Monday, May 13, 2013

प्रेम करावे म्हणतो


सारी स्वप्ने पूर्ण जाहली
तरी जगावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

पूर्णविरामाची ना पडली
गाठ कधी माझ्याशी
प्रवाह खळखळ, दोस्ती केली
मी खाचा खळग्यांशी
अपूर्णतेला पूर्णत्वाचे
वेड असावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

जसा चेहरा तसा दावला
स्पष्टपणे मज त्याने
दोष पाहुनी प्रयत्न केला
सुधारण्या जोमाने
निर्भिड त्या आरशास आता
सत्कारावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

अश्वमेध जाहला करोनी
उंच तरी मन उडते
दहा दिशांचे कर्तृत्वाला
क्षेत्र अपूरे पडते
दिशा आकरावी शोधाया
त्वरे निघावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

नमते घेउन समझोत्याने
जीवन सारे जगलो
विद्रोहाची उर्मी येता
बेफिकिरीने हसलो
निर्भय होउन जीवनास मी
ललकारावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

देह जाहला जीर्ण तरीही
मला न त्याची चिंता
तूच जाणसी कसा वागलो
दयाघना भगवंता
पुन्हा फुलाया नवीन जन्मी
आज मरावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment