Saturday, October 12, 2013

असे नेहमी वाटायाचे


प्रजक्ताच्या पायघड्यांवर
ठसे तुझ्या दिसता पायाचे
सुगंधात तू लपली असशिल
असे नेहमी वाटायाचे

सतेज कांती, रूप नशीले
मनी ठरवले वहावयाचे
माझ्यापासुन स्वतःस आता
तुलाच आहे जपावयाचे

वसंतासही वेड लागले
स्वप्न नव्याने फुलवायाचे
तुझ्या चेहर्‍यावरती म्हणतो
रंग हजारो उधळायाचे

मैफिलीतली शमा असोनी
सोड इरादे जळावयाचे
तुला शायरीमधून माझ्या
अजून आहे मिरवायाचे

असूनही नसल्यासमान का
ठरवलेस तू असावयाचे?
जरी चांदणे पांघरतो मी
कसे ओंजळी भरावयाचे?

खाचा, खळगे मला, मखमली
गवतावर तू चालायाचे
दूर पाहता तुला सुखी, मी
मनी खुशीने हुरळायाचे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment