गेल्या आठवड्यात कोविदचा बूस्टर डोस घेतल्यामुळे अंगात थोडी कणकण होती ज्या मुळे मी या सदराखाली लिखाण नाही करू शकलो. आज संपणार्या आठवड्यात महिलादिन येवून गेला. त्या दिवशी मी या विषयावर एकही पोस्ट टाकली नाही कारण त्या दिवशी अशा पोस्ट्सची भरमार असते. शिवाय माझ्या पोस्टची थीम या विषयाच्या जनरल थीमला छेद देणारी असते म्हणून मी त्या दिवशी कांहीही पोस्ट केले नाही. पण या विषयावर माझ्या असलेल्या बर्याच कविता रोज एक या प्रमाणे पोस्ट करत आलो; आज पाचवी आणि शेवटची रचना पोस्ट करून या उपक्रमाचा शेवट मी करत आहे. रसिकांनी भरभरून प्रतिसाद देवून कौतुक केले प्रत्येक पोस्टचे. सर्वांचे मनापासून आभार.
आजच्या कवितेची थीम जरा आपल्या विचारांना छेद देणारी आहे म्हणून थोडी पार्श्वभूमी सांगण्यासाठी हा प्रपंच. अन्याय कायम असूनही, स्त्री आपल्या परीने प्रगतीशील जीवनाचा मार्ग अवलंबताना दिसते ही आनंदाची बाब आहे.कदाचित याच एका कारणाने प्रत्येक रचनेत शेवटचे कडवे आशादायी स्वरूपाचे आपसूकच येते हे आपण आधीच्या पोस्ट्समधे अनुभवलेच असेल. आणि असा आशावाद वाचकांना पण खूप भावतो. अर्थात जे घडते आहे ते अतिशय मंद गतीने हे कोणालाही मान्य करावेच लागेल. विशेषतः ग्रामीण भागात बदलाचे वारे अजून पोहंचायचे आहेत. येथे एक गंमत आपणास सांगू इच्चितो. एका कार्यक्रमात, ज्यात माझे काव्य वाचन पण होते, माझे सहकवि माझी टर उडवीत म्हणाले की तुम्ही कांही विषय सततपणे हाताळता म्हणून तुमच्या काव्यात तोच तो पणा जाणवतो. मी त्यांना हसत हसत उत्तर दिले की जो पर्यंत ही समस्या समाजात शिल्लक आहे तोपर्यंत या विषयावर लिहिणे ही कवीची सामाजिक जिम्मेदारी आहे. टाळीबाज लिखाण करणे हे ध्येय असू शकत नाही आणि असूही नये.
आज जी रचना पेश करतोय ती माझ्या हृदयाला खूप जवळ आहे. यात मध्यवर्ती कल्पना अशी आहे की जगातील एकूण वातावरण बघून गर्भातील मुलगी आईला कांही मागणे मागत आहे. येथे आई पण तशी निर्बलच आहे. ती काय मुलीला देणार? आमच्याकडे एक म्हण आहे की "उघड्याकडे नागडे गेले आणि सारी रात्र थंडीने मेले." असा हा एकूण प्रकार. कोण कुणाला मदत करणार? असे म्हणतात की रुदन जर दुर्लक्षित राहिले तर त्याचे रुपांतर अक्रोशात होते. या रचनेत गर्भातच मुलीच्या आक्रोशाला सुरुवात झाली आहे. कधी कधी मनात शंका येते की हा जागतिक महिला दिन आहे की आगतिक महिला दिन? कविता थोडी मोठी झालीय. कविता लिहितांना घोंगावणार्या विचारांना आवर घलू शकलो नाही. क्षमस्व!
मी अतिशय आशावदी माणूस आहे पण या एका बाबतीत माझा नाविलाज होतो. समाजाच्या ढोंगीपणाची तिडीक येते.
ही कविता पोस्ट करून माझ्या उपक्रमाला विराम देतो.
आई मला मार गं
गर्भात तुझ्या मी अंकुरतेय
होईल तुला भार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं
चाचणी नंतर कळेल जेंव्हा
मुलगी आहे म्हणून
कूस तुझी चांगली नाही
बाबा म्हणतील कण्हून
ताई झाल्या वेळीचा तू
आठव जरा थरार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं
टिटवी ओरडेल कुत्री रडतील
सारे होईल अमंगल
चाहूल माझी घेवून येईल
नैराश्याचं जंगल
मला नाही व्हायचं कधी
अनाहूत नार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं
लग्नानंतर बदलतय नाव
गोत्र अन कुलदैवत
हरवून जातोय आपला सूर
लावू कसा धैवत ?
अपेक्षा अन वास्तव यात
खूप खूप दरार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं
अन इनव्हायटेड चालेल कदाचित
पण अन वांटेड नसावं
मी तर आई दोन्ही आहे
जगात कोठे बसावं ?
तुझ्या सारखा नकोय मला
अंधारशी करार गं
लिंग निदान चाचणी अधीच
आई मला मार गं
मला नाही मरायचय
नणंद दीरा कडून
मरण नकोय मला कधी
सासू सास-या कडून
जळून मेल्या नंतर तुझ्या
डोळ्याला लागेल धार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं
फ्रीझ, पंखा, टीव्ही, स्त्री
हेच जगाचं माप गं
आदिमाया, आदिशक्ती
लोणकढी थाप गं
या जगातून जन्मा पूर्वीच
होऊ दे फरार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं
दूर दिसतोय आशा किरण
मंद स्मीत ओठी
वेळ खूपय कदाचित
तुझ्या पणतीच्या पोटी
बिजली म्हणून जन्मेन मी
करण्याला प्रहार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.नं. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment