Tuesday, June 25, 2013

विकास केला नवतंत्राचा

सलाम त्यांना ज्यांनी कोणी विकास केला नवतंत्राचा
अमिरिकेने शोध लावला चोर पकडणार्‍या यत्रांचा

भारतातल्या सरकारावर जनरेट्याचा दबाव आला
या यत्रांची आयात व्हावी असा शेवटी ठराव झाला

गरजा अपुल्या ध्यानी घेउन बदल खूपसे उचित केले
यंत्र पुरवठा करणार्‍यांना कॅबिनेटने सूचित केले

शासनकर्ते गठबंधन या यंत्राच्या कक्षेत नसावे
विरोधकांना खिंडीमध्य गाठण्यास हे तंत्र असावे

दूर असाव्या यंत्रापासुन सार्‍या नेत्यांच्या औलादी
काय वाकडे कुणी करावे? संरक्षण ज्यांना पोलादी

कक्षेच्या बाहेर असावे कोलगेट, स्पेक्ट्ररम घोटाळे
जर यंत्राने साहस केले जाम कराया डिजिटल टाळे

स्विसबँकेच्या व्यवहाराशी असेल ज्यांचे ज्यांचे खाते
चोर कसे ते? दिल्लीमध्ये "अर्थपूर्ण" सर्वांशी नाते

संपत्तीला वेगवेगळे रंग द्यायची प्रथा नसावी
काळे धन पांढरे कराया यंत्रांमध्य सोय असावी

पोट जाळण्या भुरट्या चोर्‍या करणार्‍यांची मान कसावी
करबुडव्या या आम जनांना यंत्राद्वारे जरब बसावी

भाव "ठरवले" निविदा नव्हत्या, मुल्यांची ही दिवाळखोरी
चोर पकडणार्‍या यंत्रांची खरीदताना झाली चोरी


निशिकांत देशपांडे. मो. के. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




No comments:

Post a Comment