Friday, November 1, 2013

तू नसल्याचे मनी रितेपण


गझलेच्या मैफिलीत जेंव्हा
रंग लागतो भरावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

नंदनवनही कवेत होते
तुझ्या सोबती वावरताना
एक निराळी धुंदी होती
पडताना अन् सावरताना
सुवर्णक्षण जे कधी भोगले
तेच लागले रुतावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

अनुभवला स्पर्शात तुझ्या मी
कायापालट जीवनातला
शक्य जाहले अशक्य ते ते
ऋतू भेटला श्रावणातला
अक्षर ओळख नसून सुध्दा
गीत लागलो लिहावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

परीघ अपुल्या स्वप्नांचा तर
क्षितिजाच्या पण पल्याड होता
खाचा खळगे पदोपदी अन्
समोर मोठा पहाड होता
हात घाट्ट हातात असू दे
जमेल तितके चढावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

जीवन म्हणजे एक खण्डहर
वैभव जेथे कधी नांदले
आठवणींचा जुना खजाना
शुन्य आजच्या क्षणी राहिले
आयुष्याच्या जुनाट भिंती
रंग लागले उडावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

शेवटचा हा पडाव आहे
सुरकुत्यासवे रहावयाचा
बघून मागे आठवणींना
देत उजाळा जगावयाचा
पुढील जन्मी प्रभात किरणे
पुन्हा लागतिल दिसावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail=== nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment