Monday, June 17, 2013

पाउस आला


धरेस हिरवा शालू देण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

ओला उत्सव सुरू जाहला, तन मन भिजले
रोमांचाने गवताचे पाते थरथरले
मनामनातिल प्रीत फुलवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

तरुणाईच्या मनी जागली प्रीत नव्याने
धुंद होउनी ओठी येती नवे तराने
मल्हाराचा सूर छेडण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

खळखळणार्‍या ओढ्यांनाही प्यास लागली
मिठीत घ्यावे सरितेने ही आस जागली
भिजलेल्यांना पुन्हा भिजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

खूप दिसानी शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरती
हास्य पाहिले सचैल जेंव्हा भिजली धरती
नवी उभारी मनी रुजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

रंग उडोनी चारी भिंती भकास माझ्या
रागरंगही वस्तीमधला उदास माझ्या
नवीन स्वप्ने मनी रुजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yqhoo.com

No comments:

Post a Comment