कोणतीही गोष्ट आयुषयात प्रथमच घडते किंवा केली जाते; अशा घटनेचे अनन्य साधारण महत्व असते जे कायम ध्यानात रहाते. अशी घटना स्मृतीपटलावर कायम कोरली जाते. अशा घटनांची एक मोठी यादी बनवता येईल.
उदाहरणादाखल, १) आयुष्यात बांधलेले पहिले घर,२)घरात आलेलेले पहिले मूल, ३) बागेत उमललेले पहिले फूल, ४) पहिले प्रेम, ५)नोकरीचा पहिला दिवस, ६) घरात आलेली पहिली सून ७) येऊ घातलेल्या पहिल्या बाळाची चाहूल ८) सनातनी घरातील तरुणाईचे बाहेर टूरवर जाणे ( जे आधी यात्रेशिवाय होत नव्हते) ९) घरातील एखादे मूल परदेशात शिकण्यासाठी/ नोकरीसाठी जाणे १०) आई बाबांचे परदेशी मुलांकडे कांही दिवसासाठी जाणे, ही यादी अजून खूप वाढू शकते. अशा घटना या वैयक्तिक जीवनात कायमस्वरूपी आनंददायी असतात म्हणून त्यांचे खूप महत्व असते.
आता थोडे वेगळ्या क्षेत्रातले. एखाद्या वैज्ञानिकाने लावलेला पहिला शोध, प्रतिस्पर्धेत मिळालेले बक्षीस. साहित्य क्षेत्रातील लोकांचे पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन, एखादे लिखाण कविता वर्तमानपत्रात प्रकाशित होणे, एखादा पुरस्कार मिळणे. या पहिल्या घटनेचे महत्व वादातीत असते.
माझा या बाबत अनुभव वेगळाच आहे जो मी येथे शेअर करू इच्छितो आज. मी पहिली कविता लिहिल्याची पार्श्वभूमी खास आहे. माझी मुलगी आणि जावई अमेरिकेत कामाला होते. मी त्यावेळी बँकेच्या नोकरीत मुंबईत कार्यरत होतो. माझी पत्नी आमेरिकेला गेली मुलीच्या बाळंतपणासाठी. सहा महिने राहून ती परतली. मी नोकरीत असल्यामुळे जाऊ शकलो नाही. नंतर चार महिण्यांनी लेक, जावई आणि नात येणार होते. मी नातीला आधी पाहिले नव्हते. माझ्या औत्सुक्यातून माझ्या पहिल्या इंग्रजी कवितेचा जन्म झाला. नातीचे नाव ANKITA होते. मी सहा ओळीची कविता लिहिली होती. प्रयेक ओळीचे अद्याक्षर घेतले की अंकिता हे नाव तयार होत होते. ही कविता संगणकाच्या स्क्रीनवर डिसप्ले केली होती. माझ्या सर्व नातेवाईकांनी त्या कवितेची खूप स्तुती केली. माझ्या मनात विचार आला की मी कविता लिहू शकतो आणि माझा कवितांचा प्रवास सुरू झाला. चिमुरड्या नातीवर लिहिलेली कविता अशा रितीने माझ्यासाठी लँडमार्क ठरली. आणि ती पहिली रचना होती माझी.
असेच काल व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्ताने झाले. जुन्या आठवणी फेस बुकवर आलेल्या वाचताना माझ्या ध्यानात आले की मी व्हॅलंटाइन दिनावर तब्बल आठ कविता लिहिल्या आहेत. अगदी शेवटची रचना या प्रसंगी गझलेच्या स्वरूपात लिहिली जी पोस्ट पण केली आहे. या लिखाणात अगदी सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे सर्व आठ रचना एकापाठोपाठ वाचल्यावर माझ्या लक्षात आलि की या सर्वात मला व्हॅलेंटाइन डे वरची सर्वात जुनी म्हणजे पहिली रचनाच मला जास्त भावली जी आपणा सर्वांसठी खाली पेश करतोय.
गीत मखमली लिहावयाला
मनात माझ्या तुझी आठवण
जशी लागली रुजावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला
गझल असो वा असो रुबाई
अथवा कविता वृत्तामधली
तुझ्या वावराविना कधीही
मनाजोगती नाही सजली
चारोळ्या अन् मुक्तछंदही
रंग लागले भरावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला
तू असताना कवितेमध्ये
हवे कशाला चंद्र सितारे?
उर्मी येता लिहावयाची
प्रतिभेला फिटतात धुमारे
लागतेस तू सहजासहजी
लेखणीतुनी झरावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला
व्हॅलेंटाइन आला गेला
कधी? मला हे कळले नाही
डंका का लैला मजनुंचा?
एक दिवस हे पटले नाही
तुझ्यासोबती स्वप्न गुलाबी
रोज लागलो बघावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला
तू हसल्याने मोती गळती
किती, कसे अन् कुठे साठवू?
मधाळ बघणे लोभसवाणे
क्षणोक्षणी मी किती आठवू?
विश्वामित्रा तुझी समस्या
मला लागली छळावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला
बारा महिने ऋतू असावा
तुझियासंगे हसावयाचा
जीवन व्हावे वसंत उत्सव
प्रेम भावना फुलावयाचा
उरले सुरले पुढील जन्मी
भेटू आपण लुटावयाला
गुंफत असतो शब्द फुलांना
गीत मखमली लिहावयाला
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment