आपल्या समाजात संकेत असा आहे की सर्वांनी चालीरिती पाळून जगावे. नसता लोक लगेच चष्म्याच्या काचा पुसून चौकस नजरेने बघायला सुरू करतात. म्हणूनच सर्वांना लोक काय म्हणतील ही काळजी सदैव छळत असते. घरात पती पत्नीने भांडले तर चालते पण ती भांडणे कुणाला ऐकू जाणार नाही याची अमाप काळजी घेतली जाते. हेच लागू प्रत्येक क्षेत्रात पडते जरा लक्ष देऊन पाहिले तर.
मी काही दिवसापूर्वी एका गझलेत एक उर्दू शब्द वापरला. तो शब्दही प्रचलीतच असाच होता. पण दोघा तिघांनी टिकेची झोड उठवली. जसा कांही मराठी भाषेवर अन्याय झाला असा एकूण सूर होता. माझे स्पष्ट मत आहे की कोणत्याही भाषेने स्वभाषेत प्रचलीत दुसर्या भाषेतले शब्द आपसूक आले तर वापरास मज्जाव नसावा. अशाने भाषा श्रीमंत होते. जगात सर्वात जास्त परभाषेचे शब्द आत्मसात करणारी भाषा इंग्लिश आहे हे ध्यानात ठेवणे योग्य ठरेल.
मी गझलेचे शिक्षण शेवटी शेवटी प्रसिध्द गझलकार पै. इलाही जमादार यांच्याकडे घेतले. बर्याच वेळा त्यांच्या घरी जाऊन शिक्षण घेतले आणि मला अमुल्य मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या खूप खूप गझला वाचल्या. त्या वाचताना माझ्या काही गझला अशा वाचण्यात आल्या ज्यात तीन ओळींचे शेर पण होते. त्यांनी प्रश्न विचारता सांगितले की तीन ओळीचा शेर अस्तित्वात आहे. फारसी भाषेत तीन ओळीच्या शेराच्या गझलेला "सेमिसरी" गझल असे म्हणतात. फारसीत से म्हणजे तीन. सतारीला तीन तारा असत म्हणून सितारीला सेतार म्हणत. . पुढे तिला सतार असे म्हणू लागले.
त्यांच्या घरी एका त्यांच्याच पुस्तकात कांही गझला अशा वाचल्या की शेराच्या दोन ओळी पैकी एक ओळ मराठीत होती तर दुसरी हिंदीत होती. हेही माझ्यासाठी नवीन होते. चर्चेदरम्यान त्यांनी मला अशा गझलांचे अस्तित्व पटवून दिले आणि मी तशी गझल लिहिली पण. इलाहीजींनी हे पण सांगितले की सेमिसरी गझलेचे अस्तित्व हल्ली कुणीही मानत नाही. त्यांच्या मते तीन ओळीचे शेर असलेली गझल नज़्म या प्रकारात मोडते. असो. हा खूप गहन विषय आहे ज्यावर मी बोलण्यास केवळ असमर्थ आहे.
तथापी इलाहीजींकडून स्फूर्ती घेऊन एक गझल लिहिली आहे ज्यात कवाफी फक्त इंग्रजी भाषेतले आहे. ही त्यांच्या मार्गदर्शनात लिहिली आहे. बघा कशी वाटते ती ही गझल. द्विभाषिक गझल यथावकाश पेश करीन.
ही जनरेशन
कशी लिहावी शुध्द मराठी जाणत नाही ही जनरेशन
व्याकरणाचे फक्त पुस्तकी होते केंव्हा केंव्हा मेन्शन
शुभंकरोती कुठे हरवले? हंप्टी डंप्टी रोज म्हणावे
भगवद् गीता, संध्या करणे बुरसटलेले जुने क्रिएशन
गल्लीमधला वाणी आता जुना वाटतो माल घ्यावया
वॉलमार्ट अन् बड्या मॉलशी जुळले आहे मस्त कनेक्शन
नाती बोटावर मोजावी इतकी ठाउक पाश्चात्यांना
बाकी सारे इन-लॉ इन-लॉ ओलाव्याविन कसे रिलेशन?
राजा राणी कुटुंब छोटे मजेत राही परदेशी पण
इन-लॉ येता भेटायाला डॉटर-इन-लॉ घेई टेन्शन
पोट भराया अन्न मिळेना चार घास खाण्यास परंतू
अमाप साठा, करावयाला कडधन्न्याचे फरमंटेशन
नाक घासतो, मुजरा करतो नकोच मर्जी खफा बॉसची
प्रमोशन हवे हाव एवढी टेन्शनला मिळते ना पेन्शन
उजाड खेडी, बकाल शहरे, माणुसकीची सदा वानवा
देश उद्याचा असेल कैसा अवघड करणे इमॅजिनेशन
"निशिकांता" जर जगायचे तर डोळेझाक करावी अथवा
बाय करूनी जगास, स्वर्गी शोध तुझ्यासाठी लोकेशन
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment