Monday, February 15, 2021

पदर खोचला होता

 

असून स्त्रीभ्रुण, जगात माझा

जन्म जाहला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


जन्मताच मी रडले, लागुन

नव्या जगाचा वारा

पदराखाली तिने घेउनी

दिधल्या अमृत धारा

याच दुधाने कसे जगावे?

धडा शिकवला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


आल्यावरती पदर, घेतली

साडी मज आईने

पदरावरती मोर छानसा

विणलाही घाईने

पदर घ्यायचा चापुन चोपुन

पाठ गिरवला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


सुटले घर, लग्नात बांधली

गाठ जशी नवर्‍याशी

माझ्यासाठी घर जे होते

उत्तर दक्षिण काशी

अश्रू पुसण्या तुझाच आई

पदर शोधला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


पदरमोड कष्टांची करुनी

गाडा रेटत होती

आज नसोनी, वळणावरती

आई भेटत होती

संकटकाळी लपावयाला

पदर न उरला होता

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता


भिन्न मनाचे पदर एवढे!

जीवन सारे गेले

उलगडले पण तरी हजारो

उकलू ना शकलेले

हर पदराचा रंग जीवना

कुणी जाणला होता?

आईनेही जन्म द्यावया 

पदर खोचला होता



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Tuesday, February 9, 2021

बसून पिऊ या घरात

(चाल--मराठी गीत-- तुझी नि माझी गम्मत वहिनी ऐक सांगते कानात, आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात.)


आज करू या गम्मत जम्मत

ऐक सांगतो कानात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात


किती ओतसी सोडा रे!

आणि केवढा चिवडा रे!

जास्त ओत ना व्हिस्की मित्रा

आधी माझिया ग्लासात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात


रंग लागला जसा चढू

काय गोड अन् काय कडू?

कसे कळावे? भान हरवले

बोलत सुटले जोरात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात


पुढील पार्टी कुणाकडे?

पाठव वहिनी आईकडे

पुन्हा एकदा नवीन मैफिल

मस्त रंगवू जोशात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात


दार वाजले टका टका

उघडा यारों भिऊ नका

गाडी चुकली, घरी परतली

उभी कैकयी दारात

बायको गेली माहेरी चल

बसून पिऊ या घरात



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३ 


Saturday, February 6, 2021

व्हायचे ते जाहले

व्हायचे ते जाहले

आज मी माझ्यात नाही
व्हायचे ते जाहले
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले

भोवती अंधार सारा
संपता संपेचना
वाट बघुनी पूर्ण थकले
सूर्य पण उगवेचना
जीवनाशी तह करोनी
श्वास होते घेतले
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले

का व्यथा इतरास सांगू?
मीच माझी सोबती
प्रश्न माझे, दु:ख माझे
वाजवू का नौबती?
व्यक्त होण्याला कधी मी
आरशाशी बोलते
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले

नार आली नार गेली
बाब नित्त्याची असे
एक महिला दिन तिचा जो
येतसे अन् जातसे
फ्रीज, टीव्ही आणि पंख्या
सम तिला का मानले?
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले

संपले मी, नवपिढ्यांनो 
घ्या वसा तुम्ही तरी
खड्ग घ्या हातात आता
का शिकायत वैखरी?
हक्क घ्या झगडून तुम्ही
जे मला ना लाभले
प्राक्तनाचे भोग सारे
मी सुखाने भोगले


निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Monday, February 1, 2021

प्रिया स्वतःला झाकत असते


कमाल आहे स्वप्नामध्ये

आल्यावरही लाजत असते

नकोनकोच्या पडद्यामागे

प्रिया स्वतःला झाकत असते


हवेहवेसे मिळवायाला

शरीर करते बंड कधी पण

सभ्य मुइखवट्यासही नसावा

डाग जराही, सदैव दडपण

स्वतः पेक्षा प्रतिमेची का

मनात भीती नांदत असते?

नकोनकोच्या पडद्यामागे

प्रिया स्वतःला झाकत असते


अंधाराशी जाते जुळता

प्रकाश वाटे नको नकोसा

एक थांबतो ह्रदयी ठोका

जरा कुठे दिसताच कवडसा

वाट न दिसते पुढे मागुती

तरी चालते अविरत आहे

नकोनकोच्या पडद्यामागे

प्रिया स्वतःला झाकत असते


तना मनाच्या तांडवात या

मनास होते सदा डांबले

पिंजर्‍यात भ्रामक मुल्यांच्या

शरीर पूर्वापार कोंडले

तृणपात्याविन दवबिंदूंना

जगावयाची कसरत असते

नकोनकोच्या पडद्यामागे

प्रिया स्वतःला झाकत असते


स्वप्नांम्धुनी ये बाहेरी

कवेत घे तुझिया विश्वाला

वाट मोकळी करून दे तू

गुदमरलेल्या तव श्वासाला

लुटावयाला मुक्त जीवनी

आनंदाची बरकत असते.

नकोनकोच्या पडद्यामागे

प्रिया स्वतःला झाकत असते



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३