Wednesday, July 18, 2018

आपुल्या फुलण्यातुनी

( माझी पत्नी सौ. जयश्रीच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता )

बोलती झाली अबोली
आपुल्या फुलण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

बारमाही फूल असते
बहरलेले अंगणी
जर कधी सुकलेच तर ते
दाटतो गुदमर मनी
प्रेमही वेडी अबोली
व्यक्तते रुसण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

चाललेले काय असते?
अंतरी ती जाणते
यत्न करता लपवण्याचा
शस्त्रही ती उपसते
डाव हुकुमी खेळते ती
पापण्या ओलाउनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

सावली होती कधी तर
ऊनही होते कधी
भोगले, आनंद लुटला
साथ खळखळती नदी
काळजी ना वर्तमानी
ना उद्याला पाहुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

वादळे आली नि गेली
राग लोभांची तरी
चालला संसार आहे
काठ त्याला भरजरी
मस्त जगलो स्पष्ट झाले
काळ भुर्र उडण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

मोगरा गंधळलेला
धुंद स्वप्ने कालची
आठवांची मांदियाळी
साथ आहे आजची
छंदवेडा मी हरवतो
नेहमी माझ्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, July 10, 2018

शहरांमुळे कदाचित

ओसाड गाव झाले
गजबज असे सदोदित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

येतात बालपणचे
खेड्यामधील आठव
पारावरील गप्पा
संभाषणात लाघव
शहरातल्या सुखाने
झालो न मी प्रभावित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

सारेच तिथे माझे
मीही पण सार्‍यांचा
तुटवडा तिथे नव्हता
अश्रू पुसणार्‍यांचा
गर्दी असून झालो
शहरी कसा  तिर्‍हाइत ?
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

एकत्र कुटुंबाच्या
मी चाखले फळांना
आधार सर्व देती
थंडावती झळांना
ना जिंकलो तरीही
झालो न मी पराजित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

शहरी घरात कुत्रे
वृध्दाश्रमात आई
मोकाट श्वान गावी
आई घरात राही
असुनी कुटुंब निर्धन
नसते कुणी निराश्रित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

हळव्या मनास आता
हळहळही ना वाटे
अन् बधीर हृदयाला
बोचतात का काटे?
जगण्यात स्वतःसाठी
मी केवढा पटाइत!
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, July 3, 2018

आनंदाने पुढील अंतर

( माझी पत्नी सौ. जयश्रीच्या  वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता )

काय गवसले, काय हरवले?
करूत चर्चा निवांत नंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

तिच्या रुपाने घरात आले
राग, ताल अन् कैक तराने
नूर घराचा बदलत गेला
गळ्यातल्या परिपक्व स्वराने
मैफिल आयुष्याची सजली
अमूल्य झाले हे स्थित्यंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

क्षितिजाच्याही पल्याड आम्ही
दोघे सोबत नांदत होतो
जरी हिमालय जमला नाही
पर्वतीवरी सुखात होतो
काबिज केलेल्या स्वप्नांचा
अश्वमेध चालतो निरंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

गरज वाटली कधीच नाही
हास्य लेउनी मिरवायाची
मनी नांदले, तेच गोंदले
आवड नव्हती प्रदर्शनाची
हवे आमुच्या जगास आम्ही
क्षणोक्षणी आले प्रत्त्यंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

उधारीतल्या सुखास आम्ही
नगदीच्या दु:खात तोलले
संतुष्टीच्या सुपीक रानी
आनंदाचे बीज पेरले
प्रश्न न केला देवांनाही
परावलंबी नव्हते उत्तर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर

वटपूजा ना करताही पण
दृढप्रेमाचा प्रत्त्यय येतो
झूळझुळणार्‍या प्रेम प्रवाही
रुढी प्रथांचा व्यत्त्यय येतो
या जन्माचा शेवट होता
म्हणूत झाले हे मध्यंतर
हात धरोनी चालत राहू
आनंदाने पुढील अंतर


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, July 1, 2018

सोडूनी सासरा

सोडूनी सासरा--(आता वारीचे दिवस जवळ येत आहेत. सर्व वातावरणच विठुमय होईल येत्या कांही दिवसात. या निमित्ताने एक भारुड सादर.)) 

बाई मी जाते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा
उचकी लागली गं मजला त्याची
जाते मी माहेरा ||धृ ||

लगीन जरी का झालय त्याचं
मला कई हरकत न्हाई
नव-यासाठी जुन्या प्रेमाला
जरूर कई फारकत न्हाई
सटवी खेटुन उभी तरी पण
बाई दिसतो गं दिसतो मला
प्रेमळ अन हासरा
बाई मी जाते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा ||१||

वेड मनाला लाउन गेलं
सोनं बावनकशी
लाज ठेवली गुंडाळुन म्या
उघड सांगते अशी
नकोय मजला दादला आता
जाते सोडुन गं सुडुन जाते
पोटीच्या वासरा
बाई मी जाते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा ||२||

मन बी माझं चंचळ भारी
इकडं तिकडं फिरतय
सरत्या शेवटी कुशीत त्याच्या
सुख अनुभव करतयं
नजर करडी मजवर त्याची
बाई धरतो गं धरतो माझ्या
वेसणीचा कासरा
बाई मी जाते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा ||३||

पंढरपूर हे माहेर माझं
चंद्रभागेच्या तिरी
मोक्षाची गं वाट दावतो
कनवाळू श्रीहरी
दिंडीमध्ये होउन सामील
बाई घेईन गं घेईन त्याच्या
चरणी मी आसरा
बाई मी जते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा ||४|

निशिकांत देशपांडे.