म्हणू नका माझ्या मित्रांनो
साठी बुध्दी झाली नाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी
उत्सुकता तर शिगेस होती
यान उतरता मंगळावरी
नवीन धरती, नवे नजारे
मनास आली खूप तरतरी
कुमारिका ती धरती होती@@
जशी लाजरी गोडशी परी
परलोकीचे बघून राक्षस
धडधडली ती असावी उरी
टोळधाड ही कशास आली?
भंग शांतता करण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी
बर्याच सेना तिथे पाहिल्या
जनतेच्या सेवा करणार्या
जनसेवेचे ढोंग करोनी
धांगडधिंगा माजवणार्या
जात, धर्म अन् आदर्शांचे
झेंडे घेउन वावरणार्या
अंदोलन हे निमित्त साधुन
नियमांनाही ठोकरणार्या
अडचण त्यांची, तिथे टोलबुथ
बसेस नव्हत्या फुटण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी
जिकडे तिकडे पाट्या होत्या
सुजीतदादा, नि वरद पवार
किती प्लॉट्स त्यांचे होते ते!
थकलो वाचुन वारंवार
उत्तरेस तर बड्या घराचा
कुणी जावई दावेदार
डोंगर सारे एकाचे अन्
कैक लव्हासा आवतरणार
जमीन जुमला सारा त्यांचा
स्क्वेअरफुटने विकण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी
तेथेही दुष्काळच दिसला
नेतृत्वाची चांदी होती
नेत्यांच्या तोंडाला पाणी
मदतनिधीची संधी होती
राजकारणी सोडुन सार्या
धंद्यामध्ये मंदी होती
सुजीतदादा खुदकन हसले
कारण तेथे नव्हती बंदी
दर्या कपारी खोल कोरड्या
लघुशंकेने भरण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी
अद्भुत यात्रा करावयाची
मनोमनी मी खूप हुरळलो
मंगळ! मंगळ! प्रभात समयी
स्वप्नामध्ये म्हणे बरळलो
मला उठउनी पत्नी करते
सवाल "कोठे कसा हरवलो?"
धरतीवरती पाय टेकले
वास्तवात पटकन गुरफटलो
खडबडून मी उठलो, लोकल
सात तीसची धरण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी
@@ virgin land
निशिकांत देशपांडे.मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment