि घडूनये ते घडले बालपणात. मी आई या नात्याच्या चार पिढ्या पाहिल्या आहेत . माझ्या वडिलांची आई, माझी आई, माझ्या मुलांची आई आणि माझ्या नातवंडाची आई. मला एक गोष्ट नक्की कळून आली आहे की आईच्या मुलांना वागवण्यात कितीही बदल झाले असले तरीही आईचे प्रेम अनादीकालापासून अगदी तेच आहे आणि म्हणूनच खडतर बालपणाकडे वळून बघताना दुःखाचा लवलेश पण नाही. फक्त आईमुळे वेदनांच्या वाळंवंटात प्रेमाच्या झुळझुळत्या झऱ्यांत केशरांचे मळे फ़ुलले.

अजून एक जीवनाचे सत्त्य आहे. बालपण चांगले गेले तर ठीकच. खडतर बालपण आठवतांना पण अपण या परिस्थितीतून आजच्या जागी पोहंचल्याचा आनंदच असतो . मला अजून कोणीही भेटला नाही जो वर्तमनावर खुश आहे; कारण अजून खूप कांही करायचे आहे याचा सल असतो. माझे असे स्पष्ट मत आहे की भूतकाळाच्या तुलनेत (जो आनंद देतो) वर्तमान हा नेहमीच दिवाळखोर असतो. आनंदाची गुरुकिल्ली आठणीतच असते. म्हणून बालपणाला अयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, January 7, 2014

प्रणयगीत ती लिहू लाहली


नांदत असता वसंत दारी
तुझी पैंजणे जशी वाजली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

आयुष्याच्या कॅन्व्हासावर
अंधाराचा रंग सांडला
फक्त हारणे माझ्या पदरी
कसा जीवना! खेळ मांडला?
ती आल्याने नभात काळ्या
शुक्रतारका दिसू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

शब्द आपुले सूर आपुले
मैफिलीत या रंग भरावा
आळवताना सुरेल ताना
वेगळेपणा कुठे नुरावा
मिळून मिसळुन जगावयाची
आस नव्याने रुजू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

तुझ्या सोबती रिमझिम आली
कैक दिसांनी बरसुन गेली
गंधित गंधित ओली माती
मनास हळव्या स्पर्शुन गेली
असून काटे निवडुंगावर
फुले लालसर फुलू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

तू असताना वादळातही
मंद मंदशी ज्योत तेवते
अशक्य वाटे ते ते सारे
मनासारखे घडू लागते
वठलेल्या वृक्षास अचानक
पुन्हा पालवी फुटू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

इतिहासाचे पान फाडुनी
निश्चय केला जगावयाचा
विश्वासाचे पंख लावुनी
यत्न करू या उडावयाचा
काळवंडल्या क्षितिजावरती
केशर लाली खुलू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com