Monday, June 24, 2013

फूल हे आले कसे?


वृक्ष असुनी पिंपळाचा
फूल हे आले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

मी व्यथा माझ्या मनीची
मांडतो ना मांडली
वेदना अन् घाव भळभळ
हीच माझी कुंडली
प्रेम शिडकाव्यात माझे
अंग हे न्हाले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

मी जरी छातीस होते
माझिया धरले पुढे
वार का पाठीत केले
आपुल्यांनी एवढे?
आज ते पाठीवरोनी
हात का फिरले असे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

सूर माझा हरवलेला
आज आहे लागला
मैफिलीला तूच सखये
ये अता खुलवायला
चाहुलीने फक्त तुझिया
रंग हे भरले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

हात हाती तू दिला अन्
वाटते जग खास हे
कैक दु:खे वेदना पण
तुजमुळे मधुमास हे
आज कळले स्वप्न गंधित
एवढे फुलले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





No comments:

Post a Comment