Monday, July 11, 2022

मनातील सल--(वीक एंड लिखाण-- फादर्स डे)--18.06.22

सध्याच्या जगात मग तो आपला देश असो वा जगातील इतरत्र देश असोत, दिवस साजरे करायचे फॅड पसरलेले आहे. त्याला थाटात म्हणतात हे नवीन कल्चर आहे. आता काय बोलावे! आपल्याकडे एखादी नवीन गोष्ट आली की त्याचा अतिरेक होतो आणि जिकडे तिकडे हेच दिसते. लक्ष देऊन पाहिले तर असा एकही दिवस दिसणार नाही जो कोणाच्या तरी स्मरणार्थ अर्पण केलेला नाही. आठवून बघा किती दिवस आपण साजरे करतो ते!
आपला सदभाव व्यक्त करण्याचा प्रांजळ हेतू असतो. आपल्या संस्कृतीचा वेगवेगळ्या जयंत्या, पुण्यतिथ्या पण याचाच एक भाग आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचेही दिवस ठरलेले आहेत. भारकाभर दिवस असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या म्हंटल्याप्रमाणे सारे कांही निमित्तमात्रच होते शेवटी.
माणसांची वेगवेगळी नाती बघता मातृदिन हा सर्वात जास्त जिव्हाळ्याने साजरा होणे सहाजिकच आहे. आई हे जन्मापासूनचे नाते आहे आणि तेही सर्वात प्रेमळ! पण मला प्रश्न पडतो तो बाबांच्या बाबतीत. नाही म्हंटले तरी हे थोडे दुर्लक्षित पात्र. आईच्या सावलीत वावरणारे, त्यांची प्रतिमा म्हणजे कडक थोडे करडे व्यक्तिमत्वच. तरीही या बाबांना थोडा उजाळा मिळाला तो कवि संदीप खरे यांनी लिहिलेल्या बाबा वरच्या कवितेमुळे. आणि ही रचना श्री. संलील कुलकर्णी यांनी इतकी बेफाम गायली आहे की आठदहा कार्यक्रम झाल्या बरोबर प्रसिद्धीचे उच्चांक गाठले. या द्वयीने बाबांच्या प्रतिमेला उजाळा दिला हे नक्कीच.
आज हा विषय आवर्जून काढण्याचे खास कारण आहे. माझे एक पोलीस खात्यात ओळखीचे आय. पी. यस. आधिकारी आहेत. त्यांची माझी ओळख कवितांच्या माध्यमातून झालेली. खूप उमदा आणि रसिक माणूस. आम्ही त्याकाळी एकमेकाच्या खूप संपर्कात होतो. आठवड्यातून एकदोनदा तरी संभाषण होत असे. एके दिवशी थोड्या गप्पा झाल्यानंतर त्यांनी स्वतः होऊन सांगितले की आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. पण आज लॉ अँड ऑर्डरच्या ड्यूटीवर असल्यामुळे ते आपल्या मुलीसोबत राहू शकत नाही. मी थक्कच झालो हे ऐकून. काय वाटत असेल बाबांना आणि मुलीला पण?
पोलीसाची प्रतिमा जनतेच्या मनात किती वेगळी असते. पण तेही शेवटी माणसेच असतात याचा विचार फार कमी केला जातो. या एका घटनेतून माझे विचार चक्र सुरू झाले. त्या चिमुरड्या मुलीच्या भावना बाबा नसताना वाढदिवस साजरा करताना काय असतील या चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसाची आपल्या मुलांचा बाबा म्हणून होणारी कुचंबना आणि मुलीच्या मनात बाबा विषयीची प्रतिमा यांचा परामर्श घेणारी कविता फादर्स डे निमित्त पोस्ट करत आहे. कविता मनातील सलाला हात घालते.
त्याचा बाबा विचित्र होता असेच त्याला वाटत होते
चार शब्द ना कधी बोलला, दु:ख मनाला काचत होते
सणासुदीला आनंदाने मिळून जेवण कधी न झाले
येई तो रात्री अपरात्री, थंड अन्नही त्याला चाले
सुर्योदय होण्याच्या आधी दिवाळीतही स्नान न केले
स्वर्ग पित्याला कसा मिळावा? मनात काहुर उठून गेले
अव्वल येता वर्गामध्ये घरी धावता सांगायाला
घरात नव्हता बाप, शेवटी डोळे मिटले झोपायाला
कधी नव्हे ते पिक्चर बघण्या आम्हासंगे बाबा आला
भ्रमणध्वनी वाजताच का तो अर्ध्यामधुनी उठून गेला?
चार घराच्या भिंतींनाही विचित्र वाटे जरी वागणे
सहनशीलता घरात इतकी! कुणी न पुसती तया कारणे
तणाव, दंगेधोपे होता, हटकुन बाबा घरात नसतो
उशीर होता परतायाला, जीव आईचा जिवात नसतो
दिवा लाउनी देवापुढती डोळे मिटुनी प्रार्थना करी
माय मागते देवाला "कर औक्षवंत नवर्यास श्रीहरी"
मूल विचारी नोकरीतही जीव असा ओलीस कशाला?
पित्यास नाही कधी वाटले झालो मी पोलीस कशाला?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
P. S. Patil, Hemantkumar Tadwalkar आणि अन्य १६
२४ कमेंट्स
२ शेअर
लाईक
टिप्‍पणी
सामायिक करा

No comments:

Post a Comment