धीर धरोनी वादळासवे
जिद्दीने ती झगडत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती
झगमग नाही, मंदमंदसा
प्रकाश देणे तिला आवडे
कष्टांचे, खस्ता खाण्याचे
तिला न होते कधी वावडे
तेल संपले, वात जळाली
स्वयंप्रकाशित भासत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती
खांद्यावरती ओझे घेणे
तिने पोसला छंद आगळा
गाभार्यातिल दिव्याप्रमाणे
मिणमिणता आनंद वेगळा
चंदन होउन झिजावयाची
तिची आपली पध्दत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती
ग्रिष्म असोनी सदा द्यायची
थंड सावली, हिरवळ हिरवळ
प्राजक्ताचे झाड जणू ती
सभोवताली दरवळ दरवळ
फुले वाहता ओंजळीत, ती
गंध जरासा ठेवत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती
हात फिरवता, स्पर्श मखमली
पडे चांदणे शीतळ शीतळ
रौद्ररूप जर कधी दावले
जणू काय ती होती कातळ
नर्मदेतल्या गोट्याला ती
कठोरतेने घडवत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती
गर्भगृहीची ज्योत अचानक
विझून जाता खिन्न वाटले
घरात माझ्या, देवाच्या पण
अंधाराचे राज्य जाहले
ठेच लागली मला कधी तर
स्वर्गी आई विव्हळत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती
निशिकांत देशपांडे. मो.के.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment