Sunday, December 3, 2017

सूर्य का मला शोधतो आहे ?


अता कुठे सावली मिळाली, चैन भोगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

रखरख वणवण सदैव असते पाचवीस पुजलेली
आयुष्याची घडी त्यामुळे सदैव विसकटलेली
लगाम घालत आकांक्षांना, मजेत जगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जिथे संपतो रस्ता तिथुनी चालू प्रवास होतो
कसे जायचे ध्येय दिशेने, बांधत कयास असतो
अनवट वाटांवरती पाउल खुणा सोडतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

पहिल्या, शेवटच्या श्वासातिल अंतर असते जीवन
त्यात भेटतो कधी उन्हाळा कधी ओलसर श्रावण
दु:ख-वेदनांशी मैत्रीचा सराव करतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जन्मच झाला मुळी मानवा! जगात रडता रडता
जरी कळाले दु:ख सोबती असेल बसता उठता
हात धुवोनी तरी सुखाच्या मागे पळतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

परावलंबी सुखास हिणकस, भाव केवढा आला!
दु:ख नांदते जगी म्हणोनी जन्म सुखाचा झाला
पर्णफुटीला पानगळीचे फलीत म्हणतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?


निशिकांत देश्पांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

पांडुरंगा


सदैव मनात । दिससी स्वप्नात ।
रंगलो तुझ्यात । पांडुरंगा ॥१॥

नको घरदार । नको येरझार ।
दावा मुक्तिद्वार । पांडुरंगा ॥२॥

मोहविते माया । सोकावली काया ।
जन्म गेला वाया । पांडुरंगा ॥३॥

रमलो नात्यात । आलो मी गोत्यात ।
पाय चिखलात । पांडुरंगा ॥४॥

असू दे उपाशी । रोज एकादशी ।
जागा दे पायाशी । पांडुरंगा ॥५॥

मठ्ठ निर्विकार । तरी मी अधीर ।
जागवी लागीरं । पांडुरंगा ॥६॥

जन्म गेला फुका ।पामराचे ऐका ।
माझा व्हावे सखा । पांडुरंगा ॥७॥

गळा तुझी माळ । तोडली का नाळ ।
तुझाच मी बाळ । पांडुरंगा ॥८॥

करमेना घरी । भाऊबंद तरी ।
रमतो मंदिरी । पांडुरंगा ॥९॥

"निशिकांत" म्हणे । कृपेचे चांदणे ।
होवो माझे लेणे । पांडुरंगा ॥१०॥


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, November 11, 2017

जमवला पसारा किती आपुल्यांचा?


जगी एकटा जन्मतो आणि मरतो
तरी ध्यास का मानवा संचयाचा?
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

किती मारती डंख आठव सुखांचे !
जसे दु:ख आले मला साथ द्याया
प्रभावी असे वेदना एवढी की !
सुखे कालची लागली मावळाया
कळा अंतवेळी न टळती कुणाला
मनी छंद का पोसला मृगजळांचा ?
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

प्रयत्ने अथक सोयरा मी यशाचा
घरी राबता नेहमी संपदेचा
मना वाटले, गाठता ध्येय शिखरे
नियंता जणू जाहलो प्राक्तनाचा
कसा काळ गेला? उमगण्या अधी का
दिसे चेहर्‍यावर मळा सुरकुत्यांचा
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

पहावे वळोनी असे काय मागे?
खरी वर्तमानीच चिंता मनाला
भविष्या! तुझ्या अंतरी गूढ इतके!
कळावे कसे ते मला पामराला?
अनिश्चित असोनी "उद्या" वाटतो का
सहारा उद्याच्या विमा पॉलिसांच्या?
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

कुठे वाचले, पुण्य जन्मातले या
नवा जन्म मिळताच कामास येते
म्हणोनीच पुण्यार्जनी जन्म गेला
कराया न जमले मनाला हवे ते
ग्रहण लागले जीवनाला असे की
पुनर्जन्म बनला उगम काळज्यांचा
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

मला वाटले तृप्त जगलो नियंत्या
तरी कावळा का न पिंडास शिवला?
सुखी माणसाचा क्षणार्धात सदरा
कसा हा अचानक असा रे उसवला?
भ्रमासंभ्रमाचेच आयुष्य असुनी
मना मोह पडतो पुन्हा जन्मण्याचा
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Monday, October 30, 2017

चौकटीत का जगावयाचे?


खळखळायचे मनी असोनी
संथ, प्राक्तनी वहावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

परीघ माझा कुणी आखला?
कसे हसावे? कसे रहावे?
व्यास व्हायची क्षमता असुनी
त्रिजा बनविले, तरी हसावे
स्त्री शक्तीचा उदो उदो पण
गुदमरात का रहावयाचे?
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

पतीमुळे सौभाग्यवती स्त्री
लग्न लागता, क्षणात बनते
सुंदर पत्नीमुळे वराचे
भाग्य उजळले कुणी न म्हणते
अशा संस्कृतीच्या कवणांना
निमूट का मी लिहावयाचे?
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

अशा दुटप्पी जगी ठरवले
नको लग्न अन् नको बंधने
मनाजोगती घेत भरारी
सुखावेन मी खुल्या हवेने
बंडखोर आवतार बघोनी
हसोत ज्यांना हसावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

कैक विषारी नजरांना मी
वळणावळणावरती झेलत
जीवन ओझे नसून सुध्दा
संकटांस मी असेन पेलत
मार्ग निवडला मीच तरी का
प्राक्तनावरी कण्हावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

पतीमुळे स्त्री संरक्षित ही
भ्रामक आहे किती कल्पना !
पाचांची द्रौपदी असोनी
केली कृष्णाचीच प्रर्थना
खड्ग घेउनी हाती, रक्षण
मलाच माझे करावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

नव रामायण लिहिता लिहिता
वाल्मिकीसही प्रश्न पडावा
उध्दाराया सती आहिल्या
सिता असावी? राम असावा?
छेद देत मज रुढी प्रथांना
अजन्म आहे लढावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३







Monday, October 9, 2017

मनाजोगते जीवन जगतो


जरी जाहले बाहत्तर वय
आयुष्याला मोजत नसतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

अटी लादल्या मला हव्या त्या
आयुष्यावर निर्धाराने
सदा कासरा धरून हाती
मार्ग चाललो सतत्त्याने
हार, जीत माझीच कमाई
प्राक्तनास ना दोषी म्हणतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

पहिल्या, शेवटच्या श्वासातिल
अंतर म्हणजे जीवन असते
रखरखणारे ऊन कधी तर
जीवन ओला श्रावण असते
किती घेतले? किती राहिले?
श्वास कुणी का मोजत असतो?
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

आत्मवृत्त जर मी लिहिले तर
झरेल जीवन यथार्थतेचे
पानोपानी ऐकू येइल
सुरेल गाणे कृतार्थतेचे
सुर्यास्ताची वेळ असोनी
पहाट गीतांना गुणगुणतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

अजातशत्रू जगून झाले
सारे माझे, मी सार्‍यांचा
मावळतीला विहरत असतो
हात धरोनी मी वार्‍याचा
ऐलतिरावर जगता जगता
पैलतिरावर कविता रचतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

आकाशाला कवेत धरणे
स्वभाव माझा जुना पुराना
संथ चाल पण रियाज केला
द्रुतगतीत गावया तराना
सूर, तान, सम साधत साधत
मैफिलीस मी समाप्त करतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, September 30, 2017

तुझ्या अंतरी एक असू दे


रखरखलेल्या जीवनातही शांत बसोनी मला हसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

निराकार तू निर्गुणही पण, तरी भरवसा नितांत आहे
गोजिरवाणे रूप कल्पिले, भाव ठेउनी निवांत आहे
तुझ्या कृपेचा प्रसाद माझ्या झोळीमध्ये असू नसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

उपास, व्रत, वैकल्ये केली, साधण्यास जवळीक तुझ्याशी
जीवन छोटे, अंतर मोठे, नाते जुळले नैरश्याशी
दोष कशाला तुला द्यायचा? माझ्या वरती मला रुसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

तुझी पताका घेउन देवा अव्याहत मी चालत असतो
काय भले अन् काय बुरे हा विचारही डोकावत नसतो
नसेल जर हे योग्य आचरण, फास गळ्याला घट्ट कसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

"ब्रह्म सत्य अन् मिथ्या जग" हा विचार भ्रामक आचरल्याने
काय मिळाले? आप्तजनांना सातत्त्याने उपेक्षिल्याने?
आज उपरती झाली, माझ्या अपुल्यामध्य मला फसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

जसा खोल मी विचार करतो, त्रेधातिरपिट अंतःकरणी
श्रध्देला शह देते लिलया, तर्क सुसंगत विचारसरणी
वैचारिक वादळ शमवाया, संस्कारांना जुन्या पुसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, September 14, 2017

अस्तित्वाचा तुझ्या दाखला


किती मंदिरे पवित्र क्षेत्रे !
प्रवास केला रुचला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

पूजा अर्चा कर्मकांड अन्
महा आरत्या सदैव होती
नवरात्राच्या एके दिवशी
पशूस एका बळी चढवती
कधी दयाळू भवानीसही
गुन्हा बळीचा कळला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

समान वस्त्रे सर्व घालती
उच्चनीच हा भेद विसरुनी
हज यात्रेचा शेवट करती
सैतानांना खडे मारुनी
पण सैतानी राज्य चालते
भेदभावही सरला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

बालपणीचे श्रीरामाचे
हट्ट बदलले अता एवढे !
हवेच कार्टुन टीव्ही वरती
चंद्र नभीचा ! तया वावडे
निंबोणीच्या आड चंद्रही
अशात गाली हसला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

