Thursday, October 21, 2021

पदर खोचला होता


असून स्त्रीभ्रुण, घरी नकोशी

जन्म जाहला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


माय सासरी नवीन होती

चालत नव्हते कांही

मुकाट गेली सामोरी ती

लिंग निदानालाही

जन्मायाच्या अधी मुलीचा

गळा दाबला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


इतिहासाची पुनरावृत्ती

अधी दोनदा झाली

अशी कशी ही काजळलेली

पूर्व दिशेची लाली?

श्वास घ्यायच्या अधीच पहिला

श्वास थांबला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


घरातल्यांनी नवस बोलला

जर का मुलगा झाला!

एक पोरगी करूत अर्पण

देवी यल्लम्माला

बरे जाहले मुलगी झाली 

अनर्थ टळला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


आई झाली कणखर आता,

आम्ही सार्‍या बहिणी

तिला बघूनी उत्तर मिळते

 कशी असावी गृहिणी

तिच्या कडूनी लढावयाचा

अर्थ जाणला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता


काय पोरगी काय पोरगा?

काय दिवा वंशाचा?

थोतांडाला कुणी बनवला

भाग अंधश्रध्देचा?

अज्ञानाने ज्ञानासंगे 

लढा जिंकला होता

कधी तरी आईने माझ्या 

पदर खोचला होता



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

 

Friday, October 15, 2021

प्रतिकात्मक परीघ--( वीक एंड लिखाण. )

 आपण जर सभोवताली डोळसपणे पाहिले तर बर्‍याच गोष्टी मजेशीर घडताना दिसतात. याला कारणीभूत असते आपण जोपासलेल्या श्रध्दा आणि त्यांच्याशी चिकटून रहाण्यातील वाटणारा मोठेपणा! परत लोक काय म्हणतील याची तलवार कायमच लटकत असते. 

१) परत फिरा काम होणार नाही;  कारण मांजर आडवे गेले आहे,

२) सवाष्ण बाई भरली घागर घेऊन वाटेत भेटली तर काम यशस्वी होते,  

३) मुहूर्त बघून पूजा पाठ किंवा कामाची सुरुवात करणे,

४) आमक्या आमक्या वारी दाढी किंवा कटिंग करू नये

एक नाही अशा हजारो बाबी आपणास दिसतील आणि आपणही त्या पाळतोच.  मी जास्त उदाहरणे देत नाही कारण ते कदाचित कांही लोकांना आवडणार नाही. अर्थात यात कांही गोष्टी प्रतिकात्मक असतात. श्रावणाच्या आसपास मृत्तिका पूजन हे धरतीमातेचे उपकार बिंबवण्यासाठी असते कारण धरती सुजलाम सुफलाम नसती तर काय झाले असते? तसेच मंगळागौरीची पाने पत्रीने पुजा करणे याचे पण आहे. वनस्पती जोपासणे आणि त्यांचे अनन्यसाधारण महत्व हे यातून अधोरेखित करण्यासाठी असते. आपण हे सर्व श्रध्देचा भाग म्हणून करतो. म्हणावी तशी जागृती न आल्याने जंगलतोड चालूच आहे.  आपण कर्मकांडात अडकतो आणि मूळ उद्देश बाजुलाच रहातो.

गेल्या आठवड्यात आपण विजयादश्मी नेहमीप्रमाणे उत्साहाने साजरी केली. ठिकठिकाणी ( विशेषतः उत्तर भारतात) रावणाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. असे दहन कित्त्येक वर्षापासून करतच आहोत. याचा हेतू दुष्टप्रवृत्तींचा नायनाट करावा असा आहे. रावण हा दुष्टवृत्तीचे प्रतीक आहे. पण प्रत्यक्ष हे काम करतो का? दुष्टप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. खून, दंगे, लिंचींग, लाचखोरी हे सारे कशाचे प्रतीक आहे? पण आपण दरसाली रावणाचे दहन करतो एक  कर्मकांड म्हणून. आपण नेहमी प्रतिकात्मक परीघात अडकलेलो असतो.  यावर विचार करून करून माझ्या एका कवितेचा जन्म झाला. मी ही कविता दसर्‍यादिवशी मुद्दाम पोस्ट केली नाही कारण मला जनतेच्या सणासुदीच्या उत्साही मूडमधे अडथळा आणायचा नव्हता. सदर कविता खाली पेश करतोय. 


रावणास का पोसत असतो? ( विजयादश्मीच्या निमित्ताने. )


विजयादश्मी मुहुर्तावरी

दशाननाला जाळत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


रामप्रभूंना तोंड द्यावया

समोर होता एकच रावण

हजार आता सभोवताली

लुटावयाला अमुचा श्रावण

राम व्हायचे सोडून त्याच्या

पादुकांस प्रक्षाळत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


आज जरी का कुणी लक्ष्मण

भूक लागुनी मुर्छित झाला

हनुमंताने कुठे उडावे?

