Friday, September 16, 2016

किती कोडकौतुक किती सोहळे ते--( भुजंगप्रयात )

जरा धाक होता जरूरी मनाला
म्हणोनी तुला निर्मिले मानवाने
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने

तुझा गवगवा वाढवायास लिहिल्या
हजारो कथा, काल, थोतांड आम्ही
अविष्कारिले पाप, पुण्यास सुध्दा
मनी जागवायास भयंगंड आम्ही
सुरू जाहला कोंडमारा मनाचा
रुढीचे उभे राहिले कैदखाने
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने

अवाढव्य, चित्रांस, किंमत मिळे पण
कधी चित्रकारास पुसतो न कोणी
तुझा फक्त डंका जगी वाजतो अन्
खर्‍या शिल्पकारास बघतो न कोणी
तुला लाभते पालखी, न्याय कुठला?
नि भोई बनावे तुझ्या करवित्याने
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने

तुझी पाद्यपूजा, तुझी आरती अन्
तुझ्या भव्य दिंड्या, तुझी कैक क्षेत्रे
न कळले कधी दास केलेस आम्हा!
ससे जाहले माणसे सर्व भित्रे
जनाधार देवा हवासा तुलाही
तरी भक्त केलेस का दीनवाणे?
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने

"जसे ठेवतो देव तैसे रहावे"
अशा धिकवणीचीच जडली बिमारी
तुझीही महत्ता कमी खूप झाली
नि शिरजोर झालेत पंडे पुजारी
जरी क्षुद्र माणूस, दगडा! तुला मी
दिले देवपण माखुनी शेंदुराने
किती कोडकौतुक किती सोहळे ते!
अहोरात्र केले तुझे रे! जगाने


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३


Friday, September 9, 2016

मी पिशाच्च बनलो आहे.----

( अतृप्त भटकत्या आत्म्याचे मनोगत सांगणारी आगळी वेगळी कविता; पक्ष पंधरवाड्याचे निमित्त साधून. )

प्रेमात आपुल्यांच्या मी
एवढा गुंतलो होतो !
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

आजही भटकतो आत्मा
का आसपास पोरांच्या ?
राबता सुखांचा राहो
भरभरून दारी त्यांच्या
दिसताच नात रडताना
पळभर गलबललो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

सळसळ पिंपळ पानांची
जी होती तशीच आहे
अंगणात फुलवेलींची
थरथरही जुनीच आहे
मी मेलो, काय बदलले?
प्रश्नात गुंतलो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

पिंडदान करतेवेळी
कावळा शिवेना जेंव्हा
" काळजी नीट आईची
घेऊत" म्हणाले तेंव्हा
पोरांच्या विश्वासावर
पिंडाला शिवलो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

श्राध्दा दिवशी माझ्या मी
पाहिले, घरी फिरताना
मोबाइल, संगणकावर
सारेच काम करताना
विसरले मला! मी माझ्या
डोळ्यातुन झरलो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

अजरामर का हा आत्मा
भटकावयास जगदिशा ?
जीवना ! हारलो बाजी
ना मनात उरली ईर्षा
प्रेमाचे घेउन ओझे
मरणोत्तर फिरलो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, September 3, 2016

शाश्वत हसतो


आभासाच्या विश्वासावर जगतो आहे
नश्वर सारे असून शाश्वत हसतो आहे

शास्त्र पुराणे लाख सांगती, माया सारी
ब्रह्म सत्त्य अन् मिथ्या सारी दुनियादारी
प्रेम चिरंतन माते चरणी बघतो आहे
नश्वर सारे असून शाश्वत हसतो आहे

मला न ठावे देव नेमका कुणा पावला
स्तोत्र वाचुनी जगी कुणी का सुखी जाहला?
कर्मकांड का जगात जो तो जपतो आहे?
नश्वर सारे असून शाश्वत हसतो आहे

पुनर्जन्म थोतांड कल्पना कुणी रुजवली?
पाप, पुण्य, मुक्तीची सांगड कुणी घातली?
जे नाही त्या मागे मानव पळतो आहे
नश्वर सारे असून शाश्वत हसतो आहे

धर्म अफूची गोळी असते धर्मांधांना
"जिहाद" फलनिष्पत्ती दिसते सामांन्यांना
वर्ख अधर्माला धर्माचा मिळतो आहे
नश्वर सारे असून शाश्वत हसतो आहे

युगायुगांची पुरे जाहली दुकानदारी
पुंगीवरती लोक डोलती, तुम्ही मदारी
झुगारण्या जोखडास जो तो झटतो आहे
नश्वर सारे असून शाश्वत हसतो आहे

सत्कर्मांचा ध्यास असू द्या, नको फारसे
भय न असावे कुणाच्या मनी कधीही असे
"क्षितिजापुढचा नसणाराही रुसतो आहे"
नश्वर सारे असून शाश्वत हसतो आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३