Thursday, March 14, 2013

माझी पहिली विदेश वारी

माझा मुलगा आणि सून आमेरिकेत बोस्टन येथे रहात होते. मुलगा सारखे बोस्टनला येण्याविषयी आग्रह करत होता. मी त्या वेळी नोकरीवर असल्याने रजा नाही या सबबीखाली टाळत होतो.एका शनिवारी फोन खणाणला.
फोनवर मुलगा बोलत होता. नेहमीचे बोलून झाल्यावर त्याने बाँबशेलच टाकला. म्हणाला तुमचे आणि आईचे मुंबई ते न्यूयॉर्क विमानाचे तिकिट कुरियरने पाठवले आहे. अमूक अमू़क तारखेचे आहे आणि बांधाबांध सुरू करा. प्रवास नक्की ठरला याचे मुख्य कारण म्हणजे प्रवासाच्या खर्चिक बाबीची काळजी मुलाने घेतली होती. नाही तरी मध्यवर्गातील महाराष्ट्रीयन माणसाने दरडोई ४५,००० रुपायाचे तिकिट काढून प्रवास करणे म्हणजे कपिलाशष्टीचा योगच! दुसरे महत्वाचे गोड कारण म्हणजे आम्ही दोघेही आजी आजोबा होणार होतो. तेंव्हा नाही म्हणून टाळायचा आता  प्रश्नच नव्हता.
प्रवासाचा ( मुंबई--बोस्टन व्हाया लंडन ) दिवस निश्चित झाला आणि घरातले वातावरणच बदलून गेले. सोबत काय काय घ्यायचे? मुलांना काय काय आवडते? सुनेचे बाळंतपण म्हणजे डिंकाच्या लाडूचे सामान, बाळंत झाल्यावर सुनेला रोज आळिवाची खीर आशा नाना विषयावर चर्चेच्या फैरी झडू लागल्या. वर "श्री गणेशायनमः" असे लिहून खरेदीच्या याद्या बनू लागल्या.
फोनवर संभाषण झाल्यानंतर चारच दिवसानी फेडेक्स या आमेरिकन पोस्टल कंपनीचा एक जाडजूड लिफाफा आला ज्यात दोन तिकिटे, व्हिसा मीळवण्यासाठी अवश्यक ती कागदपत्रे आणि प्रवासाच्या अथ पासून इती पर्यंत दिलेल्या सविस्तर सुचना होत्या. मला वाटते आमचा प्रवास हा साध्याच पण कधी न अनुभवलेल्या गोष्टी बघण्यामुळेच अविस्मरणीय झाला. आता हेच बघा ना ! आपणाला पाठवलेले पत्र देशातल्या देशात ८ ते १५ दिवसांनी पोहंचणे यात कांही गैर वाटत नाही. पण बोस्टनहून पाठवलेला लिफाफा चार दिवसात हाती पडला. येथूनच मनात अमेरिकेचे कौतुक वाटायला सुरू झाले.
तिकिटावरील सर्व सुचना (अगदी बारीक अक्षरातल्या) दहा वेळेस तरी मी वाचल्या असतील. ओघाने ओघाने ध्यानात आले की दरडोई दोन बॅगा आणि प्रत्येक बॅगेतील सामानाचे कमाल वजन ३२ किलो पेक्षा जास्त नसावे असे ध्यानात आले. आणि त्या अनुषंगाने खरेदीला सुरुवात झाली. १५ दिवस चर्चा आणि खरेदी हेच अव्याहपणे
 चालू होते.
आणि प्रवासाचा दिवस येऊन ठेपला.आम्ही मुंबईला सहारा इंटर नॅशनल विमानतळावर पोहंचलो. मनात एक सुप्त भिती होती.कारण आमची ही पहिलीच "खेप" (वारी) होती देशाटन करण्याची.
प्रवास एअर इंडीयानेच होता. प्रथम चेक इन काउंटरवर गेलो. वजनदार सामान तेथे हवाली केले.बॅग्ज भरताना आम्ही तरकाट्याने (स्प्रिंग बॅलन्स) प्रत्येक बॅगचे वजन करून कमाल मर्यादेत आहे याची खात्री करून घेतली . काऊंटरवर एका बॅगचे वजन ३२ ऐवजी ३० किलो भरले. मी आणि माझी पत्नी दोघांच्याही  मनात आले की अरे रे! अजून थोडे सामान घेता आले असते. इमायग्रेशन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून डिपार्चर लाउंज मधे थांबून थोड्या वेळातच आम्ही विमानात बसलो.
बहुतांश विमान प्रवासी  भारतीय होते.त्यांचे एकंदरीत वागणे, वेशभूषा, जीवनाचा प्रत्येक क्षण एंजॉय करण्याची वृत्ती बघून वाटत नव्हते की भारत एक गरीब देश आहे. ते विश्वच वेगळे होते. विमानाने झेप घेतली आणि आम्ही दोघांनीही डोळे मिटले. परक्या जगात सुखरूप प्रवास व्हावा म्हणून मनात अथर्वशिर्षाचे पठण करत  देवाचा धावा केला.
पहिला प्रवास हिथ्रो विमानतळ, लंडन हा साडेआठ तासाचा होता.तेथे उतरून आम्हाला वेगळ्या धावपट्टीवर जाऊन दुसरे विमान लंडन- न्यूयॉर्क पकडायचे होते. कोणत्या धावपट्टीवर विमानात बसायचे ते मुलाने कळवले होते. हे विमानतळ प्रचंड मोठे आहे.पहिल्या टर्मिनलवरून शेवटच्या टर्मिनलवर जाण्यासाठी रेल्वेने जावे लागते.आमची धावपट्टी त्या मानाने जवळ होती. आम्ही चालत गेलो. प्रत्येक ठिकाणी इंडीकेशन बोर्ड्स इतके स्पष्ट होते की आम्ही वीस मिनिटे चालल्यानंतर हव्या त्या धावपट्टीवर पोहंचून चेक-इन केले.पुढील विमानास अडीच तासाचा वेळ होता.थंडी कडाक्याची असूनही मी विमानतळाबाहेर फेरफटका मारला. त्यात प्रकर्षाने ध्यानात आलेल्या गोष्टी खालील प्रमाणे होत्या.
---अतिशय रूंद रस्त्यावर मी पाथवे वरून चालत होतो.कोठेही पथारीवाला दिसला नाही.
---सार्वजनीक रस्ता असूनही कोठेही घाण नव्हती.
---एकाही कोपर्‍यात कणीही थुकलेले दिसले नाही
---परिसरात कोठेही कुण्या दादाच्या किंवा भाऊच्या वाढदिवसाचे किळसवाणे फ्लेक्स दिसले नाहीत.
---"शादीके पहले या शादीके बाद"असे गुप्तरोग आणि लैंगिक समस्येवर इलाज करणार्‍या दवाखान्याच्या जाहिराती दिसल्या नाहीत.
I WAS MISSING MY INDIA COMPLETELY.
पुन्हा पुढील प्रवास सुरू झाला. न्यूयॉर्क विमानतळावर मुलगा आला होता.त्याच्या सोबत कारने बोस्टनला पोहंचलो आणि प्रवासाची नवलाई संपली.
यथावकाश एका नातीचे आम्ही आजी आजोबा झालो.नव्या बाळात सर्वच रंगून गेले.कशी गंमत असते नाही! बाळ जन्मले की पूर्ण कुटुंब त्याच्या भोवती फिरत असते. ते सर्वांच्या जगण्याचे केंद्रबिंदू बनते. आमचेही तेच झाले.ते दिवस आम्हासाठी स्वर्गसुखाचे ठरले.कसे उडून गेले कळलेच नाही. व्हीसाची मुदत संपत आली आणि परतीच्या प्रवासाचे वेध लागले. येताना खूप उत्साह, कुतुहल, उर्जा होती. परतताना नेमकं उलट घडत होतं.
मरगळ, मरगळ आणि फक्त मरगळ ! चिमुरड्या नातीत जीव एवढा अडकला होता की डोळे पुन्हा पुन्हा ओलावत होते.शेवटी विमानतळावर हुंदका आवरत मुलगा, सूनबाई आणि नातीला टाटा केला. निघायच्या आदल्या रात्री मनाची सारखी घालमेल होत होती.रात्रभर झोप नव्हती.  त्या रात्री नातीच्या विरहाचे दु:ख सांगणारी एक रचना झरणीतून ओघळली ती अशी :--

एकही नसता नभ आकाशी वीज कशी ही कडकडली?
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

निद्राधिन तो गोंडस चेहरा जणू चंद्रमा वसे घरी
संगमरमरी रूप लाडके आनंदाच्या पडती सरी
शांत स्पंदने असता छाती आज अशी का धडधडली?
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

तुझ्यामुळे ना कळले आम्हा दिवस कसे गेले उडुनी
सुख संसारी पीत राहिलो अमृत आम्ही सदैव बुडुनी
चाहुल येता तव विरहाची स्वप्ने सारी गडगडली
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

फुलांपासुनी सौरभ आणि चंद्रा पासुन शीतलता
वसंत ऋतुच्या पासुन होतिल दूर कधी का तरूलता?
सुंदर गाणे सोडुन जिंव्हा विरह गीत का बडबडली?
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

कस्तुरी मृग असताना सदनी धूंद राहिलो सुगंध पिउनी
दूर रहावे कसे तिजविना जीवन गेले सुन्न होउनी
सवय असूनी एकांताची मनोभावना चिडचिडली
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

परतीच्या प्रवासाची सांगता विरह भावनेमुळे एका वेगळ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली.




No comments:

Post a Comment