Monday, July 11, 2022

मुगाचा अनोखा उपयोग (वीक एंड लिखाण)--19.03.22

 प्रत्येकाला फावल्या वेळेत जुन्या आठवणीत कळत न कळत हरवून जायचा छंद असतो. खरेच आठवण हा प्रकार आयुष्यात नसता तर काय झाले असते? कल्पनाही करवत नाही. जुन्या आठवांनी त्रस्त झालेल्या व्यक्तींच्या तोंडी माझ्या बर्याच रचनेत असेही घातलेले आहे की मी देवाला स्मृतीभ्रंशाचा वर मागून घेतो म्हणजे आठवांचा त्रास कमी होईल. हे कवि कल्पना म्हणून ठीक असले तरीही प्रत्यक्षात आठवणींची सोबत नसताना जगणे अशक्यच असते.

प्रत्येकाला, भल्या अथवा बुर्या असोत, आठवणी या लागतातच. कुणीही रात्री झोपण्याआधी विचार करून दिवसभरात काढलेल्या आठवणींचा आढावा घ्यावा मग लक्षात येईल की आठवणींचे किती महत्व आहे आयुष्यात ते. मला तर आठवणीत रमायचा छंदच आहे म्हणा ना! आणि या आठवणींची अजून एक बाब खास आहे. त्या येण्यासाठी कांही कारण लागत नसते. बिचार्या येतात तशाच जातात पण. आठवणी म्हणजे माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत मिळालेली महान नैसर्गिक देणगी आहे हे नाकारून चालणार नाही.
मी आणि माझी पत्नी नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी फिरलो/राहिलो. खूप अनुभवाची शिदोरी जमवली. अनेक प्रदेश, अनेक माणसे जमा केली. माझ्या पत्नीचाही स्वभाव मिलनसार आणि प्रवाही असल्यामुळे आमचा लोकसंचय पण खूप छान होता. जेंव्हा आम्ही दोघे मागे वळून आयुष्याकडे बघतो तेंव्हा आमची "आनंदाचे डोही आनंद तरंग" ही अवस्था असते . परवा आम्ही दोघे असेच गप्पा मारत असताना एक जुना प्रसंग आठवला. आम्ही तेंव्हा महाराष्ट्राच्या बाहेर होतो कामासाठी. आमचा लोकसंग्रह तर छान असायचाच पण आम्ही सर्व लोकात अगदी मिसळून जायचो. कधी भेदभाव वगैरे नसायचा. खेळीमेळीचे संबंध. आमच्या घरी नेहमी संगिताच्या बैठ्की होत असत. एकूण आयुष्य छान गेले. आम्ही निवडक लोकांच्या पिकनिक्स पण काढत असू. अशा प्रसंगी आम्ही दोघे ग्रुप गेम्स पण घेत असू जे लोकांना आवडत असत. एकदा आम्ही एका टुरिस्ट स्पॉटला जायचे ठरवले. लोकांना सूचित करण्यात आले. जवळ जवळ दहा जोडपी तयार झाली. जय्यत तयारी सुरू झाली. मी आणि माझ्या सौ.ने एक कपल गेम घ्यायचे ठरवले आणि प्लॅनिंग केली. आम्ही सारे त्या ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास पोहंचलो. नाष्टा केला. जेवणासाठी तीन तास होते. आम्ही एका ठिकाणी सर्वांना एकत्र करून ग्रुपगेमसाठी तयार होण्यास सांगितले. सर्वांना कुतुहल होते की कोणता गेम आम्ही खेळवणार याचे. पण आम्ही ते शेवटपर्यंत सांगितले नव्हते. सगळ्यांना पतीपत्नी असे गोल खुर्च्या टाकून गोलाकार बसवले. आम्ही सांगितले की आज खेळासाठी आम्हाला पाच जोडपी हवी आहेत. तुम्हीच ठरवा आणि आम्हाला सांगा. अर्ध्या तासात त्यांनी फायनल करून पाच कुटुंबाची नावे सांगितली आणि खेळाला सुरुवात झाली. माझ्या पत्नीने खेळाची रूपरेषा आणि नियम सांगितले. खेळणारी पाच जोडपी एका बाजूने आणि इतर समोर अशी आसन व्यवस्था करून घेतली.
खेळतांना प्रत्येक जोडप्याला वीस मिनिटे वेळ दिला होता. त्या वेळात पतीने आपल्या पत्नीच्या पाच त्याला खूप आवडणार्या गोष्टी सांगायच्या होत्या. आणि खेळ सुरू झाला. नवरे पाच बाबी सांगायचे आणि त्यावर इतर जोडपी आणि आम्ही उभयता मिश्किल प्रश्न विचारायचे. प्रत्येकजण बायकोचे आवडणारे गुण सांगून तिची तारीफ करायचा. नंतर इतर लोक खोचक प्रश्न विचारून धमाल करायचे. हे सर्व जवळ जवळ तीन तास चालले होते. सर्वांनी खूप एंजॉय केले. लेडीज पण खूप मनमोकळेपणाने भाग घेत होत्या. लोकांना हे सर्व आवडायचे कारण म्हणजे आपण एवढे मनमोकळेपणाने प्रत्यक्ष जीवनात कधीच बोलत नसतो.
संध्याकाळी चहानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. सर्वांनी हाच प्रश्न विचारला की पुढची ट्रीप केंव्हा? आणि ज्या जोडप्यांनी भाग घेतला नव्हता त्यांनी हट्ट धरला की पुढच्या वेळी तेच भाग घेतील.
सांगायची गरज नाही की चार महिन्यांनी अजून एका पकनिकचे आयोजन केले गेले. पुन्हा भरभरून प्रतिसाद. दुसरा एक अॅग्रोटुरिझम रिसॉर्ट शोधून आम्ही पोहंचलो. कार्यक्रम तोच, लोक तेच फक्त रिसॉर्ट वेगळा. खेळाला सुरुवात करण्याआधी मी नियम सांगितले. सर्व नियम गेल्यावेळचेच. फक्त नवर्यांनी बोलायचा विषय बदलेला आहे या वेळेस. गेल्यावेळेस बायकोच्या पाच आवडत्या गोष्टी नवर्याने सांगायच्या होत्या. यावेळी बायकोच्या ना आवडणार्या पाच गोष्टी सांगायच्या आहेत.
आणि काय सांगू? एका क्षणात सर्वांचे चेहरे उतरले. सगळे एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत होते. कोणीही बोलायला तयार नव्हते. कोण करणार हो हिंम्मत! सगळीकडे अवघड शांतता. असे कांही सांगणे म्हणजे केवढी मोठी आफत? सगळेच अवघडलेले दिसले. त्या जोडप्यात एक मला वैयक्तिकरित्या जवळ असलेला ऑफिसर होता. तो मला सर्वासमोर म्हणाला की साब आपही इस गेमकी सुरुवात करो ना! मग मला पण घामच फुटला. मी पण त्यांच्याप्रमाणे मूग गिळून गप्प झालो.
पिकनिकला अचानक गंभीर वळण लागलेले पाहून माझ्या पत्नीने नवीन गेम सुचवला आणि माझी आणि इतर पाच जणांची सुटका केली. नवा गेम मस्त झाला आणि ट्रीपची सांगता झाली. हुश्श! बायकोचे आभार!
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment