कॉम्प्यूटरग्रस्त आणि फेसबुक वेड्यांसाठी (ज्यात माझा समावेश आहे) एक आगळी वेगळी रचना
आठवणीच्या ऑप्शनवरती
नकोस मारू टिचकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
सहजासहजी मैत्री झाली
फेसबुकवरी तुझ्यासवे
जीव तुझ्यावर जडून गेला
पडू लागले स्वप्न नवे
झाली चॅटिंग मधाळ इतकी
तू न वाटसी परकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
कळून आले प्रोफाइल तो
बोगस होता तुझा तरी
मना पटेना झूठ बरसतिल
श्रावणातल्या कशा सरी ?
घेतलीस तू उगाच माझी
क्रूर अशी का फिरकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
पुरे जाहले मृगजळ आता
नकोत भेटी गाठी गं
फॉरमॅटिंग मी माझे केले
तुला विसरण्यासाठी गं
तरी व्हायरस तुझा असा का
मनात घेतो फिरकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
फुले, कळ्या अन् बाग बघाया
शोध घेतला गुगलवरी
चित्र पाहिले लोभसवाणे
सभोवती दुष्काळ जरी
बागेश्रीची हसरी धुन का
आज जाहली रडकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
व्हर्च्यूअल या जगात आहे
अभासी आकाश निळे
अॅक्च्यूअल कंगाल असोनी
श्रीमंतीचा स्वाद मिळे
अमीर आहे जो तो येथे
खिशात नसता दिडकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
शब्द जुळवतो, कविता करतो
शांत शांत मी जगावया
दोस्त सांगती पोस्ट कराव्या
फेसबुकवरी दिसावया
संगणकाच्या नावानेही
मनात भरते धडकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
निशिकांत देशपांडे मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment