अशा प्रकारचा लेख लिहायची वेळ माझ्यावर इतक्या लवकर येईल असे जर मला कोणी एक वर्षापूर्वी म्हणाले असते तर मला खरेही वाटले नसते. म्हणून सुरुवात कशी करावी हा मोठा प्रश्न माझ्यासमोर या क्षणाला आहे. काय काय अन् किती लिहावे? अगदी बालपणापासून एकत्र घालवलेले आयुष्य! आठवणींचा भला मोठा पेटारा आहे.
भास्करबद्दल सांगायचे झाल्यास तो अतिशय मनमिळाऊ, सालस होता. समोरच्याला लिलया जिंकण्याची कला त्याला अवगत होती. खळखळणारे प्रवाही जीवन म्हणजे काय हे सांगणारे उदाहरण होता तो. आमची आर्थिक परिस्थिती खूप बेताची असे म्हणणे सुध्दा अतिशयोक्ती ठारावी इतकी गरिबी होती आमच्या घरी. त्यात तीन बहिणी आणि चार भाऊ असा आमचा जंबो परिवार. तरीही जे आले, आहे ते स्विकारत बालपण गेले. आज ते सारे आठवले की अभिमान वाटतो या फाटक्या आयुष्याचा.
संस्काराचा परिणाम असेल कदाचित पण कडकीच्या काळातही आम्ही भावंडे कधी भांडल्याचे आठवत नाही. भास्करशी माझे नेहमीच सूत जुळत असे. मतभेद अगदी नगण्य असत लहानपणापासूनच. हाच एकोपा शेवटपर्यंत कायम होता.
भास्करने वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. जेथे जेथे तो कार्यरत होता तेथे तेथे आम्ही उभयता जात असू एखाद्यावेळा तरी. प्रत्येकवेळेस हे प्रकर्षाने जाणवायचे की त्याचा मित्र संचय जबरदस्त असे आणि सर्वांशी तो खेळीमेळीचे संबंध ठेवत असे. मग ते आगदी लहान गाव मंठा असो की कर्नाटकातील खेडे निरना असो. असे संबंध ठेवायला मनाचा मोकळेपणा लागतो जो त्याच्याकडे भरपूर होता.
त्याच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे जिद्द. चांगल्या अर्थाने तो एक जिद्दी स्वभावाचा माणूस होता. त्याने आयुष्यात काय नाही केले? विशेषतः कला क्षेत्रात! आमच्या घराण्यात संगिताचा वावर नव्हताच म्हंटले तरीही चालेल. संगीत फक्त भुलईची गाणी, काकड आरतीची गाणी, परंपरागत भजने येथेपर्यंतच मर्यादित होता. पण माझी पत्नी जयश्री आली आणि खर्या अर्थाने संगिताचा शिरकाव झाला आमच्या घरात. यात अजून भर घातली ती भास्करने. कुठलीही पार्श्वभूमी नसताना तो संवादिनी, तबला, बासरी वाजवत असे. गायन कला पण त्याने बर्यापैकी आत्मसात केली होती. मी या पूर्वी भास्करच्या जिद्दीविषयी बोललो आहेच. त्याच्या आणि माझ्या घरात एकच कंपाउंड वाल होती. मी त्याचा बासरीचा, तबल्याचा, आणि संवादिनीचा रियाज तास न तास ऐकलेला आहे. बासरी एका विशिष्ट पोजिशनमधे मान ठेवून वाजवताना त्याची मान दुखत असे. पण पठ्ठ्याने रियाज कधी सोडला नाही.
नंतरच्या जीवनात त्याचा कल अध्यात्माकडे वळला तिथेही जिद्द पावलोपावली दिसत होती. किर्तन करणे, अभंगांचे निरुपण, ज्ञानेश्वरी वाचून समजावणे यात पण त्याचा हातखंडा होता. एकदा आमचे दहा बारा मित्र युरोप टूरवर जाणार होते. या समूहात मी भास्कर आणि त्याची पत्नी आशा यांना येण्यासाठी अग्रह केला. ते तयार झाले. टूरवर जायची तारीख जवळ आली आणि मला मेडिकल इमर्जन्सी आल्याने आम्हा दोघांचे जाणे स्थगित करावे लागले. समूहात सर्व माझे ज्येष्ठ नागरिक संघाचे मित्र होते. भास्कर फक्त नवीन होता. टूर संपल्यानंतर सर्व मित्र मला भेटले. ते म्हणाले की तुमचा भाऊ फारच हुशार आहे हो सर! रोज सायंकाळी टूरवर असताना ते एका अभंगाचे निरुपण करायचे. ही तारीफ ऐकून मला मूठभर मास चढले!
एक शेवटची आठवण सांगून हे लिखाण संपवतो. भास्कर बँकेत जॉईन व्हायच्या आधी सॉईल काँझर्वेशन खात्यात नोकरीला होता. त्यावेळी एक सहा महिन्याची ट्रेनिंग असे. ती त्याने केली. तो आणि त्याचे पाच मित्र या खात्यात नोकरीला लागले. मी त्याच्यासाठी माझ्या बँकेत नोकरी लावण्याचा प्रयत्न करत होतो. सुदैवाने त्याला यश आले. त्याची ऑर्डर निघाली आणि रुजू होण्याचे आदेश निघाले. तो त्यावेळी जालन्याजवळ सेवली या खेड्यात तो कार्यरत होता. त्याला बँकेत जॉईन होण्यासाठी निरोप पाठवले पण तो कांही प्रतिसाद देत नव्हता. त्या काळात फोन पण नव्हते. शेवटी मी रजा घेऊन औरंगाबादहून जालना आणि जालन्याहून सेवली असा प्रवास सुरू केला. जालन्याहून एक मित्र घेतला सेवलीला जायला. अंतर सात किलोमिटर होते. बस नाही. पायी डोंगर चढून हे अंतर पार करायचे होते. जालन्याहून सकाळी ११ वाजता निघून सायंकाळी सात वाजता पोहंचलो. आमचे बंधूमहाशय एका बाजेवर निजले होते. दोन साईटवरील कामगार त्याच्या अंगाला तेल लाऊन मॉलिश करत होते. अजून एक कामगार स्वयंपाक करत होता. त्याचा हा थाट बघून आवाकच झालो. नोकरीला लागून दोनच महिने झाले होते पण त्याने एक अॅट्लास सायकल पण घेतली होती जी तेंव्हा एकशे सहा रुपायाला मिळायची. त्याला गोड बोलून, समजाऊन, थोडे दटाऊन बँकेची नोकरी जॉइन करायला मजबूर केले. आणि शेवटी तो बँकेत वैजापूर या शाखेत रुजू झाला. हे सर्व सांगायचे प्रयोजन म्हणजे सॉईल काँझर्वेशन हे खाते लाच खाण्यासाठी तेंव्हा बदनाम होते. भास्करसोबत त्या खात्यात लागलेले सर्व मित्र एका वर्षाच्या कालावधीत लाच प्रकरणी नोकरीतून बरखास्त झाले. हे आठवले की मनात येवून जाते की मी नोकरी बँकेत धरायचा भास्करला केलेला आग्रह त्याच्या पुढील जीवन घडवण्यासाठी एखाद्या समिधेप्रमाणे कारणीभूत झाला.
किती लिहू? साश्रू नयनाने विराम देतो.
निशिकांत देशपांडे, पुणे.
No comments:
Post a Comment