Sunday, July 24, 2022

मंदशा वार्‍याप्रमाणे..राजन शेगुंशी--Youtube link

 Gazal--मंदशा वार्‍याप्रमाणे..राजन शेगुंशी--Youtube  link

https://youtu.be/Vv9y1UK0_fo

वारकर्‍यांची मांदियाळी--(वीक एंड लिखाण)

 आपला देश आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे भक्तिभावाचे माहेर घर आहे. जत्रा, यात्रा,  सणवार आपल्या राज्यात खूपखूप आहेत.  खरे सांगायचे तर या सर्व बाबी आपल्या संस्कृतीचा  अविभाज्य घटक आहेत. माणसांची आणि समाजाची जडणघडण त्यामुळे हवी तशी होते. याला दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या भूमीत झालेले संत महात्मा हे पण आहेत.


आमच्या आभ्यासक्रमात परिपूर्ती नावाचा कथा संग्रह होता. सर्व कथा इरावती कर्वे या प्रसिध्द लेखिकेने लिहिलेल्या होत्या. या कथासंग्रहाचे नाव परिपूर्ती ठेवण्याचे एक गमतीदार कारण आहे. एकदा इरावती कर्वे काम आटोपून कॉलेजमधून (जेथे त्या नोकरी करत होत्या) घरी परतत असतांना घरापासून थोड्या अंतरावर त्यांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता, आई येत असलेली पाहून त्याने आपल्या मित्रांना सांगितले "ती माझी आई आहे". हे त्यांनी स्वतः ऐकले. त्यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे की त्यांना वेगवेगळे पुरस्कार, मानसन्मान मिळाले. पण मुलाचे ही माझी आई आहे सांगितलेले ऐकून त्यांना जीवन सार्थकी लागल्याचा विचार मनात आला आणि म्हणून त्यांनी या कथा संग्रहाचे नाव परिपूर्ती असे ठेवले. किती उद्बोधक प्रसंग आहे नाही! हे मी सहजच सांगितले. पण आजचा संबंध असा की या पुस्तकात एक प्रदीर्घ लेख होता तो पंढरपूरच्या वारीवर!  या वारीचे इतके सुंदर वर्णन आहे की वाचताना माणूस हरवून जातो. मी त्यावेळेस एका पेपरमधे आलेल्या परिक्षणात वाचले होते की हा लेख म्हणजे महराष्ट्राच्या संस्कृतीचा आरसा आहे.
आजही वारी म्हणजे वर्षातून दोन वेळेस  येणारा सांस्कृतिक महोत्सव असतो. सर्व लोक उत्सुकतेने वाट बघत असतात. आपण ऐकतो की लोकांचा नास्तिकवादाकडे कल आहे हल्ली. पण पंढरीची वारी ही अपवाद दिसते. सालाबाद भाविकांची संख्या वाढतच आहे. परवाच कळाले की या महासागरात सॉफ्टवेअर कर्मचार्‍यांची पण एक दिंडी निघते.
हे सर्व व्यवस्थापन अगदी सुरळीत चालते. एवढा भक्तांचा महासागर असून वारी व्यवस्थित पार पडते  हे विशेष!
सर्व वारकरी घरून कांहीही न घेता निघतात. या पायी प्रवासात त्यांची थांबण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था पण लोकच करतात. या वारीत सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश असतो. अगदी गाडीतून प्रवास करणार्‍यांपासून ते चालत चालत वाटचाल करणार्‍या पर्यंत!  
ही वारी म्हणजे आपल्या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. माझे एक मित्र वारीला जाऊन आले. ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी या वारीचे वर्णन " वारकर्‍यांची मांदियाळी" असे केले.  हे सर्व ऐकून आठवून मी इतका प्रभावित झालो की मी लागलीच या विषयावर कविता, अभंग्,भारुड रचले. त्यातील एक रचना अभंग रुपात खाली माझ्या वाचकांसाठी पेश करतोय.

