जेंव्हा माझा मुलगा अनिकेत, अमेरिकेला जाऊन आठ दहा वर्षे तेथे नोकरी करून आणि ग्रीन कार्ड करूनही परत आला तेंव्हा मलाच थोडा आश्चर्याचा झटकाच बसला.कारण तेथून बस्तान गुंडाळून परत येणे त्यावेळी ऑड वाटत होते. मला बराच वेळा त्याला विचारावे असे वाटले पण मोह टाळला. कांही दिवसांनी हळू हळू कळाले की त्याची मुलगी तेव्हा सात वर्षाची झाली आणि मुलांनी आणि सूनबाईंनी ठरवले की मुलीचे पालन पोषण भारतातच करायचे आणि तिचे शिक्षण पण भारतातच! . मला तो विचार स्वागतार्ह असाच वाटला. मुलाच्या मते दहावीपर्यंतचे शिक्षण भारतीय वातावरणातच व्हावे असे होते. त्यांना मुलीला भारतीय वातावरणात वाढवायचे होते. विचार स्तुत्य होता आणि मी आणि माझी पत्नी मनोमन खुश झालो होतो. न मागता आमच्या मनासारखे झाले होते. नातीचे यथावकाश बारावी पर्यंतचे शिक्षण झाले आणि त्यांनी मुलीच्या पुढील शिक्षणासाठी तिकडे प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नंतर आम्हाला समजले की नातीला तब्बल सहा महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्या पैकी एक युनिव्हर्सिटी निवडून त्यांना परत अमेरिकेत जायचे होते. आमची स्थिती म्हणजे थोडी खुशी थोडा गम अशी होती.
Monday, July 11, 2022
तकलादू समाधान--(वीक एंड स्फूट लिखाण)--23.04.22
इतक्यातच अनिकेतचा एक भारतातील मित्र अमिरिकेहून भारतात रजा घेऊन आला. दोघेही एकाच शाळेत होते आणि लहानपणापासू त्यांची मैत्री होती. शिक्षण एखादा वर्ग मागे पुढे असावे. तो मित्र दोन तीन वेळा घरी आला. एकदा डिनरला पण घरी आला. लहानपणापासूनची मैत्री! ते दोघे बैठकीत गप्पा मारत बसत बराच वेळ. त्यांच्या गप्पातून मला त्यांच्या अमेरिकन जीवनाबद्दल बरेच कांही कळाले. तिथले रहाणीमान, जगण्याची तर्हा, विचार करण्याच्या पध्दती वगैरे. त्याच्या मित्राच्या बोलण्यात नेहमी तिकडल्या रहाणीमानाची तारीफ असे आणि आपल्या चालीरितींना तुच्छ लेखत असे. हे मला खूप खटकायचे.
रस्त्यावरून कार नेताना ते दोघे पुढे बसत आणि मी मागल्या आसनावर बसत असे. त्यांच्या मनमोकळ्या गप्पा चालत असत. मुलाच्या मित्राचा नेहमीचा सूर म्हणजे आपला देश पाहिजे तशी प्रगती करत नाही म्हणून आपण अजून मागासलेले आहोत. रस्त्याने कार नेताना बाजूची घाण बघून तो शिसारी आल्याचे हावभाव दाखवत असे आणि आपला देश किती मागासलेला आहे हे माझ्या मुलालाच समजाऊन सांगत असे. नेहमी त्याच्या बोलण्यातील सूर हाच असे. रस्त्याच्या बाजूचा कचरा, कांही भागात असलेली दुर्गंधी, रस्त्यात असलेली बेवारसी कुत्री हेच विषय तो काढून भारताला कोसत होता. एका हॉटेलच्या बाहेर पडलेला कचरा बघून " यू इंडियन्स" म्हणून मनसोक्त नावे ठेवत असे. त्याचा एकूण सूर असा की तो देशात येवून त्याने आपल्या देशावर उपकारच केले आहेत. मला खूप वाईट वाटायचे हे ओंगळवाणे उद्गार ऐकून. मी त्यादिवशी माझी नाराजगी मुलाजवळ व्यक्त केली आणि त्याला म्हणालो की मी उद्यापासून सोबत येणार नाही.
दुसरेदिवशी त्यांना युनिव्हर्सिटी रोडला जायचे होते. माझ्या बायकोने मला सोबत जाऊन कांही सामान त्याच भागातून आणायचे सांगितले. मनात नसताना मला पुन्हा त्या दोघाबरोबर जाणे भाग होते आणि मी नाविलाजाने निघालो. गाडी गर्दीतून रस्ता काढत ट्रॅफिकमुळे हळू हळू चालली होती. पुणे विद्यापीठाच्या चौकात गाडी अगदी हळू हळू चालली होती. चौकात गाडी सिग्नल आणि ट्रॅफिकमुळे हळू हळू चालली होती. चौकात रेड सिग्नल असल्यामुळे गाडी एकदम थांबली. लागलीच फाटक्या कपड्यातील बारा तेरा वर्षाची मुलगी गाडीजवळ भीक मागण्यासाठी आली. माझ्या मुलाचा मित्र मुलाला सांगत होता की ती तोकड्या वस्त्रातील मुलगी किती सेक्सी दिसतेय नाही! उन्हामुळे स्कीन जी काळी पडली आहे ना त्यात खूप सेक्सी अपील असते असे पाश्चात्य लोक मानतात. अशा स्किनला फार डिमांड आहे तिकडे. हे सारे ऐकून माझ्या डोक्यात तिडीकच उठली. मी चौक क्रॉस केला की गाडी थांबवायला सांगितले आणि मी उतरून त्यांना बाय केले. माझा गुदमरलेला जीव थोडा हायसा झाला. परत येताना ती मुलगी परत भेटली. तिला मी परत हटकले आणि विचारपूस केली. तिने सांगितलेले ऐकून मी चकितच झालो. तिने थोडक्यात सागितलेली हकिकत अशी:
तिला लहान असताना आई पासून पळवले होते. तिचा एक हात कोपरात मुडपून चार महिने बांधून ठेवला होता. नंतर तो हात रक्त पुरवठा न झाल्याने लुळा झाला. आणि तिला भीक मागायाला लावून उत्पन्नाचे साधन बनवले. दोन वेळेचे जेवण देवून पळवलेला माणूस भिकेचे पैसे घेऊन जातो. हा त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेला व्यवसाय आहे. मी गलबलून त्या मुलीच्या हातात शंभरची नोट घातली आणि त्यातच तकलादू समाधान मिळवलं. कुठे तो अमेरिकेत रहाणारा मुलाचा घाणेरडा मित्र, कुठे ती भीक मागणारी पोर आणि शंभर रुपये देवून स्वतःला तकलादू समाधान मिळवणारा मी?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. नं. ९८९०७ ९९०२३
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment