Friday, May 31, 2013

शिवार


शिवार माझा खूप तापला
वाट ढगांची बघतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

असेच झाले गतवर्षीही
वांझोटे नभ आले गेले
वाया गेले बी-बियाणही
डोक्यावरती कर्ज वाढले
बघून मालक फासावरती
शिवार माझा रडतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

आभ्यासुन शेती शास्त्राला
पदवीधर का करी चाकरी?
शेत कसाया लाज वाटते
हवाय बर्गर नको भाकरी
शिक्षण पध्दत अशी कशी ही?
शिवार माझा पुसतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

एकच मार्गी वाट कशी ही
खेड्यामधुनी शहरी जाते?
परत यावया कुणी न राजी
भूमातेशी तुटते नाते
खिन्न अंतरी शिवार झाला
एकटाच भळभळतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

उंच उंच त्या इमल्यांमध्ये
किती बांधले कबुतरखाने?
कुठे हरवली आमराई अन्
कुठे हरवले कोकिळ गाणे?
शिवार शहराच्या बगलेतिल
प्रश्न जगाला करतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

भूमाता मी जरी जगाची
स्त्री मातेसम दु:ख भोगते
सोडुन गेली मुले तरी मी
त्यांच्यासाठी देव पूजिते
जा बाळांनो हवे तिथे जा
शिवार आवंढा गिळतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Sunday, May 26, 2013

हा एक काळ आहे



आयुष्य सांज झाली
सरली सकाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

होतो कधी तिच्या मी
प्रेमात रंगलेला
मी एकटाच आता
प्याल्यात झिंगलेला
चढता नशा उमगते
जगणे रटाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

माझ्याच इशार्‍यांची
त्यांना असे प्रतिक्षा
झालेत थोर, माझी
करतात ते समिक्षा
होतो जहाल केंव्हा
आता मवाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

जोमात कधी चढलो
मी ऊंच ऊंच शिखरे
उठण्यास तेच गुडघे
करतात आज नखरे
उद्वेग वेदनांचा
आता सुकाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

डौलात राज्य मीही
सिंहासमान केले
तख्ता अता पलटला
तह मी गुमान केले
गात्रात त्राण नाही
नुसते आयाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

म्हणतो जरा शिकावे
सापासमान जगणे
टाकून कात नवखे
तारुण्य प्राप्त करणे
श्रावण सरी हरवल्या
नुसते ढगाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

वृध्दत्व निर्मुनी तू
का वाटलेस देवा?
आयुष्य दे कसेही
चाखेन जणू मेवा
तू दूर, तुला का रे
माझा विटाळ आहे?
तो एक काळ होता
हा एक काळ आहे


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Tuesday, May 21, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग-४


मी कधी कधी विचार करतो की आमची पिढी किती भाग्यवान आहे ! याची देही याची डोळा आम्हाला गांधी, नेहरू, सावरकर बाबा आमटे,, राज कपूर, बलराज सहानी, सचीन तेंडुलकर, सुनील गावसकर, लता मंगेशकर, आशा भोसले, तलत महमूद, मोहमद रफी, एकाहून एक ग्रेट संगीतकार  अशा हजारो विभूती बघावयास आणि ऐकावयास मिळाल्या. या लोकांबद्दल शंभर वर्षानंतर जर सांगितले तर लोकांना खरे वाटणार नाही. त्यांना या सार्‍या दंत कथा वाटतील.
मी आज या मालिकेखाली जे गाणे निवडले आहे ते लता मंगेशकरने गायलेले आहे. मी आज माझ्या कुवतीनुसार लताजींबद्दल थोडे लिहिणार आहे. त्यांच्या बद्दल काय काय आणि किती लिहावे? नवीन पिढीला जुन्या कांही चांगल्या गोष्टी कळाव्यात म्हणून हा सारा प्रपंच.
मला जसे गाणे कळते तेंव्हा पासून मी लताजीना ऐकतोय. त्यांच्या मधूर गळ्याने सार्‍या देशाचे संगीताशी नाते जोडले. लोकांचा संगीत क्षेत्रात कान तयार केला. पूर्वी रेडिओ हे एकमेव गाणी ऐकण्याचे साधन होते. त्य्य पण विविध भारती आणि सिलोन ही महत्वाची स्टेशन्स. केंव्हाही रेडिओ लावला की १० गाण्यापैकी किमान ६ गाणि लताजींची असायची. अर्थात, हे सर्व यश आणि किमया सहजासहजी नाही घडली. त्याच्या मागे खडतर तपस्या, रियाज होते.
लताजीचा जन्म २८ एप्रील १९२९ साली इंदौर येथ झाला. घरात संगीताचे वातावरण होते. एक मजेशीर गोष्ट अशी की त्यांनी पहिले मराठी फिल्मी गाणे १९४२ साली (वयाच्या १३व्या वर्षी) मराठी फिल्म "किती हसाल" या सिनेमासाठी गायले होते. पण सिनेमात गाणे म्हणणे हा विचारच दिनानाथ मंगेशकरांना पटला नाही आणि त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. म्हणून हे गाणे त्या सिनेकातून काढून टाकले.
१९४७ साली त्या काळचे प्रसिध्द संगीतकार गुलाम हैदर (त्यांना सगळे आदराने मास्टरजी म्हणत असत) यांचा गाणे गाण्यासाठी निरोप आला. लताजी रेकॉर्डींग स्टुडिओ मधे रात्री पोहंचल्या. त्या वेळेस गायकाला ऑर्केस्ट्रा सोबत एकाच बैठकीत पूर्ण गाणे म्हणावे लागे. थोडीही चूक झाली की पुन्हा रिटेक! मास्टरजीना सर्व गाणी त्याच दिवशी पूर्ण करायची होती; कारण त्यांना दुसर्‍या दिवशी पाकिस्तानला जायचे होते. लताजींचा रेकॉर्डींग साठी नंबर सुर्योदयच्या वेळी आला.  त्यांनी गयलेले गाणे होते "बेदर्द तेरे दर्द को".तो पर्यंत त्या एका बेंचवर कोपर्‍यात बसून होत्या. गाण्याचे रेकॉर्डिंग सकाळी ८.३० ला झाले. मास्टरजी त्यांच्या गाण्यावर जाम खुष होते.
गडबड असूनही मास्टरजी लताजींना घेऊन फिल्मिस्तान या कंपनीच्या मुखर्जीकडे  गेले. ते निर्माण करत असलेल्या शहीद या चित्रपटाची गाणी लताजींना गाण्याची संधी देण्याची शिफारस केली. मुखर्जींनी तिला गाणे गावयास लावले. गाणे ऐकून त्यांनी आवाज खूप पातळ (thin) आहे या सबबीखाली प्रस्ताव धुडकावला. मास्टरजी त्यावेळी मुखर्जींना म्हणाले की आज आपण या पोरीला नकारताय. ऊद्या सर्व फिल्म इंडस्ट्री या मुलीचे स्वागत करील तेही रेड कार्पेट टाकून !. अन् झालेही तसेच! त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. एकाच वर्षात लताजींनी अंदाज, बरसात, बडी बहन, महल अशा यशस्वी चित्रपटात मातबर संगीतकारांबरोअब्र गाणी गायली.हा आवाका पाहून एके दिवशी मास्टरजीचा लताजींना फोन आला. मास्टरजी लताला म्हणाले "मैने जो कहा था पह सच निकला ना?" नंतर चार पाच महिन्यांनी पाकिस्तानहून नूरजहाँचा लताला फोन आला आणि म्हणाली "मास्टरजी को कॅन्सर हुआ है".
लताजींना खरा ब्रेक मिळाला तो महल या सिनेमातील " आयेगा आनेवाला आयेग" या गाण्यापासून. नंतरच्या काळात सर्व लिडींग संगीतकारांबरोबर त्यांनी गाणी गायली. या मधे शंकर-जयकिशन, एस.डी. बर्मन, नौशाद, हेमंतकुमार, सलील चौधरी आदींचा समावेश होता. शंकर जयकिशन यांच्यावर तर लताजींच्या आवाजाने जादूच केली होती.
लताजींनी जवळजवळ २० भाषेत गाणी गयली आहेत. त्यांनी किती गाणी गायली आहेत यावर बराच वाद आहे ज्याच्यावर येथे चर्चा करायची गरज नाही. त्यांना असंख्य सन्मान प्राप्त झालेले आहेत. नंतर त्यांनी नवीन संगीतकारांबरोबर गाणी गायला सुरुवात केली ज्या मधे आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, जयदेव, कल्याणजी आनंदजी आदींचा समावेश आहे.
१९६२ मधे भारताला चीन कडून लढाईत हार पत्करावी लागली होती. सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी विविध भारतीवर "जयमाला" हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी प्रसारीत होत असे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण एखादा सेलिब्रेटी करत असे. एक कार्यक्रम लक्ष्मिकांत-प्यारेला यांनी प्रक्षेपित केला होता. त्यात ते म्हणाले की लताजी हे या विश्वातले एक आश्चर्यच आहे. त्यांना एखाद्या गाण्याची धुन पियानोवर किंवा पेटीवर वाजून दाखवली की त्या लिहिलेल्या गाण्यावर कांही स्वरचिन्हे करतात. त्या जेंव्हा गाणे गातात तेंव्हा आम्ही सुचवलेल्या चाली पेक्षा खूप सुंदर हरकती घेऊन गाण्याचे सोने करतात. त्यांच्या गाण्याला कधीही रिटेक करावे लागत नाही
त्या अगदी सहजतेने गातात. ऐकायला सोपी वाटणारी गाणी इतरांना म्हणायला खूप अवघड असतात. वर्षानुवर्षे रियाज करूनही चाफा बोलेना या गाण्याची पहिली तान गळ्यातून काढणे जमत नाही; हा आहे त्यांचा महिमा !
अजून एक किस्सा येथे अवर्जून सांगावा वाटतोय. बडे गुलाम अली खाँ साहेब त्या काळचं रागदारी संगीतातलं एक बडं प्रस्थ होतं. खाँ साहेब साथीला संवादिनी किंवा सारंगी घेत नसत. फक्त चार तंबोर्‍याची साथ आणि ठेका धरण्यासाठी तबला. एकदा त्यांच्या गायनाचा कर्यक्रम एका शाळेच्या प्रांगणात होता. खाँसाहेबाचे गाणे अगदी रंगात आले होते. दर्दी श्रोतेही अगदी तल्लीन झाले होते. त्या मैदानाच्या भोवती कांही घरे होती. खाँसाहेब एकदम गाणे थांबऊन शांत झाले आणि साथीदारांनाही वाजवणे बंद करण्यास सांगितले आणि स्वतः डोळे मिटून बसले. लोकांना कळेना हे काय चालले आहे ते. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले " ये कमबख़्त कभी बे सुरी होतीही नही" त्या वेळेस एका घरात लतांनी गायलेले भाई भाई या चित्रपटातील "कदर जाने ना ओ कदर जाने ना मोरा बालम" हे रेडिओवर गाणे लागले होते, आणि त्यांचे हे उदगार त्या गाण्याला ऐकून होते. किती ग्रेट लता आणि दिलखुलास दाद देणारे खाँसाहेब पण!
असाच एक किस्सा अजून एका गाण्याचा. १९६२ च्या पराभवानंतर राष्ट्रभक्तीपर गीताची लाटच आली होती. कवी प्रदीपने लिहिलेले एक गीत सी. रामचंद्र यांनी संगीतबध्द केलं होतं. गीताचे बोल होते "ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँखमे भरलो पानी-जो शहीद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी" हे गाणे लताजींनी लाल किल्ल्यावरून गायले होते. या गाण्याचा आशय आणि लताच्या आवाजातील आर्तता ऐकून पंडित नेहरू अक्षरशः रडले होते.
आशा महान लताजीने गायलेले एक गाणे चित्रपट सीमा, गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट निर्मिती-१९५५. हे गाणे जयजयवंती या रागावर आधारीत आहे. गाण्याचे बोलअसे;-
मनमोहना बडे झूठे
हारकर हार नही माने
मनमोहना----

बने थे खिलाडी पिया
निकली अनाडी पिया
मोसे बेमानी करे
मुझसेही रूठे
मनमोहना-----

तुमरी ये बन्सी
बनी गला फांसी
तान सुना के मेरा
तनमन लूटे
मनमोहना-----
हे गाणे ऐकण्यासाठी क्लिक करा--http://www.youtube.com/watch?v=uXGMxTTB_Dg

Saturday, May 18, 2013

मला वाटते परत फिरावे


हिरवळ गंधित ओली माती
कसे बालपण मी विसरावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

एक सदनिका विकत घेतली
तेच वाटते अमाप वैभव
वाडा, अंगण कसे कळावे?
खुराड्यातले ज्यांचे शैशव
अंगणातल्या प्राजक्ताच्या
गंधाला श्वासात भरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

खिडक्या दारांना पडदे अन्
आडपडदेही मनात नव्हते
सार्‍यांसाठी गर्द सावली
कुठलेही घर उन्हात नव्हाते
टीव्हीवरच्या मालिकांतले
मुळीच नव्हते कधी दुरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

लुगडे घेता वहिनीसाठी
नणंद त्याची घडी मोडते
चापुन चोपुन नेसुन होता
सर्वांच्या ती पाया पडते
विभक्त इथल्या कुटुंबात हे
दृष्य कधी अन् कसे दिसावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

लेक सासरी जाण्या निघता
रंक असो वा रावाची ती
आईबाबांची  नावापुरती
लेक खरे तर गावाची ती
आभाळमाया इथे पाहिली
प्रेम किती अन् कसे करावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

खेड्यामधल्या तरुणाईला
भुरळ घालती शहरी वारे
नसे संस्कृती, विकृतीच ही
लुभावणारे मृगजळ सारे
थांबव देवा श्वास अता तू
काय करणे जगी उरावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे


वयस्क लोकांना आठवेल की जुन्या काळी घरात एखाद्या स्त्रीला लुगडे (साडी) घेतली तर कुटुंबातली दुसरी स्त्री ती साडी प्रथम नेसायची. नंतर धुवून ती साडी जिच्यासाठी आणली अहे ती स्त्री नेसायची. या पध्दतीला घडी मोडणे असे म्हणत असत.


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Monday, May 13, 2013

प्रेम करावे म्हणतो


सारी स्वप्ने पूर्ण जाहली
तरी जगावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

पूर्णविरामाची ना पडली
गाठ कधी माझ्याशी
प्रवाह खळखळ, दोस्ती केली
मी खाचा खळग्यांशी
अपूर्णतेला पूर्णत्वाचे
वेड असावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

जसा चेहरा तसा दावला
स्पष्टपणे मज त्याने
दोष पाहुनी प्रयत्न केला
सुधारण्या जोमाने
निर्भिड त्या आरशास आता
सत्कारावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

अश्वमेध जाहला करोनी
उंच तरी मन उडते
दहा दिशांचे कर्तृत्वाला
क्षेत्र अपूरे पडते
दिशा आकरावी शोधाया
त्वरे निघावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

नमते घेउन समझोत्याने
जीवन सारे जगलो
विद्रोहाची उर्मी येता
बेफिकिरीने हसलो
निर्भय होउन जीवनास मी
ललकारावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

देह जाहला जीर्ण तरीही
मला न त्याची चिंता
तूच जाणसी कसा वागलो
दयाघना भगवंता
पुन्हा फुलाया नवीन जन्मी
आज मरावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Thursday, May 9, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग-४


माझा आवडता गायक तलत मममूद याच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने---

लखनौ मधे एका सनातनी (ऑर्थोडॉक्स) मुसलमान कुटुंबात २४ फेब्रुवारी, १९२४ रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्या वेळी कुणाला स्वप्नातही वाटले नसावे की देशातील एका भावी गायकाचा जन्म झाला आहे. खरेच भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे आज पर्यंत कोणालाही कळलेले नाही. हे जन्मलेले व पहिले श्वास घेत असलेले बाळ म्हणजेच नंतरच्या काळचा प्रसिध्द गायक तलत महमूद होय.
तलतने अगदी लहान वयातच आपली संगीतातील रुची दाखऊन दिली. गाणे ऐकण्याचा, विशेशतः रागदारी संगीत -खूप नाद होता. रात्रभर जागून तो संगीताच्या मैफिली ऐकत असे. संगीत त्याला जीव की प्राण वाटत होते. आणी हा शौक वाढतच गेला. त्याचे कुटुंब सनातनी असल्यामुळे घरात संगीताला विरोध होता. संगीत हे मुस्लीम समाजात अन-इस्लामिक मानले जाते. हा केवढा विरोधाभास आहे पहा! रागदारी संगीताच्या क्षेत्रात दिग्गज गायक आणि उस्ताद मुस्लीम आहेत. पण असे मानले जाते की संगीत इस्लाम विरोधी आहे. असो.
घरातील विरोधाला तोंड देत देत तलतने संगीत शिकण्यास सुरुवात केली. Maris College of Music म्हणजे आताचे भातखंडे संगीत महाविद्यालय, येथील पं. भट यांच्याकडे १९३० मधे संगीताचे धडे घेण्यास सुरू केले. या नंतर तलतला अ‍ॅक्टिंग मधे पण रुची निर्माण झाली आणि त्या दिशेने त्याने पावले उचलण्यास सुरुवात केली. संगीत आणि अ‍ॅक्टिंग हे दोन छंद जोपासणे घरच्यांना मंजूर नव्हते. शेवटी तलतला घर आणि अ‍ॅक्टिंग या पैकी एकाची निवड करणे भाग पडले आणि त्याने आपला छंद जोपासयाचा निर्णय घेतला आणि घराला रामराम ठोकला. लखनौ सोडून कलकत्ता जवळ केले.
वयाच्या सोळाव्या वर्षी तलतने गझल गायक म्हणून १९३९ साली आपले संगीतातले करिअर सुरू केले..प्रसिध्द शायर दाग, मीर, जीगर इत्त्यादीच्या गझला रेडियो लखनौ वर गात असे. त्याच्या आवाजाचा पोत कांही काळातच रसिकांच्या आणि संगीतकारांच्या नजरेत भरला. यामुळेच की काय १९४१ मधे HMV या प्रसिध्द रेकॉर्ड कंपनीने त्यांना पहिल्या गाण्याचे निमंत्रण देऊन करारबध्द केले. तलतला. दहा वर्षाच्या खडतर तपस्येनंतर आणि नाव कमवल्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला पुन्हा घरात स्विकारले.
तलतला खरा ब्रेक मिळाला तो त्याच्या पहिल्या गैरफिल्मी गझल "तसवीर तेरा दिल मेरा बहला न सकेगी" मुळे. या गझलेस अमाप प्रसिध्दी मिळाली. आता तलत फक्त लखनौ आणि कलकत्त्याचा न राहता पूर्ण देशाचा झाला. शेवटी तलतने करिअरसाठी १९४९ मधे आपले बोर्‍याबिस्तर मुंबईला हलवले.
जुन्या काळी एकच व्यक्ती अ‍ॅक्टिंग आणि गात असेल तर त्याला खूप स्कोप होता. या मुळेच के. एल. सहगल, किशोर कुमार, अशोक कुमार (हादरलात! होय, अशोक कुमारनेही गाणी गायली आहेत), सुरैया, नूरजहाँ हे त्या काळी प्रसिध्द होते. असेच तलतचेही घडले. त्याने पण अ‍ॅक्टिंग केली तीही एक नाही दोन नाही तब्बल १६ फिल्म्स मधे! त्याच्या बरोबर काम केलेल्या नट्या म्हणजे कानन बाला. भारतीदेवी, शामा, नादिरा, सुरैया, शशिकला, माला सिन्हा, नूतन वगैरे वैगरे.
तलतचा गायनाच कालखंड १९३९ ते १९८६. त्याने श्रोत्यांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. त्या काळात केत्येक देशात त्याचे कार्यक्रम खच्चून भरलेल्या सभागृहात झाले. त्याला इंग्लंडच्या रॉयल अल्बर्ट हॉल मधे लाइव्ह कार्यक्रम करायचा मान मिळाला. विदेशात त्याच्या कार्यक्रमाला लोक अधीच रांग लावून ताटकळत बसत असत. तलत म्हणजे दर्द, तलत म्हणजे मखमली आवाज, तलत म्हणजे रसिकांच्या दिलाचा राजा अशी त्याची ख्याती होती. अत्त्यंत हळुवार, मनमिळाऊ होता तो. दिलीप कुमार त्याला perfect gentleman म्हणत असे. जसा रेशमी आवाज तसाच रेशमी कोणताही पीळ नसणारा स्वभाव. त्याचे एकही गाणे असे नाही की ऐकणार्‍याच्या ह्रदयाला भिडत नाही. अशा गुणी कलाकाराचा भारत सरकारने १९९२ मधे पद्म भूषण हा किताब देवून सत्कार केला.
पण १९६० च्य सुमारास हलकी फुलकी आणि रॉक अँड रोल टाईप गाणी यायला सुरुवात झाली आणि तलत मागे पडला. मागणी तसा पुरवठा या न्यायाने संगीतकारही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले. हा काळ फार कठीण असतो कलाकारांसाठी. हे घडणे अपरिहार्य असले तरीही तगमग होतेच ना! पिढी बदलली . सचिनदेव बर्मन यांनी त्यांच्या गाण्यांचे सोने करून घेतले तलतच्या गळ्या द्वारे. पण राहुलदेव बर्मनने तलतला घेणे शक्यच नव्हते. त्याच्या संगीताचा पोतच वेगळा होता.
तलतने अगदी कमी म्हणजे एकूण ८०० च्या जवळपास गाणी गायली. आशा या गुणी गायकाने आजच्याच दिवशी म्हणजे ०९.०५. १९९८ ला शेवटचा श्वास घेतला आणि पैगंबरवासी झाला. अ‍ॅक सुरेख वाटचाल संपली. एक हळुवार मोरपीस अल्लाह कडे गेलं. काळ हा सर्वात क्रूर असतो. त्याला कुणाचाही मुलाहिजा नसतो. कधी कधी मनात अशक्य असे प्रश्न येतात. तलत सारखे अनेक कलाकार र जेंव्हा आपापल्या कारकिर्दीच्या परमोच्च बिंदूवर असतात तेंव्हाच काळाच्या घड्याळाचे काटे का बरे थांबत नाहीत? का ही माणसे मनाला असा चटका लाऊन जातात! एक गोष्ट बरी आहे की असे गुणी लोक अपल्या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्य भोवती मृत्त्यूनंतरही दरवळत असतात.
आज माझ्या या मालिकेअंतर्गत मी ज्या गाण्याची निवड केली आहे ते देख कबिरा रोया या १९५७ सालच्या चित्रपटातील आहे.संगीतकार मदनमोहन दी ग्रेट आणि गीतकार राजेंद्र कृष्ण हे आहेत. गायक अर्थातच तलत महमूद मी या गाण्या बद्दल कांही लिहीत नाही कारण लेखण खूप प्रदीर्घ झालं आहे. तुम्हीच ते ऐकून ठरवा कसे आहे ते!. या गाण्याचे बोल खाली देत आहे.
हम से आया ना गया, तुम से बुलाया ना गया
फासला प्यार में दोनों से मिटाया ना गया

वो घड़ी याद हैं, जब तुम से मुलाकात हुई
एक इशारा हुआ, दो हाथ बढ़े, बात हुई
देखते, देखते दिन ढल गया और रात हुई
वो समां आज तलक़ दिल से भूलाया ना गया

क्या खबर थी, के मिले हैं तो बिछड़ने के लिए
किस्मते अपनी बनाई हैं, बिगड़ने के लिए
प्यार का बाग़ लगाया था, उजड़ने के लिए
इस तरह उजड़ा के फिर हम से बसाया ना गया

याद रह जाती हैं और वक्त गुजर जाता हैं
फूल खिलता ही हैं, और खिल के बिखर जाता हैं
सब चले जाते हैं, कब दर्द-ए-जिगर जाता हैं
दाग जो तूने दिया, दिल से मिटाया ना गया
हे गाणे ऐकाण्यासाठी क्लिक कराhttp://www.youtube.com/watch?v=0FdShtk9FYA

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1044@yahoo.com

Tuesday, May 7, 2013

मला लागते उचकी गं !



कॉम्प्यूटरग्रस्त आणि फेसबुक वेड्यांसाठी (ज्यात माझा समावेश आहे) एक आगळी वेगळी रचना

आठवणीच्या ऑप्शनवरती
नकोस मारू टिचकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

सहजासहजी मैत्री झाली
फेसबुकवरी तुझ्यासवे
जीव तुझ्यावर जडून गेला
पडू लागले स्वप्न नवे
झाली चॅटिंग मधाळ इतकी
तू न वाटसी परकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

कळून आले प्रोफाइल तो
बोगस होता तुझा तरी
मना पटेना झूठ बरसतिल
श्रावणातल्या कशा सरी ?
घेतलीस तू उगाच माझी
क्रूर अशी का फिरकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

पुरे जाहले मृगजळ आता
नकोत भेटी गाठी गं
फॉरमॅटिंग मी माझे केले
तुला विसरण्यासाठी गं
तरी व्हायरस तुझा असा का
मनात घेतो फिरकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

फुले, कळ्या अन् बाग बघाया
शोध घेतला गुगलवरी
चित्र पाहिले लोभसवाणे
सभोवती दुष्काळ जरी
बागेश्रीची हसरी धुन का
आज जाहली रडकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

व्हर्च्यूअल या जगात आहे
अभासी आकाश निळे
अ‍ॅक्च्यूअल कंगाल असोनी
श्रीमंतीचा स्वाद मिळे
अमीर आहे जो तो येथे
खिशात नसता दिडकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

शब्द जुळवतो, कविता करतो
शांत शांत मी जगावया
दोस्त सांगती पोस्ट कराव्या
फेसबुकवरी दिसावया
संगणकाच्या नावानेही
मनात भरते धडकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !


निशिकांत देशपांडे मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com