Sunday, May 26, 2013

हा एक काळ आहे



आयुष्य सांज झाली
सरली सकाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

होतो कधी तिच्या मी
प्रेमात रंगलेला
मी एकटाच आता
प्याल्यात झिंगलेला
चढता नशा उमगते
जगणे रटाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

माझ्याच इशार्‍यांची
त्यांना असे प्रतिक्षा
झालेत थोर, माझी
करतात ते समिक्षा
होतो जहाल केंव्हा
आता मवाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

जोमात कधी चढलो
मी ऊंच ऊंच शिखरे
उठण्यास तेच गुडघे
करतात आज नखरे
उद्वेग वेदनांचा
आता सुकाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

डौलात राज्य मीही
सिंहासमान केले
तख्ता अता पलटला
तह मी गुमान केले
गात्रात त्राण नाही
नुसते आयाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

म्हणतो जरा शिकावे
सापासमान जगणे
टाकून कात नवखे
तारुण्य प्राप्त करणे
श्रावण सरी हरवल्या
नुसते ढगाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

वृध्दत्व निर्मुनी तू
का वाटलेस देवा?
आयुष्य दे कसेही
चाखेन जणू मेवा
तू दूर, तुला का रे
माझा विटाळ आहे?
तो एक काळ होता
हा एक काळ आहे


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


No comments:

Post a Comment