Showing posts with label Poetry by Nishikant Deshpande--lAnandach wegala.. Show all posts
Showing posts with label Poetry by Nishikant Deshpande--lAnandach wegala.. Show all posts

Saturday, August 25, 2012

आनंदच वेगळा


साठी बुध्दी माझी
झाली की हो नाठी
कविता लिहिण्यासाठी
गावली कोरी पाटी

गैरवर्तन करतोय
सरळ सोप्या शब्दांशी
शब्दातून खेळतोय

भोगलेल्या अब्दांशी

निवडुंगाचं रान
आठवतय मला
त्यात सुध्दा रमण्याची
अवगत होती कला

आता बागेत गुलाबाचा
काटा पण रुततोय
थोड्याशा दु:खानं
जीव आत कुढतोय

काळ पडला मागे
जीवनमान सुधारले
वेदनांचे भाव कसे
एकदम वधारले

श्रीमंतीच्या हव्यासानं
भावविश्व अंधारलय
भोगवट्याचं भूत
जास्तच उंडारलय

कष्टानं खडबडलेला
हात आवडे तिचा
काम सोडून नटतेय आता
यातच येतीय मजा

पिठलं भाकर जेवण
झालय आता वजा
स्टेटससाठी मागवतोय
न आवडणारा पिझा

आनंदाच्या नगरीत
रहातोय बनून बगळा
सुखी माणसाचा सदरा
होतोय मला डगळा

आयला ह्या सुखामुळे
माणूस होतोय पांगळा
गरिबीत जगण्याचा
आनंदच वेगळा----आनंदच वेगळा

टीपः- मी वयाच्या साठाव्या वर्षी कविता लिहिण्यास सुरुवात केली. सर्व्वंनी माझी टिंगल केली होती तेंव्हा. पहिल्या चार ओळीस हा संदर्भ आहे.

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944#yahoo.com