नवीन व्याख्या लिहू लागलो,
आम्हीच वेडे, कसे जगावे ?
गोंधळलेला पार्थ आजही
पुन्हा जन्मुनी कृष्णा यावे
पाप काय अन् पुण्य काय हा
कधीच गुंता सुटला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

जीवन अपुले, जगणे अपुले
देव कशाला हवा गड्यांनो ?
जगणे झाले, मरून झाले
जळा चितेवर अता मढ्यांनो
धावा केला सदैव पण तो
विटेवरूनी हलला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, August 20, 2017

घना अंधेरा मेरा साथी


जगमग झिल मिल दुनिया सारी, मेरे घरमे दिया न बाती
रिश्ता है यह जनम जनमका, घना अंधेरा मेरा साथी

नौ दो ग्यारह सभी हो गये, सवार मुझपर तनहाई है
इर्द गिर्दमे विरान बस्ती, सुनी कभी ना शहनाई है
ऊबगया हूं इस दुनियासे, मौत मुझे है अब ललचाती
रिश्ता है यह जनम जनमका, घना अंधेरा मेरा साथी

लाख ढूंडनेपर भी मुझको, अतीतमे ना खुशी मिली है
आगेभी बस यही सिलसिले, मुरझाहट क्या कभी खिली है?
चेहरेकी मुस्कान खो गयी, मायूसी अब है इठलाती
रिश्ता है यह जनम जनमका, घना अंधेरा मेरा साथी

कफ़न नही है, जमीं नही है, लावारिश क्यूं लाश पडी है?
अचेत मनवा खुश मरनेसे, जीनेकीही सज़ा कडी है
तलाशता हूं हमदम जिसके तौरतरिके हो जजबाती
रिश्ता है यह जनम जनमका, घना अंधेरा मेरा साथी

नयननसे असवनके मोती गिरागिराकर क्या पाओगे?
टूट गये जो अंदरसे तो मंज़िल तक कैसे जाओगे?
सवारना तुम खुदको खुदही, सीख जिंदगी है सिखलाती
रिश्ता है यह जनम जनमका, घना अंधेरा मेरा साथी

सुखमे हसना, दुखमे रोना जीवनकी है यही वंचना
सावनका हो गीत कभी या मीराकी दुखियारी रचना
मधुर  स्वरोंमे बध्द पंक्तिंया, छूकर दिलको है बहलाती
रिश्ता है यह जनम जनमका, घना अंधेरा मेरा साथी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३





Wednesday, August 16, 2017

नाते जुडून गेले

नाते जुडून गेले---( एका नराधमाने आपल्या मुलीवर सतत नऊ वर्षे बलत्कार केल्याची घटना २००९ मधे वर्तमानपत्रात आली होती. त्या वरून पिडित मुलीचे मनोगत व्यक्त करणारी मला सुचलेली रचना ).

कसले नशीब माझे?
का हे घडून गेले?
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

रक्षा जिची करावी
तिजलाच लक्ष्य केले
निष्पाप पाडसाला
त्यानेच भक्ष्य केले
राहू समेत केतू
दारी रडून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

जल्लाद हवा शिकण्या
फंदा कसा कसावा?
बापास सुळी देण्या
आक्षेप का असावा?
दररोज एक मृत्यू
जगता चिडून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

नाती अनेक जगती
फसवा आलेख आहे
मादी सदा नराची
कटु सत्य एक आहे
आकाश वळचणीला
तारे झडून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

नाना, नकोय मामा
काकाविना जगावे
अदृष्य राक्षसांना
झोपेत घाबरावे
भयमुक्त विश्व कोठे
आहे दडून गेले?
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

बडवू नकात टिमकी
श्रीमंत संस्कृतीची
नात्यात गुंफलेली
मी गोष्ट विकृतीची
पापात पुण्य सारे
आहे बुडून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

भगवंत मायबापा
जर का असेल माया
आई बनून येई
नेण्यास भ्रष्ट काया
बघता पित्यास, वाटे
नाते विटून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३






Sunday, July 23, 2017

मुलाखात -- माहितीस्तवः---

मुलाखात -- माहितीस्तवः---

कविता रसिक मंडळी ( करमं ) तर्फे "आदाब अर्ज है-२" हा गजल मुशायर्‍यासहित अडीच तासाचा भरगच्च कार्यक्रम २२.०७. २०१७ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे आयोजित केला होता. कार्यक्रम खूपच रंगत गेला आणि प्रेक्षकांची उदंड दाद मिळाली. या कार्यक्रमात माझी मुलाखात प्रसिध्द कवयित्री आणि ज्येष्ठ साहित्यकार  श्रीमती स्वाती शामक यांनी घेतलीजी वेळेच्या बंधनामुळे २५ मिनिटे चालली. या कार्यक्रमास करमं या व्हाट्सअ‍ॅप समूहाच्या व्यतिरिक्त गझल क्षेत्रातले आदरणीय सर्वश्री  राम पंडीत , म.भा. चव्हाण, वैभव जोशी, अ‍ॅड प्रमोद आडकर, हास्यपंचमीकार श्री बंडा जोशी ई. पण उपस्थित होते. माझ्यासाठी हा अत्यंत बहुमोल आणि अविस्मरणीय  क्षण होता. या मुलाखातीवर दोन दिग्गज कवी तथा गझलकार श्री भूषण कटककर ( बेफिकीर ) आणि सारंग भणगे यांनी केलेले मतप्रदर्शन सर्वंच्या माहितीस्तव देत आहे.

१) भूषणजी कटककर--

"निशिकांत - स्वाती मुलाखत -

दोघेही ज्येष्ठ वयाचे सदस्य एकमेकांशेजारी शोभून दिसत होते. निशिकांत काकांच्या गझलेचा प्रवास आजवर पुरेसा उलगडला गेलेला नव्हता. मनुष्याला एखादा काव्यप्रकार कसकसा आकर्षित करतो ह्याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. स्वातीताईंनी मुलाखतीला योग्य वेळी योग्य वळणे दिली. निशिकांत काकांनी त्यांच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे सांगताना एकाचवेळी काही मौलिक मते तर काही खुसखुशीत वाक्यांची पेरणीही केलेली होती. मला वाटते की अशी मुलाखत हा 'आदाब अर्ज है' चा एक अविभाज्य भाग बनावा. खरे तर मुलाखतीला अधिक वेळ दिला जावा असे वाटत होते पण मुळातच भरगच्च कार्यक्रम असल्याने व एकंदरीत कार्यक्रम सुमारे २५ मिनिटे उशीरा सुरू झाल्याने आवरते घ्यावे लागले ह्याचा काहीसा खेद वाटला. "

"२) सारंग भणगे--

निशीदेंची मुलाखत केवळ रंजक नव्हती, तर बोध घेण्यासारखी सुद्धा होती. स्वातीताईंनी छान हाताळली आणि निशीदेंनी मनमोकळेपणाने आणि कुठलाही आव न आणता प्रामाणिकपणाने त्यांच्या भावना आणि काही विचार मांडले ते नीट विचार करता खूपच बोधक होते. ‘मलाही काही मर्यादा आहेत’ ही प्रामाणिक कबुली असो कि ‘कुणाच्या गझलांचा माझ्या गझलांवर प्रभाव पडला हे सांगून मी त्यांचा अपमान करू शकत नाही’ ही विनयशीलता असो, निशीदेंची मुलाखत खूप काही बोलून गेली!"

वयाचे अणि शायरीचे तसे कांही नाते नसते हे सर्वांना पटवून देण्यासाठी या प्रसंगी सखीवर मी लिहिलेले ३ सुटे शेर वाचून दाखवले ते असे:-

१) जशी चाळली डायरी जीवनाची, तुझ्या पावलाचेच दिसले ठसे
    समासातला कोपरा एक माझा तरी पान माझे म्हणावे कसे?

२) असे पैंजणांना नको वाजवू ना! शिकावेस चालावयाला हळू
    तुझ्या चाहुलीने उरी आस जागे, मनाला सखे आवरावे कसे?

३) तू गेल्यावर असे वाटले जीवनात ना राम राहिला
    आज कळाले आठवातही ऊर्जा असते जगावयावी

या वयात अशी शायरी? हे श्रोत्यांच्या मनात कदाचित आले असेल म्हणून शंकानिरसनार्थ पुन्हा दोन शेर वाचून समारोप केला मुलाखतीचा. ते शेर असे:--

१) वयस्क झाल्या कलमेमधुनी सळसळ झरते तरुणाई; पण
   सुरकुतलेला शायर बघुनी; चर्चा होते फक्त वयाची

२) मनी कसा "निशिकांत"नांदतो वसंत अजुनी?
    वार्धक्याचे कलंदराला नसते दडपण



निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३  

Monday, July 17, 2017

मी माझा उरलो नव्हतो

मी माझा उरलो नव्हतो--(असे म्हणतात की लग्नानंतर स्त्रीच्या जीवनात खूप मोठे बदल येतात. पण माझ्याही जीवनाच्या रंगात विवाहानंतर अमूलाग्र बदल झाले आहेत. आज पत्नीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृतार्थ भावनेने हे बदल नोंदवण्यासाठी लिहिलेली कविता).

