माझ्या आयुष्यात एक आनंददायी योगायोग आला आहे. मी माझ्या वाचकांशी हा अनुभव शेअर करत आहे.
मी औरंगाबादला असतांना गझलनवाझ आदरणीय भिमताव पांचाळे यांच्या गझलगायनाचा कार्यक्रम होता. मी त्या कार्यक्रमाला गेलो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मराठी गझल गायन ऐकणार होतो. जसजसा कार्यक्रमात रंग भरू लागला; मी मंत्रमुग्ध होत गेलो. याच मैफिलीमुळे गझल या काव्यप्रकाराकडे आकर्षित झालो. मनात आले की या प्रकारालाही जरा हाताळून बघावे. गझलेची माहिती घेतली; शिक्षण घेतले आणि माझा गझल प्रवास सुरू झाल . पहिले दीड दोन वर्षे फक्त गझला नि गझलाच लिहीत गेलो आणि कवितांकडे दुर्लक्ष झाले. नंतर जाणूनबुजून कविता लिहिण्याचे ठरवले आणि सध्या दोन्ही प्रकार यथाशक्ती लिहीत आहे.
मी गझला लिहीत गेलो आणि त्या फेसबुकवर पोस्ट करत गेलो. माझे सौभाग्य की माझ्या गझला भिमरावजींच्या वाचनात आल्या आणि आशिर्वादपर त्यांचे प्रतिसाद मिळत गेले. एकेदिवशी प्रतिसादात मला कांही गझला त्यांना ईमेलवर पाठवण्यास सांगितले. मी गझला पाठवल्यावर ते काय करणार हा प्रश्न माझ्यासमोर होता. भिमरावजी मुंबईहून प्रसिध्द होणार्या पुण्यनगरी या दैनिकाच्या रविवारीय पुरवणी "प्रवाह" यात गझलेवर एक सदर लिहीत असतात. ०२.११.२॑१४ या पुरवणीत त्यांनी माझी एक गझल "आठवड्याची गझल" या शिर्षकाखाली प्रसिध्द केली. इतकेच नव्हे तर ०९.११,२०१४ च्या पुरवणीत त्यांनी माझ्या गझलेवर भाष्य पण केले.
माझ्यासाठी हा अत्त्युच्च आनंदाचा क्षण होता. योगायोग म्हणायचे कारण की ज्यांच्या कडून मी गझलेची प्रेरणा घेतली त्यांनीच आज माझ्या पाठीवर कौतुकाची थाप पण दिली प्रकाशित झालेली माझी गझल खाली देत आहे
लढतो आहे एक कवडसा
अंधाराशी लढतो आहे एक कवडसा
प्रकाश उत्सव दिसेल आता मनी भरवसा
पडायचे तर पड किंवा तू नकोस येऊ
अश्रूंनीही तहान शमते अरे! पावसा
जनसेवेचा बुरखा असतो पांघरलेला
नांदत असते ना सरणारी आत लालसा
स्फुल्लिंगाला मतदारांच्या कमी लेखता
मुजोर सत्तांधांचे झाले राज्य खालसा
तोल ढळे पर्यावरणाचा तो नसल्याने
म्हणून का तू गिधाड व्हावे असे माणसा?
विभक्त जगते चंगळवादी कटुंबशैली
कसा मिळाला कोणाकडुनी असा वारसा?
गझल संपली, खयाल सरले, पण ती दिसता
उर्मी येते मनी लिहाया शेर छानसा
नको पालख्या, नकोत दिंड्या रस्त्यावरती
भावभक्तिचा मनात उजळो दीप मंदसा
चीड मनी का "निशिकांता"च्या खदखदणारी?
धृतराष्ट्रासम कसा जगू मी शांत शांतस?
भिमरावजींनी केलेले समिक्षण (लेखातून उधृत करत आहे) खालील प्रमाणे.
"अंधाराशी लढतो आहे एक कवडसा
प्रकाश उत्सव दिसेल आता मनी भरवसा..'
