एकटा चालू किती मी?
ना धराया बोट आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे
शोध घेतो, चाचपडतो
नीट ना कळतो कधी
चेहरा मज जीवनाचा
स्पष्ट ना दिसतो कधी
सूर्यकिरणे हरवलेली
अन् धुके घनदाट आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे
हुंदक्यांशी नाळ आहे
जोडलेली पण तरी रे
दोष ना तुजला दिला मी
जाण हे तू श्रीहरी रे
याचना? छे! आपलीही
खूप कॉलर ताठ आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे
राबता असता सुखाचा
जीवनाचा थाट आहे
दु:ख येता थोडकेही
वाटते ती लाट आहे
कुंभ भरला जीवनाचा
आज काठोकाठ आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे
तोंड ओळखही सुखाची
जाहली नाही जयाला
तो सुखी, दु:खात असतो
दु:ख ना वाटे तयाला
जेवणाला वाढलेले
वेदनांचे ताट आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे
दु:ख माझे ते तुझेही
ईश्वरा! आहे खरे ना?
वासही करतोस माझ्या
अंतरी तू हे खरे ना?
संगमी तुझिया नि माझ्या
मुक्त होण्या घाट आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mila-- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment