Friday, February 8, 2013

अंधाराचा बांध बांधतो


तुला मिळावे हास्य म्हणोनी
दु:खाशी मी नाळ जोडतो
प्रकाश बिखरू नये म्हणोनी
अंधाराचा बांध बांधतो

खेळामध्ये जिंकताच तू
तुझा चेहरा उजळत असतो
लोभसवाण्या रुपावरी मी
भान विसरुनी बहकत असतो
चिन्ह तुझ्या हारण्याचे दिसता
अर्ध्यातच मी डाव मोडतो
प्रकाश बिखरू नये म्हणोनी
अंधाराचा बांध बांधतो

उगाच का तू खडा टाकला?
डोहामध्ये तरंग उठले
तरंग कसले? आठवणींचे
झंझावाती वादळ सुटले
दिवाळखोरी झोपेची पण
स्वप्नांना मी साद घालतो
प्रकाश बिखरू नये म्हणोनी
अंधाराचा बांध बांधतो

धन्यवाद ! तू दु:ख दिले मज
दुसरी दु:खे पळून गेली
एक दु:ख अन् एक वेदना
भोगायाची सवय जाहली
दोष तुला ना देणे जमले
प्राक्तनाकडे दाद मागतो
प्रकाश बिखरू नये म्हणोनी
अंधाराचा बांध बांधतो

तू गेल्यावर आयुष्याचे
उदासवाणे चित्र पाहिले
तुझी वजावट होता हाती
शिल्लक मोठे शुन्य राहिले
परीघ त्या शुन्याचा होउन
पाश गळ्याला खूप काचतो
प्रकाश बिखरू नये म्हणोनी
अंधाराचा बांध बांधतो

गडगडणारे की बरसाती
मेघ कसे हे माहित नसुनी
भरून येणे नभात त्यांचे
मनास जाते प्रसन्न करुनी
आठवणीच्या नभास बघुनी
मोर बिचारा नाचनाचतो
प्रकाश बिखरू नये म्हणोनी
अंधाराचा बांध बांधतो


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment