Sunday, March 24, 2013

(भाग-३) मराठी भाषादिनाच्या निमित्ताने


मराठी भाषादिनाच्या निमित्ताने समूहावर मला जे प्रश्न विचारले होते त्यांना प्रतिसाद मी दोन भागात दिला होता. कांही अपरिहार्य कारणाने कांही प्रश्नांना प्रतिसाद देवू शकलो नाही त्या बद्द्ल दिलगिरी व्यक्त करतो.
आज मी महेन्द्रने चारोळ्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाबद्दल थोडी चर्चा करतो. खरे तर महेंद्र स्वतःच उत्कृष्ट चारोळ्या लिहितो हे मला माहीत आहे. मी त्यच्या चारोळ्या लक्ष देवून वाचत असतो.
मी स्वतः चारोळ्या लिहीत नाही. पण चारोळ्या वाचतो. त्यातून माझ्या निदर्शनास जे आले ते येथ सांगत आहे.
कवितेप्रमाणे चारोळ्याचे कांही नियम असल्याचे मला माहीत नाही; आणि माझ्या वाचण्यातही आले नाहीत. पण ही रचना नाव सुचवते त्या प्रमाणे चार ओळींचीच असते. या मर्यादेमुळे थोडक्यात प्रभावीपणे सांगण्याची कसरत करावी लागते. यात कविच्या प्रतिभेचा कस लागतो. जरी आजकाल चारोळ्या उदंड झाल्याचे बोलले जात असले तरी; सुरेख चारोळ्या लिहिणे तसे अवघडच असते.
मी ज्या चारोळ्या वाचल्या आहेत त्यावरून मी चारोळ्या खालील प्रकारात विभागतो.
१)  अशा चारोळ्या ज्यांच्या चारही ओळीत यमक असते
२)  अशा चारोळ्या ज्यांच्या दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते.
३)  अशा चारोळ्या ज्याच्या पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते
४)  आशा चारोळ्या ज्यात यमक नसतेच.
या व्यतिरिक्त खालील प्रकार पण आहेत.
अ)  कांही चारोळ्या गजलेच्या वृत्तात असतात. त्यांच्या पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते. अशा चारोळ्यांना "मुक्तक" असे म्हणतात.उदाहरणा दाखल मी रचलेली दोन मुक्तके देत आहे.
१)  देत जा जखमा मला तू वेदनांचेही झरे
    भळभळू दे अन् पडू दे लाख हृदयाला चरे
    झेलता तव घाव ताजे विसरतो मी त्या जुन्या
    वेदनांना, अन् मनाला वाटते थोडे बरे>>>>>>>( देवप्रिया वृत्त )

२)  जी मनी बसली कधीची ती घरी आलीच नाही
    जी घरी आली रहाया ती मनी बसलीच नाही
    लावला मी मुखवटा अन् जिंदगी तडजोड बनली
    झाकली भळभळ अशी की ती कुणा दिसलीच नाही>>>>>>( व्योमगंगा वृत्त )

ब)  गजलेच्य वृत्तातील ( वरील प्रमाणे ) चारोळी जर उर्दूत लिहिली तर त्याला "कतआ" म्हणतात.

क)  रुबाई हा एक काव्य प्रकार आहे जो फक्त चार ओळींचा असतो. रुबाई हा काव्य प्रकार फार्सीत ऊमर खय्याम याने लोकप्रिय केला. रुबाईचे अनेकवचन रुबाइयात असे आहे. रुबाईचे अपले ५४ वृत्त आहेत. यातच रुबाई लिहावी लागते. खाली  डॉ. शेख इकबाल मिन्ने यांची एक रुबाई उदाहरणा दाखल देत आहे.

दु:खद माझे जीवन सारे जगलो
हरलो सारे मात्र नव्याने लढलो
डोक्यावर आकाश कितीदा पडले
मात्र लपोनी भीत कधी ना बसलो >>>>>( वृत्त-मिहिर )

रुबाईच्या संदर्भात अजून बरेच नियम आहेत पण त्या क्लिष्ट क्षेत्रात जाण्याचे सध्या प्रयोजन नाही.
 नियमात अडकून बसण्यापेक्षा चारोळ्या भरपूर वाचव्यात आणि तंत्र आत्मसात करावे. मी श्री. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांचे वाचन आणि मनन करण्याचे  सर्वांना सुचवेन.चारोळ्या गजलांप्रमाणे वाचकांच्या हृदयास भिडायला हव्यात. काय सांगायचे आहे ही प्रस्तावना पहिल्या तीन ओळीत आणि प्रभावी शेवट (क्लायमॅक्स) शेवटच्या ओळीत असा यावा की वाचकाने लागलीच दाद दिली पाहिजे.
सर्व चारोळी रचनाकारांना माझ्य हार्दिक शुभेच्छा.


  

No comments:

Post a Comment