मी माझे मीपण त्यजुनी
क्षणभरही जगलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

दुनिया माझी काळोखी
अन् रातकिड्यांची संगत
मी करी माझियासंगे
एकांती अंगत पंगत
ती मला भेटण्याआधी
क्षितिजावर फिरलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

शिडकावा दवबिंदूंचा
ही पहाट ओली ओली
अन् गंध फुलांचा ताजा
व्यापतो मनाची खोली
एकटा विहंगम बघण्या
मी धुक्यात विरलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

जीवनात जगण्याजोगे
शोधू या दोघे मिळुनी
घेऊ या ईंद्रधनुंच्या
रंगांना सार्‍या खलुनी
हातात हात आल्याने
मी उदास उरलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

तोडल्या चौकटी सार्‍या
आयुष्य जगायासाठी
उकलून पटापट गेल्या
ज्या काचत होत्या गाठी
एकटा कलंदर इतका!
जीवनास दिसलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

घेतली डायरी लिहिण्या
स्थित्यंतर माझ्या मधले
कालचा आज मी नाही
हे पदोपदी जाणवले
ही किमया सर्व सखीची
लिहिण्यास कचरलो नाही
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, June 30, 2017

भाव विठुचे दाटले


वाट धरिता पंढरीची
दु:ख सारे आटले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

ज्ञानया तुकया आले अन्
तेज दिंडीस लाभले
टेकुनी माथा, फुलांनी
पालखीला सजवले
भजन गजरी धुंद सारे
भान कोणा कोठले?
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

भक्तिमय सारेच झाले
टाळ, मृदंग अन् वीणा
शोध घेता सापडेना
एकही मन विठुविना
किर्तनी रंगून सारे
पुण्यमार्गी लागले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

घालण्या मार्गात रिंगण
वारकरी सरसावले
पाहुनिया दृष्य सुंदर
देवही भारावले
पुष्पवृष्टी वरुन होता
धन्य भक्ता वाटले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

वारकरी चौफेर दिसती
आसमंत भरुनी वाहिला
आतुरल्या त्यांच्याच नयनी
सावळा मी पाहिला
दो

दिव्य झाले वस्त्र अंगी
होते जुने जे फाटले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

चंद्रभागी वाळवंटी
वारकरीगण झोपले
सर्व नेत्री स्वप्न एकच
नाते विठुशी गुंफले
अंगणी छायेत हरीच्या
ब्रह्म त्यांना गावले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३





Wednesday, June 7, 2017

सांजवेळी चाळवू या


पेलले ओझे,जिवाचा
शीण थोडा घालवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

जे घडावे ते न घडले
प्रक्तनाचा खेळ सारा
भोगला होता किती तो!
भावनांचा कोंडमारा
जिंकली आहे लढाई
चल तुतारी वाजवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

चैन म्हणजे काय असते?
हे कुठे माहीत होते?
पोट भरण्या घाम आणि
कष्ट हे साहित्य होते
भोगले अन्याय जे जे
चल जगाला ऐकवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

वेदना भोगीत चेहरा
नाटकी हसराच होता
मुखवट्याच्या आत दडला
तो कुणी दुसराच होता
लक्तरे शोकांतिकेची
चावडीवर वाळवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

दोन असतील फक्त नोंदी
जन्मलो मेलो कधी त्या
आत्मवृत्तातील पाने
का अशी कोरी विध्यात्या?
मोकळ्या पृष्ठावरी चल
दु:ख थोडे गोंदवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

हे कवडशा सांगतो मी
तू घरी येऊ नको रे!
मस्त काळोखात जगतो
तू दया दावू नको रे
तेवला नाही कधी जो
दीप तोही मालवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३


Tuesday, May 30, 2017

तुम्हीच तर ठरवायचं

जाईच्या मांडवात
का काँक्रिटच्या तांडवात
शंभर कौरवात का
फक्त पाच पांडवात
कुणी कुठं रहायचं?
तुम्हीच तर ठरवायचं
पिझ्झा कोकचा आहार
का बर्गर चिप्स बहार
मऊ भात पिठल्यावर
गावरान तुपाची धार
पोट कसं भरायचं?
तुम्हीच तर ठरवायचं
रोज दारू पिण्यात
अन् बेहोष जगण्यात
का विठूच्या भजनात
देह भान विसरण्यात
सूख कशात बघायचं?
तुम्हीच तर ठरवायचं
मंत्री पदाचा साज
कानाखाली आवाज
का अमरण उपोषणाचा
अण्णाजींचा रिवाज
कुणाकडून शिकायचं?
तुम्हीच तर ठरवायचं
दीर्घायुष्यी बनणे
अन् पिकता पान गळणे
दवबिंदूसमान थोडंच
पण चमकत चमकत जगणे
ध्येय काय ठेवायचं?
तुम्हीच तर ठरवायचं
स्मरायचाय गुरूमंत्र
की जुनेरं प्रेमपत्र
जगत जगत शेवटचं
आयुष्याचं सत्र
कशात किती रमायचं
तुम्हीच तर ठरवायचं
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, May 25, 2017

मला जगू द्या


आर्त हाक ना कुणी ऐकली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

माता, भागिनी, सून जगाला हवी हवीशी
पण कन्या का गर्भामधली नको नकोशी
जन्मायाच्या अधीच रडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

एकच गाणे तिच्या नशीबी कारुण्याचे
जन्मच अवघड, स्वप्न कुठे मग तरुण्याचे?
करुणाष्टक ती गात राहिली "मल जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

देवदूत जे डॉक्टर, झाले अता कसाई
मुल्य पराजित, स्वार्थ जिंकतो, कशी लढाई?
श्वास घ्यावया ती तडफडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

स्थान स्त्रियांचे विसर पडावा समाजास का?
गर्भाशय हे स्मशान बनले स्त्री भ्रुणास का?
समाज बहिरा, ती ओरडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

नकोच मुलगी, कठोर काळीज. बाप रांगडा
गळा घोटला, श्वास थांबला दीन बापडा
शांत जाहली, हाक थांबली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

टीपः-शहरात शिक्षणामुळे दृष्टीकोन खूप बदलला आहे. पण खेड्यात खूप बदल व्हायला हवा.


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, May 2, 2017

दोघामधले विरान अंतर


चंद्र हरवला, आशा होती मिळेल नंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

कधी रिकामे हृदयीचे सिंहासन नसते
नसूदे मनी, कुणी तरी त्यावरती बसते
शल्य मनाला, रुचले नाही हे सत्तांतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

लग्नाच्या बेडीने का मन कैदी बनते?
चौकटीतही सदैव स्वच्छंदी भिरभिरते
जगण्यावाचुन आठवात नसते गत्त्यंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

यथावकाशी वेलीवरती कळी उमलली
मळभ संपुनी पूर्वा होती लाल उजळली
उदासीत क्षणभंगुर हसरे हे मध्यंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

काळ निघोनी गेला पण वळता वळणावर
अजून दिसतो पहिल्या प्रेमाचा का वावर?
कशी पोकळी? क्षणोक्षणी देते प्रत्त्यंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

हात रिकामे, चिमटीमधुनी सर्व निसटले
आठवणींच्या वणव्यामध्ये सदैव रमले
गुदमरलेले श्वास तरी घेतले निरंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



सांगा कुठे हरवले?


मंदीर मारुतीचे कोणी कुठे हलवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?

तो पार मंदिराचा, रात्री जमून सारे
सुख दु:ख सांगताना जाती रमून सारे
हुंकार वेदनांचे नव्हते कुणी लपवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?

जागेत मम घराच्या झालाय मॉल आता
डीजेवरी डुलूनी धरतात ताल आता
येथे शुभंकरोती होते मला शिकविले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?

विकतो पिझा दुकानी, म्हणतात हट तयाला
गर्दी अमाप असते, आळस घरी बयेला
आईत अन्नपूर्णा, मजला जिने भरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?

तांदूळ हातसडीचा शिजवीत माय होती
साजूक तूप, माया ओतीत साय होती
सारेच लाड माझे होते तिने पुरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?

शाळा इथे असावी, तो काळ दूर नव्हता
गणवेष बूट कसले? शिकण्यात सूर होता
आदर्श पाठ येथे होते किती गिरवले
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?

झोतात पश्चिमेच्या का लोप संस्कृतीचा?
दिसतोय काळ आला बेभान विकृतीचा
विझण्यास झोत आम्ही काहूर का पुरवले?
येथील गाव माझे सांगा कुठे हरवले?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३







Sunday, April 30, 2017

ओसरी कोणी सारवत नाही


दिवस उगवतो पूर्वीसारखा
कोंबडं कधी आरवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

भोळी अनपढ बहिणाबाई
चार वेद सांगून गेली
सोप्या चार ओळीची भीक
सरस्वती घेऊन गेली
बाबा ब्लॅकशिपची गुटी देतोय
ओव्या अभंग भरवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

आईला माझ्या वेळ नाही
महिला मंडळ, सखी मंच
स्त्री अन्यायाविरुध्द मोर्चा
कधी डिनर कधी लंच
पेप्सी, चॉकलेट सारे देते
मायेनं हात फिरवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

बघून स्त्रीचं मंगल रूप
देवी मानून करतो पूजा
शक्ती जाणून तिला कल्पिले
चतुर्भुजा अन् अष्टभुजा
स्त्री भ्रुण हत्येसम पापाचा
जगात दुसरा पर्वत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

चाणाक्याच्या या देशात
राजनिती नासून गेली
देशाच्या उजळ चेहर्‍याला
काळिमा फासून गेली
सारे एका माळेचे मणी
मतदान आज करवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

सगळच जग बदललय कसं
चांगलं जुनं दिसत नाही
कृष्ण कन्हैया शिट्टी मारतोय
गालात गोड हसत नाही
सूर्य बसलाय ढोलीत दडून
भ्याड प्रकाश मिरवत नही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

आरशामध्ये बघून सांगतोय
चांगल्या कविता लिहीत नाही
जशी मागणी तसा पुरवठा
हे काय मला माहीत नाही?
नवकाव्याची मुजोर मस्ती
कोणीच कशी जिरवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, April 28, 2017

स्वप्न रंगवित असतो


आयुष्या! लोभसवाणे
मी तुला चितारित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

खाचा, खळगे रस्त्यांचे
ही तुझी देणगी देवा
चाखली मजा आनंदे
समजून संकटे  मेवा
वेदनेस कुरवाळावे
मी मलाच शिकवित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

मी अपार दु:खे माझी
ना कोणाला सांगितली
अन् भीक दयेची देवा
का कधी तुला मागितली?
देवास कोसणार्‍यांना
मी सदैव हिणवित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

एकदा कळाल्यावरती
नाते ऋणानुबंधाचे
आहे जे व्यथेसवे ते
प्रेमाने जपावयाचे
मी निवडुंगाला सुध्दा
अंगणात फुलवित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

सुखदु:खांचे असणे अन्
नसणेही मीच ठरवतो
व्याख्यांना जुन्या पुराण्या
मी पदोपदी ठोकरतो
माझ्या मी कलंदरीला
खतपाणी घालत असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

संपल्या वेदना सार्‍या
स्वरस्य अता ना उरले
ऐलतीर सोडायाला
मन किती तरी आतुरले!
पैलतीर हल्ली मजला
सारखा खुणवित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, April 12, 2017

सुखात जगलो


हात धरोनी हाती, दोघेही मोहरलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

ग्रिष्म असोनी मल्हाराचे सूर छेडले
वादी अन् संवादी स्वरही चिंबचिंबले
राग असोनी अनवट दोघेही गुणगुणलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

रंगपंचमी जीवन सारे रंग उधळले
रंग टाकले जे अंगवर, मनात रुजले
कधी वेगळे आपण दोघे कुणा न दिसलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

अल्पायुष्यी बहार असते अनुभवायला
वसंत अमुचा नकार देतो मावळायला
रोमांचांना पांघरुन दोघे शिरशिरलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

येत नसोनी जरा व्याकरण, शब्द वेचले
आठवणींच्या मोत्यांना धाग्यात ओवले
आत्मकहाणी वाचत दोघे धुक्यात रमलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

आयुष्याची जरी सांगता दु:खी असते
पुनर्जन्म ही खळखळणारी उर्मी बनते
पहाट दिसता नवजन्माची, खुशीत हसलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३





Wednesday, April 5, 2017

झुगारून मी जगतो आहे


हार असोनी निश्चित माझी
जिद्दीने धडपडतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

भावविश्व हा बालेकिल्ला
भक्कम आहे आयुष्याचा
जिथे पाहतो वावर माझ्या
अंधराचा, जाज्वल्याचा
जे घडले ते मीच घडवले
खुशीत हसतो, रडतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

गेले वृंदावन तुळशीचे
अंगण कोठे लुप्त जाहले?
खुराड्यास सदनिका म्हणोनी
जीवन आहे बरे चालले
टोच सोसण्या अधोगतीची
बधीर काळिज करतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

वळणावळणावरती लाखो
लोक भेटले, निघून गेले
मोजकेच, पण भेटल्यातले
जीव लाउनी छळून गेले
झाकत जखमा भळभळणार्‍या
केविलवाणे हसतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

लिहावयाला जरी घेतले
आत्मवृत्त मी मृत्यूनंतर
पानोपानी एल्गाराचे
वाचकास येइल प्रत्त्यंतर
दिल्यास तू ज्या व्यथा प्राक्तना
समासात मी लिहितो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

बांधलेस प्रश्नांचे तोरण
तूच जीवना दारावरती
जगतो आहे रुबाबात मी
श्वास थांबुनी मेल्यावरती
थाटाने मी चारजणांच्या
खांद्यावरती निघतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, February 16, 2017

चांदण्यात बघण्याची

चांदण्यात बघण्याची

चाहुल देते झुळझुळणारी
हवा तुझ्या येण्याची
सवय लागली तुझा चेहरा
 चांदण्यात बघण्याची

रोमांचांनी मोहरतो  मी
तुझी आठवण येता
ध्यास मनाला तुझाच असतो
सदैव उठता बसता
ओढ लागली कधी पासुनी
स्वप्न पूर्ण होण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

समोर ये तू, गीत तुझ्यावर
लिहावयाचे आहे
गूज मनीचे शब्दांमधुनी
रंगवायचे आहे
आपण ठरवू कशी असावी
चाल मस्त गाण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

मनात माझ्या एक कोपरा
गहाण तुझियापाशी
जिथे ठेवल्या शिंपल्यातल्या
आठवणींच्या राशी
तुला मोकळिक सदैव आहे
हृदयी वावरण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

निळ्या चांदण्यातले शिल्प तू
अपार लोभसवाणे
तुझ्या दिशेने नजरकडांचे
मधाळ येणे जाणे
चंद्र सोडुनी आस लागली
फक्त तुला बघण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

तुला कळाव्या कशा झळा त्या
ग्रिष्माच्या जगताना?
वसंत वेडा तुझ्याभोवती
रेंगाळत असताना
तशीही तुला हौस केवढी!
क्षणोक्षणी फुलण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, January 29, 2017

तरी एकटी नांदत असते


गूज मनीचे सांगायाला
आरशासवे बोलत असते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते

नसे बालपण आठवायला
तारुण्याची तीच कहाणी
वसंत आला, निघून गेला
ग्रिष्माची नेहमी विरानी
वेदनेतही जीवन गाणे
आळवीत ती सुरात असते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते

विद्याविभुषित झाली होती
मोठी आशा मनी ठेउनी
स्वप्न केवढे साधे होते
जगावयाचे माणुस म्हणुनी
वशिला नाही तिला कुणाचा
तरी नोकरी शोधत असते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते

सराव असुनी अंधाराचा
म्लान म्लानसे दिसे पाखरू
गौतम बुध्दा जरा लक्ष दे
खचते आहे तुझे लेकरू
हास्य लेउनी ओठावरती
अंतरात ती खितपत आहे
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते

हिरे, माणिके अन् रत्नांचे
स्वप्नही तिला कधी न पडले
काल संपला, आज जगाया
जिद्दीने लढते, धडपडते
नैराश्याला दूर ढकलुनी
पुढे पुढे ती चालत अस्ते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते

तिला मिळाली गार सावली
अनामिकाची जशी अचानक
हास्य उमलले ओठांवरती
भूतकाळ विसरुनी भयानक
आनंदाच्या डोही हल्ली
सूर मारुनी पोहत असते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, January 17, 2017

प्रजोत्पादनासाठी


सुडौल तरुणी गरीब, पुसते खळगी भरण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

जाहिरात वाचुनी जोडपी कैक चौकशा करती
सरोगेट मम्मी होण्याचा भाव काय? ते पुसती
हवी उच्चभ्रू वांझ स्त्रियांना दीपक अथवा पणती
निपुत्रिकाचे जीवन जगणे नको नको त्या म्हणती
अपत्त्य होऊ शकणार्‍या ललनांचे तर्क निराळे
"नकोच आई होणे" बांधा, उभार जपण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

ठरलेल्या सौद्याची राशी फक्त प्रेरणा होती
व्यापाराचे सूत्र पाळले, कुठे भावना नव्हती
व्यभिचाराची टोच कशाला? जिथे वासना नव्हती
यशस्वीपणे केली क्रत्रिम गर्भधारणा होती
काळ चालला हळू केवढा! तगमग शिगेस गेली
दोन्ही बाजू वाट पाहती बाळ जन्मण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

जशी घडी येऊन ठेपली तसा जन्मला कान्हा
व्हायचे तसे सर्व जाहले, समाधान सर्वांना
सौदा होता जरी जन्मण्यामागे इवला तान्हा
जन्म घातलेल्या आईला फुटू लागला पान्हा
घालमेल जाहली सुरू अन् उशीर झाला कळण्या
नाळ कापली बाळाशी, नेहमी काचण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

बाळ दिले व्यवहार संपला, तगमग सांज सकाळी
दु:ख लागले हात धुवोनी मागे तिन्ही त्रिकाळी
चूक जाहली सरोगसीची, करती सर्व टवाळी
तिने खरे तर दु:ख घेतले लिहून अपुल्या भाळी
पुसेल का ती पुन्हा कधी लोकांना पैशासाठी?
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

सौंदर्याचा ध्यास जयांना अन् त्या निपुत्रिकांनी
पैशाच्या जोरावर असते केलेली मनमानी
बालगृहातिल बाळ शोधुनी एखादे अनवाणी
दत्तक घेउन म्हणता येती अंगाईची गाणी
माफक आहे किती अपेक्षा सुजाण लोकांकडुनी!
निराधार एका बाळाचे भाग्य खुलवण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?


निसिकांत देशपांडे




Thursday, January 12, 2017

हसावयाचे


आनंदाचा लेप लाउनी जगावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

मंतरलेला काळ आठवे जेंव्हा जेंव्हा
गंध दरवळे मनात माझ्या अमाप तेंव्हा
भूतकाळच्या हेमकणांना टिपावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

नभास बाहूमधे भरावे, मनी इरादा
चौकटीतला गुदमर सोसुन काय फायदा?
धीर धरोनी श्वास मोकळे भरावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

जिथे जायचे तिकडे सारे उडून गेले
एकलपणचे सदैव असते रिचवत प्याले
विरान रस्त्यानेच एकटे फिरावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

कधी न दिसतो त्या देवाला पूजत असते
सुख ना येते कधी अंगणी, उदास नसते
मनी ठरवले बंडखोर मी बनावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

आत्मवृत्त मी लिहावयाला तयार नाही
लपवायाला एक जीवनी भुयार नाही
जीवन गाणे ध्वनिमुद्रित मज करावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३