Thursday, October 10, 2013

हवाहवासा गुदमर आहे


जन्मदिनाच्या लाख शुभेच्छा
ओझे झाले मणभर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे


अंधाराचा मी रहिवासी
किती कवडसे गडे धाडता?
ओबडधोबड व्यक्तित्वाला
अगणित पैलू तुम्ही पाडता
शब्द फुटेना व्यक्त व्हावया
ओठावरती थरथर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

शाई, कागद सज्ज लेखणी
माझ्यावर मी काय लिहावे?
माझी ओळख ,मलाच नसता
चित्र कसे मी रेखाटावे?
आत्मचरित्री पानोपानी
कृतज्ञतेचा वावर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

ऋणी तसा तुमचा पण आहे
गझला, कविता अन् शब्दांनो
खूप लाभल्या मित्र-मैत्रिणी
दूर पळा तुम्ही अब्दांनो
मुक्त कराने नशीब देता
अता कशाची मरमर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

किती घेतले, किती राहिले
श्वास कशाला हिशोब करता?
किती भेटले किती जोडले
मुजून घ्यावे जगता जगता
आठवणींना दरवळण्याचा
वाढदिवस हा अवसर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

वठलेल्या वृक्षास अचानक
कशी पालवी फुटू लागली?
कोरडवाहू शेत असोनी
ओलाव्याची भूक भागली
संतुष्टीच्या सायंकाळी
पाठीशी लंबोदर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment