Friday, October 25, 2013

उशीर झाला


दिला आवळा का नेत्याने?
उमजायाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

पाच पाच वर्षांनी येती
राजकारणी भीक मागण्या
जुन्या योजना पुन्हा नव्याने
सांगत आम्हा भुरळ घालण्या
विकास त्यांचा दैन्य आमुचे 
कळावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

कल्याणाच्या सर्व योजना
नाव जोडले नेहरू, गांधी
सावरकर, जयप्रकाश म्हणता
संतापाची येते आँधी
एक घराणे=प्रजातंत्र हे
पचावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

किती खर्चले? कितॉ चोरले?
दिलाच नाही हिशोब कोणी
मिटक्या मारत कुणी चाटले?
गरिबांच्या टाळूचे लोणी
षंढ प्रजेला यक्षप्रश्न हे
पडावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

श्राध्द कराया, भारत देशा !
राजकारणी सज्ज जाहले
डोंबकावळे पूर्वज त्यांचे
आत्मे गगनी फिरू लागले
अतृप्तीने पिंड कावळा
शिवावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

कवी, शायरांनो बस आता
तो अन् ती च्या रटाळ कविता
शोधा स्फुल्लिंगांची वस्ती
रान पेटवा क्रांतीकरिता
फुंकर मारा राख उडवण्या
धगधगायला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment