Sunday, February 24, 2013

जे तुला बोलू न शकलो


जे तुला बोलू न शकलो
कागदावर मांडले
नेमके ते पान माझ्या
डायरीचे फाटले

गाळली नाही कधीही
मूक माझी आसवे
व्यक्त झालो मी कधी तर
फक्त झालो मजसवे
चार भिंतींनीच होते
दु:ख माझे जाणले
नेमके ते पान माझ्या
डायरीचे फाटले

आठवांनो का अताशा
साथ माझी सोडली?
हस्तरेषा चांगली जी
ती कुणी का खोडली?
प्राक्तनाने आज फासे
सर्व उलटे टाकले
नेमके ते पान माझ्या
डायरीचे फाटले

वर्णितो शब्दातुनी मी
प्रेम माझे अन् तुझे
का तुला काव्यात वाटे
नांदते कोणी दुजे?
अर्थ माझ्या शायरीचे
वेगळे का काढले?
नेमके ते पान माझ्या
डायरीचे फाटले

जीवनाच्या मैफिलीचा
ओसरावा नूर का?
मीच गातो ऐकतोही
तू अताशा दूर का?
ना शमा साकी न आता
एकटेपण दाटले
नेमके ते पान माझ्या
डायरीचे फाटले

चित्र रेखाटू कसे मी?
भावना घोंगावती
इंद्रधनुचे रंग घेउन
कुंचले सरसावती
पण तरी कॅन्व्हास कोरा
रंग सारे आटले
नेमके ते पान माझ्या
डायरीचे फाटले


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--  nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment