Showing posts with label Poetry by Nishikant Deshpande--Mala jagu dya.. Show all posts
Showing posts with label Poetry by Nishikant Deshpande--Mala jagu dya.. Show all posts

Saturday, August 25, 2012

मला जगू द्या


आर्त हाक ना कुणी ऐकली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

माता, भगिनी, सून जगाला हवीहवीशी
पण कन्या का गर्भामधली नकोनकोशी
जन्मायाच्या अधीच रडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

एकच गाणे तिच्या नशीबी कारुण्याचे
जन्मच अवघड स्वप्न कुठे मग तारूण्याचे
करुणाष्टक ती गात राहिली"' "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

देवदूत जे, डॉक्टर झाले अता कसाई
मुल्य पराजित, स्वार्थ जिंकतो, कशी लढाई?
श्वास घ्यावया ती तडफडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

स्थान स्त्रियांचे विसर पडावा समाजास का?
गर्भाशय हे स्मशान बनले स्त्रीभ्रुणास का?
समाज बहिरा, ती ओरडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

नकोच मुलगी, कठोर काळिज, बाप रांगडा
गळा घोटला, श्वास थांबला दीन बापडा
शांत जाहली, हाक थांबली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com