एका कवडशानं अंधाराशी झुंज देणं आणि विश्वास बाळगणं की, प्रकाश उत्सव साजरा करण्याचे दिवस नक्की येतील, ही अतिशयोक्ती वाटेल; पण क्रांती अशीच आकार घेत असते. मोठमोठी स्थित्यंतरं घडवून आणणारे उठाव असे शून्यातूनच झालेले आहेत.
'अंधकार संपणार आज ना उद्या
फक्त एक ज्योतिचा उठाव पाहिजे..'
असं संगीता जोशी म्हणतात ते याच विश्वासाच्या बळावर. इथे पुन्हा अस्ताला जाणार्या सूर्याचं अंधार दूर करण्याचं कार्य यथाशक्ती करू पाहणार्या रवींद्रनाथांच्या इवल्याशा पणतीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.
खूप सुंदर अशी मात्राबद्ध गझल निशिकांतजींनी आपल्याला दिलेली आहे. त्यांच्या गझलचा प्रत्येक शेर छान जमून आलेला आहे. 'आसवांच्याच सरी आणि आसवांचंच पीक' अशी अगतिक अवस्था करणार्या बेभरवशी पावसाला त्यांचं ठणकावणंसुद्धा रास्तच आहे. चंगळवादी विभक्त कुटुंब पद्धतीची विषारी फळं आवडीनं चाखून आपलं समाजजीवन कसं रसातळाला चाललं आहे, याचं भान ही गझल देते. आपल्या ३७ व्या संवादातील विश्वजीत गुडधेच्या गझलचा एक याच आशयाचा शेर तुम्हालाही नक्की आठवत असेल -
'सुखात न्हावे सदैव तू हीच एक इच्छा
कसा बसा मी जगेन वृद्धाश्रमात बाळा..'
निशिकांतजींची ही गैरमुरद्दफ गझल कवडसा, भरवसा, पावसा, लालसा, खालसा, माणसा, वारसा, शांतसा हे काफिये चालवत मक्त्यापर्यंत जाते. या शेवटच्या शेरात तखल्लुस (शायराचे टोपणनाव) घेण्याचे चलन तसे कमीच आहे. तखल्लुसमुळे एका चांगल्या चपखल शब्दाची जागा वाया जाते, असेही म्हटले जाते. पूर्वीच्या काळी मुद्रणकला विकसित नव्हती, त्या वेळी हे गरजेचे होते. हे काहीही असले तरी हा सर्वस्वी त्या शायराच्या अधिकार व अख्त्यारीतला प्रश्न आहे. असो!"
मला आश्चर्याचा धका बसला तो जेंव्हा भिमरावजीचा अचानक मला एकेदिवशी टेलिफोन आला. किती साधी असतात ना मोठी माणसे! मुंबईतून प्रसिध्द होणारी पुरवणी मला पुण्यात मिळाली नाही. या संबंधात मला माझी फेसबुक मैत्रीण (पुतणी) अपर्णा जोशी आणि पोलिस खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी श्री. योगेश संखे यांनी मला खूप मदत केली. या सहकार्यासाठी दोघांचेही मना पासून अभार.
या प्रसंगाने मनात विचार आला की झाले ते कौतुक तर झाले; पण मी या लायकीचा अहे का? या विचारातून दोन चारोळ्या सुचल्या ज्या खाली देत आहे.
१)
सरस्वतीच्या दारी बसुनी पायरीवरी
दान मागतो शब्द, पेटली भूक अंतरी
दिग्गज देता पाठीवरती थाप वाटते
भाग्यवंत मी स्वप्न पाहतो संगमरमरी
२)
`मला वाटते गझलांमधुनी सूर गवसले
दिशाहीन जीवना कसे रे! अर्थ बहरले
धूळ झटकुनी हाती धरता, कलमेमधुनी
गझलांची बरसात जाहली, मन मोहरले
मना पासून अभार भिमरावजी!
निशिकांत देशपांडे
No comments:
Post a Comment