संजिवनीचा शोध घ्यायला

पर्वतावरी घरे, लव्हासा

झाडे आम्ही तोडत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


सत्तांधांच्या हस्ते जेंव्हा

पुतळ्याला फुंकून टाकले

दुष्टाचे निर्दालन झाले

मनोमनी जनतेस वाटले

आजकालचा रावण येथे

जुन्या रावणा जाळत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


अनेक रावण जिवंत असुनी

मानमरातब त्यांना मिळतो

पुरुषोत्तम मर्यादित, त्याचा

म्हणे मंदिरी वावर दिसतो

रामकथेतिल आदर्शांचे

डोस जमाना सोसत असतो

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?


समाज सारा राम बनावा

प्रत्त्यंचा ओढून धराया

मुठभर रावण वेचवेचुनी

बाण मारुनी नष्ट कराया

कृती न करता, समाज निर्बल

प्राक्तनास का कोसत असतो?

वर्षाच्या उरलेल्या दिवशी

रावणास का पोसत असतो?




निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

 


 

Saturday, October 9, 2021

मॅनिया--( वीक एंड लिखाण. )

  मॅनिया--( वीक एंड लिखाण. )


 बहुतांश लोक कोणत्या ना कोणत्या मॅनियाने ग्रस्त असतात. कळत किंवा नकळत! एखाद्या गोष्टीचे आतोनात वेड असणे याच सदरात मोडते. अशी गोष्ट जर मिळाली नाही तर माणूस अस्वस्थ होतो.  कांही लोकांना संपत्तीचा मॅनिया असतो तर कांहींना लोकप्रियतेचा. अर्थात यात हजारो प्रकार असतात. छंद पोसणे हा जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे; पण छंदाचा अतिरेक होणे म्हणजे मॅनिया.

मी माझे या बाबतीत विश्लेषण केले  आणि एक गोष्ट ध्यानात आली. मी या आधी सांगितले की माझे गझल क्षेत्रातले पदार्पण माझे गुरू औरंगाबादचे डॉ. इकबाल मिन्ने यांचे बोट धरून झाले. जसा मी पुण्याला स्थलांतरित झालो, मी इलाही जमादार यांच्याकडे गझलेसाठी मार्गदर्शन घेऊ लागलो. त्यांनी मला अगदी लहान लहान गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांच्या गझल लिखाणाबद्दल लिहायची अर्थातच माझी कुवत नाही. मला या काळात इलाहींचा मॅनियाच झाला होता म्हणा ना!

मी मंत्रमुग्ध झालो त्यांच्या गझला वाचून. मी त्यांच्याकडून आठ दहा गझल संग्रह विकत घेतले आणि पारायणे सुरू केली त्यांच्या गझलांची. 

परवा बर्‍याच दिवसांनी मला त्यांची आठवण आली. अस्वस्थ झालो. मी त्यांचे माझ्याकडे असलेले सगळे गझल संग्रह काढले आणि जवळ जवळ आठ दिवस वाचत गेलो. अवीट गोडी आणि नजाकत! मोगरा या गझल संग्रहातील दोन शेरांनी मला खिळवूनच ठेवले. काय ती कल्पना शक्ती आणि खयालांची झेप! ते शेर असे आहेत.


आनंद वेचताना आक्रंदने मिळाली

रत्ने गळून गेली मज कोंदणे मिळाली


कळपात काजव्यांच्या आजन्म हिंडलो मी

नुसत्या तुझ्या स्मृतीची तारांगणे मिळाली


हे झाले हळूवार इलाही. शायर काय किंवा कवि काय त्यांची समाजाशी नाळ जुळलेली असेल तर कवितेला एक प्रकारची झळाळी येते. स्त्रियांची परिस्थिती वर्णन कर्तानाचे त्यांचे बोचरे शेर पण वाचण्यात आले. दोन खाली देतोय.


संस्कृतीचा आरसा खरोखर नारी आहे

जिवंत असुनी एक कलेवर नारी आहे


नारी म्हणजे धन दौलत वा जणू खिरापत

मनाप्रमाणे करण्या वापर नारी आहे


शायराचा खरा कस लागतो तो लहान बहरात गझल लिहिताना. त्यांची अशीच एक गझल वाचली. ओळीत फक्त चौदा मात्रा आहेत. त्यातील सहा मात्रांचा रदीफ आहे. तरीही अप्रतिम आहे ही गझल. त्यातील दोन शेर खली देतोय.