पांडुरंगा--

सदैव मनात । दिससी स्वप्नात ।
रंगलो तुझ्यात । पांडुरंगा ॥१॥

नको घरदार । नको येरझार ।
दावा मुक्तिद्वार । पांडुरंगा ॥२॥

मोहविते माया । सोकावली काया ।
जन्म गेला वाया । पांडुरंगा ॥३॥

रमलो नात्यात । आलो मी गोत्यात ।
पाय चिखलात । पांडुरंगा ॥४॥

असू दे उपाशी । रोज एकादशी ।
जागा दे पायाशी । पांडुरंगा ॥५॥

मठ्ठ निर्विकार । तरी मी अधीर ।
जागवी लागीरं । पांडुरंगा ॥६॥

जन्म गेला फुका ।पामराचे ऐका ।
माझा व्हावे सखा । पांडुरंगा ॥७॥

गळा तुझी माळ । तोडली का नाळ ।
तुझाच मी बाळ । पांडुरंगा ॥८॥

करमेना घरी । भाऊबंद तरी ।
रमतो मंदिरी । पांडुरंगा ॥९॥

"निशिकांत" म्हणे । कृपेचे चांदणे ।
होवो माझे लेणे । पांडुरंगा ॥१०॥



निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३.

Monday, July 11, 2022

केविन कार्टर--(वीक एंड लिखाण)

आज जरा वेगळा विषय या स्तंभाखाली हताळावा असे मनात आले. दर वेळेस माझ्या कविता आणि गझलेच्या अनुषंगाने मी कांही लिहित असतो. अनेक रचनांच्या मागे कवीची कांही तात्कालीन भूमिका असते ज्याचा मी या लिखाणातून परामर्श घेतो. हे लेखन जवळ जवळ दोन वर्षापासून चालू आहे. का माहीत नाही पण आज थोड्या वेगळ्या वाटेने जावयाची उर्मी आली आणि विषय निवडीसाठी विचारचक्र सुरू झाले.

आज मी एका आवलिया व्यक्तीमत्वाबद्दल लिहिणार आहे. हा मनुष्य जोहन्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेचा होता ज्याचे नाव केविन कार्टर असे होते. त्याचा जन्म १३-०९-१९६० रोजी झाला. तो जरी गोर्या कुटुंबात जन्मला होता, या देशात या वेळेस काळ्या लोकावर खूप अन्याय होत असत. अमानुषपणे शोषण होत असे. केविन स्वतः गौरवर्णीय असूनही त्याला या अन्यायाची खूप चीड होती.त्याने छंद म्हणून फोटोग्राफीचा छंद जोपासला होता आणि या व्यवसायात त्याने चांगलेच नाव कमावले होते. त्याने केलेली फोटोग्राफी पुढे खूप नावारुपाला आली. काढलेल्या फोटोंना खूप न्यूज व्हॅल्यू असल्याने या व्यवसायास फोटो जर्नॅलिजम असे म्हणतात.
तिकडे दरवर्षी एक प्रदर्शन भरवले जात असे. यात मोठे मोठे कलाकार भाग घेत असत. एके वर्षी केविनने काढलेले एक चित्र यात ठेवण्यात आले. ते चित्र हे अतिशय भेदक, मन हेलावून टाकणारे असे होते. त्याने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. हे चित्र शक्य झाल्यास शेवटी देण्याचा प्रयत्न करतोय. पण शक्य न झाल्यास म्हणून या चित्राबद्दल थोडी माहिती देत आहे. हे चित्र सुदान या कमालीच्या दुष्काळी मागास भागातील आहे. यात एक आफ्रिकन भुकेजलेली कुपोषित मुलगी एका विरान भागात खाली वाकून जमिनीवर डोके टेकून बसलेली आहे. अगदी थकलेली, मरगळलेली. तिच्या पासून दहा पंधरा फुटावर मागे एक गिधाड बसलेले आहे. असे वाटते की ते गिधाड ती मुलगी मरण्याची वाट बघत आहे तिच्यावर झडप मारण्यासाठी.
या परिणामकारी आणि बोलक्या चित्रासाठी केविन कार्टरला त्या वर्षीचे प्रेस्टिजियस रशियन पुलित्झर बक्षीस मिळाले. हे बक्षीस देणारी संस्था ज्यांनी सामाजिक, औषधी, आणि वातावरणा बद्दल काम करणार्या कलावंतांना दिले जायचे. केविनचा या साठी जगात उदो उदो झाला. हे चित्र अमेरिकन पेपर न्यू यॉर्क टाईम्स मधे पण प्रकाशित झाले होते.
या विजयाच्या धामधुमीत एक अजब घटना घडली. केविनला एका अनोळखी माणसाचा फोन आला. त्याने फोनवर या फोटोंचा विषय निघाला. संभाषण संपताना त्या माणसाने केविनला प्रश्न विचारला की त्या फोटोत किती गिधाडे
आहेत? केविन म्हणाला एक. समोरचा माणूस म्हणाला की चूक! दोन गिधाडे आहेत. केविनने गोंधळून प्रश्न विचारला कसे काय? तो म्हणाला एक चित्रातील मुलीच्या मागे असलेले गिधाड आणि दुसरे कॅमेर्या मागील तू! तू त्या असाह्य मुलीला मदत न करता सुंदर फोटो, बक्षीस यातच मग्न होतास. आणि त्याने फोन कट केला.
केविन खूप खजील झाला आणि आपण गुन्हेगार असल्याचे भाव त्याला त्रास देऊ लागले. हा त्रास त्याला अनावर झाला आणि त्याने पश्चातदग्ध अवस्थेत २७ जुलै, १९९४ रोजी आत्महत्त्या केली अगदी तरुण वयात.
व्हाट्सअॅपवर ज्यांना हे चित्र दिसणार नाही त्यांनी माझ्या फेसबुक वॉलवर बघावे.
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

सांगा कुठे हरवले? (वीक एंड लिखाण) --02.07.22

 या प्रगती करत असलेल्या जगात, संस्कृतीचा चेहरा मोहरा पण बदलत आहे. कालचे आदर्श आज कालबाह्य होत आहेत. हे संक्रमण बघून वयस्क लोक नाराजीचा सूर लावत आहेत तर नवपिढी आनंद व्यक्त करीत आहेत. खुषीचे मापदंड पण वेगवेगळे होत आहेत. आजच्यांना कालचे जुनाट, बुरसटलेले वाटतात तर कालच्यांना आजचे संस्कृती वार्यावर झोकणारे वाटतात, हे दोन संस्कॄतीतले द्वंद्व अनादीकालापासून चालले आहे पण हल्ली ते जरा जास्तच टोकाला पोहंचल्यागत वाटते हे नक्की.

अर्थात याला कांही उपाय नसतो. सर्वांनी एकमेकाला समजून उमजून वागले तर होणारा त्रास सोसणे सोपे जाते एवढेच. पण हे सांगायला जरी सोपे असले तरी आचरणात आणणे खूप अवघड असते. सर्वांच्या वागण्यातून सामाजिक परिस्थिती निर्माण होते. हे सर्व विचार डोक्यात या क्षणाला यायचे कारण मला एक पाहिलेला प्रसंग आठवला. माझ्या एक मित्राचा रोहीत नावाचा मुलगा होता. अभ्यासात अतिशय हुशार लहानपणापासूनच!. उत्तम गुणाने उत्तिर्ण व्हायचा. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. त्याने उराशी स्वप्न फार भव्य जोपासले होते आणि त्या दिशेने त्याची वाटचाल चालू होती. मला या मुलाबद्दल खूप आदर होता. माझ्या त्याच्यापासून खूप अपेक्षा होत्या. मला नेहमी वाटायचे की तो आई बापाचे पांग फेडेल. आणि झालेही तसेच. तो खूप स्पर्धात्मक परिक्षा द्यायचा. त्याला संगणक क्षेत्रात मोठ्या पगारावर अमेरिकेत नौकरी मिळाली आणि तो कामासाठी गेला. तो आईवडिलांना अधूनमधून बोलत असे फोनवर. माझ्याशीही त्याचे अधून मधून बोलणे (ज्याला ते लोक चॅटिंग म्हणतात) होत असे. सगळे छान चालले होते.
त्याचे घर पुण्याच्या शेजारी एका लहान गावात होते. आई वडील तेथेच रहात. कांही दिवसात या भागाला खूप महत्व आले आणि जमिनींचे भाव आकाशाल भिडले. मोठे लोक धडाक्याने जमिनी खरेदी करू लागल्याने भाव उंची गाठत राहिले. आपण सगळीकडे बघतो की मोठी शहरे बाजूची लहान खेडी अक्षरशः गिळंकृत करतात. याही गावचे तेच झाले. या चढ्या भावाने रोहीत आणि त्याच्या वडीलाने ते घर विकले. आलेल्या भरपूर पैशातून शहरात एक फ्लॅट विकत घेऊन तेथे वडील स्थलांतरीत झाले. यथावकाश रोहित गावी सुट्टीवर आला जवळ जवळ तीन महिन्यासाठी. या वेळी त्याची सोयरिक पण होणार होती. तो एकेदिवशी घरातून आपला जुना प्लॉट बघण्यासाठी गेला. त्यांनी त्या भागातील जे बदल पाहिले, तो एकदम निराशच झाला. त्याला जे वाटले ते परतताना माझ्याशी शेअर केले. जे सर्वांना वाटते तेच त्याने व्यक्त केले होते पण ते माझ्या मनाला भिडले.
त्याने व्यक्त केलेल्या भावनावर मला एक कविता सुचली जी खाली देत आहे.
सांगा कुठे हरवले?
मंदीर मारुतीचे कोणी कुठे हलवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
तो पार मंदिराचा, रात्री जमून सारे
सुख दु:ख सांगताना जाती रमून सारे
हुंकार वेदनांचे नव्हते कुणी लपवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
जागेत मम घराच्या झालाय मॉल आता
डीजेवरी डुलूनी धरतात ताल आता
येथे शुभंकरोती होते मला शिकविले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
विकतो पिझा दुकानी, म्हणतात हट तयाला
गर्दी अमाप असते, आळस घरी बयेला
आईत अन्नपूर्णा, मजला जिने भरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
तांदूळ हातसडीचा शिजवीत माय होती
साजूक तूप, माया ओतीत साय होती
सारेच लाड माझे होते तिने पुरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
शाळा इथे असावी, तो काळ दूर नव्हता
गणवेष बूट कसले? शिकण्यात सूर होता
आदर्श पाठ येथे होते किती गिरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
झोतात पश्चिमेच्या का लोप संस्कृतीचा?
दिसतोय काळ आला बेभान विकृतीचा
विझण्यास ज्योत आम्ही काहूर का पुरवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

झाली संध्याकाळ--(वीक एंड लिखाण)--15.06.22

मी जेंव्हा सॉक्रेटिस म्हणजे सुक्रातची कहाणी वाचली तेंव्हा थोडा अस्वस्थच झालो. तो एकटा अगदी लहानपणापासून एका निर्मनुष्य बेटावर रहात होता. पूर्ण आयुष्य त्याने तेथेच व्यतीत केले. हे जरी वाचायला सोपे असले तरी कल्पना करा की किती अवघड असते असे रहाणे. आपण कधी इतरांना न बोलता जगू शकतो का? मी असेही वाचले अहे की सुक्रातला कुणीही बोलायला नसल्याने तो स्वतःही बोलू शकत नव्हता. आपली लहान मुले आपले बोलणे ऐकून स्वतः जीभ हलवून बोलायचा प्रयत्न करतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तात्पर्य, सहजीवन हे माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना पण अवश्यक असते. एक म्हण आहे ना "Man is a social animal". सर्व प्राणीमात्रांना थोड्या फार फरकाने हे लागू पडतेच. म्हणून तर मानवाने कुटुंब पध्दती निर्मिली असावी.

एकदा कुटुंब म्हंटले की त्यात वेगवेगळी नाती आलीच. मग प्रत्येक नात्याचे महत्व, आवश्यकता, रेशमी धागे वगैरे पर्यायाने निर्माण होतात. अशाने जीवन सुसाह्यही होते आणि असाह्यही होते हे नक्की! प्रत्येकाने सर्व नाती सुसह्य असतील या साठी प्रयत्नशील असायला हवे.
मी आज थोडे आईच्या नात्याबद्दल बोलणार आहे. हे जन्मापासून आपसूक तयार झालेले नाते आहे. आईचा महिमा कित्येक पोथ्या पुराणांनी वर्णन केलेला आहे. मातृ देवोभव पित्र देवोभव हेच तर दाखवते. अनेक साहित्यिकांनी पण आई या नात्याचा उदोउदो केलेला आह. ऐंशी टक्के कवींनी आपली पहिली कविता आईवरच लिहिलेली असते. हे सारे घडणे सहाजिकच आहे. असे का झाले याची कारण मिमांसा करण्याची गरज नाही.
मी ज्या घरी रहात होतो त्या घराच्या खिडकीत एका चिमणीने घरटे बनवायला सुरू केले होते. तिचे घरटे बनवण्या पासून बसून बघण्याचा छंद आम्हा उभयतांना लागला होता. हा एक आनंददायी विरंगुळाच होता म्हणा ना! तेथील हालचलीवरून आता घरट्यात काय चालू आहे याचा अंदज येत असे. आम्ही दोघे यावर चर्चाही करत असू. या विषयावर मला कविता करायची उर्मी आली. ही कविता आपल्यासाठी खाली पेश करतोय. वाचल्यानंतर ध्यानात येईल की माणूस आणि चिमणी यांच्या आयुष्य जगण्यात खूप साम्य आहे.
झाली संध्याकाळ
चोंच उघडुनी वाट पहाते
पक्षिणिचे ते बाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
बाळा चारा खाऊ घाली
खूप खूप मायेने
पाठीवरुनी हात मखमली
फिरवी ती प्रेमाने
कुशीत निजता बाळ वाटते
येवू नये सकाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
बाळाच्या खोड्या दंग्यांनी
घरटे गजबजलेले
तिला आवडे बाळ नेहमी
कानी कुजबुजलेले
कौतुक जेंव्हा बाळ खेळते
सोडुन सारा ताळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
पंख पसरुनी कसे उडावे
तिने शिकविले त्याला
आकाशाचे स्वप्न लागले
अता पडू बाळाला
उरात धडधड प्रश्न भयानक
तुटेल का ही नाळ?
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
एके दिवशी चारा घेउन
अशीच ती परतता
घरट्यामध्ये तिने पाहिली
खूप निरव शंतता
भिरभिरत्या नजरने शोधी,
मनी रक्तबंबाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
स्वतंत्र होउन बाळ उडाले
हीच जुनी ती कथा
आईच्या प्राक्तनात असते
कुरतडणारी व्यथा
एकलपणचे शल्य उरी अन्
मावळतीचा काळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

मनातील सल--(वीक एंड लिखाण-- फादर्स डे)--18.06.22

सध्याच्या जगात मग तो आपला देश असो वा जगातील इतरत्र देश असोत, दिवस साजरे करायचे फॅड पसरलेले आहे. त्याला थाटात म्हणतात हे नवीन कल्चर आहे. आता काय बोलावे! आपल्याकडे एखादी नवीन गोष्ट आली की त्याचा अतिरेक होतो आणि जिकडे तिकडे हेच दिसते. लक्ष देऊन पाहिले तर असा एकही दिवस दिसणार नाही जो कोणाच्या तरी स्मरणार्थ अर्पण केलेला नाही. आठवून बघा किती दिवस आपण साजरे करतो ते!
आपला सदभाव व्यक्त करण्याचा प्रांजळ हेतू असतो. आपल्या संस्कृतीचा वेगवेगळ्या जयंत्या, पुण्यतिथ्या पण याचाच एक भाग आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचेही दिवस ठरलेले आहेत. भारकाभर दिवस असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या म्हंटल्याप्रमाणे सारे कांही निमित्तमात्रच होते शेवटी.
माणसांची वेगवेगळी नाती बघता मातृदिन हा सर्वात जास्त जिव्हाळ्याने साजरा होणे सहाजिकच आहे. आई हे जन्मापासूनचे नाते आहे आणि तेही सर्वात प्रेमळ! पण मला प्रश्न पडतो तो बाबांच्या बाबतीत. नाही म्हंटले तरी हे थोडे दुर्लक्षित पात्र. आईच्या सावलीत वावरणारे, त्यांची प्रतिमा म्हणजे कडक थोडे करडे व्यक्तिमत्वच. तरीही या बाबांना थोडा उजाळा मिळाला तो कवि संदीप खरे यांनी लिहिलेल्या बाबा वरच्या कवितेमुळे. आणि ही रचना श्री. संलील कुलकर्णी यांनी इतकी बेफाम गायली आहे की आठदहा कार्यक्रम झाल्या बरोबर प्रसिद्धीचे उच्चांक गाठले. या द्वयीने बाबांच्या प्रतिमेला उजाळा दिला हे नक्कीच.
आज हा विषय आवर्जून काढण्याचे खास कारण आहे. माझे एक पोलीस खात्यात ओळखीचे आय. पी. यस. आधिकारी आहेत. त्यांची माझी ओळख कवितांच्या माध्यमातून झालेली. खूप उमदा आणि रसिक माणूस. आम्ही त्याकाळी एकमेकाच्या खूप संपर्कात होतो. आठवड्यातून एकदोनदा तरी संभाषण होत असे. एके दिवशी थोड्या गप्पा झाल्यानंतर त्यांनी स्वतः होऊन सांगितले की आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. पण आज लॉ अँड ऑर्डरच्या ड्यूटीवर असल्यामुळे ते आपल्या मुलीसोबत राहू शकत नाही. मी थक्कच झालो हे ऐकून. काय वाटत असेल बाबांना आणि मुलीला पण?
पोलीसाची प्रतिमा जनतेच्या मनात किती वेगळी असते. पण तेही शेवटी माणसेच असतात याचा विचार फार कमी केला जातो. या एका घटनेतून माझे विचार चक्र सुरू झाले. त्या चिमुरड्या मुलीच्या भावना बाबा नसताना वाढदिवस साजरा करताना काय असतील या चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसाची आपल्या मुलांचा बाबा म्हणून होणारी कुचंबना आणि मुलीच्या मनात बाबा विषयीची प्रतिमा यांचा परामर्श घेणारी कविता फादर्स डे निमित्त पोस्ट करत आहे. कविता मनातील सलाला हात घालते.
त्याचा बाबा विचित्र होता असेच त्याला वाटत होते
चार शब्द ना कधी बोलला, दु:ख मनाला काचत होते
सणासुदीला आनंदाने मिळून जेवण कधी न झाले
येई तो रात्री अपरात्री, थंड अन्नही त्याला चाले
सुर्योदय होण्याच्या आधी दिवाळीतही स्नान न केले
स्वर्ग पित्याला कसा मिळावा? मनात काहुर उठून गेले
अव्वल येता वर्गामध्ये घरी धावता सांगायाला
घरात नव्हता बाप, शेवटी डोळे मिटले झोपायाला
कधी नव्हे ते पिक्चर बघण्या आम्हासंगे बाबा आला
भ्रमणध्वनी वाजताच का तो अर्ध्यामधुनी उठून गेला?
चार घराच्या भिंतींनाही विचित्र वाटे जरी वागणे
सहनशीलता घरात इतकी! कुणी न पुसती तया कारणे
तणाव, दंगेधोपे होता, हटकुन बाबा घरात नसतो
उशीर होता परतायाला, जीव आईचा जिवात नसतो
दिवा लाउनी देवापुढती डोळे मिटुनी प्रार्थना करी
माय मागते देवाला "कर औक्षवंत नवर्यास श्रीहरी"
मूल विचारी नोकरीतही जीव असा ओलीस कशाला?
पित्यास नाही कधी वाटले झालो मी पोलीस कशाला?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
P. S. Patil, Hemantkumar Tadwalkar आणि अन्य १६
२४ कमेंट्स
२ शेअर
लाईक
टिप्‍पणी
सामायिक करा

सेमिसरी गझल--(वीक एंड लिखाण)--11.06.22

 आपल्या समाजात संकेत असा आहे की सर्वांनी चालीरिती पाळून जगावे. नसता लोक लगेच चष्म्याच्या काचा पुसून चौकस नजरेने बघायला सुरू करतात. म्हणूनच सर्वांना लोक काय म्हणतील ही काळजी सदैव छळत असते. घरात पती पत्नीने भांडले तर चालते पण ती भांडणे कुणाला ऐकू जाणार नाही याची अमाप काळजी घेतली जाते. हेच लागू प्रत्येक क्षेत्रात पडते जरा लक्ष देऊन पाहिले तर.

मी काही दिवसापूर्वी एका गझलेत एक उर्दू शब्द वापरला. तो शब्दही प्रचलीतच असाच होता. पण दोघा तिघांनी टिकेची झोड उठवली. जसा कांही मराठी भाषेवर अन्याय झाला असा एकूण सूर होता. माझे स्पष्ट मत आहे की कोणत्याही भाषेने स्वभाषेत प्रचलीत दुसर्या भाषेतले शब्द आपसूक आले तर वापरास मज्जाव नसावा. अशाने भाषा श्रीमंत होते. जगात सर्वात जास्त परभाषेचे शब्द आत्मसात करणारी भाषा इंग्लिश आहे हे ध्यानात ठेवणे योग्य ठरेल.
मी गझलेचे शिक्षण शेवटी शेवटी प्रसिध्द गझलकार पै. इलाही जमादार यांच्याकडे घेतले. बर्याच वेळा त्यांच्या घरी जाऊन शिक्षण घेतले आणि मला अमुल्य मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या खूप खूप गझला वाचल्या. त्या वाचताना माझ्या काही गझला अशा वाचण्यात आल्या ज्यात तीन ओळींचे शेर पण होते. त्यांनी प्रश्न विचारता सांगितले की तीन ओळीचा शेर अस्तित्वात आहे. फारसी भाषेत तीन ओळीच्या शेराच्या गझलेला "सेमिसरी" गझल असे म्हणतात. फारसीत से म्हणजे तीन. सतारीला तीन तारा असत म्हणून सितारीला सेतार म्हणत. . पुढे तिला सतार असे म्हणू लागले.
त्यांच्या घरी एका त्यांच्याच पुस्तकात कांही गझला अशा वाचल्या की शेराच्या दोन ओळी पैकी एक ओळ मराठीत होती तर दुसरी हिंदीत होती. हेही माझ्यासाठी नवीन होते. चर्चेदरम्यान त्यांनी मला अशा गझलांचे अस्तित्व पटवून दिले आणि मी तशी गझल लिहिली पण. इलाहीजींनी हे पण सांगितले की सेमिसरी गझलेचे अस्तित्व हल्ली कुणीही मानत नाही. त्यांच्या मते तीन ओळीचे शेर असलेली गझल नज़्म या प्रकारात मोडते. असो. हा खूप गहन विषय आहे ज्यावर मी बोलण्यास केवळ असमर्थ आहे.
तथापी इलाहीजींकडून स्फूर्ती घेऊन एक गझल लिहिली आहे ज्यात कवाफी फक्त इंग्रजी भाषेतले आहे. ही त्यांच्या मार्गदर्शनात लिहिली आहे. बघा कशी वाटते ती ही गझल. द्विभाषिक गझल यथावकाश पेश करीन.
ही जनरेशन
कशी लिहावी शुध्द मराठी जाणत नाही ही जनरेशन
व्याकरणाचे फक्त पुस्तकी होते केंव्हा केंव्हा मेन्शन
शुभंकरोती कुठे हरवले? हंप्टी डंप्टी रोज म्हणावे
भगवद् गीता, संध्या करणे बुरसटलेले जुने क्रिएशन
गल्लीमधला वाणी आता जुना वाटतो माल घ्यावया
वॉलमार्ट अन् बड्या मॉलशी जुळले आहे मस्त कनेक्शन
नाती बोटावर मोजावी इतकी ठाउक पाश्चात्यांना
बाकी सारे इन-लॉ इन-लॉ ओलाव्याविन कसे रिलेशन?
राजा राणी कुटुंब छोटे मजेत राही परदेशी पण
इन-लॉ येता भेटायाला डॉटर-इन-लॉ घेई टेन्शन
पोट भराया अन्न मिळेना चार घास खाण्यास परंतू
अमाप साठा, करावयाला कडधन्न्याचे फरमंटेशन
नाक घासतो, मुजरा करतो नकोच मर्जी खफा बॉसची
प्रमोशन हवे हाव एवढी टेन्शनला मिळते ना पेन्शन
उजाड खेडी, बकाल शहरे, माणुसकीची सदा वानवा
देश उद्याचा असेल कैसा अवघड करणे इमॅजिनेशन
"निशिकांता" जर जगायचे तर डोळेझाक करावी अथवा
बाय करूनी जगास, स्वर्गी शोध तुझ्यासाठी लोकेशन
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
Nilesh Shembekar, P. S. Patil आणि अन्य १६
२० कमेंट्स
लाईक
टिप्‍पणी
सामायिक करा

अच्छा बुरा--(वीक एंड लिखाण)--04.06.22

 कधी कधी माणूस कोणत्याही गोष्टीवर गंभीरपणे विचार करण्यास मजबूर होतो. जर आयुष्यात घडलेल्या घटनांचा विचार केला तर हे चांगलेच ध्यानात येईल. सहजासहजी या घटना ध्यानात येत नाहीत कारण आपल्याला त्या अंगवळणी पडलेल्या असतात.

या जगाची निर्मितीच बर्या वाईटांच्या भेसळीतून झालेली आहे. जगात जर सर्व घटना चांगल्याच किंवा वाईटच घडल्या असत्या तर जीवन निरस वाटले असते.चांगला राम झाला पण त्याबरोबर दुष्ट रावण पण होताच ना! हेच पांडव कौरव, श्रीकृष्ण कंस, देव दानव या बाबतीतही म्हणता येईल. ही निर्मिती चांगल्या वृत्तींना अजून चांगले रूप देण्याच्या प्रवृत्तीतून घडलेली असेल कदाचित. मानवाला यातून सुटका नसते. म्हणून जीवन सुखावह होण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील असतो. या चांगल्या वाईटांची प्रत्येकांच्या वेगवेगळ्या धारणा असतात.
आपल्याकडे नायक, खलनायकांची निर्मिती करतांना खलनायकाला शेवटी शिक्षा दिली जाते किंवा ठार केले जाते. पण पाश्चात्य देशात मी जेंव्हा कांही काळ मुलांकडे होतो तेंव्हा नातवंडाची पाठय पुस्तके किंवा गोष्टी वाचताना निदर्शनास आले की खलनायक असलेल्या पात्रांना न मारता त्यांच्यात सुधारणा झाल्याचे अढळून येते आणि शेवट हा "सर्वजण गुण्यागोविंदाने राहिले" असा असतो. हे सर्व सांगायचे कारण की लोकावर संस्कार कसे करायचे याचा खूप खूप सर्वांगीण विचार होतो.
या पार्श्वभूमीवर नेहमीच घडणार्या कांही दुर्घटनांचा गोषवारा माझ्या डोळ्यासमोरून सरकल्यामुळे विचार चक्र सुरू झाले. मन विषन्न झाले आणि असे का? या प्रश्नांनी खूप त्रास दिला पण उत्तर गावले नाही. शेवटी मनाने पळपुटा मार्ग शोधला आणि हे आपले काम नाही असा विचार करून मोकळा झालो. हा निर्णय घेण्याआधी खूप वैचांरिक मंथन झाले आणि त्यातून एका कवितेचा जन्म झाला. कवितेत व्यक्त झालेले भाव हे माझे स्वतःचे आहेत जे मी शेअर करतोय.
ही कविता हिंदीत आहे. मी त्यावेळेस पटियाला येथे कार्यरत होतो. तेथे मराठी रचना कोण वाचणार या एकमेव भावनेतून हिंदीत लिहिली. मला पूर्ण जाण आहे माझ्या हिंदी स्टँडर्डची. वाचकांनी सहन करून घ्यावी ही रचना.
सीख ना दो अच्छा बननेकी
संकट मे होगी धरती
हम लोगोंकी कारण होती
अच्छे लोगोंकी आरती
ऋषी मुनी ज्ञानी न पनपते
अज्ञानी बिन यंहा वंहा
पांच पांडवोंके हित मे ही
जन्मे कौरव शतक यंहा
रामकी प्रतिमा यूं न दमकती
अगर न होता रावण
ग्रिष्म न होता कालचक्र मे
मन न लुभाता सावन
महिषासुरने रक्त बहाया
पूजनीय बनी काली माँ
बुराइंया इस जगमे रहते
अच्छों की है शुभ प्रतिमा
संशय ग्रासित राम न होते
अग्नी दिव्य क्यों करे सिता?
अर्जून थे जब संभ्रम डूबे
जगने पायी अमर गीता
क्या अच्छ क्या बुरा विश्वमे?
एक बिना है दूजा आधा
बूरोंको रहना है बुरा ही
विश्व हीत का गणित है साधा
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३