Saturday, June 15, 2013

सोड चाकोरीत जगणे


व्हायचे ते होउ दे, ये
लाघावी घेऊन हसणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

लोक म्हणती काय? याची
सर्वदा भीती मनाला
वागतो, जगतो कसे? का
काळजी सार्‍या जगाला?
तोडुनी परीघास आता
तू शिकावे बंड करणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

चार भींतीचे कशाला
तोकडे घरटे असावे?
चल रहाया दूर गगनी
पार क्षितिजाच्या बघावे
घे भरारी पंख पसरुन
शक्य आहे उंच उडणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

वागणे अपुले, उद्याच्या
नीव आहे संस्कृतीची
गवगवा रूढी प्रथांचा,
जन्मभूमी विकृतीची
बंद कर आता तरी तू
आतल्या आतून कुढणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

सागराच्या उंच लाटा,
गाज आवडते मनाला
गुंफिले कवितेत सारे
वाटते जे या क्षणाला
सूर दे रचनेस माझ्या
सोड रुदनाचीच कवणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

मी भविष्याच्या दिशेने
टाकले पाऊल आहे
गारवा अन् ताजगीची
लागली चाहूल आहे
होउनी बेबंद दोघे
अनुभवू अपुल्यात नसणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment