Wednesday, June 12, 2013

थोपवावे मी कसे?


पार्श्वभूमी:-- आजकाल जीवनाची शैली बदलली आहे. या बदलांचा जीवनावर होणार्‍या परिणामाचा परामर्श घेणे कधी कधी गरजेचे वाटते. आपली आर्थिक परिस्थिती, वैयक्तीक महत्वाकांक्षा, विभक्त कुटुंबपध्दतीत नवरा बायको या दोघांनाही नोकरी करण्याची गरज या गोष्टी मध्यम वर्गीयांच्या जीवनावर खूप परिणाम करत आहे. आपल्या मुलाचे चांगले पालनपोषण व्हावे म्हणून एक मूल कुटुंबशैली आता बर्‍यापैकी स्थीर झाली आहे. हे सर्व होणे अपरिहार्य आहे. पण या बदलाचे अनेक पैलू आहेत.
वर्किंग कपल्सच्या मुलांवर याचा परिणाम होतो आहे. आईला इच्छ असूनही मुलांना वेळ देणे जमत नाही. पण मुलांच्या वाट्याला उपेक्षा येते हे कुणाच्या ध्यानात येत नाही. मी कल्पना केली की अशा एखाद्या मुलाला अशी व्यथा सांगावयाची असेल तर तो काय सांगेल? त्याच्या मनात खदखदणार्‍या भावना असतीलच. हा मुलांचा आक्रंद या रचनेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझा कोणाचीही टिका करण्याचा हेतू नाही. बघा प्रयत्न यशस्वी झाला अहे का ते!

पेटलेल्या काहुराला
शांतवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

पाळणाघर विश्व माझे
माय करते नोकरी
ऊब मायेची न तेथे
दु:ख सलते अंतरी
गात अंगाई स्वतःला
झोपवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

खेळणी भरपूर आहे
खेळतो मी एकटा
ना मला ताई न दादा
मीच मोठा, धाकटा
काचणार्‍या वेदनांना
जोजवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

अक्षरे गिरवून घेण्या
माय ना बाबा घरी
शिक्षणाचे तीन तेरा
मी रित्या कलशापरी
चित्र भावी जीवनाचे
रंगवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

कोक देते, चिप्स देते
ती घरी आल्यावरी
वेळ फिरवायास नसतो
हातही पाठीवरी
तृप्ततेचे स्वप्न नेत्री
जागवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

जन्म पुढचा द्यायचा तर
दे मला गरिबा घरी
हक्क आईचा मिळावा
ऐक माझे श्रीहरी
दु:ख तुज सोडून इतरा
दाखवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment