Friday, May 31, 2013

शिवार


शिवार माझा खूप तापला
वाट ढगांची बघतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

असेच झाले गतवर्षीही
वांझोटे नभ आले गेले
वाया गेले बी-बियाणही
डोक्यावरती कर्ज वाढले
बघून मालक फासावरती
शिवार माझा रडतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

आभ्यासुन शेती शास्त्राला
पदवीधर का करी चाकरी?
शेत कसाया लाज वाटते
हवाय बर्गर नको भाकरी
शिक्षण पध्दत अशी कशी ही?
शिवार माझा पुसतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

एकच मार्गी वाट कशी ही
खेड्यामधुनी शहरी जाते?
परत यावया कुणी न राजी
भूमातेशी तुटते नाते
खिन्न अंतरी शिवार झाला
एकटाच भळभळतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

उंच उंच त्या इमल्यांमध्ये
किती बांधले कबुतरखाने?
कुठे हरवली आमराई अन्
कुठे हरवले कोकिळ गाणे?
शिवार शहराच्या बगलेतिल
प्रश्न जगाला करतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

भूमाता मी जरी जगाची
स्त्री मातेसम दु:ख भोगते
सोडुन गेली मुले तरी मी
त्यांच्यासाठी देव पूजिते
जा बाळांनो हवे तिथे जा
शिवार आवंढा गिळतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment