Friday, April 11, 2014

आयुष्याचे रंग बदलले


ऊन कोवळे, प्रखर दुपारी
धूसर झाले का मावळता?
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

खळखळणारी बाल्यावस्था
हुंदडणारी, बागडणारी
अन् आईच्या पदराखाली
सायंकाळी विसावणारी
जाग यायची ऐकुन ओव्या
माय गायची दळता दळता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

आईच्या मायेत डुंबता
बालपणाचे सोने झाले
खडबड असुनी, पाठीवरती
मोरपिसासम हात वाटले
ठेच लागली मला जर, तिची
रात्र जातसे कण्हता कण्हता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

तारुण्याच्या उंबरठ्यावर
प्रेमभावना मनात रुजली
रोमांचांचे फुलून येणे
स्वप्न गुलाबी रोज मखमली
गंध पसरले चहूदिशेला
सखीसंगती जगता जगता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

एक गाठता दुसरे येई
ध्येयमालिका जिंकत गेलो
चढून ध्येयांच्या शिखरांवर
जरी तुतारी फुंकत गेलो
हळूच आली सांज, थकावट
दस्तक देई उठता बसता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?

आठवणींचे ओझे घेउन
सुरकुतलेला प्रवास उरला
श्वास घ्यावया जगावयाचे
आयुष्याचा उभार सरला
म्लान किती तो सूर्य जाहला?
पश्चिमेकडे ढळता ढळता
आयुष्याचे रंग बदलले
कसे एवढे बघता बघता?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२3
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment