Sunday, June 2, 2013

सुरेल गाऊ नवे तराने


चार पाउले ये तू पुढती
मीही येतो तुझ्या दिशेने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने

सुरुवातीचे धुंद धुंद ते
दिवस कधी अन् कसे हरवले?
आपण अपुल्या खेळामध्ये
फासे उलटे कसे फिरवले?
हार जीत हा विषय संपवू
दोघे जिंकू क्रमाक्रमाने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने

नाते असते चार क्षणांचे
दवबिंदूंचे अन् गवताचे
एक दुज्याला बनून पूरक
ठरवतात ते जगावयाचे
तेच भाव अन् तोच तजेला
पुन्हा अनुभवू नव्या दमाने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने

वळणावरती आयुष्याच्या
हातामध्ये हात असावा
अवघड वाटा पार कराया
साथ असावी, नको दुरावा
संवादाचे सूत्र धरोनी
जगू मोकळे खुल्या दिलाने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने

स्वप्न उद्याचे आज रंगवू
दोघे मिळुनी एक मताने
तुझ्या सोबती अवघड नाही
सखे गाठणे स्वर्ग सुताने
द्वंद्व नको ! ये सुरू करू या
नवीन मैफिल द्वंद्वगिताने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


No comments:

Post a Comment