वाळूचे तर वाळूचे

चल बांधू घर वाळूचे


गाव झर्‍यांचे खरेच हे

वरवरचे थर वाळूचे


मला या हिमालयाची ऊंची असलेल्या गुरूंचे मार्ग दर्शन मिळाले. ते सांगायचे की शायराने जे सांगायचे ते स्पष्ट आणि वेगळ्या रितीने सांगायचे असते. हे ध्यानात धरून मी असे लिहिलेले दोन शेर खाली देतोय. पहिला आहे एका स्त्रीच्या गोरेपणावर तर दुसरा एकदा कोथिंबीर जुडी ५० रुपायाला एक इतक्या महागाईवर. ते शेर असे.


रेखून चित्र झाले, भरण्यास रंग आता

केशर गुलाब दोन्ही घेतो खलून आहे


केशर डबीत आता कोथिंबिरीस जागा

गगनास भाव भिडले जगणे कठीण झाले


असे हटके गझल लिहिण्याची मला परवा पुन्हा उर्मी आली. विषय होता स्त्रीच्या रुपाचे वर्णन. माझ्या आजोबा पासून सौंदर्य वर्णन म्हणजे डाळींबी ओठ, गालावर खळी, गोरा रंग, हनुवटीवर तीळ वगैरे वगैरे. हे सारे आता तेच ते वाटते. मला हे सर्व टाळून लिहायचे होते. नायिका तर चांगलीच आहे आणि तिला चांगलीच म्हणायचय पण जरा वेगळ्या पध्दतीने. आठवडाभर विचार करून लिहिली एकदाची गझल! खाली देतोय. बघा जमलाय का प्रयोग.


आली असावी उर्वशी


बाग ना फुलली तरी गंधित हवा येते कशी?

बांधला अंदाज की आली असावी उर्वशी


सभ्यही बघती तिला चोरून, राखित सभ्यता

पण बिचारे पाहुनी हसणे तिचे, पडती फशी


मुक्त छंदातून लिहिणार्‍या कवींनाही अता

पाहता तिजला गझल वाटे लिहावी छानशी


पैंजणांचे वाजणेही सांगते कानात की

सोड तू वेड्या तपाला, जिंदगी जग अल्पशी


व्यस्त  असते समिकरण का रूप अन् वय यातले?

कैक वर्षांपासुनी दिसते जणू ती षोडशी


वाढली वर्दळ जशी ती लागली उमलायला

का अडोशाला जगावे, माय सांगे तिज जशी ?


आड आहे, पण भुतांचा, सांगते ती अंगणी

ग्रासता नैराश्य केली रोमिओंनी खुदकशी


भाग्यशाली तोच ज्याची जाहली ती शेवटी

प्राक्तनी इतरास बघणे फक्त स्वप्ने धुंदशी


लेखणी "निशिकांत"ची थकली तिला रेखटता

शेवटी इतकेच लिहिले "रूप ते बावनकशी"



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

वृत्त--देवप्रिया

लगावली--गालगागा X ३ +गालगा


  


Monday, October 4, 2021

योग म्हणूनी जुळून आला

 ( या कवितेस विनोदी म्हणा किंवा जीवनाचे जहाल वास्तव म्हणा. )


ऑक्सिजनचा वातावरणी

कमी पुरवठा असेल झाला

दाखल आयसीयूत व्हायचा

योग म्हणोनी जुळून आला


जीवन शैली तीच असूनी

वेळ पुढे का सरकत नाही?

रात्र आजही काल सारखी

तरी संपता संपत नाही


पत्नीसंगे गप्पा टप्पा

मित्र मैत्रिणी सोडुन झाल्या

भोळीला त्या कळले नाही

आज कशा या तारा जुळल्या?


मुबलक होता वेळ म्हणोनी

एक घेतले पुस्तक हाती

कसले वाचन! कानी माझ्या

माझी मैत्रिण बोलत होती


वहावलेल्या मनास माझ्या

नकोच होती निरव शांतता

चुळबुळ इतकी मनात माझ्या !

शांततेतही दिसे आर्तता


काल जाहले बंद फेसबुक

व्हट्सअ‍ॅपही तया सोबती

असे पुन्हा ना कधीच होवो

अशी विठ्ठला तुला विनंती


काल रात्री फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप दोन्हीही जगभरात बंद पडले औटेजमुळे. त्यावरून सुचलेली कविता.



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Saturday, October 2, 2021

गांधीजी की जय--( वीक एंड लिखाण )

 आपल्या समाजात व्यक्तीपूजेचे मोठे स्तोम आहे. चांगल्या विभूतींची पूजा करणे गैर नाही. पण त्यांचे आदर्श ठेवून आचरण केले नाही तर अशी पूजा फक्त एक कर्मकांड बनून रहाते. एके काळचे मोठे मोठे लोक आपण नमस्कार करण्यासाठीच वापरतो.

हेच राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय दिनांचे पण आहे. रोज कोणता ना कोणता दिवस असतोच असतो. बालिका दिवस, व्हॅलंटाइन डे, भाषा दिवस, ज्येष्ठ नागरिक दिवस असे अनेक. मग आपण तो दिवस साजरा करतो म्हणजे काय करतो? कविता, लेख, एखादी सभा, भाषणे वगैरे वगैरे. यात औपचारिकतेचा भागच जास्त असतो. एक साधे उदाहरण महिला दिनाचे घेऊ या. हा दिवस कित्येक वर्षापासून साजरा केला जात आहे. पण महिलांची ( शहरी सोडून ) परिस्थिती जैसे थेच आहे. आपण अशा दिवसामागचा हेतू लक्षात घेऊन कांहीच करत नाही. हेच स्त्रीभ्रुणाच्या आणि नवजात मुलींच्या बाबतीतही घडते. मुलगा व्हावा म्हणून या काळातही एखादी मुलगी कर्नाटकातील येल्लम्मादेवीला अर्पण केल्याचे बघून समाजाच्या बधीर मनाला कांहीच वाटत नाही ही खरी शोकांतिका आहे.
हेच नेमके जयंत्या आणि स्मृतीदिनांच्या बाबतीतही घडते. आपण सर्व नेत्यांचे या दिवशी गुणगाण गातो. त्यांचे तत्वज्ञान त्रिकालाबाधित असल्याचे सभांमधून सांगतो. त्यांचे तत्वज्ञान दहा टक्केही पाळले असते तर समजात अमुलाग्र बदल दिसला असता एव्हाना. एकेकाळी ज्यांना वंदन करावे अशा व्यक्ती समाजात भरपूर होत्या. त्यांनी समाजाला आकार देण्याचे बहुमुल्य काम केले. आजच्या काळात भोवती नजर टाकून बघा. दिसतात का कुणी विभूती. शायर इलाही जमादार यांनी ही खंत व्यक्त करताना लिहिलेल्या एका गझलेतील दोन शेर खाली देतोय.

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?

रोज अत्याचार होतो आरशावरती अता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?

हेच माझ्या डोक्यात काहूर उठवत होते कांही वर्षांपूर्वी. गांधी जयंती साजरी झाली धुमधडाक्यात. आणि नंतर इलाहीजींची वरील गझल वाचून विचाराचे चक्रीवादळ उठले. मग मन या जयंती साजरी करण्याच्या पध्दतीचा आणि वास्तवाचा विचार करू लागले आणि त्यातून एक कविता जन्मास आली. कविता उपरोधिक झालीय या उद्वेगातून.  पहिल्या चार ओळी लिहिताना मनात आले की एक खेड्यातील अनपढ शेतकरी आपल्या नातवाला विचारतो की आज तारीख काय आहे. त्यांने दोन ऑक्टोबर असे सांगण्यापासून या रचनेची सुरुवात झाली आहे. बघा कशी वाटते ती.

काय म्हणलास पोरा, आज
दोन ऑक्टोबरय व्हय?
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

सगळ्या हापिसात फोटो तुझे,
कैक गावी गांधी रोड
एवढं करून तुझ्या तत्वाशी
बसत नाही जोड
सगळं बघून उपोषणाला
बसशील वाटतय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

खादी भंडरातुन घेतोत
झेंडे, पायजम्याच्या नाड्या
तू रहिलास आश्रमात
आम्ही बांधल्या माड्या
माया जमा करील त्यालाच
म्हनत्यात दिग्विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

नेते लोक भाषण करतील
तुझे गुण गाऊन
झकास बोलता येतय त्यांना
येळ प्रसंग पाहून
सभा संपली, भूक लागली
कोंबडीची नाही गय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

सत्याग्रह शस्त्र शोधलस
स्वातंत्र्य त्याचं फलीत
आम्ही घेतलं हातात जसं
माकडा हाती कोलीत
वेळी अवेळी सत्त्याग्रह
आम्हाला जडलीय सवय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

आजच्या गांधीचं काय सांगू
दिल्लीत बसत्यात
क्वत्रोची कोन इचाराव तर
गालामंदी हसत्यात
तरण्या गांधीला मिळणारय म्हने
सिंहासनाचं वलय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

दुष्ट वृत्ती हिंसा करताना
सगळीकडे दिसत्यात
शांतीप्रिय लोकांना
भ्याड म्हनून हसत्यात
तुझ्या अहिंसेला हिंसेच
वाटू लागलय भय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय

आभाळातला तारा तुटून
अंधारात हरपतोय
अंधाराच्या तिव्रतेनं
प्रकाश झोत करपतोय
होतोय बघा अंधाराचा
प्रकाशावर विजय
आज तर म्हणायलाच पायजे
गांधीजी की जय



निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३