या प्रगती करत असलेल्या जगात, संस्कृतीचा चेहरा मोहरा पण बदलत आहे. कालचे आदर्श आज कालबाह्य होत आहेत. हे संक्रमण बघून वयस्क लोक नाराजीचा सूर लावत आहेत तर नवपिढी आनंद व्यक्त करीत आहेत. खुषीचे मापदंड पण वेगवेगळे होत आहेत. आजच्यांना कालचे जुनाट, बुरसटलेले वाटतात तर कालच्यांना आजचे संस्कृती वार्यावर झोकणारे वाटतात, हे दोन संस्कॄतीतले द्वंद्व अनादीकालापासून चालले आहे पण हल्ली ते जरा जास्तच टोकाला पोहंचल्यागत वाटते हे नक्की.
अर्थात याला कांही उपाय नसतो. सर्वांनी एकमेकाला समजून उमजून वागले तर होणारा त्रास सोसणे सोपे जाते एवढेच. पण हे सांगायला जरी सोपे असले तरी आचरणात आणणे खूप अवघड असते. सर्वांच्या वागण्यातून सामाजिक परिस्थिती निर्माण होते. हे सर्व विचार डोक्यात या क्षणाला यायचे कारण मला एक पाहिलेला प्रसंग आठवला. माझ्या एक मित्राचा रोहीत नावाचा मुलगा होता. अभ्यासात अतिशय हुशार लहानपणापासूनच!. उत्तम गुणाने उत्तिर्ण व्हायचा. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. त्याने उराशी स्वप्न फार भव्य जोपासले होते आणि त्या दिशेने त्याची वाटचाल चालू होती. मला या मुलाबद्दल खूप आदर होता. माझ्या त्याच्यापासून खूप अपेक्षा होत्या. मला नेहमी वाटायचे की तो आई बापाचे पांग फेडेल. आणि झालेही तसेच. तो खूप स्पर्धात्मक परिक्षा द्यायचा. त्याला संगणक क्षेत्रात मोठ्या पगारावर अमेरिकेत नौकरी मिळाली आणि तो कामासाठी गेला. तो आईवडिलांना अधूनमधून बोलत असे फोनवर. माझ्याशीही त्याचे अधून मधून बोलणे (ज्याला ते लोक चॅटिंग म्हणतात) होत असे. सगळे छान चालले होते.
त्याचे घर पुण्याच्या शेजारी एका लहान गावात होते. आई वडील तेथेच रहात. कांही दिवसात या भागाला खूप महत्व आले आणि जमिनींचे भाव आकाशाल भिडले. मोठे लोक धडाक्याने जमिनी खरेदी करू लागल्याने भाव उंची गाठत राहिले. आपण सगळीकडे बघतो की मोठी शहरे बाजूची लहान खेडी अक्षरशः गिळंकृत करतात. याही गावचे तेच झाले. या चढ्या भावाने रोहीत आणि त्याच्या वडीलाने ते घर विकले. आलेल्या भरपूर पैशातून शहरात एक फ्लॅट विकत घेऊन तेथे वडील स्थलांतरीत झाले. यथावकाश रोहित गावी सुट्टीवर आला जवळ जवळ तीन महिन्यासाठी. या वेळी त्याची सोयरिक पण होणार होती. तो एकेदिवशी घरातून आपला जुना प्लॉट बघण्यासाठी गेला. त्यांनी त्या भागातील जे बदल पाहिले, तो एकदम निराशच झाला. त्याला जे वाटले ते परतताना माझ्याशी शेअर केले. जे सर्वांना वाटते तेच त्याने व्यक्त केले होते पण ते माझ्या मनाला भिडले.
त्याने व्यक्त केलेल्या भावनावर मला एक कविता सुचली जी खाली देत आहे.
सांगा कुठे हरवले?
मंदीर मारुतीचे कोणी कुठे हलवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
तो पार मंदिराचा, रात्री जमून सारे
सुख दु:ख सांगताना जाती रमून सारे
हुंकार वेदनांचे नव्हते कुणी लपवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
जागेत मम घराच्या झालाय मॉल आता
डीजेवरी डुलूनी धरतात ताल आता
येथे शुभंकरोती होते मला शिकविले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
विकतो पिझा दुकानी, म्हणतात हट तयाला
गर्दी अमाप असते, आळस घरी बयेला
आईत अन्नपूर्णा, मजला जिने भरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
तांदूळ हातसडीचा शिजवीत माय होती
साजूक तूप, माया ओतीत साय होती
सारेच लाड माझे होते तिने पुरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
शाळा इथे असावी, तो काळ दूर नव्हता
गणवेष बूट कसले? शिकण्यात सूर होता
आदर्श पाठ येथे होते किती गिरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
झोतात पश्चिमेच्या का लोप संस्कृतीचा?
दिसतोय काळ आला बेभान विकृतीचा
विझण्यास ज्योत आम्ही काहूर का पुरवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment