Wednesday, March 20, 2013

काय वेगळे जगून केले?


भार जाहलो धरेस मी हे
किती उशीरा कळून आले?
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

जसा जन्मलो वाढत गेल्या
सातत्त्याने माझ्या गरजा
शोध सुखाचा घेत राहिलो
करीत आलो रोज बेरजा
माझ्यातच मी गुरफटलेला
असेच जीवन सरून गेले
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

छाया देण्या ऊन झेलती
इतरांसाठी झाडे जगती
मंदमंदसा उजेड देण्या
तेवत असते सदैव पणती
परमार्थाचे विचार येण्या-
अधी मनातुन पळून गेले
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

आदर्शाची किती वानवा !
सारे दिसती भरकटलेले
मार्ग दावण्या कुणीच नाही
काळे गोरे बरबटलेले
इमानदारी अन् शुचितेचे
बुरखे सुध्दा गळून गेले
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

सरणावर भाजावी पोळी
टाळूवरचे खावे लोणी
हेच सूत्र जगण्याचे झाले
अपुले नसते खरेच कोणी
जग हे स्वार्थी इथे कुणी का
कोणासाठी झुरून मेले?
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

धरतीवरची माती व्हावे
जगास चारा देण्यासाठी
लाख असू दे सर्प भोवती
व्हावे चंदन झिजण्यासाठी
नकोच देवा जन्म मानवी
पशू अर्जवे करून गेली
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment