Thursday, August 21, 2014

निरव शांतता कुठे मिळेना


यत्न करोनी गावाकडची नाळ तुटेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

भल्या पहाटे उठण्यासाठी गजर लावतो
सेकंदाच्या काट्यावरती उठतो, बसतो
जात्यावरची ओवी कानी कधी पडेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

नकोच शेती, कनिष्ठ असुनी बरी नोकरी
ध्येय दरिद्री, जगावयाला पुरे भाकरी
गावी राहुन शेत कसाया कुणी धजेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

रानपाखरे, ओढे खळखळ, हिरवी धरती
भागवायला भूक बघावे टीव्हीवरती
कर्टुन शोच्या शिवाय दुसरे मुला रुचेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

धृव नि त्याच्या अढळपदाची गोष्ट हरवली
मिकिमाउस अन् विनी मनावर कुणी रुजवली
ग्रहण लागले संस्कृतीस का असे कळेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

असेच लोंढे येत राहिले खेड्यामधुनी
ओस गाव अन् शहरे जातिल तुडुंब भरुनी
मुंग्यांच्या गर्दीत आपुले कुणी दिसेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

बदलाच्या वादळी बदलणे जरी जरूरी
दु:ख वाटते जुन्या पिढीला, ही मजबूरी
सुंभ आमुचा जरी जळाला, पीळ जळेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना


निशिकांत देशपांडे. मो.क्र ९८९०७ ९९०२३
EMail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment