किंमत माझी तय करण्याचे
मार्ग शोधता सखे उमगले
तुझ्याविना अस्तित्व मोजण्या
मी मजला शुन्याशी गुणले
तू आल्यावर उजेड झाला
जळमटातही दिसले झुंबर
कसा जाहलो अमीर इतका!
चंद्र, चांदण्या माझे अंबर
सभोवताली ग्रिष्म असोनी
वसंतातले अर्थ बहरले
तुझ्याविना अस्तित्व मोजण्या
मी मजला शुन्याशी गुणले
तुझ्या रुपाने घरात माझ्या
सुरेल ताना, गाणे आले
कानसेन मजला होण्याचे
तुझ्यामुळे तर भाग्य लाभले
सूर ऐकुनी ब्रह्मानंदी
टाळी म्हणजे काय? उमगले
तुझ्याविना अस्तित्व मोजण्या
मी मजला शुन्याशी गुणले
वळून बघता मागे केंव्हा
आठवणींचे तरंग उठती
शब्दबध्द करण्यास तयांना
कविता, गझला मनात स्फुरती
सोने झाले त्या रचनांचे
जेंव्हा त्यांना तू गुणगुणले
तुझ्याविना अस्तित्व मोजण्या
मी मजला शुन्याशी गुणले
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment